Sunday, 10 August 2014

मैत्र जीवाचे

या आभासी जगाला आभासी तरी का म्हणावं अशा २-३ घटना गेल्या काही महिन्यात घडल्या. परभणीकर मित्रांनी कडकडून दिलेली भेट असो, कुणी बरेच दिवस दिसलं नाही तर मेसेज पाठवल्यावर मिळालेला मैत्रीपूर्ण प्रतिसाद असो आणि मग गेल्या महिन्यात अमेरिकेत नुसत्या फेसबुकच्या मैत्रीवर मिळालेली कल्पनातीत मदत असो. मानसच्या उपचाराबद्दल मी लिहीलेच होते. बोस्टन मधे Boston Children Hospital मधे treatment होती. झालं मानस त्यांच्या आईवडिलांबरोबर अमेरिकेत पोहोचला. इथे अनिकेत ने मला सांगितलंच होतं की प्रवीण बोस्टनजवळंच राहतो. मग मी प्रवीणला मेसेज केला अन परिस्थिती सांगितली. त्याने सांगितलं की यथाशक्ती मदत करेल, पण तु तर शक्तीमान चं निघालास रे मित्रा. मकरंद ची अन माझी अजून प्रत्यक्ष भेट नाही झाली, पण त्याने जे तुझ्याबद्दल, तुझ्या पत्निबद्दल सांगितलं त्याने माझ्या मनात तुम्हा दोघांबद्दल प्रेमयुक्त आदर दाटून आला आहे. तुझं त्यांच्या अमेरिकेच्या वास्तव्यात इतक्यांदा ४५ किमी ड्राईव्ह करून येणं, आणि नुसतेच येणं नाही तर प्रत्येकवेळी काही ना काही गरजोपयोगी वस्तु आणणं आणि घरापासून १०००० किमी दूर एका अख्ख्या कुटुंबाला घरपण देणं. ते ही या तथाकथित आभासी जगातील मित्राच्या एका हाकेवर.

Virtual world या माध्यमाचे मनात धडकी भरवणारे अनुभव ऐकले पण या पार्श्वभूमीवर मला आलेले अनुभव अगदी आनंददायी आणि प्रवीण, तु या फॅमिली ला केलेली मदत ही आतापर्यंत च्या अशाच अनुभवाची सर्वोच्च पातळी आहे.

आता नुसतं बोलघेवडं आभार तरी कसं मानू. अनंत ऋणांच्या ओझ्याखाली दबलेलो मी हे पण ऋण पण वाहीन म्हणतो. तसंही या ओझ्याचा त्रास होत नाही आणि कुणास ठाव, उतरेवनही कदाचित.

आता काही व्यवहार्य लोकं म्हणतीलही, की हा तुमचा प्रेमालाप पर्सनल मेसेजमधे टाका, आम्हाला कशाला ऐकवताय.  पण मित्रांनो, तासाभरच्या प्रवासात पाच मिनीटासाठी कुणाचं डोकं खांद्यावर आलं तर ते ओझं देखील सहन न होणार्या जगात जर असे अनुभव शेअर करण्यात या माध्यमाचा उपयोग केला तर काय हरकत आहे. 

No comments:

Post a Comment