Wednesday, 27 August 2014

We learn English

He has ran इतकं म्हणालो आणि पाचवीला पेठे हायस्कूलमध्ये परांजपे बाईंनी काडकन वाजवली. इतकी कि वो थप्पड कि गुंज आज भी सुनाई देती है. थोडक्यात मार खाणं मला पाचवीला ला पूजलं. तेव्हापासून माझा इंग्रज अन इंग्रजी या दोन्हीवर प्रखर राग आहे. पुढे सातवीला जोशी सरांना वाटलं कि याचं इंग्रजी बहुधा बरं आहे आणि त्यापेक्षा पाठांतर चांगलं आहे म्हणून अभिमन्यूची गोष्टं इंग्रजीतून सांगण्याच्या स्पर्धेत निवड केली. इथे खेडयातून मुलं आली होती. बिचारी इंग्रजीतून भाषण करण्यासाठी. ते भाषण त्यांनी देवनागरी त लिहून आणलं होतं. आणि घोकत होती. (दोन महिन्यापूर्वी माझ्या दहा वर्षाच्या मुलानी मराठीत एक नोट लिहिली. मराठी देवनागरीत लिहिता येत नाही म्हणून त्याने इंग्रजी अल्फाबेट मध्ये लिहून काढली. दिवस असे बदलले आहेत) यथावकाश यांत्रिकी अभियंता झालो, हे मात्र अति झालं, mechanical engineer झालो. इंग्रजी शिवाय दुसर्या कुठल्याही भाषेत हे शिक्षण नव्हतं म्हणून मोडकं तोडकं का होईना बोलू लागलो. walking talking shivaji fell a king (बोलून चालून शिवाजी पडला राजा). SKF मध्ये बरीच स्वीडिश. जर्मन मंडळी असायची पण ती आपल्याच जातीची, म्हणजे इंग्लिश च्या बाबतीत हो. (जात हा शब्द लिहिताना सुद्धा आज काल माझे हात थरथरतात, गात्रे शिथिल पडतात, इतका मी या फेसबुक मुळे त्या शब्दाचा धसका घेतला आहे).

आणि मग मी बंगलोर च्या रोलोन नावाच्या कंपनीत जॉईन झालो. मी पुण्याला अन ऑफिस बंगलोर. बॉस चं नाव बोनी. त्याला हिंदी अ कि ठ कळत नव्हतं. मला त्याच्याशी रोज बोलावं मात्र लागायचं. मग माझ्या अगम्य अशा इंग्रजीत मी संवाद साधू लागलो. बोनी पण बिचारा चांगला माणूस, आजही तो माझा चांगला मित्र आहे, मला समजून घ्यायचा. चार सहा महिन्यात वाक्य व्यवस्थित जुळू लागली. म्हणजे मी बोनी चा फोन आला कि बहुधा इंग्रजीत विचार करू लागलो. ९६-९७ नंतर अमेरिकेहून खूप लोकं यायची आणि मग मला घेऊन त्यांना फिरावं लागायचं. बोनी चा आणि आमचा एम डी संजीव यांचं written communication माझ्यापर्यंत पोहोचायचं. त्याने माझंही drafting सुधारलं. थोडक्यात या सगळ्या प्रकारात हळू हळू मी इंग्रजाळू लागलो.

अन आता काय त्या इंग्रजीचं काही कौतुक राहिलं नाही. जगभरच्या लोकांशी संवाद साधताना ना त्याचं अप्रूप ना काही कौतुक. अर्थात त्याचं सगळं श्रेय रोलोन च्या ८ वर्षाच्या नोकरीला अन अर्थात बोनीला. तरी आमचं मोठं पोरगं convent चं, मग चुका काढतं. पण ठीक आहे. पण एक मात्रं आहे माझी अन त्या भाषेची नाळ काही जुळली नाही. म्हणजे मी इंग्रजीच्या उत्तमोत्तम साहित्याला मी मुकलो आहे हे तेव्हढंच खरं. आणि त्या भाषेतील चित्रपटापासूनहि  दूर राहिलो हे पण नाकारत नाही. नाही म्हणायला Fountainhead, The Goal, Godfather, Second Lady, Papilon अशी ५-५० वाचलीही असतील किंवा आता फेसबुक चं account नाही म्हंटल्यावर डोळे विस्फारतात तसं त्यावेळेस where eagles dare, Guns of Navarone, good, bad ugly, An Officer and A Gentleman  हे चित्रपट नाही बघितले म्हंटला कि पोरंपोरी  फिदफिदायची, म्हणून काय ते १०० एक पिक्चर बघितले असतील तेव्हढेच. बाकी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी.

असो. या सगळ्यांची आठवण या साठी कि आकाशवाणी वर कार्यक्रम चालतो "We learn English" आम्ही इंग्रजी शिकतो. मी थोड्यावेळ गम्मत म्हणून सुनिता मावशीला ऐकायचो अन मग channel बदलायचो. आज अचानक या तीन वर्षापासून चालणार्या कार्यक्रमाने खेडोपाड्यात कसा इंग्रजीचा प्रसार केला हे ऐकत होतो. शाळेतली गुरुजी सांगत होते कि ते कसा सराव करून घ्यायचे पोरापोरीकडून. छान वाटत होतं. आणि मग अचानक कार्यक्रमाची सुनिता मावशी म्हणाली "आता मुलामुलींच्या प्रतिक्रिया ऐकू" आणि ९-१० वर्षाच्या मुलामुलींचे मंजुळ आवाज कानी पडू लागले "I am Sunil Londhe. I am 9 years old. I am studying in class 5"
"I am  Shital Kapre. I am 10 years old. I am in Jilha Parishad School" काय नव्हतं त्या आवाजात. अप्रूप, आत्मविश्वास. त्यांच्या चेहऱ्यावर हसू आहे हे मी रेडियो त हि बघत होतो. काहीच कारण नव्हतं तरी माझा गळा दाटून आला. त्या पोरांना इतकंच म्हणावं वाटतं "Congrats Dude". (इथं कदाचित काहीना वाटेल कि उगाच भावुक वाक्य वैगेरे, पण केवळ इंग्रजीत express होउ न शकल्यामुळे संधी गमावल्यांना विचारा)

हे खरं काम. नाही का. मी तर त्या सुनिता मावशीला मनोमन नमस्कार केला. न कंटाळता इतकं किचकट काम त्या आपल्या साथीदारासह रोज करायच्या आणि त्याचा परिणाम मी याच कानांनीहि ऐकला.

मला तर खरंच वाटतं हे कितीही एफ एम उड्या मारू देत किंवा टी व्ही channel घसा खरवडून ओरडू देत, सालं आकाशवाणी आणि दूरदर्शन चं स्थान अबाधित राहावं. Salute



No comments:

Post a Comment