Wednesday 13 August 2014

जाॅईंट वेंचर

सन २०१०. युनिडो (युनायटेड नेशन्स इंडस्ट्रीयल डेवलपमेंट ऑर्गनायझेशन, अबब) काही होतकरू कंपन्यांच्या शोधात होती. म्हणजे छोट्या कंपनीला तंत्रज्ञानाद्वारे अजून अपग्रेड करायचा प्रोग्राम होता. त्यात माझी कंपनी "छोटी" या सदरात चपखल बसत होती. त्याच्याहि खाली "खूप छोटी" किंवा मायक्रो अशी काही लेवल असली असती तरी आमच्या कंपनीची दखल घ्यावी लागली असती. बरं तंत्रज्ञान दृष्टया प्रगत करायचा ध्यास. इथं तर आम्ही सगळ्यात पात्र उमेदवार. म्हणजे तंत्र तर आमच्या आस पास नव्हतं आणि ज्ञान, काय जोक करता राव. त्यामुळे माझी मुलाखत झाली. आणि अमेरिकेला जायच्या दौऱ्यावर सिलेक्शन झालं.

या सगळ्या प्रकारात युनिडो आम्हाला या ट्रीपचे निम्मे पैसे देणार होती. आता आलं लक्षात हे सगळं का सांगत होतो ते. बाकीचं जावू दया, ट्रीप निम्मी स्पोन्सर होणार होती. पूर्ण नाही झाली, यामुळे खट्टू झालो होतो. तेव्हा अशा निम्म्या आनंदानिशी मी अमेरिकेला जाण्याच्या तयारी ला लागलो.

IMTS नावाच्या प्रदर्शनात जायचं होतं. ते बघून मिशिगन युनिवर्सिटी ला आणि काही वाहन उद्योगांना भेट असा कार्यक्रम होता. त्या नंतर ग्रुप फुटून सगळे जण आपापल्या पर्सनल कामाला जाणार होते. मी सेटको नावाच्या कंपनीच्या प्रेसिडेंट ला भेटणार होतो. डेट्रोइट  इथे मिटिंग ठरली. आमच्या भारतातल्या कंपनीत एक विशिष्ट प्रकारचे स्पिंडल टेस्ट करण्यासाठी टेस्ट रिग मला हवी होती जी मी या सेटको कंपनीकडून घ्यायच्या उद्देशाने आलो होतो. आता माझ्यासारख्या झिंगुराने असं करणं म्हणजे रस्त्यावरच्या कोपर्यावर दुचाकी दुरुस्ती करणाऱ्याने राजीव बजाज ला काही पल्सर चं टेस्टिंग ची मशीन मागण्या सारखं होतं.

झालं, मिटिंग सुरु झाली. माझ्या समोर जेफ क्लार्क हा प्रेसिडेंट अन डेव्ह नावाचा अगडबंब माणूस बसला होता. मी कंपनीचं प्रझेंटेशन देत होतो. हे पाॅवर पाॅईंट मधे लोकं इतकं भारी प्रेझेंटेशन कसं बनवतात हे एक कोडंच आहे. कधी गोष्टी खालून, कधी बाजूने अन काय काय. त्या मानाने आमचं म्हणजे एकदम साधं वरण, सपक एकदम. मी बोलत असताना जेफ़ त्याच्या डोळ्याच्या कडेतून डेव्ह कडे बघायचा हे मी माझ्या डोळ्याच्या कडेतून बघायचो. माझ्या चाणाक्ष नजरेत हे पण दिसायचं की डेव्ह त्यावेळेला मेन दरवाजाकडे बघायचा. थोडक्यात मिटींग झाल्यावर मला बाहेरचा रस्ता दाखवण्यात येईल हे मी ताडलं.

पण घडलं भलतंच. मिटींग झाल्यावर जेफ़ म्हणाला " बाळ राजेश, ते तुझ्या टेस्ट रिगचं नंतर बघू, तूर्तास आम्ही भारतात तुझ्या कंपनीबरोबर एकत्र काम करायचं असं ठरवतोय. जाॅईंट वेंचर. तुझं काय म्हणणं आहे" हे म्हणजे साक्षात माधुरीने मला, हे जरा जास्त होतंय का, बरं जाऊ द्या, आदित्य पांचोली ला "आज संध्याकाळी जुहू चौपाटीला भेळ खायला येतोस का" असं विचारण्यासारखं होतं. (उदाहरण माधुरीचं दिलं तरीही माझी मध्यमवर्गीय भूक हे भेळेपलीकडे जाऊन पाठचं हाॅलीडे इन नाही बघू शकत हो).

जेफ़ मला हे सांगत असताना डेव्ह च्या तोंडावर मात्र " जेफला बहुधा वेड लागलंय" असे भाव होते. आणि खरंतर माझ्याही मनात तेच येत होतं. कारण ते राजा भोज अन आम्ही गंगू तेली.

असो. पुढे दीड वर्ष चर्वण झाल्यावर १४ जुन २०१२ रोजी पुणे स्थित, नांदेड नामक गावी वसलेली आमची छोटीशी कंपनी अचानक बहुराष्ट्रीय कंपनीचा भाग झाली. सगळ्यांनी अभिनंदनाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव केला. म्हणजे आमचं अभिनंदन केलं अन जेफला शुभेच्छा़ दिल्या. त्याला त्याची आता नितांत गरज होती.


No comments:

Post a Comment