Saturday, 29 November 2014

रविवारचे रिकामे उदयोग

च्या मारी, शप्पथ सांगतो, या इंग्रजीने घात केला. नाही तर फेसबुकवर जेव्हढे तारे तोडतो, तेवढे Linked In वर तोडले असते ना, बिझिनेस डबल तरी केला असता एव्हाना. (झुक्याला सांगू नका रे कोणी. नाहीतर linked in चं मार्केटिंग केलं म्हणून माझं अकौंट च ब्लॉक करायचा).

आता हेच बघा ना, गेले काही दिवसांपासून फेसबुक अगदी स्पिंडल मय झालं आहे. Multifaceted शिवा ने माझ्या विनंतीला मान देऊन माझं स्केच काढलं अन त्यात गळ्यात स्पिंडल अडकवला. मेडलच जणू. नर्मविनोदी यशवंत पाटील यांनी तिथेच मला Amazing Spindleman हि पदवी दिली. ती वाचल्या वाचल्या मी भिंतीवर चढून बसलो. ह्या पदवीदानाची तुलना मी फक्त लोकमान्यांनी नारायण रावांना (हे राजहंस, राणे नव्हे) बालगंधर्व म्हंटले या घटनेशी करू शकतो. भरीस भर म्हणून कि काय पण आमचे परम मैतर अनिकेत बोंद्रे मुरुमकर यांनी मी राजेश स्पिंडलिक असे नामकरण करावे हे हि सुचवले. सध्या हे औरंगाबाद च्या दौऱ्यावर आहेत. माझ्या प्रदेशाचे पाणी पिल्यामुळे आमची मैत्री अजून दृढ होईल यात शंका नाही. मला आठवतंय पत्नीमित्र (इथे हा अर्थ अनेकांच्या पत्नीचे मित्र असा बहुवचनी नसून, माझ्या एकमेव पत्नीचे मित्र इतका एकवचनी घ्यावा) हृषीकेश कुलकर्णी एकदा म्हणाले "राजेश चं नाव घेतलं कि मला तो वैभवीचा नवरा आहे हे दिसत नाही, तो इंजिनियर आहे ते कळत नाही, तर फक्त स्पिंडल दिसतो." परवा (खरंतर दोन महिन्यापूर्वी, पण एका वर्षापूर्वीच्या सगळ्या घटनांना आमच्या मराठ्वाड्यात "परवा" असंच म्हणतात) जर्मनीत त्याला  स्पिंडल या विषयावरून इतकं पकवलं कि आता परत तो स्पिंडल च नाव म्हणून काढणार नाही. पराशर अग्रो टुरिझम चे सर्वेसर्वा मनोज याने सुद्धा मला "ये इलू इलू क्या है" च्या धरतीवर विचारले "ये स्पिंडल स्पिंडल क्या है". आता हाच प्रश्न मला मनीषा कोयराला सारख्या कुणी सुंदरीने विचारला असता तर त्या विवेक मुश्रन सारखा लाजलो हि असतो. (विवेक मुश्रन चं नाव आठवलं राव, मानता कि नाही आपल्या मेमरीला). नाही म्हणायला राजेंद्र गानू सर ही मला इतके मस्त प्रश्न विचारत आहेत कि मला खात्री आहे, एक दोन महिन्यात ते मला सांगणार "अरे, जरा XXXXX कंपनीत visit करून ये, तिथे ५० एक मशिन्स आहेत. तुझा चांगला बिझिनेस वाढेल." (XXXXX याचा अर्थ या लेखापुरता सभ्य घ्यावा.). मध्ये दिवाळीला आपल्या सगळ्यांचा आवडता गणेश ने स्पिंडल ला जणू नववधू समजून असे बहारदार फोटो काढले कि काय सांगू. फेस बुकर प्राईज विजेत्या प्रिया प्रभुदेसाई या सुद्धा स्पिंडल बिझिनेस वर प्रोत्साहनपर कोटस टाकत असतात. (प्रिया ताई, तुम्हाला अरुंधती रॉय बद्दल फारसं ममत्व नसावं. पण हे फेसबुकर प्राईज आहे याची नोंद घ्यावी)

इतका सगळा गदारोळ झाल्यावर मी माझे नाव "राजेश स्पिंडलवाला" वाला का करू नये, या माझा मित्र सुबोध याच्या सुचनेवर मी गंभीर विचार करत आहे. (ज्याच्या बाईक मुळे या पामराचं प्रोफाईल पिक्चर मोनालिसा सारखं जगप्रसिद्ध झालं त्या बाईकचा मालक सुबोध आहे.) तसंही ५०% पेक्षा जास्त बोहरी शेजार असलेल्या आमच्या सोसायटीत हे नाव चपखल बसेल.

आता हे सर्व लिहिल्यावर "लवकरच येत आहे: स्पिंडल म्हणजे काय" अशी, बर्याच जणांना आवडणारे आणि बर्याच जणांना न आवडणारे माझे मित्र डॉ अभिराम दीक्षित यांच्या स्टायल ची पोस्ट नक्कीच पडेल.

खरं तर या लेखातल्या सगळ्यांना tag करणार होतो. पण विजयकुमार देशपांडे सरांच्या उघडtag  विरोधी पोस्ट मुळे आणि मीराताई यांनी काढलेल्या चिमट्या मुळे माझं मानसिक सक्षमीकरण झालं आहे. त्यामुळे ते महापाप माझ्याकडून कदापि होणार नाही. (तसं ते छोटंच पाप आहे, पण आजकाल या भूमीवर प्रत्येक गोष्टीमागे "महा" लिहिण्याची fashion आहे) काय आहे, फेसबुकवर नवीन आलो होतो, तेव्हा आपलं घर च्या विजय फळणीकर यांच्यावर लेख लिहिला होता. तो सर्वदूर पोहोचावा म्हणून tag चा सहारा लेखात सांगून घेतला होता. पण तरीही एक मित्रवर नाराज झाले होते. मग मीही त्यांच्यावर शरसंधान केले. बरं तेही मला ब्लॉक करत नाही अन मी हि त्यांना. हे म्हणजे एका वर्गात बाकावर बसून न बोलण्यासारखं आहे. (तुमच्या पेज ला लाईक करण्याची तुमची आज्ञा ही मान्य केली हो. आता तरी सोडा नाराजी).

(लेखात नेहमी प्रमाणे कंस जास्त झाल्यामुळे "फेसबुकवर चा कंस" या निलेश बंडाळे यांनी मला दिलेल्या उपाधीला जागलो आहे हे नम्रपणे नमूद करतो.) खरं तर कंसाबाहेरचे वाक्य कंसात टाकून आणि कंसात लिहायचे वाक्य कंसाबाहेर लिहून मी निलेशच्या आरोपाचा योग्य परामर्श घेतला आहे हे गर्वाने नमूद करतो आणि थांबतो.

रविवारचे रिकामे उदयोग

Wednesday, 26 November 2014

Amchi Kampani

काल फारच डोकं भनकल होतं. हा म्हणजे गोष्टच तशी घडली. नाही म्हणजे असेल तुमची मल्टी national वैगेरे. आहात तुम्ही माझे नेहमीचे कस्टमर. हे जे आले होते ते वेगळं department, नेहमी ओर्डर येते ती वेगळी लोकं. मला म्हणाले "आम्ही हे काम नेहमी करतो आणि मास्टर आहोत. आमच्या पद्धतीने तुम्ही काम करायचं. तेव्हा आमची दोन लोकं काम पूर्ण होईपर्यंत तुमच्या माणसाबरोबर काम करतील. त्याला सांगतील काम कसं करायचं ते " शक्यतो आम्ही कुणाला असेम्ब्ली कशी करतो ते दाखवत नाही. पण कंपनी मोठी, दुसर्या डिविजन मधून येणारा बिझिनेस चांगला. म्हंटल ठीक आहे. पाठवा तुम्ही लोकं. शिकायला तर मिळेल.

आली दोघे जण. कदम आणि शेख नावं ठेवू. आणि काम चालू झालं. लेकाच्यांना काही म्हणता काही माहित नव्हतं.आमचा technician इरफान, पाहिजे ती मदत करत होता. मोठी होती हो स्पिंडल असेम्ब्ली. ती पूर्ण झाल्यावर म्हणाले "नाही हे बहुतेक चेक करायचं राहिलं आहे. असेम्ब्ली परत उघडा." गम्मत नाही हो ती असेम्ब्ली उघडायची. इरफान ने गपगुमान उघडली. जे चेक करायचं ते केलं. इरफान ने काम एक नंबर केलं होतं. बिनकामाची हमाली झाली होती. परत झालं सगळं काम.

आता टेस्टिंग. त्याच वेळेस मी तिथून जात होतो. मला बोलले "इथे आम्हाला हा एक parameter असा पाहिजे." आता ते टेक्निकल आहे म्हणून लिहित नाही, पण थोडक्यात "या भिंतीला luster पेंट लावून पाहिजे, पण मध्ये जर धब्बा दिसला पाहिजे किंवा फोफडे उडले पाहिजे" असं काही तरी. मी म्हणालो अहो हे नाही जमणार. उदया तुम्ही poultry मध्ये जाऊन म्हणाल "मला जरा नासकी अंडी पाहिजेत हो." तर म्हणाले "नाही आम्हाला तसंच पाहिजे." तर इरफान म्हणाला "अहो तसं करायचं असेल तर करून देतो पण लॉक नट लूज ठेवून स्पिंडल चालवावा लागेल." तर कदम भडकला ना "इरफान, तुला कळतं का काय बोलतो ते. नॉन टेक्निकल बोलतोस. असं कधी असतं का"

मग मात्र इतका वेळ शांत बसलेलो मी, सटकलो. त्याला बोललो "ए भाऊ, तू त्याची अक्कल काढतोस. तुझी जागेवर आहे का. तुम्ही जे मागताय ते तरी कधी असतं का? सकाळपासून माझा माणूस तुम्ही सांगाल ते काम करतोय. तुम्हाला जास्त नॉलेज म्हणून तुम्ही येणार होते. तुम्हाला माहित तर काहीच नाही वर आमच्या माणसाला शहाणपणा शिकवताय. हा जॉब उचला आणि जावा घेऊन" कदम सटपटलाच, तरी म्हणाला "कुणाला बोलताय कळतंय का. बिझिनेस जाईल तुमचा इतका मोठा."

मी बोललो "ओ कदम, तुमच्या या बिझिनेस पेक्षा मला माझ्या पोराचा, इरफानचा सेल्फ एस्टीम जास्त महत्वाचा आहे. तुमची भंकस ऐकून घ्यायला तो काही बांधील नाही आहे. आमच्या कंपनीत येउन आमच्याच माणसाची अक्कल काढताय, त्याची काही चुकी नसताना. नको मला तुमचा बिझिनेस."

"बघतोच तुम्हाला" वैगेरे म्हणत गेला. मी दट्ट आहे माझ्या भूमिकेवर. इरफानची चूक नसताना त्याच्यावर चिखलफेक करणाऱ्या कंपनीचा बिझिनेस नकोच मला, कितीही मोठी असू दे न ती.  

सल्ला

बर्याचदा वाचायला मिळतं, फेसबुकवर कमी यायला पाहिजे. व्यसन आहे. इथे बऱ्याचदा डोक्याला ताप होतो. आठवडयातून एकदाच यावे. कंपल्सरी पोस्ट टाकायच्या नाहीत. comment टाकायच्या नाहीत. फक्त लाईक द्यायचं. गेल्या दोन एक महिन्यात असे काही मेसेज आले कि मलाही वाटलं कि आपण पण इथला वावर जरा कमी करावा. नाही म्हणजे, आपली प्रकृती अशी कि कुणी "हाड" म्हणल्याशिवाय आपण काही जागचं हलत नाही. पण आता मेसेज खाली दिले आहेत.

********************************************************************************
मी लहानसा व्यावसायिक आहे. गेल्या दहा वर्षात प्रचंड चढ उतार अनुभवलेत . 8करोड वार्षिक उलाढाल पर्यंत पोहचून परत प्रचंड अपयश हि पाहतोय. अनेक professional motivation आणि managment सेमीनार्स ,पुस्तके , चिंतन ,psychiatrist  सगळे झाले. पण तुमच्या साध्या सरळ अनुभव सिध्द लिखाणाने जितक बळ  मिळाल तितक कशानेच नाही मिळाल ! धन्यवाद ! नाही तर शेतकरया सारखी उद्योकाकाची आत्महत्या का असू नये ..असे विचार भुंगा करीत डोके कुरतडत असतात. अर्थातच मी इतका दुर्बल नाहीच !पण थकतो हे मात्र खर ! कुठल्याही व्यावसायिक ,अथवा आर्थिक लालसे शिवाय एकदा तुम्हाला भेटुन , बोलून स्वतः ला अधिक channelized करता येईल असे वाटतंय. कारण आज सर्वाधिक गरज आहे ती एका friend, philosopher आणि guide ची . आपण थोडा वेळ दिलात तर आनंद होईल. धन्यवाद !!

*********************************************************************************

Rajesh, kindly give your Pune address where I can meet you next time when I come to Pune..I read your observations on automobile industry and without hesitating requesting your half an hour time to seek your guidance specifically on "Challenges in passenger car segment and future trends" I will inform you two days in advance before planning. I am based at Hyderabad. I hope you will love to help and will share your knowledge and experience. Thanks in advance 

*********************************************************************************

आता आली का पंचाईत. नाही म्हणजे लिहिताना तारे तोडणे वेगळं. आणि याची देही याची डोळा (अ) ज्ञान पाजळणं वेगळं. इथे म्हणजे बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. बरं हे मला मार्गदर्शन मागत आहेत. मला, मी कोण, तर ज्याला स्वत:च्या च मार्गाचं दर्शन झालं नाही त्याला. नाही म्हणजे, या तुम्ही. आपण चहा पिऊ, हवं तर जेवण करू एकत्र. पण हे guidance वैगेरे. टेन्शन येतं हो. काही बोलताना चुकलं, किंवा नाहीच बोलता आलं तर तुम्ही म्हणणार "लिहितो बरा चुरूचुरू. बाकी बोंबाबोंब आहे. नाव मोठं, लक्षण खोटं. बडा घर पोकळ वासा" न जाणो अजून काही. 

As a friend कधीही, कुठेही एका पायावर भेटायला तयार आहे आपण. पण त्याच्या पुढची भूमिका हि मोठया जोखमीची. responsibility आहे मोठी, नाही का? काही चुकीचा सल्ला जाईल, याची तुमच्यापेक्षा मलाच भीती जास्त आहे हो. बाकी काही नाही. 

सल्ला

Monday, 24 November 2014

अ………………अभियंत्याचा भाग ४

अ………………अभियंत्याचा भाग ४

अल्ट्रा प्रिसिजन स्पिंडल (२००२-२०१९ ते २०२३)

आता खऱ्या अर्थाने मी कंपनी चालवायला लागलो होतो. कंपनी ४ जणांची, त्यातले २ डायरेक्टर. पण चालू झालं काम. तसं दोन वर्षात नाही म्हणायला कंपनीचं थोडं का होईना बस्तान बसलं होतं. २००४ च्या सुरुवातीला  PCB industry साठी लागणारा air bearing spindle घेऊन एक जण आले होते. मी बोललो "ह्यातील आम्हाला काही नॉलेज नाही आहे. नाही होणार हा रिपेयर." आमचा छोटेखानी सेट अप बघून ते बोलले "प्रयत्न तर करा" मी विचार केला प्रयत्न करायला काय हरकत आहे. झाला सुद्धा तो रिपेयर, पण एक parameter काही सेट करू नाही शकलो. high rpm spindle चं एक वैशिष्ट्य आहे. तो पहिले दहा मिनिट फिरला कि झालं. फेल झाला तर त्या काळात होणार.

व्यवस्थित रिपेयर नाही झाला पण एक वेगळंच segment कळलं PCB इंडस्ट्री. तिथे वापरले जाणारे high rpm स्पिंडल्स. आणि त्याचा manufacturer वेस्टविंड. साहेबाच्या देशातील. मग त्यांच्या authorisation च्या मागे लागलो. वर्षभर मागे लागल्यावर शेवटी ती कंपनी पटली आणि आम्ही authorised spindle service provider झालो. (च्यायला, इतका वेळ मला वैभवीला पटवायला हि नाही लागला). आज नऊ वर्ष झाली आहेत. मस्त चाललंय. (लग्नाला २३. तिथंही मस्त चालू आहे). पण इथे एक गम्मत झाली. वेस्ट विंड चे टेस्ट रिग घेण्यासाठी २० लाख रुपयाची investment होती. आम्ही चार जणांचं बोर्ड. लैच खल व्हायचा. potential आहे का, भारतात किती स्पिंडल आहेत, कस्टमर कुठे आहे वैगेरे. २ दिवस चर्चेचं गुर्हाळ चाललं होतं. सगळी माहिती दिल्यावर ३ पैकी २ डायरेक्टर डोकं पकवत होते. मी बोललो "मला माहिती आहे हा बिझिनेस यशस्वी होणार आहे. याची सगळी जबाबदारी माझी." कुणाला काही बोलायला जागाच राहिली नाही.

आमचा रिपेयर चा बिझिनेस. एखादा पार्ट खराब झाला तर सप्लायर चे उंबरठे झिझवावे लागायचे. आणि डोक्याला ताप व्हायचा. सातारा रोड वर आमचा एक वेंडर होता. इतकी शायनिंग करायचा. मी विचार केला च्यायला याचे पाय किती काळ धुणार आपण. २००५ ला वेस्ट विंड साठी १७ लाखाचं  लोन घेतल्यावर एका वर्षातच मी पुढचं लोन घ्यायच्या तयारीला लागलो. इथं बोंबलायला collateral security नव्हती. पण SV ग्रुप ने corporate guarantee दिली आणि आमचा मार्ग सुकर झाला. परत अजून पाहिलं लोन घेऊन एक वर्षही नाही झालं तर पुढचं लोन वैगेरे ऐकावं लागलं. पण मी रेटलं. आणि २००६ ला छोटं मशीन शॉप चालू केलं.

एकेरी, दुहेरी करत डाव रंगात आला. चाराचे आठ लोक झाले, आठाचे बारा.

साधारण २००५ च्या सुमारास लक्षात आलं कि आमची specialty ज्या grinding  स्पिंडल मध्ये होती त्याचं मार्केट झपाटयाने कमी होत होतं. त्या ऐवजी मशिनिंग सेंटर्स वेगाने इंडस्ट्री मध्ये वापरू लागले होते. त्याचा स्पिंडल हि मोठा असतो. काम पण वेगळं आहे. काही अतिरिक्त नॉलेज ची गरज होती जे आमच्यापाशी कणभर हि नव्हतं. त्यातलं एक काम हे त्या प्रकारच्या स्पिंडल refurbishment मध्ये सगळ्यात महत्वाचं आहे, ते by default करावं लागतं याचा आम्हाला पत्ता हि नव्हता. पण आम्ही मग त्याच्या मागेच लागलो. मिळेल तिथून त्याचं नॉलेज गोळा करत गेलो. equipments जमा केले. प्रोसेस शिकलो. हे नवीन प्रकारचे स्पिंडल रिपेयर करायला शिकणे हा एक आनंददायी काळ होता. आणि त्याच्या बरोबर आम्ही एकेरी दुहेरी ऐवजी चौकार तर कधी छक्के हि मारायला लागलो.

आज सांगायला मस्त वाटते कि मशिनिंग सेंटर च्या स्पिंडल रिपेयरने  आमच्या गाडीची ड्रायविंग सीट घेतली आहे.इतकेच नाही तर २०१२ मध्ये जेव्हा अमेरिकन कंपनी सेटको ने आमच्याशी JV केले त्यामध्ये मशिनिंग सेंटर चे स्पिंडल रिपेयर करण्याच्या proficiency चा सिंहाचा वाटा होता, नव्हे त्यामुळेच झालं ते.

 मग २०१० मध्ये तिसरी शेड आणि २०१२ मध्ये अजून ३ शेड (अर्थात सगळं भाडयाच्या) असं करत गाडी १४० sqft पासून ५५०० sqft इथपर्यंत येउन पोहोचली आहे. कंपनीत २६ स्किल्ड लोकं काम करतात.

 आज आमची कंपनी महिन्याला ९०-१०० स्पिंडल रिपेयर करते. त्यामध्ये मशिनिंग सेन्टर स्पिंडल, grinding स्पिंडल, PCB स्पिंडल, वूड वर्किंग स्पिंडल यांचा मुख्यत्वाने समावेश होतो. आणि या क्षेत्रातल्या भारतातल्या अग्रगण्य कंपन्यांमध्ये आमचा समावेश होतो. कदाचित आत्मप्रौढी वाटेल पण, अगदी नंबर १ ला आहे असं म्हंटल तरी अतिशयोक्ती होणार नाही.

क्रमश: (पाचवा भाग शेवटचा, हे सगळं  का लिहिलं त्याबद्दल)

Saturday, 22 November 2014

भास्कर भट

भास्कर भट, टायटन चा मी शेयर होल्डर असल्यामुळे त्यांच्या Balance Sheet मध्ये वाचलेलं नाव. टायटन चे Managing Director. अतिशय निगर्वी, पण तितकेच witty. अनुभवी आणि हजरजबाबी. Razor Edge Marketing and branding हा विषय दिलेला. म्हणाले "चुकून मला वाटलं कि Gillette ची मेल चुकून मला आली कि काय"

टायटन ची पूर्ण स्टोरी च उलगडली त्यांनी. टायटन म्हंटल कि आपल्याला घडयाळ आणि तनिष्क आठवतं. पण टायटन चे खालील बिझिनेस आहेत:

- टायटन Watches.
- तनिष्क jewelry
- Fast track youth accessories
- टायटन आय + (Eye ware)
- PED Precision Engineering Division (यांचे आम्ही सप्लायर आहोत)
- आणि आता Perfumes (स्कीन नावाचं product आहे म्हणे. मला तर माहित नाही)

तुम्ही नजर टाकली तर सगळे products भारी. सर्व क्षेत्रात टायटन नंबर १ ला आहे. त्यांनी मग त्यांचे वेगवेगळे brands सांगितले. त्यांना कसं develop केलं ते हि सांगितलं. आज टायटन ११००० कोटींची कंपनी आहे. ४५० कोटीचं त्यांचं advertising budget आहे. Fast Track च्या ads कशा provocative आहेत ते हि कबूल केलं,  म्हणाले "पण काय करणार, ads चा एक निकष आहे. ज्या ads मला आवडत नाहीत. suggestive आहेत असं मी म्हणतो, that promptly goes on air. The marketing dept feedback is that the ad which I do not like are hit and go viral among teenagers"

तुम्ही product line बघितली. सर्व क्षेत्रात organised सेक्टर मधील कुणीच नाही आहे. HMT संपल्यावर तर wrist watches मध्ये टायटन undisputed लीडर आहे. अर्थात HMT होती तेव्हा काही वेगळी परिस्थिती नव्हती.  ज्वेलरी बिझिनेस मध्ये पण transparency कुणी आणली असेल तर ती तनिष्क नेच. तसंच eye ware चं. PED सुद्धा फक्त aerospace च्या संदर्भात. म्हणजे सर्व बाबतीत टायटन अगदी ट्रेंड सेटर आहे. कॅश चा बिझिनेस. उगाच नाही १०० रुपयाचा शेयर १५००० हजार पर्यंत पोहोचला.  

Helios नावाची चेन येत आहे त्यांची. त्यात जगातल्या सर्वोत्तम घड्याळांची विक्री होणार आहे. हा पण एक नवीन ट्रेंड च नाही का?

अगदी hardcore टाटा माणूस आहे पण. भाषण झाल्यावर त्यांना moment o म्हणून गिफ्ट दिलं. तर म्हणाले "As per Tata Code of Ethics, we are not supposed to accept any gift. Not accepting gift would offend you. And if we do, it is put for auction on the gate and the proceeds goes to charity. So do not feel bad if you find this gift again in some shop." 

शप्पथ सांगतो, भास्कर भट यांच्यासारखे अधिकारी ही टाटांची खरी ताकद आहे.

प्रश्नोत्तराच्या वेळात माझ्या मनात एक प्रश्न आला. पण घाबरट किंवा भिडस्त स्वभावामुळे मी नाही विचारला. एकाने तसाच, पण तो नाही, प्रश्न विचारला. मला विचारायचं होतं कि "will wrist watch extinct, because of the electronic gadget showing time?" पण जगातल्या काही उत्तम product च्या manufacturing कंपनी च्या MD ला विचारायचं काही मला धैर्य मला नाही झालं. दुसर्याने विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी काही उत्तर दिलं. पण मला नाही पटलं. कदाचित स्वत:च्या प्रोडक्ट च्या प्रेमात असावेत असं वाटलं. Wrist Watch हे extinct होऊ नये हि त्यांची विश लिस्ट वाटली. तुम्हाला काय वाटतं "येणाऱ्या काही वर्षात मनगटी घडयाळ इतिहासजमा होईल?"

हो किंवा नाही या उत्तराला काही सपोर्टिंग कारण दिलं तर मजा येईल.  

Thursday, 20 November 2014

जागतिक पुरुष दिन

काही वर्षांपुर्वीची गोष्ट आहे. नील बहुधा सिनीयर केजी किंवा पहिलीत असेल. म्हणजे ५ एक वर्षापूर्वी. नीलच्या टीचरने त्याच्या लिहिण्यावरून काहीतरी फालतू रिमार्क टाकले होते. आता ते ५ वर्षाचं पोर. काय त्याच्या handwriting चं नाटक. माझं सटकलं. मी वैभवी ला बोललो "मी येणार तुझ्याबरोबर शाळेत. आणि बघतोच कोण ती टीचर आहे." झालं, अस्मादिक गरम डोक्याने गेले शाळेत. बरोबर वैभवी. आणि गेलो टीचर समोर. शप्पथ, खल्लास झालो. ज्याला एकदम म्हणजे सुबक अशी ती आणि एकदम मधाळ आवाजात म्हणाली "yeeees Sir" वैभवी माझ्याकडे बघत म्हणाली "अरे बोल कि आता" का दातखीळ बसली तुझी हे मनात. मी "you know, you should not. I mean its ok" वैगेरे काही तरी शब्द जुळवत होतो. घरात सिंहगर्जना करणारा मी इथे अगदी म्याऊ झालो होतो. वैभावीने ओळखलं कि सौंदर्य पाहून घायाळ झालेल्या सिंहाची आयाळ काही फडफडणार नाही. म्हणाली "चल निघू आता"

नंतर मग मित्र मंडळीत माझी नक्कल करून सॉलिड हंशा व टाळ्या मिळवायची. आता शाळेच्या गेट वर watchman ने सलाम मारला नाही एवढ्या क्षुल्लक कारणाने म्हणून शाळेत जाणार नाही सांगणारा मी, वैभवीला बोललो "परत आता मला शाळेत जायला सांगू नको"

काल पाच वर्षांनी नील म्हणाला "रिझल्ट घ्यायला तुम्ही चला माझ्याबरोबर." मी बोललो येतो. गेलो आम्ही शाळेत. वैभवीने सांगितलं होतं "दुसरी आहे टीचर आता. पण जा बोर नाही होणार तुला." रांगेत बसलो होतो. तिसरा एक नंबर होता. इतक्यात नील म्हणाला

"माझी मिस चांगली आहे, म्हणून गप्पा मारत बसू नका." तो निरागस पणे म्हणाला (खरं काय माहित), पण माझ्या चोराच्या मनात चांदणं. मी विचारलं "चांगली म्हणजे" तर माझं पोरगं  बोललं "अहो स्वभावाने, तुम्हाला काय वाटलं?" आता मात्र मी चपापलो. आयला, पोरगं पण फिरकी घ्यायला लागलं कि काय माझी. पण मीच मनाला समजावलं आणि तो पण इतर मित्र दाखवू लागला.

टीचर समोर बसलो. ती म्हणाली "I was expecting Neil in rank, but he missed. I always feel that he studies well and  a clever boy. He pretends that he knows everything and he is studious boy, but actually he is not." मला नेहमीच वाटत आलं आहे कि दोन्ही मुलं माझ्यावर गेली आहेत. पण लेकांनी माझे अवगुण इतके शत प्रतिशत उचलावेत, याचं फार वाईट वाटलं. पुढे म्हणाली "actually you should speak in English with him. So that he understands subjects well" मराठी शाळेत घालू का मग, हा प्रश्न तोंडावर आला होता. पण गप्प बसलो.

प्रगती पुस्तक घेतलं, oh sorry, report card आणि चालू लागलो. नील ला म्हणालो "Neil, I am going to talk with you in English from today. Have you heard what your teacher said?" डोळे विस्फारत नील म्हणाला "पप्पा, प्लीज, तुम्ही आपलं मराठीच बोला. फिनिक्स आठवतं ना?" मागच्या आठवडयात नगर रोड वर Phoenix Mall वरून जाताना मी (चुकून) फोनिक्स बघ असं म्हणालो तर नील यश कडे बघत खदखदला आणि म्हणाला "फिनिक्स!" ह्या ह्या ह्या.

चालता चालता नील ला विचारणार होतो "तुझ्या त्या मिस चं नाव काय?" म्हणून. पण गप्प बसलो. हे बेणं म्हणायचं "अहो तुमचं वय काय, तुम्ही बोलता काय?" नकोच ती भानगड.

जागतिक पुरुष दिनाची सुरुवात ही अशी झाली. 

Saturday, 15 November 2014

रवि वेंकटेसन

रवी वेंकटेसन, साधारण माझ्या वयाच्या (४६) ऑटोमोबाईल आणि सॉफ़्टवेयर शी संबंधित प्रत्येकालाच माहित असलेले नाव. कमिन्स ची झळाळती कारकीर्द अन मायक्रोसाॅफ्ट इंडिया चालू करण्यापासून तिला भारतात establish करणारे. बिल गेटस, स्टीव बामर यांच्याशी खांदा लढवलेले. त्यांच्या कमिन्स Dream run चे क़िस्से आजही चर्चिले जातात. गेले दोन दिवस एका कॉन्फरन्सच्या निमित्ताने त्यांच्या आजूबाजूला फिरतो आहे. माणूस इतका humble की काल ब्रेकफ़ास्टला मलाच म्हणाले hey rajesh, good morning. प्रश्न सुप्रभात म्हणाला तो नाही, गंमत आहे त्यांनी नावाने हाक मारली त्यात. आता परत, मग त्यात काय मोठं? तर माझी अन त्यांची ओळख आदल्या रात्री डिनरच्या वेळेस जेफने करून दिली. "Meet Rajesh, man who takes care of Setco India" आणि नंतर ते बकबकत राहिले, बिझीनेस बद्दल. 70 लोकांमधे त्याच्या stature च्या माणसाने एखाद्याचं (म्हणजे माझ्यासारख्या लिंबूटिंबूचं) दोन सेकंदाच्या संभाषणानंतर नाव लक्षात ठेवणं हे माझ्यासाठी अप्रूप होतं. (आता काही लोकांना अजूनही वाटेल, त्यात काय एवढं? तर ठीक आहे).

Humbleness इतका की, त्यांनी सांगितलं की वयाच्या ३१ व्या वर्षी tata cummins ची जबाबदारी त्यांच्यावर टाकली. आणि त्यावर त्यांची मार्मिक टिपण्णी "the reason I was chosen for the job was that there was no one interested to turn around failing venture of Tata and Cummins" आणि मग पुढं इतिहास झाला. लोणंदचा प्लांट हे त्याचंच फलित आहे.

त्यांनी सकाळी एक दीडतासाचं जोरकस भाषण केलं. अंहं, भाषण नव्हतं, तो होता संवाद. चालतं बोलतं management book. तुम्हाला काही मुद्दे सांगतो, आवडतील तुम्हाला.

- India is the toughest country to do business. We stand 142th in world ranking behind Pakistan and Yemen.

- Though, India is the most important country in world arena.

- India is not as corrupt as you think.

- Win in India, win everywhere in the world.

- China is harassing western businesses and not interested in creating level playing field. And world business leaders are fade up with this. (China reported 25 billion of machine tool production. As per Gartner, leading report publication, it is valued at 9 billion. Look at the difference)

- long term commitment/right resources, young talent/hunger to perform/listening ability/ tenacity are the keys to success.

- Ambition, willingness to risk, ability to de risk, never give up.

- Important message "Person's nationality, religion do not matter. Ability matters" for the company.

- if the plan does not work, change the plan. But never the goal.

- Chase your vision, not matter how many years. You will succeed. Bill Gates vision at 17, "I want to see computer on the table of every home..........of the world"

- but remembar, having vision with no action plan, remains a dream.

त्यांचं पुस्तक आहे भारतावर Conquering Chaos म्हणून. मला मिळालं. वाचलं की सांगेन. पण माणूस भारी आहे. अभिप्रायाची वाट न बघता, पुस्तक घेऊ शकता.

मुरली शंकर नावाच्या Sundaram Group च्या senior stalwart चं भाषण झालं. Automobile आणि auto component manufacturers बद्दलचा आदर द्विगुणीत झाला. जुना लेख आहे. उद्या टाकतो.

नेहमीच ऊर्जा देणारे पराक्रमी जडेजा भेटले आणि शैलेश सेठ यांचंही मार्गदर्शन मिळालं. (वर काही quotes सेठ साहेबांचे आहेत). जडेजांचा क़िस्सा सांगतो अन संपवतो. पुढच्या सहा वर्षात आमच्या इंडस्ट्रीला 11 times grow होण्याची टारगेट आहे. (Potential आहे). होईल की नाही, मग टारगेट थोडं सैल करायचं का वैगेरे. जडेजा उठले अन म्हणाले "my company turnover was 7 cr in 2004, and today it is 760 cr with one acquisition of French company. If I can grow 100 times in 10 years, you all can do it. No need to change our goal." टाळ्यांचा कडकडाटात संगळ्यांनी अनुमोदन दिलं.


Tuesday, 11 November 2014

कर्दे 2

यावेळेस दिवाळी कर्दे इथे केली. सकाळी सहा वाजता किनार्यावर फिरायला गेलो होतो. हा morning walk घेताना सहसा माझ्या तोंडावर साधारण ४-५ विकेटस गेल्यावर राहुल द्रविड च्या चेहऱ्यावर जसे भाव असायचे तसे भाव असतात. हो, म्हणजे "चिंता करितो विश्वाची" असे. किनाऱ्यावर जमलेले पक्षी बघितले. एक माणूस, बहुधा पुण्या मुंबईचा असावा. मुंबईचाच म्हणू, सारखं पुणेकराची का चेष्टा. तर तो  ध्यान लाऊन बसला होता. तो प्राणायाम करताना कपालभाती करण्याचा काहीतरी चमत्कारिक प्रयत्न करत होता. ते बघूनही माझ्या चेहऱ्यावर काही हसू उमटले नाही.

साधारण एखादा किमी जाऊन मी परत फिरलो. म्हणजे घाम यायला सुरुवात झाली कि परत. व्यायाम पण अगदी तब्येतीला सांभाळून.

एव्हाना माझा धाकटा मुलगा नील आणि बायको वैभवी समुद्रावर आले. ते दोघं समुद्रात धमाल करू लागले. माझ्याजवळ i pad होता. हि सगळी गंमत चालू असताना माझ्यातला

- वेस्ट जर्मनी आणि इस्ट जर्मनी यांचं विलीनीकरण कसं झालं याचा विचार करणारा इतिहासतज्ञ (हो आपल्या लेखी जे मेंदूला जुनं आठवतं तोच इतिहास. त्याच्या पलीकडे पुस्तकं वाचायची. ते कुणी सांगितलं)
- साउथ कोरिया आणि नॉर्थ कोरिया यांचं विलीनीकरण होईल का याचा विचार करणारा आंतरराष्ट्रीय घडामोडी तज्ञ
- हिंदुस्तान आणि वायव्य हिंदुस्तान हे एकत्र येउन अखंड हिंदुस्तान होईल का हा विचार करणारा हिंदुत्ववादी
- भारत आणि पाकिस्तान एकमेकांना कसे पूरक ठरू शकतील हे विचार करणारा पुरोगामी (खोटं कशाला सांगू पण बिलावल भुत्तो पाकिस्तान आणि आग्नेय पाकिस्तान म्हणत असेल का असाही मुलायमसिंगी विचार मनात चमकून गेला)

अशी वेगवेगळी व्यक्तिमत्वे तात्विक विचार करू लागली. खोटं कशाला सांगू, पण बर्लिन wall जर लोकं पाडू शकतात तर चायना wall पाडून त्या दोन प्रदेशातील लोकांना एकत्र आणण्याचा विचारही मनाला चाटून गेला.

अशा गहन विचारात असताना वैभवी ओरडली "अरे नुसता उभा काय आहेस ………सारखा. माझे नाहीतर नील चे फोटो तरी काढ" आता हे टिंब म्हणजे काय? तर मनमुराद च्या पोस्ट वर आजच खूप नावं आली आहेत. जे आवडेल ते टाका.

मी फोटो काढायला सुरुवात केली. हा दुसराच फोटो. नील ने अश्या काही आवेशात सूर मारला कि फ्रेंच खाडी पोहून जाणारा मिहीरसेन पण  चकित झाला असता. अन मग माझ्यातला "वादी" संपला अन बाप जागा झाला. ते फोटो, त्या फेसबुकच्या पोस्टी सगळं विसरून मी सुद्धा निलबरोबर उड्या मारल्या, लाटेबरोबर पळत किनाऱ्यावर आलो, लाट परत जाताना पायाला होणाऱ्या गुदगुद्या जाणवल्या. मी आणि वैभवी दमलो नील बरोबर खेळून. नील मात्र साडेसात वाजले तरी सहा वाजताच्या उत्साहाने बेफाम खेळत होता. मी त्याचं खेळणं अनिमिष नजरेनं साठवून घेत होतो.

(पहिला फोटो लावला असता. त्यात वैभवी पण आहे. कुणी उगाच "देवमासा पण होता का समुद्रात?" अशी comment टाकली तर तिला वाईट वाटायला नको म्हणून नाही टाकला.………. तू मला सुंभ म्हणलीस त्याचा बदला म्हणून मी तुला देवमासा म्हणालो, हा माझा युक्तिवाद तयार आहे. काळजी नसावी. काय करणार सुंभ जळाला तरी पीळ जळत नाही.………खोटं कशाला सांगू)


Monday, 10 November 2014

पराशर-एक अनुभव

काल गेलो होतो मनोज हाडवळे यांच्या पराशर रिसोर्ट ला. कंपनीची ट्रीप घेऊन. २१ जण होतो. गेल्या गेल्या स्वागत झालं पार गंध आणि फुलांचे हार वैगेरे घालून. फ्रेश होऊन गोंधळाचा घाट घातला होता. भगवान काटे म्हणून कलाकार होते. असली संबळ घुमवली त्यांनी कि आमचे पोट्टे सगळे नाचायलाच लागले. लोक कला काय झिंग आणू शकते याचा जिवंत अनुभव घेतला. खूप आरडाओरडा हि केला. मनोज, त्याचे सहकारी  आणि आजूबाजूची झाडी यांनी आम्हाला सहन केलं. रसरशीत रात्रीचं मासवाडीचा जेवण  केलं. जेवणाचा दर्जा "अत्युत्कृष्ट" या सदरात मोडणारा.  रात्री कॅम्प फायर आणि त्याभोवती आमची सगळी पोरं कोंडाळ करून बसली. एकेकाला कंठ फुटायला लागला. नागेश, इरफान, मिलिंद, अनिल, गणेश आणि मी सुद्धा, आम्ही खूप गाणी म्हंटली.

सकाळी उठून टेकडीवर चढायला गेलो. बरोबर विकास होता रिसोर्ट चा. त्याने लिंबू सरबत घेतलं होतं कॅन भरून. वरती महादेवाचं मंदिर होतं. दर्शन घेतलं. समोर दर्गा होता. तिथे कपाळावर गंध लावलेला माणूस, अगदी बजरंग दलाचा सदस्य वाटत होता, दुकान लावून बसला होता. आम्हाला म्हणाला "दर्ग्याच दर्शन घ्या." आम्ही गेलो. स्वच्छ होता. एक बाई डोक्यावरती ओढणी घेऊन प्रार्थना करत होती. कपाळावर टिकली होती. तिचा नवरा दर्ग्यातल्या बाबाशी स्वच्छ मराठीत बोलत होता. मी पण दर्ग्याला नमस्कार केला. परत आलो. परत येताना आमच्या कार सिंगल रस्त्यावरून येत होत्या. एक सायकलवाला आणि नंतर मोटर सायकलवाला समोरून आले. दोघंही बाजूला उभे राहिले. आमच्या ५ कार जाईपर्यंत.

मिसळीचा नाश्ता झाला. मग टीम बिल्डींग च्या activities. आम्ही ट्रेनर नेला होता. मनोज चा हि माणूस होता. एकमेकांची चेष्टा करत, गप्पा मारत तीन तास कसे गेले कळलेच नाही. मी पोरांना अन मुलं मला मित्रच समजायला लागले होते.  परत भूक लागली. कदाचित खूप oxygen शरीरात गेल्यावर भूक लागत असावी. मी निष्कर्ष काढला.

आणि मग पुन्हा एकदा झकास जेवण जेवलो. दुपारी सव्वा ते दोन मनोजशी अन त्याची बायको नम्रता यांच्याशी गप्पा मारल्या. कृषी पर्यटन, अखिल भारतात असलेली ४५०० पेक्षा जास्त कृषी सेंटर आणि त्याचा पर्यटनासाठी वापर, शेती कडे इंडस्ट्री म्हणून बघण्याची गरज, शेतकर्याच्या मुलाला दुसरा शेतकरीच मुलगी देत नाही, ते बदलण्याची सामाजिक गरज अशा विविध विषयावर मनोज कुठलाही अभिनिवेश न बाळगता बोलत होता. मागेच त्याचं पुस्तकाचं rack बघितलं. व्यवस्थित मांडली नव्हती, पण बर्याच विषयांवरची बरीच पुस्तकं होती. त्याने मलाही पुस्तक भेट देण्याच्या लायक समजलं.

परत आमच्या काही activitiesझाल्या. साडेतीन वाजता  निघायची वेळ झाली. खूपच साधं ठिकाण, अत्यंत साधी लोकं.मनोज, त्याची बायको नम्रता आणि त्यांचे सहकारी. कुठेही  भपका नाही. मनोजला मी मिठी मारून त्याचा निरोप घेतला. तेव्हा मला एका अकृत्रिम स्नेह जाणवला, इतका कि लेख चालू करताना अहो जाहो करणारा मी आता अरे तुरे पर्यंत आलो.

निघालो पण का कुणास ठाऊक, मला विचित्र वाटत होतं. काहीतरी या रिसोर्ट मध्ये कमी आहे. काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं.

वाटेत चहाला थांबलो.कार चालू केली  कारच्या सायलेन्सर ला नाक लावलं. कार्बन डाय oxideछातीत भरून घेतला. तिथून निघालो. कासारवाडीला गळ्यात सोन्याचा गोफ घातलेला, पांढरा शर्ट वाला गॉगल धारी, माझ्या कारसमोर आडवा आला. त्याने माझ्या आईबापाचा उद्धार केला. मी पण त्याच्या अन माझ्या देहयष्टीचा अंदाज घेऊन यथाशक्ती शिव्या घातल्या. दापोडीच्या पुढे एक मुस्लिम तरुण सिग्नलला माझ्याकडे द्वेषाने बघतो आहे असं मला त्याच्याकडे द्वेषाने बघताना जाणवलं. आम्ही कारमधील तिघं जण बालगंधर्व समोरच्या शेट्टी च्या हॉटेल मध्ये रात्रीचं जेवण केलं. भात खात होतो तेव्हापासून हॉटेलच्या manager ने पुढचं गिऱ्हाईक आमच्या डोक्यावर आणून ठेवले. ते आम्ही जेवण कधी संपवतो हे आशाळभूतपणे पाहत राहिले. जेवण झाल्यावर तेलयुक्त पंजाबी जेवणाचा ढेकर दिला.  आज सकाळी कंपनीत आलो. कस्टमर ला खोटी आश्वासनं दिली. कंपनीतल्या पोरांवर डाफरलो. फेसबुकवर शहाणपणा करत एक पोस्ट टाकली. दोन चार दीड शहाणपणाच्या comments टाकल्या. आपल्याच प्रतिमेला घट्ट चिकटून बसणारा शहरी माणूस झालो. आताकुठे मला जे काल विचित्र वाटत होतं, ते कमी झालं.

पण मला  अजूनही मनोज आणि नम्रताच्या पराशर रिसोर्ट मध्ये काय कमी आहे हे कळलेलं नाही आहे.

बघा, तुम्हीच एकदा तिथे भेट द्या आणि शोधा याचं उत्तर. आणि सापडलंच तर मलाही सांगा.

पराशर-एक अनुभव


Saturday, 1 November 2014

अ……………अभियंत्याचा भाग ३

 अ……………अभियंत्याचा भाग ३

अल्ट्रा प्रिसिजन स्पिंडल्स: २००२-२०१९ ते २०२३

अल्ट्रा  ची सुरुवात १९९२ सालीच झाली होती. पहिला स्पिंडल माझ्या बेडरूम मधेच रिपेयर केला होता. ९१ साली माझं लग्न झालं होतं अन आठ महिन्यात मी ५०० sqft च्या राजमहालातील १५० sqft च्या अलिशान माझ्या शयनगृहात मी kerosene ने स्पिंडल चे पार्ट साफ करत होतो. बायको समजूतदार होती म्हणून वाचलो नाही तर वांदे झाले असते. ९३ च्या शेवटी किंवा जानेवारी ९४ ला स्वत:ची जागा घेतली. कशी, तर खाली ५० sqft चं ऑफिस अन वर mezzanine ९० sqft. म्हणजे टोटल जागा तब्बल १४० sqft. दिवसभर rollon चं काम करायचं आणि मग संध्याकाळी ६ ते रात्री ९ स्पिंडल रिपेयर करायचे. सब कुछ आम्ही दोघं, मी आणि वाघेला. हेल्पर, technician, मार्केटिंग, purchase सगळं आम्हीच.

संजय  SKF मध्ये माझा बॉस कम मित्र होता (बॉस कमी मित्र जास्त). मला म्हणायचा "अरे असं किती दिवस दुसर्यांची धुणी धुणार. स्वत: बिझिनेस कर" माझं कचखाऊ घोडं खिंकाळलं 'पैसे कुठे, जागा छोटी वैगेरे" काहीतरी calculations केले अन सांगितलं "हि तुझ्या कंपनीची value, हे माझे पैसे, इतके माझे अन इतके सतीशचे  शेयर, हि ६०० sqft जागा, जागेचं हे भाडं, बाकी काही मदत लागली तर सांग. उदयापासून ह्या जागेत धंदा चालू कर." काही कळायच्या आत राजेश मंडलिक, Manager Technical Service हा Ultra Precision Spindles Pvt Ltd  चा डायरेक्टर झाला.

झालं, माझ्या धंद्याबरोबर च मी दुसऱ्या अजून एका बिझिनेस चं application engg/sales बघावं असंही ठरलं. आणि मग चालू झाली घड्याळा बरोबरची शर्यत. सकाळी ९ ते रात्री ९. शेवटची ८ वर्ष ऑफ the शेल्फ आयटम विकत होतो आणि आता स्पिंडल रिपेयर अन मोठे प्रोजेक्ट, त्याचं application engg, quotes धमाल नुसती. जो additional बिझिनेस मी बघत होतो तिथे मार्केटिंग ची टीम बनवली. आधी तिथे वीस वीस लाखाची quotations एका पानात जायची. मी त्याला यथाबुद्धी बरं रूप दिलं. असंख्य प्रोजेक्ट्स केले. इंदोर च्या टाटा वेंचरच्या एका कंपनीचा प्रोजेक्ट. सहा महिने कचकावून काम केलं. ४. ५४ करोड चा प्रोजेक्ट होता. खूप कष्ट घेतले आणि आॅर्डर लूज़ केली. पण त्या application Engg ने टाटा ग्रूप मधे नाव झालं. टाटा मोटर्सच्या तर orders ची लाईन लागली. काही orders final करायला टाटा सन्स मुंबईला गेलो. मोठ्या prestigious orders मिळवल्या. आणि इतरही अनेक assembly lines, material handling equipments यांच्या आॅर्डर्स मिळवल्या. एकंदरीतच टेक्निकल आणि कमर्शियल गोष्टींमध्ये enrich होण्याचा तो काळ होता. इंडस्ट्रीचा अनुभव घटाघटा पीत होतो......तहानल्यासारखा.

पण सव्वा दीड वर्षात प्रोफेशनल फ्रंट वर अशा काही गोष्टी घडायला लागल्या कि मी मानसिक दृष्टया पूर्ण खचलो. आता मी कुणाचं नाव नाही घेत, पण मी त्याच्यामुळे अक्षरश: नैराश्याचा शिकार झालो. छातीत pricking pains व्हायचे. घरात झोपून रहावसं वाटायचं. जून २००४ ला दुसरा मुलगा झाला मला. नवीन घर हि घेतलं. चांगल्या गोष्टी घडत होत्या, पण त्याचा आनंद लुटू शकत नव्हतो.

एक झालं मात्र, कि माझं आणि वाघेलाच ब्रेन चाइल्ड Ultra Precision Spindles ह्याला काही झळ पोहोचली नव्हती. पण म्हणावं तसं तो बिझिनेस वाढत हि नव्हता हे हि तितकंच खरं.

पहिल्यांदा छातीतलं दुखणं म्हणजे हार्ट चं काहीतरी आहे असं वाटून ट्रीटमेंट चालू केली ती पुढे मानसोपचार तज्ञाकडून घ्यावी लागली. 

एक दिवस अशी काही घटना घडली कि मी सांगून टाकलं मी त्या अतिरिक्त बिझिनेस चं काही बघणार नाही फक्त माझ्या पोराची काळजी घेईल (स्पिंडल बिझिनेस). कदाचित मला नवीन जागाही शोधावी लागली असती. दोन वर्ष आयुष्य rewind करावं लागलं असतं. मी काही फार स्वाभिमानी वैगेरे नाही पण इथे माझं मी पणच पणाला लागलं होतं. दोन घोड्यांवर दशकभर मांड ठोकून शारीरिक दृष्ट्या फाटलो होतोच पण इथे मन ही  उसवलं होतं.

असो खूप रडगाणं झालं. वैभवी आणि आई त्या काळात खंबीर होत्या. त्या काळात काही जवळचे लोकं कसे वागले हे आठवलं तरी मनस्वी आश्चर्य वाटतं.

परत एकदा इकडे तिकडे सांडलेल्या गोष्टींना एकत्र केलं आणि डिसेंबर २००४ पासून जिथे होतो त्या जागेतच एका जोमाने सुरुवात केली अन आयुष्य नव्याने लिहायला लागलो. उंच खोल लाटांवर दोलायमान असणारा मी शिडं लावून मार्गक्रमण करू लागलो.

परत एकदा सकाळी मुसमुसलेल्या उत्साहानी ऑफिस मध्ये जाऊ लागलो.