Tuesday, 11 November 2014

कर्दे 2

यावेळेस दिवाळी कर्दे इथे केली. सकाळी सहा वाजता किनार्यावर फिरायला गेलो होतो. हा morning walk घेताना सहसा माझ्या तोंडावर साधारण ४-५ विकेटस गेल्यावर राहुल द्रविड च्या चेहऱ्यावर जसे भाव असायचे तसे भाव असतात. हो, म्हणजे "चिंता करितो विश्वाची" असे. किनाऱ्यावर जमलेले पक्षी बघितले. एक माणूस, बहुधा पुण्या मुंबईचा असावा. मुंबईचाच म्हणू, सारखं पुणेकराची का चेष्टा. तर तो  ध्यान लाऊन बसला होता. तो प्राणायाम करताना कपालभाती करण्याचा काहीतरी चमत्कारिक प्रयत्न करत होता. ते बघूनही माझ्या चेहऱ्यावर काही हसू उमटले नाही.

साधारण एखादा किमी जाऊन मी परत फिरलो. म्हणजे घाम यायला सुरुवात झाली कि परत. व्यायाम पण अगदी तब्येतीला सांभाळून.

एव्हाना माझा धाकटा मुलगा नील आणि बायको वैभवी समुद्रावर आले. ते दोघं समुद्रात धमाल करू लागले. माझ्याजवळ i pad होता. हि सगळी गंमत चालू असताना माझ्यातला

- वेस्ट जर्मनी आणि इस्ट जर्मनी यांचं विलीनीकरण कसं झालं याचा विचार करणारा इतिहासतज्ञ (हो आपल्या लेखी जे मेंदूला जुनं आठवतं तोच इतिहास. त्याच्या पलीकडे पुस्तकं वाचायची. ते कुणी सांगितलं)
- साउथ कोरिया आणि नॉर्थ कोरिया यांचं विलीनीकरण होईल का याचा विचार करणारा आंतरराष्ट्रीय घडामोडी तज्ञ
- हिंदुस्तान आणि वायव्य हिंदुस्तान हे एकत्र येउन अखंड हिंदुस्तान होईल का हा विचार करणारा हिंदुत्ववादी
- भारत आणि पाकिस्तान एकमेकांना कसे पूरक ठरू शकतील हे विचार करणारा पुरोगामी (खोटं कशाला सांगू पण बिलावल भुत्तो पाकिस्तान आणि आग्नेय पाकिस्तान म्हणत असेल का असाही मुलायमसिंगी विचार मनात चमकून गेला)

अशी वेगवेगळी व्यक्तिमत्वे तात्विक विचार करू लागली. खोटं कशाला सांगू, पण बर्लिन wall जर लोकं पाडू शकतात तर चायना wall पाडून त्या दोन प्रदेशातील लोकांना एकत्र आणण्याचा विचारही मनाला चाटून गेला.

अशा गहन विचारात असताना वैभवी ओरडली "अरे नुसता उभा काय आहेस ………सारखा. माझे नाहीतर नील चे फोटो तरी काढ" आता हे टिंब म्हणजे काय? तर मनमुराद च्या पोस्ट वर आजच खूप नावं आली आहेत. जे आवडेल ते टाका.

मी फोटो काढायला सुरुवात केली. हा दुसराच फोटो. नील ने अश्या काही आवेशात सूर मारला कि फ्रेंच खाडी पोहून जाणारा मिहीरसेन पण  चकित झाला असता. अन मग माझ्यातला "वादी" संपला अन बाप जागा झाला. ते फोटो, त्या फेसबुकच्या पोस्टी सगळं विसरून मी सुद्धा निलबरोबर उड्या मारल्या, लाटेबरोबर पळत किनाऱ्यावर आलो, लाट परत जाताना पायाला होणाऱ्या गुदगुद्या जाणवल्या. मी आणि वैभवी दमलो नील बरोबर खेळून. नील मात्र साडेसात वाजले तरी सहा वाजताच्या उत्साहाने बेफाम खेळत होता. मी त्याचं खेळणं अनिमिष नजरेनं साठवून घेत होतो.

(पहिला फोटो लावला असता. त्यात वैभवी पण आहे. कुणी उगाच "देवमासा पण होता का समुद्रात?" अशी comment टाकली तर तिला वाईट वाटायला नको म्हणून नाही टाकला.………. तू मला सुंभ म्हणलीस त्याचा बदला म्हणून मी तुला देवमासा म्हणालो, हा माझा युक्तिवाद तयार आहे. काळजी नसावी. काय करणार सुंभ जळाला तरी पीळ जळत नाही.………खोटं कशाला सांगू)


No comments:

Post a Comment