Thursday 20 November 2014

जागतिक पुरुष दिन

काही वर्षांपुर्वीची गोष्ट आहे. नील बहुधा सिनीयर केजी किंवा पहिलीत असेल. म्हणजे ५ एक वर्षापूर्वी. नीलच्या टीचरने त्याच्या लिहिण्यावरून काहीतरी फालतू रिमार्क टाकले होते. आता ते ५ वर्षाचं पोर. काय त्याच्या handwriting चं नाटक. माझं सटकलं. मी वैभवी ला बोललो "मी येणार तुझ्याबरोबर शाळेत. आणि बघतोच कोण ती टीचर आहे." झालं, अस्मादिक गरम डोक्याने गेले शाळेत. बरोबर वैभवी. आणि गेलो टीचर समोर. शप्पथ, खल्लास झालो. ज्याला एकदम म्हणजे सुबक अशी ती आणि एकदम मधाळ आवाजात म्हणाली "yeeees Sir" वैभवी माझ्याकडे बघत म्हणाली "अरे बोल कि आता" का दातखीळ बसली तुझी हे मनात. मी "you know, you should not. I mean its ok" वैगेरे काही तरी शब्द जुळवत होतो. घरात सिंहगर्जना करणारा मी इथे अगदी म्याऊ झालो होतो. वैभावीने ओळखलं कि सौंदर्य पाहून घायाळ झालेल्या सिंहाची आयाळ काही फडफडणार नाही. म्हणाली "चल निघू आता"

नंतर मग मित्र मंडळीत माझी नक्कल करून सॉलिड हंशा व टाळ्या मिळवायची. आता शाळेच्या गेट वर watchman ने सलाम मारला नाही एवढ्या क्षुल्लक कारणाने म्हणून शाळेत जाणार नाही सांगणारा मी, वैभवीला बोललो "परत आता मला शाळेत जायला सांगू नको"

काल पाच वर्षांनी नील म्हणाला "रिझल्ट घ्यायला तुम्ही चला माझ्याबरोबर." मी बोललो येतो. गेलो आम्ही शाळेत. वैभवीने सांगितलं होतं "दुसरी आहे टीचर आता. पण जा बोर नाही होणार तुला." रांगेत बसलो होतो. तिसरा एक नंबर होता. इतक्यात नील म्हणाला

"माझी मिस चांगली आहे, म्हणून गप्पा मारत बसू नका." तो निरागस पणे म्हणाला (खरं काय माहित), पण माझ्या चोराच्या मनात चांदणं. मी विचारलं "चांगली म्हणजे" तर माझं पोरगं  बोललं "अहो स्वभावाने, तुम्हाला काय वाटलं?" आता मात्र मी चपापलो. आयला, पोरगं पण फिरकी घ्यायला लागलं कि काय माझी. पण मीच मनाला समजावलं आणि तो पण इतर मित्र दाखवू लागला.

टीचर समोर बसलो. ती म्हणाली "I was expecting Neil in rank, but he missed. I always feel that he studies well and  a clever boy. He pretends that he knows everything and he is studious boy, but actually he is not." मला नेहमीच वाटत आलं आहे कि दोन्ही मुलं माझ्यावर गेली आहेत. पण लेकांनी माझे अवगुण इतके शत प्रतिशत उचलावेत, याचं फार वाईट वाटलं. पुढे म्हणाली "actually you should speak in English with him. So that he understands subjects well" मराठी शाळेत घालू का मग, हा प्रश्न तोंडावर आला होता. पण गप्प बसलो.

प्रगती पुस्तक घेतलं, oh sorry, report card आणि चालू लागलो. नील ला म्हणालो "Neil, I am going to talk with you in English from today. Have you heard what your teacher said?" डोळे विस्फारत नील म्हणाला "पप्पा, प्लीज, तुम्ही आपलं मराठीच बोला. फिनिक्स आठवतं ना?" मागच्या आठवडयात नगर रोड वर Phoenix Mall वरून जाताना मी (चुकून) फोनिक्स बघ असं म्हणालो तर नील यश कडे बघत खदखदला आणि म्हणाला "फिनिक्स!" ह्या ह्या ह्या.

चालता चालता नील ला विचारणार होतो "तुझ्या त्या मिस चं नाव काय?" म्हणून. पण गप्प बसलो. हे बेणं म्हणायचं "अहो तुमचं वय काय, तुम्ही बोलता काय?" नकोच ती भानगड.

जागतिक पुरुष दिनाची सुरुवात ही अशी झाली. 

No comments:

Post a Comment