Tuesday, 10 May 2016

एव्हरेस्ट

बऱ्याचदा यु पी, बिहार चे लोकं कसं जीव तोडून काम करतात आणि मराठी लोकं कसे आळशी आहेत असे स्टेटमेंट आपण वाचतो. त्यात परप्रांतीय लोकांचं कौतुक करताना तोंड थकत नाही. स्थानिक लोकांना आपण शिव्या देत राहतो.

मला असं वाटतं की जेव्हा कुणी परप्रांतात किंवा परदेशात जाऊन नशीब अजमावतात तेव्हा प्रश्न survival चा असतो. You are left with no choice than to slog and prove yourself. प्रतिकूलतेत कर्तृत्व झळाळून उठतं. आणि तसंही आपलं मैदान सोडून आपण दुसरीकडे का जातो? काही ठिकाणी रोजगार नसतो, दुष्काळाने जमीन काय माणस हीं खंगून गेली असतात, सामाजिक होरपळ असते, ग्रोथ च्या संधी नसतात. अशा वेळेला मग तिथेच राहून पिचून मरण्या पेक्षा दुसरी कडे जाऊन पंखाला।बळ देणारी सपोर्ट सिस्टम तर शोधता येते.

परदेशात आजकाल लोकं सहजगत्या जातात. पण २००० अगोदर मात्र वर उल्लेखलेल्या गोष्टीमुळे तर लोकं migrate झाली आहेत. आणि मग प्रस्थापित व्यवस्थेला अव्हेरून, मागे जाणारे दोर कापून जेव्हा दुसऱ्या प्रदेशात बस्तान बांधावं लागतं तेव्हा जिवाच्या आकांताने हात पाय मारावे लागतात. सुदैवाने काही देशात पंखांना बळ देणाऱ्या सपोर्ट सिस्टम असतात. अशा ठिकाणी मग यश मिळणं ही फॉर्मॅलिटी असते. याठिकाणी मी प्रयत्नांचं महत्व कमी करत नाही पण त्या त्या देशातील राजकीय, सामाजिक, भौगोलिक परिस्थिती तुम्हाला कधी हात देते अन मिडल ईस्ट सारख्या अजून गर्तेत ढकलते ही. पण तो तुमचा चॉईस असतो.

तसं बघितलं तर सोन्याच्या पिंजऱ्यात बसून दररोज पेरूची फोड आणि मिरची खाणारा पोपट जेव्हा पिंजर्याचा दरवाजा मोडून आकाशात विहार करतो तेही उल्लेखनीय असते. स्वतः च्या उबदार घरट्यात एखादी चिमणी अंग थरथर करत अनुकूलतेला झटकते अन आकाशात झेप घेते तेही कौतुकास्पद. किंबहुना अनुकूलतेच्या आवरणाखाली निवांत पहुडलेलं असताना काहीतरी करून दाखवण्याची उमेद बाळगतात अशा मंडळींना दाद द्यावी वाटते.

थोडक्यात सांगायचं काय तर एव्हरेस्ट सर केल्यावर रोहक अभिनंदनास पात्र राहतो. त्यावेळेस चढणीची परिस्थिती अनुकूल की प्रतिकूल यावर फारशी चर्चा करू नये.

गंमत एकच. जीवनाशी दोन हात करण्याचा उद्देश हा एव्हरेस्ट चढण्या इतकाच उदात्त आणि उन्नत असायला हवा!

No comments:

Post a Comment