Tuesday 24 May 2016

भाषा

माझे अमेरिकन मित्र आणि मी, यांच्यात काही शब्दावरून असा गोंधळ होतो की काही विचारता सोय नाही. काही वेळा जुळतंही बरोबर. माझं इंग्रजी तसं मराठी वळणाचं. त्यामुळे काही आपल्या म्हणी जेफ शी बोलताना तशाच भाषांतरित करतो. काही त्यांना आवडतात. "मधल्या काळात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं" हा टीपीकली मराठी वाक्प्रचार. मी त्याचं एकदा सरळ भाषांतर केलं "In the meantime, lot of water has flown below the bridge" पहिल्यांदा वाटलं, आपली गल्ली चुकली की काय? पण जेफ ला ती म्हण आवडली आणि नंतरच्या संभाषणात ती वापरली सुद्धा.

एकदा मी "पोटात खड्डा पडला" हे इंग्रजीत बोलण्याचा प्रयत्न करत होतो. आता खड्डयाला hole शब्द असेल हे मला जाणवलं पण नाही. मी आपलं stomach, digging, pit वगैरे शब्द वापरून काही तरी जुळवत होतो. तेवढ्यात जिम पटकन म्हणाला " A hole in the stomach" आणि माझी सुटका झाली.

माझी लग्नाची कहाणी सांगताना मी सांगितलं की माझं ९१ ला लग्न झालं पण त्याआधी दोन वर्ष माझं अफेयर चालू होतं. मी असं म्हणल्यावर जिम च्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्हांची माळ उभी राहिली. संवाद पुढे गेल्यावर असं कळलं की अमेरिकेत अफेयर, म्हणजे आपल्या भाषेत लफडं, हे एक्स्ट्रा मरायटल किंवा अजून पुढे जाऊन इंट्रा मरायटल असं असतं. प्रेमिकेबरोबर लग्नापूर्वी असलेल्या प्रेमाला "Dating" किंवा "courtship" असं म्हणतात. आपल्याकडे याला फारच सांस्कृतिक भाषेत प्रकरण म्हणतात, तिकडे "both are together" असं म्हणतात. गोष्ट सगळी उकलल्यावर माझ्या बद्दलचं जिम चं चांगलं मत बरकारार राहिलं.

अर्थात या बोलण्याच्या नादात त्यांच्याही काही म्हणी कळतात. अर्थात पहिल्या फटक्यात त्या नाही लक्षात येत. मग जेफ वा जिम त्याचं संदर्भासहित स्पष्टीकरण देतात. काही चांगली गोष्ट घडवून आणायची असेल तर एखादी न आवडणारी गोष्ट करावीच लागते. त्यासाठी जेफ एकदा म्हणाला "You have to break an egg, if you want to have an omelette"

भाषांची आदानप्रदान हा एक आनंददायी अनुभव असतो.

No comments:

Post a Comment