माणसाचं रिटायरमेंट वय किती असावं? थोडा वादाचा मुद्दा आहे, नाही?. मला स्वतःला ५० ते ५५ मध्ये रिटायर व्हायला आवडेल. म्हणजे याचा अर्थ काम करणार नाही असा होतो का? तर नाही. याचा अर्थ इतकाच की पैसे कमावण्यासाठी काम करणं बंद करेल. किंवा पैसे कमावले तरी अगदी लागतील तितकेच.
लोकं कशी ६०-६५ आणि काही जण सत्तरीला पोहोचून सुद्धा कामाला जातात याचं मला आश्चर्य वाटतं. तसं जायला काही हरकत नाही. किंबहुना शिक्षणासारख्या व्यवसायात साठी नंतरच धार येत असावी. किंवा डॉक्टर, वकील या प्रोफेशन मध्ये सुद्धा वय वाढत जातं तसा अनुभव मिळत जातो. आणि लोकं जेव्हा आपल्या अनुभवाच्या शिदोरीचं गाठोडं जेव्हा दुसऱ्यासाठी उघडतात तेव्हा देणारा आणि घेणारा समृद्ध होतात. मला अशा लोकांबद्दल नितांत आदर वाटतो.
पण काही वयस्कर लोकांचं आणि अशी लोकं की ज्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर बऱ्याच लोकांचं भवितव्य अवलंबून असतं, त्यांचं लॉजिक कळत नाही. "या वयात कसं काय कामाला जाता?" असं विचारलं की ते म्हणतात "घरी बसून तरी काय करणार?. कामात असलो की टाईम पास होतो" या उत्तरावर माझा आक्षेप आहे. कामाला जाण्याचा उद्देश काही तरी वेगळं करून दाखवण्याचा किंवा आपला अनुभव दुसऱ्यांच्या भल्यासाठी वापरायचा नसून, टाईम पास करायचा असा होतो तेव्हा अशी वयस्कर मंडळी कामाच्या ठिकाणी तापदायक ठरतात. कामातून आनंद मिळतो अशी ज्यांची भावना असते त्यांचं असणं हे दुसऱ्यासाठी आनंददायी असतं. पण घरी बसून काय करणार या भावनेनं लोकं जेव्हा कामावर जातात तेव्हा हे इथं काय करणार ही भावना तिथल्या लोकांच्या मनात येतेच येते. साधारण अशा विचारसरणीचे लोकं कामावर जातात तेव्हा त्या कंपनीचं काय चालू आहे याचा त्यांना फारसा गम नसतो. त्यांचे आठ तास कसे भरले जातील यावर त्यांचा भर असतो. आणि मग त्यांच्या निर्णयप्रक्रियेवर बाकी लोकांची ग्रोथ ही अडखळते.
टाईम पास करायचा असेल तर बाकी बरेच अव्हेन्यू उपलब्ध आहेत. सोशल वर्क आहे, काही शासकीय उपक्रम आहेत, कौटुंबिक जबाबदाऱ्या/सहली आहेत. मार्गदर्शन करण्यासाठी दिवसातून दोन तास किंवा आठवड्यातून दोन दिवस गेलं तरीही हरकत नाही. तुम्ही काहीतरी बहुमूल्य काम करता आणि तुमची किंमत ही बरकारार राहते.
No comments:
Post a Comment