Tuesday 17 May 2016

मॉर्निंग walk

मी कधी कधी मॉर्निंग walk ला जातो. आज ही गेलो. रामटेकडीच्या अलीकडे मला एक साधारण साठीचे गृहस्थ दिसले. मी त्यांच्या चेहऱ्याकडे निरखून बघितलं. हो, मी कधी कधी प्रौढ पुरुषाच्या चेहऱ्याकडे ही निरखून बघतो. मला ते ओळखीचे वाटले. माझ्या आणि त्यांच्या कानात इयर फोन्स नसल्यामुळे आम्ही साहजिकच गप्पा मारायला चालू केल्या. ते पण पेशाने इंजिनियर. दोन रिक्षावाले एकमेकांना भेटल्यावर कसं, गिर्हाईक मंडळी, भाडेवाढ, मीटर मध्ये गोलमाल, आर टी ओ ला शिव्या बोलत असतात तसे इंजिनियर लोकांचे ही त्यांच्या क्षेत्रातले काही जिव्हाळ्याचे विषय असतात. ते आम्ही चघळू लागलो.

बोलता बोलता पाटील साहेबांनी मला सांगितलं, की ते तीन वर्षापूर्वी रिटायर झालेत.

इथपर्यंत सगळं ठीक चालू होतं. याच्या पुढचा प्रश्न त्यांनी जो विचारला, त्याने मी मुळापासून हादरलो. म्हणजे मागच्या आठवडयात बंगलोर एयरपोर्ट ला पस्तिशीतल्या एका स्त्रीने "Uncle, is this queue for Pune?" असं विचारल्यावर जितका डिप्रेशन मध्ये गेलो होतो साधारण तसाच अनुभव परत आला.

पाटलानी ते तीन वर्षापूर्वी रिटायर झाले आहेत असं सांगितल्यावर मला विचारलं

"तुम्हाला रिटायर होऊन किती वर्षं झालीत?"

त्या तरुणीने अंकल म्हणून जो माझा उद्धार केला त्याचं मळभ विमानात शेजारी बसलेल्या सुहास्यवदनेने मारलेल्या गप्पांमुळे दूर तरी झालं पण या पाटील साहेबांनी केलेल्या मानसिक धक्क्यातून सावरायला किती दिवस जातील हे देवच जाणे!  

No comments:

Post a Comment