Thursday 19 May 2016

JRD

नुकतंच मी  The Greatest Company in the world: The Tata हे पुस्तक वाचून संपवलं. पुस्तकाच्या लेखकप्रमाणे मी ही टाटांनी प्रोफिटच्या पलीकडे जाऊन जे कमावलं, त्याने स्तिमित झालो आहे.  पण अगदी खरं सांगायचं तर गिरीश कुबेरांचं टाटायन हे साहित्यिक मूल्यांमध्ये आणि आतल्या तापशीलमध्ये जास्त उजवं ठरतं.  पीटर, जो या पुस्तकाचा लेखक आहे, त्याने फक्त टाटांची स्तुती केली आहे.

जेव्हा कधी मी टाटा फॅमिली बद्दल विचार करतो, तेव्हा सगळ्याच बद्दल आदर वाटतो. पण तरीही जे आर डी यांच्याबद्दल माझ्या मनात विशेष आदराची भावना आहे. त्यामागे कारण ही तसं आहे. माझ्यामते जे आर डी नी ज्या आव्हानांना सामना केला, ती परिस्थिती अत्यंत प्रतिकूल होती. आणि त्यांच्या ४५ वर्षाच्या झळाळत्या कारकिर्दीची बरीच वर्षे या प्रतिकूलतेशी झगडण्यात गेली. ते १९३८ मध्ये टाटा ग्रुपचे प्रमुख झाले, आणि पुढच्या वर्षी दुसऱ्या महायुध्दाला सुरुवात झाली. टाटा एयरलाइन्स हे त्यांच सगळ्यात आवडतं स्वप्न.देशभक्तीच्या नावाखाली भारत सरकारने तिचं राष्ट्रीयीकरण केलं अन ती एयर इंडिया झाली. नेहरूंना समाजवाद आणि भांडवलवाद याची कसरत करावी लागत असावी आणि त्यामुळे वरकरणी नेहरू जे आर डी चे मित्र दिसत असले तरी अनेक निर्णय हे नेहरूंनी टाटा ग्रुपच्या विरोधात घेतले. आणि नंतर तर लायसन्स राज आलं. शासनाच्या सगळ्या एजन्सीज खाजगी उद्योगाला दुश्मन मानू लागल्या. भारताच्या औद्योगिकी धोरणाला काळिमा फासणारी गोष्ट घडली अन ती म्हणजे जे आर डी ना अतिशय अपमानास्पद रीतीने एयर इंडिया च्या प्रमुख पदावरून पायउतार व्हावे लागले. स्वत: च्या कल्पनाशक्ती वर साकारलेल्या अन तिचं पोषण केलेल्या, नावारूपाला आणलेल्या कंपनीचं पालकत्व जे आर डी कडून अतिशय निर्दयीपणे हिसकावून घेण्यात आलं. आणि मग आली आणीबाणी. अन या आणीबाणी नंतर खाजगी उद्योगच खच्चीकरण करणारं मोरारजी भाई आणि जॉर्ज फर्नांडिस यांचं सरकार.

जे आर डींची कारकीर्द ही शासनाने उभ्या केलेल्या अडथळ्यांची अन खाच खळग्यांची शर्यत होती. एखादा उद्योग भरभराटीला आणणे तर दूरच पण टिकून राहणं हीच मोठी कसोटी होती. जे आर डींनी कंपन्या चालवल्याच नाही तर त्या नावारूपाला आणल्या. आपल्याच लोकांमधून अत्यंत नावाजलेले उद्योगधुरीण जन्माला घातले. दरबारीसेठ, सुमंत मुळगावकर, रुसी मोदी, अजित केरकर,  नानी पालखीवला, रतन टाटा अशी किती म्हणून नावं लिहायची.

जे आर डी नी जेव्हा उद्योगाची धुरा रतन टाटा यांच्यावर सोपवली तेव्हा भारतीय राजकारणावर अर्थमंत्री म्हणून श्री मनमोहन सिंग यांचा उदय झाला होता आणि उदारीकरणाचे वारे जोरात व्हायला लागले होते.

अर्थात हे सगळं म्हणताना टाटा ग्रुप मधील बाकी व्हिजनरीचं कर्तृत्व विसरता न येण्यासारखं. पण तरीही जे आर डी बद्दल प्रत्येक उद्योजकांच्या हृदयात एक विशेष आदराची भावना आहे हे निर्विवाद.

No comments:

Post a Comment