Friday 6 May 2016

Sairat

नाही लिहायचं असं ठरवलं होतं, पण नाही जमलं. आज लिहूनच टाकतो. त्या पिक्चरबद्दल माझ्या जवळच्या मित्रांचा असा आक्षेप आहे की समाजात चुकीचे संदेश पोहोचताहेत. रिंकुचं वय, हिंस्त्रपणा वगैरे वगैरे. मला कळत नाही हे कुठल्या आधारावर लोकं बोलताहेत. नागराज सरांनी दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे आणि त्याबर त्या मुलींने अत्यंत संयमित आणि ताकदीने भूमिका पडद्यावर साकारली आहे. किंबहुना पंधरा वर्षाच्या मुलीने वीस ते पंचवीस वयाची भूमिका साकारताना जी प्रतिभा प्रसवली आहे तिचं खुल्या मनाने कौतुक करायच्या ऐवजी आपण दोष शोधण्यात धन्यता मानतो हे आश्चर्यंच. एकच सांगतो रिंकुने पडदा व्यापून टाकला आहे.
मी नेहमीच म्हणत आलो आहे की आपली विचारसरणी हे आपलं अपब्रिंगींग कसं झालं यावर ठरतं. शिक्षणाबरोबरच काय सामाजिक परिस्थितून तुमचं आयुष्य सरलं यावर तुम्ही कसं जगता हे अवलंबून असतं. माझा मित्र खुल्ला माझ्यासमोर म्हणतो "स्टाफमधे मी माझ्याच जातीचे लोकं भरणार" मी त्याला आक्षेप घेत नाही, जरी मला पटत नसलं तरी. नागनाथपाराजवळ आमच्या ओळखीच्या मुलाला रूम पाहिजे होती. आडनावावरून कळत नव्हतं. आडनाव बदललं, रूम मिळाली. त्याचा भाऊ सातार्यात. त्याला बोललो, तु आडनाव बदल आणि मोठ्या भावाचं लाव. तर म्हणाला "हे आडनाव बरं पडतं. कुणी हिणवत नाही" माझ्या डोळ्यासमोरची उदाहरणं. तुम्ही बदलू शकता का? तर नाही. तुम्ही स्वत:ला बदलू शकता. आणि ते ही साधारण चाळिशीपर्यंत. मग नाही. चित्रपट तरूणाई साठी आहे. त्यांनी काही बोध घेतला तर घ्यावा. बाकी जी लोकं, चाळीशीनंतरची, या जातीत जन्माला आलो याचा अभिमान, आणि लाजही, बाळगतात त्यांनी या पिक्चरच्या वाटेला जाऊ नये.
माझा आंतरजातीय विवाह आहे. एक गोष्ट खात्रीने सांगतो, आंतरजातीय विवाह केलेल्या प्रत्येक जोडप्याने हा पिक्चर बघितल्यावर आपल्या जोडीदाराला कडकडून मिठी मारली असेल. मी मारली. विधात्याचे आभार मानण्यासाठी की आपला शेवट परशा आणि आर्चीसारखा नाही झाला. त्यासाठी मेलंच पाहिजे असं कुठं आहे? जीवनाच्या मार्गावर हा जोड़ीदार बरोबर नसता तर ते मरणच नव्हे काय? आणि यासाठीही की अशा सामाजिक परिस्थितीत आपल्या दोघांचाही जन्म नाही झाला. पण शेवट असा नाही झाला तरी एकमेकांचे आभार मानण्यासाठी. कारण या प्रवासात मनावर अनेक ओरखडे उमटतात. आणि ते उमटले तरी जोडीदार उभा राहतो, ठामपणे आपल्या प्रेमाच्या शेजारी. जखमांची दाहकता कमी असेलही पण काही प्रमाणात का होईना, पण अशा मंडळींना कधीना कधी परशा आणि आर्ची बनावेच लागते. आणि म्हणूनच अर्चना परशाला सोडून जाते आणि रेल्वेत तिची जी घालमेल होते अन ती परत येते ह्या घालमेलीचा अर्थ कळायला त्या परिस्थितून जावं लागतं. (त्यावेळेस परशा पण तरसत असतो, पण परत लक्षात राहतो तो रिंकुचा अभिनय)
प्रेमात पडायचं वय हे साधारणपणे अठराएकोणीस असतं. रिंकुचं प्रत्यक्ष वय किती आहे ते विसरा, तिला प्रेमात पडताना योग्य वय दाखवलं आहे हे ध्यानात ठेवा. त्या जोडप्याचं आता बरं चालू आहे, हे मनावर ठसण्यासाठी चित्रपटाचा मधला भाग हा महत्वाचा आहे. स्ट्रगल संपून आता जीवनाच्या उभरत्या काळाचा आनंद घेण्यासाठी आता त्रिकोणी कुटुंब तयार झालं आहे. भीषण भूतकाळ सरून उज्वल भविष्याकडे वाटचाल चालू झाली आहे. आणि त्यानंतरही नियती घाला घालते.
चित्रपटात क्रौर्य नाही आहे, अगदी शेवट ही. आहे ती फक्त वास्तवता. भीषण, दाहक. काहीतरी मनाचे ग्रह करून, कुणाचं तरी ऐकून, वाचून, तुम्ही या चित्रपटाकडे पाठ फिरवत असाल तर मोठी चुक करत आहात. अर्थात तुम्हाला पटला नाही तरी ठीकच. अनेक भिन्न विचारांच्या लोकांमधे आपण प्रत्यक्षात बागडतोच की!
पुन्हा एकदा सांगतो, रिंकु राजगुरू रॉक्स. तिचा राष्ट्रीय पुरस्कार हा संयुक्तिक. शी डिझर्व्ज. बाकी नागराज सरांबद्दल मी पामर काय बोलणार. पडदाच बोलतो. पिक्चर संपल्यावर नाव येण्यामधे तीस सेकंद जातात. जीवघेणी आहेत ती. यातंच काय ते समजा.
पोस्ट लिहीणार नव्हतो, पण नाईलाज झाला.
🙏🙏
(रिंकु आणि नागराज सरांसाठी)
एका पोस्टवरच्या कॉमेंटवरून सुचलं की चांगला अर्थ काढायचा असेल, अंडरकरंट म्हणा हवं तर, पण आततायीपणे फक्त शारीरिक आकर्षणापोटी पाऊल उचलू नका, चुकून उचललं तर ते निभवायची हिम्मत ठेवा आणि केलेल्या चुकीची किंमत कुणाचा जीव घेऊन वसुल करण्यात पुरुषार्थ नाही आहे.

No comments:

Post a Comment