Wednesday, 22 May 2019

लाल्या

लाल्या,

बास! आता पुरे झालं. नियतीने तुझ्या आयुष्याचा खेळ केलाय, पण त्याला तू पुरून उरलास. आता याच्या पुढचं आयुष्य तू मनमुराद जग. जगरहाटी च्या मागे फरफट पुरे झाली.

स्वतःची तब्येत सांभाळ. दणदणीत बँक बॅलन्स कर. ज्या कौटुंबिक इको सिस्टमने तुझी वाताहत केली त्या सिस्टम ला आता निरोप दे.

पारमार्थिक होण्यासाठी आधी स्वार्थी होणं गरजेचं आहे. ते तू होच. विमानात सुद्धा हवेचा दाब कमी झाला तर दुसऱ्याला मास्क लावायच्या आधी स्वतःला मास्क लावायला सांगतात. त्यामुळे दुसर्यांना मदत करण्याआधी स्वतःला आर्थिकदृष्ट्या बलशाली बनव.

तुझ्या आयुष्याच्या जात्याचा एक दगड आहे कर्मकांड आणि एक दगड आहे स्वार्थी मानसिकतेचा. खुट्टा फिरवतोय तो विधाता अन भरडला जातोय तो तू. आता बास! तो खुट्टा घे तुझ्या हातात. त्या कर्मकांड वाल्या दगडाला बनव तुझं आर्थिक स्थैर्य अन स्वार्थी सिस्टम ला बनव तुझं मानसिक स्थैर्य. अन ते जातं फिरवल्यावर एक कसदार दळण येऊ दे.

तुझ्या संसाराच्या सहाणेवर दुःख उगाळतात तुझीच लोक. आणि ज्यांनी तुला सहारा द्यावा तेच फासतात दुःखाचे लेप तुझ्या अंगभर.

त्या नियंत्याने तर अन्याय केलाच तुझ्यावर पण जित्याजागत्या जवळच्या लोकांनी पण मानसिकदृष्ट्या तुला लुटलं. उंटावरून शेळ्या हाकत मानभावीपणे सल्ले द्यायला फार अक्कल लागत नाही. समारंभपूर्वक जेवण झाल्यावर भरल्या पोटी पान खाऊन मारलेल्या पिचकारी इतकीच त्यांची किंमत.

तू ही तितक्या तटस्थपणे त्याकडे बघ.

आणि हो आता भिऊ नकोस, कारण तुझ्या पाठीशी कुणीच नाही आहे.

माझं म्हणशील तर मी तुझ्या पाठीशी नाही तर खांद्याला खांदा लावून उभा आहे.

तू फक्त आवाज दे आणि हा तुझा मित्र हजर होईल.

अरे, आयुष्यात अवघड प्रश्न समोर आले आणि हतबुद्ध वाटलं तर लाल्या, मी तुला डोळ्यासमोर आणतो. इतकं तर मला तुझ्यासाठी करावंच लागेल मित्रा.

तुझ्या गावी आलो की भेटूच.


Wednesday, 15 May 2019

याला तयारी पाहिजे

गिरीश कुलकर्णीना मी आश्वस्त केलं की मी त्याची पूर्ण काळजी घेईन. माझ्या कंपनीत आहे तो, काळजी करू नका.

तो मला म्हणाला, मला इंजिनियरिंग करायचं आहे. मी त्याची पटकन ऍडमिशन घेऊन टाकली. मग कौन्सिलर म्हणाला दोन्ही एकत्र नाही करू शकणार. एकतर कॉलेज नाहीतर काम. त्याने काम निवडलं.

पोरगं हुशार, मेहनती. वेगवेगळ्या जबाबदाऱ्या घेऊ लागला. मलाही स्वतःबद्दल बरं वाटू लागलं.

एकदा आजारी पडला, वजन कमी होऊ लागलं. सरळ घरी घेऊन आलो. तब्येत चांगली झाली असं वाटल्यावर चार दिवसांनी रूमवर जाऊ दिलं.

मी अशात निवांत झालो. आयुष्य माझ्यासमोर घडत होतं.

काही दिवसांपूर्वी आला. म्हणाला बीई चे ऍडमिशनचे पैसे परत द्यायचे आहेत. मी म्हणालो, मी विसरलो ते. एखाद्या संस्थेला दे. ठीक आहे म्हणाला.

एक महिन्यापूर्वी त्याने राजीनामा दिला. मित्र म्हणवणाऱ्या एका स्पर्धक कंपनीने त्याला उचलला. आणखी दोघे घेतले. त्यांचं ठीक आहे, पण हा पोरगा पण.....धक्का बसला.

राम कडे गेलो. कैफियत मांडली. निर्विकार चेहऱ्याने मला राम ने एक कागद सरकवला. विंदांची गझल होती. 

अग्नीमुळे प्रगती घडे,
हे अन्नही त्याने शिजे,
चटका बसे केव्हातरी,
त्याला तयारी पाहिजे

पुष्पे, फळे अन सावली,
वृक्षातळी या गावली
काटा अभवित टोचता,
त्याला तयारी पाहिजे

आपुल्या चुकांना आपण
इतरांस त्या दिसती परि
त्याचीच चर्चा व्हायची,
त्याला तयारी पाहिजे

केले कुणास्तव ते किती,
हे कधी मोजू नये;
होणार त्याची विस्मृती;
त्याला तयारी पाहिजे.

डोक्यावरी जे घेऊनी
आज येथे नाचती,
घेतील ते पायातळी;
त्याला तयारी पाहिजे.

सत्यास साक्षी ठेवुनी
वागेल तो, बोलेल जो,
तो बोचतो मित्रांसही!
त्याला तयारी पाहिजे.

पाण्यामध्ये पडलास ना?
पाणी कसेही ते असो-
आता टळेना पोहणे;
त्याला तयारी पाहिजे

ही कवितेची ताकद. चार तास भडभड बोलून जे सांगता येईल ते काही ओळीत. विंदा तुम्ही कालातीत आहात. निरोपाचे दोन शब्द ही घ्यायची तसदी पोराने घेतली नाही हे विसरलोय आणि कामाला निघालोय. 

Tuesday, 14 May 2019

अमेरिका

अमेरिकन जेफ हा जर इथल्या समाजाचा प्रतिनिधी आहे असं मानलं तर हा देश जगाच्या इतक्या पुढं का आहे याचा मी विचार केला. काही जाणवलेल्या गोष्टी.

१. इनोव्हेशन: मला असं वाटतं की इनोव्हेशन हा अमेरिकेचा, खरंतर प्रत्येक प्रगत देशाचा आत्मा आहे. याआधी प्रत्येक ट्रिप मध्ये मी हॉटेल मध्ये राहिलो. मात्र डिसेंबर १८ मध्ये मी अभिजित बिडकर, शिल्पा केळकर, कॅनडात माझी बहिण स्वाती आणि या ट्रिप मध्ये जेफच्या घरी राहिलो. नाही म्हणायला मध्ये एकदा डेट्रॉईट मध्ये पल्लवी सप्रे कडे गेलेलो, पण ते दोन एक तासासाठी. या सर्व वास्तव्यात मला सगळ्यात जास्त काही भावलं असेल तर जगणं सुसह्य करणाऱ्या अत्यंत नाविन्यपूर्ण आणि कल्पक गोष्टी. वाईन बॉटल चा कोर्क ओपनर, टिन डब्याचं झाकण उघडण्यासाठी चकतीची सूरी, वेगवेगळ्या पदार्थासाठी अलग चाकू, छोटी गारबेज कॉम्पॅक्ट करणारी मशीन, ब्लेड विरहित फॅन्स ही रोजच्या जगण्यातील. बाकी टेस्ला, ऍपल, गुगल, मायक्रोसॉफ्ट, थ्री एम या जगातल्या सर्वोत्कृष्ट इनोव्हेटिव्ह कंपन्या इथल्याच. थ्री एम ने तर अक्षरशः हजारो इनोव्हेटिव्ह प्रोडक्टस अमेरिकेला अन पर्यायाने जगाला दिले. पोस्ट इट, स्क्रोच बाईट, यु क्लिप ही पटकन पाठवलेली.

मी जेव्हा इथल्या सेटको मध्ये फिरतो तेव्हा अशीच कल्पक इक्विपमेंट बघायला मिळतात. अन त्यामुळेच या लोकांची उत्पादकता खूप जास्त आहे. उदा: इथे महिन्याला १२० स्पिंडल रिपेयर करण्यासाठी १२ जण आहेत तर भारतात तीस जण.

२. सर्वोत्कृष्ट गुणवत्ता: प्रत्येक गोष्ट सर्वोत्कृष्ट. अगदी फूड प्रोडक्ट पासून ते युटिलिटी गोष्टी ते इंडस्ट्रीयल गुडस यामध्ये प्रत्येक ठिकाणी सर्वोत्कृष्टतेचा ध्यास हा जागोजागी दिसून येतो.  मी यावेळेस जेफच्या घरात अनेक गोष्टी हाताळल्या. उदा: वॉटर बोट, फिशिंग बोट, कयाकिंग बोट, त्यासाठीचा डॉक, ग्रील, वॉशिंग मशीन, इलेक्ट्रिक कुकिंग, वॉर्ड रोब, खिडक्याचे ब्लाइंडज, दरवाजे. सगळीकडे गुणवत्ता एक नंबर. आपल्याकडे या गोष्टी उपलब्ध आहेत, फक्त त्याची प्राईस मोजायची तयारी नाही. सेकंड क्वालिटी मालाला आपण कमी किमतीत घेतो, स्वीकारतो आणि अडकतो. चलता है, हे ग्राहक म्हणून आपण स्वीकारलं आहे म्हणून उत्पादक पण तसं वागतात.

थोडक्यात सर्वोत्कृष्ट गुणवत्ता हा माईंड सेट आहे.

३. स्वयंशिस्त आणि स्वच्छता: कुठंही दिखावा नाही पण ही या लोकांची जीवनप्रणाली आहे. अगदी सांगायचं तर जेवण बनवल्यावर सर्व गोष्टी घासून पुसून जागच्या जागी ठेवणं, सर्व बाथरूम मध्ये नॅपकिन, टॉवेल, लिक्विड सोप हे जागच्या जागी असणे, कचऱ्याची तीन बिन्स मध्ये इमानेइतबारे विभागणी करणे, एक सुका कचरा, दुसरा रिसायकल कचरा आणि तिसरा कंपोस्टिंग. वेळेच्या शिस्ती बद्दल तर मला बोलायचा अधिकारच नाही. अक्षरशः दोन एक वर्षांपूर्वी पर्यंत मला लाज वाटावी इतका नालायक होतो वेळ पाळण्याबद्दल.

इतक्यांदा कार पार्क करताना मी बघितलं. पण प्रत्येकजण, प्रत्येकवेळी अँड आय मीन इट, पार्किंग रेषेला समांतर.

अख्खी बोट पुसली आम्ही रविवारी दुपारी. पंधरा वर्षे झालीत बोटीला पण आजही नवी कोरी दिसते ती. मी आणि यश राहिलो ती रूम आम्ही आवरून ठेवली पण मला खात्री आहे, उद्या अटलांटा हुन जेफ सिनसिनाटी ला जाताना वाट वाकडी करून टेनेसी ला जाणार, ती रूम आवरणार. आणि हा सेटको चा प्रेसिडेंट आहे. मुख्य म्हणजे या गोष्टींचं अवडंबर नाही.

या चार मूलभूत गोष्टी अमेरिकन समाजात ठासून भरलेल्या आहेत आणि त्यामुळे ही खऱ्या अर्थाने महासत्ता आहे.

मला न आवडणाऱ्या दोन गोष्टी:

१. ऊर्जेचा प्रचंड अपव्यय: या बाबतीत हा देश विचार का करत नाही हा मला नेहमी प्रश्न पडतो. युरोप या बाबतीत अमेरिकेच्या कैक पटीने सजग आहे. रात्रंदिवस इथले लाईट ढनढन जळत असतात. याबाबतीत हे इतके मागासले आहेत की रूम मध्ये लाईट स्विच ऑफ करणारी रूम की पण नसते. कुणीही नसताना टीव्ही, फॅन, एसी कायम चालू असतात. ऊर्जा वाचवणारी मास ट्रान्सपोर्ट सिस्टम या देशाला माहीत नाही. सगळे जण कार घेऊन फिरत असतात. अन ते ही अगडबंब कार्स. कमीतकमी २ लि ते ६ लि इंजिन पर्यंत.

२. खाण्याचे दणदणीत पोर्शन: कुठल्याही हॉटेल मध्ये गेलो की मला अक्षरशः भीती वाटते, दणकन किती खायला देतील ते. बरेच जण तितकं संपवतात अन काही जण टाकून देतात.

असो. माझ्या मध्यमवर्गीय समाजवादी मनाला आणि भांडवलवादी मेंदूला जाणवलेल्या या गोष्टी.

वयाची पन्नाशी पालटली पण एकदा आपण आयुष्यभरासाठी विद्यार्थी आहे असं ठरवलं की स्वतःमध्ये बदल घडवणाऱ्या गोष्टी शिकता येतात हेच प्रवासाचं फलित आहे असं मला नेहमीच वाटतं.

Wednesday, 8 May 2019

डोनाल्ड

सिनसिनाटी एअरपोर्ट पासून माझं हॉटेल साधारण अर्ध्या तासाच्या अंतरावर होतं. रस्त्यात एक अपघात झाला होता. त्यामुळे मला जवळपास एक तास लागला. उबर टॅक्सी केली होती. डोनाल्ड नाव होतं ड्रायव्हरचं. साधारण पंचावन्न वगैरे वय असावं.

डोनाल्ड गप्पा मारत होता. तो ज्या पद्धतीने माझ्याशी बोलत होता त्याने मी आश्चर्यचकित झालो होतो. जगातल्या घडामोडीबद्दल त्याला ज्ञान होतं. भारताबद्दल त्याला माहिती होती. मी डोनाल्डला विचारलं "उबर टॅक्सी चा बिझिनेस करण्याआधी, तू काय करत होता?".

त्याने जे उत्तर दिलं, ते ऐकून मी सर्द झालो. तो म्हणाला "आयएनजी मध्ये मी फायनान्स चा व्हाईस प्रेसिडेंट होतो. आणि त्यानंतर अकसा मध्ये." मी आपल्या मराठी मानसिकतेला जागून त्याला विचारलं "इतक्या चांगल्या पगाराची नोकरी तू का सोडली?".

डोनाल्ड म्हणाला "भविष्यात मला जितके पैसे लागतील ते माझे जमा झाले होते. मला फक्त आजचा खर्च भागवायची गरज होती. माझ्या फायनान्स जॉब मध्ये टेन्शन होतं आणि तितक्या पैशाची गरज नव्हती. उबर बिझिनेस हा परफेक्ट ऑप्शन होता. मला पैसे मिळतात, अनेक ठिकाणी फिरायला मिळतं आणि तुझ्यासारख्या लोकांना भेटता येतं. मला नातू आहेत. फॅमिली साठी मला वेळ देता येतो."

मला हेवा वाटला त्याचा. एखाद्याचं सरळ कौतुक करायचं नाही हा माझा बाणा. त्याला जागत मी म्हणालो "आजकालच्या जगात उबर, एअर बीएनबी सारख्या खूप संधी मिळतात. त्यामुळे असे निर्णय घेता येतात......."

मला मध्ये थांबवत डोनाल्ड म्हणाला "अशा संधी आज असतात असं नाही. माझे वडील एमआयटी चे सिव्हिल इंजिनियर होते. स्वतःचा बिझिनेस होता त्यांचा. पण १९८५ साली त्यांनी सिव्हिल बिझिनेस बंद केला अन कारण हेच. त्यांच्या भविष्यासाठी लागतील तितके पैसे जमा झाले होते. पुढचे पंचवीस वर्षे त्यांनी फूड ट्रक चालवला. आज ते ८७ वर्षाचे आहेत. आणि लाईफ एन्जॉय करत आहेत."

मी विचारलं "तुझ्या मुलांसाठी काही एक्स्ट्रा पैसे कमवावे असं तुला वाटत नाही का?"

तर तो पटकन म्हणाला "नाही! मला त्यांच्या कर्तृत्वावर विश्वास आहे. त्यांच्या साठी पैसे कमवून मला त्यांच्या पंखातील बळ कमी करायचं नाही. I strongly believe that giving money more than children deserve  is biggest de-motivator for them."

गप्पा मारताना हॉटेल आलं.

आयुष्य शिकवणारे मास्तर कुणाच्या रूपात कुठं भेटतील हे सांगता येत नाही.  

Sunday, 28 April 2019

Goli Vada Pav

It may happen that you might feel depressed at times for different reasons and so I was. 

And then I heard him. He said 'Entrepreneurship is celebration." He also said "Don't allow energy and enthusiasm diminish in the journey from dream to destination."

He left the established business of corporate financing. For what? To venture in to a very low cost product 'Vada Pav". A journey started from the small shop at Kalyan Station is reached to 300 Vada Pav outlets in 100 cities of 20 states. And still growing. He dreams even today. 

It was tough journey. It had all odds like finance, local competition, apartheid-ism that how one south Indian can run Vada Pav business in Mumbai amidst clouts of two local political parties. From such mess, he got in supply chain which is supplying to McDonald,  low cost machinery, out of box marketing campaign etc. Darling of Mumbai street food, Vada Pav has crossed borders of not only city but state and today it is filling up hunger nationwide, fetching investment from international funding. Astonishing!

Meet Mr Venkatesh Ayyar. Founder of Goli Vada Pav. Core entrepreneur, excellent orator  and whose feet are firm on ground even though sky is only limit for him. A very modest and humble man. I heard him for the second time. No wonder, both times he received standing ovation. 

Depression in mind is shown dustbin. That was the power of his talk. 

Take a bow, Mr Venkatesh Ayyar

Tuesday, 16 April 2019

गोली वडा पाव

गेले काही दिवस लो फील होत होतं. अगदी वाद नाही पण अमेरिकन बोर्ड मेंबर्स चे काही मुद्दे पटत नव्हते. एक चांगल्या माणसाने बारा वर्षानंतर कंपनीला बाय केलं. काही कास्टमर्स कामाच्या पद्धतीवरून नाराज झाले.एकंदरीत झोल झाला होता रात्रीचा. झोपेचं पूर्ण खोबरं.

आणि मग काल त्यांना ऐकलं, याची देही याची डोळा. ते म्हणाले "Entrepreneurship is celebration" ते असंही म्हणाले "ड्रीम आणि डेस्टिनेशन च्या मध्ये ऊर्जा आणि उत्साह नाही असं कधीही होऊ देऊ नका"

कॉर्पोरेट फायनान्स ची दणदणीत पगाराची नोकरी सोडून त्यांनी चालू केलं, एक अत्यंत लो कोस्ट खाण्याचा पदार्थ, वडा पाव. कल्याण रेल्वे स्टेशनच्या समोर चालू केलेल्या एका छोट्या दुकानापासून चालू झालेला प्रवास आज वीस राज्यातील शंभर गावांच्या तीनशे स्टोअर्स पर्यंत येऊन पोहोचला आहे, पण स्थिरावला नाही आहे. स्वप्नं आजही पाहतात ते.

प्रवास खडतर होता. पैसे, लोकल स्पर्धा, एका दाक्षिणात्य माणसाने वडा पाव विकण्यासाठी वापर केलेला आरे डेअरी बूथ आणि त्यावरून दोन राजकीय पक्षात झालेल्या फुटीवरून झालेली परवड. इथपासून ते मॅक्डोनाल्ड चे सप्लायर हीच माझी सप्लाय चेन, लो कॉस्ट मशिनरी, हटके मार्केटिंग कॅम्पेन, मुंबई ची जान असणारा वडा पाव वेगळ्या रेसिपीच्या मदतीने पूर्ण भारतात क्षुधा शमवतो आणि दहा वर्षानंतर च्या अथक प्रयत्नानंतर इंटरनॅशनल इन्व्हेस्टर यांच्या धंद्याला बॅक अप देईपर्यंतचा प्रवास ऐकताना विस्मयचकित होऊन गेलो.

वेंकटेश अय्यर, गोली वडा पाव चे प्रवर्तक, एक धडाडीचे उद्योजक, उत्कृष्ट वक्ता आणि आकाशाला गवसणी घातल्यावर सुद्धा ज्यांचे पाय जमिनीवर घट्ट रोवले आहेत असा मॉडेस्ट, हंबल समाजवादी माणूस. काल त्यांना दुसऱ्यांदा ऐकलं. पाहिल्यावेळी ऐकलं तेव्हाही रोमांचित झालो होतो, कालही झालो. थरमॅक्सच्या अनु आगा एकदा म्हणाल्या होत्या की कुणाचं बोलणं ऐकल्यावर स्टँडिंग ओव्हेशन द्या हे सांगायला लागलं नाही पाहिजे. पहिल्यावेळी ऐकलं तेव्हा साडेतीनशे आणि काल दीडशे लोक कधी आपल्या पायावर उभे राहिले आणि टाळ्यांचा कडकडाट करत राहिले हे कळलं ही नाही.

आज सकाळी उठलोय. मनावरचं मळभ पूर्ण दूर झालं आहे. नैराश्य कालच्या टाळ्यांमध्ये विरून गेलं आहे.

एखाद्या आर्थिक वर्षाची सुरुवात इतक्या जोरकस पद्धतीने झालेली माझ्या आठवणीत नाही.

वेंकटेश सर, टेक अ बो!

Tuesday, 9 April 2019

नाझीमा

नाझीमा चा फोन आलेला जॉब साठी. तिने फोन वर सांगितलं की चार पाच वर्षांपूर्वी तिचा इंटरव्ह्यू झालेला आमच्या कंपनीत. ती चेक करत होती की परत काही संधी आहे का ते! सुदैवाने माझ्याकडे नाझीमाच्या प्रोफाईलची एक संधी तयार झाली होती. मी नाझिमा ला इंटरव्ह्यू साठी बोलावलं. छान डिस्कशन झाले.

इंटरव्ह्यू च्या शेवटी मी तिला विचारलं "आपण चार वर्षांपूर्वी बोललो होतो. काही कारणास्तव मी तुला जॉब नाही देऊ शकलो. आजही सगळ्या गोष्टी जुळून येतील की नाही शंका आहे. पण मला आश्चर्य याचं वाटतं आहे की चार वर्षे तू आमच्या कंपनीला लक्षात का म्हणून ठेवलं?"

चेहऱ्यावर स्माईल देत नाझीमाने जे सांगितलं त्याने मी चकित झालो. ती म्हणाली "मी आतापर्यंत ६-७ इंटरव्ह्यू दिले. पण तुमची अशी एकमेव कंपनी आहे जिथे मला माझं सिलेक्शन झालं नाही याची मेल आली. आणि नुसतं तेच नाही, तर माझं सिलेक्शन का नाही झालं याची व्यवस्थित कारणं दिली होती. तुमच्या एच आर डिपार्टमेंट ची ही पद्धत मला खूप भावली. तेव्हाच माझ्या मनात फिक्स झालं की जेव्हा कधी संधी मिळेल तेव्हा मला सेटकोत काम करायला आवडेल."

इथं मला लिंक्ड इन सारख्या प्रोफेशनल मीडिया चे आभार मानावेसे वाटतात. कारण याच ठिकाणी इंटरव्ह्यू प्रोसेस तर सांगितली जातेच पण इंटरव्ह्यू नंतर जॉब इच्छुकांशी कसं वागायला पाहिजे या बद्दलही मार्गदर्शन केलं जातं. मला आमचा एच आर ऑफिसर निलेश साळुंकेचं वागणं अभिनंदनीय वाटलं ज्याने ही प्रोसेस लक्षात ठेवून तिची अंमलबजावणी केली.

एखाद्याशी प्रोफेशनल रिलेशन्स प्रस्थापित करायचे असतील तर आपण व्यवस्थित वागतोच. पण जर तसं होण्याची शक्यता नसताना तुम्ही कसे वागता यावरही तुमची पत बऱ्याचदा ठरते.