Thursday, 31 October 2013

परदेशवारीच्या worries २

२००९ चा दौरा इटलीचा. मिलान मध्ये रहात होतो. एका exhibition साठी गेलो होतो. ३ दिवस exhibition बघून चौथ्या दिवशी Frankfurt ला सकाळी जाऊन रात्री मिलानला परत येण्याचा प्लान होता .

३ दिवस exhibition मध्ये तंगडतोड करून पायाचे तुकडे झाले होते. त्या दिवशी मला पुण्याचेच एक गडगंज श्रीमंत असे industrialist भेटले होते. त्याचं नाव आपण देसाई ठेऊ. आमची कंपनी त्यांचा एक महत्वाचा कस्टमर आहे. मला म्हणाले संध्याकाळी फिरू, कॅथेड्रल पाहू, एकत्रच डिनर करू आणि मग आपापल्या हॉटेल ला जाऊ. ठरल्याप्रमाणे संध्याकाळी आम्ही भेटलो. भव्य असे कॅथेड्रल बघितले. थोडी स्ट्रीट शॉपिंग केली. दिवसभराचे फिरणे आणि हा संध्याकाळचा व्यायाम, पाय अगदी दुखून आले होते. भूक पण जबरी लागली होती. देसाई साहेबांचे निमंत्रण होते जेवणाचे. विचार केला नेतील साहेब एखाद्या हॉटेलमध्ये पिझ्झा खायला.

मिलान मध्ये हॉटेलच्या बाहेरच मेनू कार्ड लिहिलेले होते. आम्ही त्याच्या समोर उभे राहायचो आणि साहेब वाचायचे. पिझ्झाचा रेट बघायचे आणि म्हणायचे जरा बघू अजून एका ठिकाणी. पुढच्या हॉटेल मध्ये परत तीच कथा. बरं रेट मध्ये काही असा जमीन अस्मानाचा फरक नव्हता. पिझ्झा साधारण ६.५० युरो ते १० युरो ला मिळत होता. तरी पण साहेबांचे काही "अजून एक हॉटेल बघू" काही संपेचना. माझा  एका महिन्याचा पगार त्यांची एका दिवसाची कमाई होती. मला काही सुधरेना. पाय ओरडायला लागले होते आणि पोट तर कळवळून रडत होतं पण देसाई ना काही माझी दया येत नव्हती. शेवटी मीच म्हणालो " सर आता इथे खाऊ, मला सकाळी लवकर जायचे आहे विमानतळावर" असे म्हणता म्हणता मी खुर्चीत बसकण च मारली आणि मेनू कार्ड चाळू लागलो. आता देसाई ना काही इलाजच नव्हता. पटापट order दिली. ज्या देशातला पदार्थ हा त्या देशातच खाणे एक वेगळाच आनंद असतो. Italian पिझ्झा एक भारीच प्रकार आहे आणि तो इटली त खाणे हा एक भारीच अनुभव आहे. असो, बिल आले. सुरुवातीचा अनुभव घेता मीच पाकिटात हात घातला (म्हणजे तसे दाखवले) देसाई म्हणाले "राहू द्या, राहू द्या मी तुम्हाला निमंत्रण दिले" हे म्हणताना त्यांचा चेहरा कसनुसाच झाला होता. मी मात्र शपथ खाल्ली देसाई च निमंत्रण परत घ्यायचं नाही.

दुसर्या दिवशी सकाळी Frankfurt चं विमान सकाळी ७ ला होतं म्हणजे मला ६ ला पोहोचणे आवश्यक होते. मिलान च्या लीनेट विमानतळावर जायला १ तास लागत होता. सकाळीच माझा हॉटेल च्या manager शी प्रेमळ संवाद झाला होता. तो असा कि "तुला taxi ने जायचं असेल तर ६० युरो पडतील" असं म्हणाल्याबरोबर माझ्यातला अंकगणित तज्ञ जागृत झाला. म्हणजे रु ३३०० फक्त. "आणि बसनी जायचे असेल तर १ युरो. बस stop पर्यंत taxi चे ५ युरो" म्हणजे रु ३३० फक्त. (रु  ३३०० ला फक्त एक पद्धत म्हणून लिहिले). मला नाही वाटत मी कुठला option घेतला हे वेगळं सांगावं.

सकाळी ४:३० ला taxi येणार होती. ४:४५ ला बस stop. ५:०५ ची पहिली बस, ५:५० ला airport असा भरगच्च कार्यक्रम होता. देसाई कृपेमुळे हॉटेलवर पोहोचायला रात्रीचे ९:३० वाजले होते आणि पाय पण वाजले होते. सकाळचा ३:३० चा अलार्म लावला . झोपलो पण सकाळच्या टेन्शन मुळे झोप अशी अधांतरीच होती. २:३० वाजता जाग आली. तेव्हा फेसबुक प्रकरण नव्हते म्हणून बुक वाचत बसलो.

४:२५ ला बरोबर टॅक्सी आली आणि सुमसाम रस्त्यावरून १५ मिनीटात बस स्टाॅपला आणून सोडलं . विचार करा नवीन रस्ता, नवीन गाव, नवीन देश आणि सकाळची पावणेपाच ची वेळ आणि मी एकटा. सगळा अंधार , फक्त रस्त्यावरचे लाईट चालू. शप्पथ सांगतो, सटारली होती. बरं बस स्टॅाप पण बरोबर आहे कि नाही माहिती नाही. हॉटेल manager नि टॅक्सी ड्रायव्हर ला परस्पर सांगितले होते. आणी अशा विचारात असतानाच इमारतीच्या एका पिलर मागून दोघं विचित्र माणसे बाहेर आली. पूर्ण drug addict. पिंजारलेले केस, स्लीव लेस शर्ट, अंगावर भरपूर tatoo. आणी ते माझ्याच दिशेने येऊ लागले. थोडं अंतर ठेवून माझ्याकडे बघत हातवारे करत काही तरी italian भाषेत बोलत होते. मी पासपोर्ट, पैसे चाचपून बघितले आणि त्यांच्याकडे लक्ष न देता स्तब्ध उभा होतो. (एकदा नगर ला सीन बघितला होता रात्री १२ वाजता एक गावाकडचा माणूस मध्ये उभा होता आणि दोन कुत्रे त्याच्यावर बेफाम भुंकत होते. मला तेच
आठवत होतं )

अशा गर्भगळीत अवस्थेत असतानाच ती आली आदि शक्तीचे रूप. (आता मी ते राहुल-सिमरन विचार करण्याच्या मन:स्थितीतच नव्हतो). इथे आली ती air होस्टेस च्या रुपात. बहुधा सर्व परिस्थिती तिने ताडली. सर्वप्रथम ती माझ्याकडे बघून हसली. सुटाबुटात असलेला मी आतून कसा हललो होतो, नाही कळायचं. ते हास्य मला दहा हत्तीचे बळ  देऊन गेलं . नंतर तिने  गर्दुल्ल्याकडे नजर फेकली. आणि अहो आश्चर्यम! ते दोघेही रस्ता क्राॅस करून समोरच्या फूटपाथवर जाऊन बसले. माझ्या नजरेतून आभार टपकत होते. सगळा १० मिनीटाचा खेळ, पण किती वेगवेगळे विचार तेव्हढ्यात येउन गेले याची गणतीच नाही.

मी त्या महालक्ष्मीला विचारलं " will this bus take us to Milan Linate airport" ती म्हणाली "yes "माझ्या जीवात जीव आला. बरोबर ५:०५ मिनिटांनी बस आली. १ युरो चं तिकीट काढताना मनात आलं, आपण काही मुर्ख पणा तर नव्हता पैसे वाचवण्याच्या नादात.

पुढे सगळं व्यवस्थित झाले. ७ ला विमान हाललं आणि मी झोपेचा बॅकलाॅग भरण्याच्या कामाला लागलो.




















Saturday, 26 October 2013

परदेशवारीच्या worries

साधारणत: कधीही माझा परदेश दौरा ठरला की माझ्या काही मित्रांची आणि नातेवाईकांची पहिली प्रतिक्रिया असते "मजा आहे बुवा तुमची." जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे याप्रमाणे त्यांना कळत नसते का मी कुठल्या दिव्यातून जातो आहे ते. माझ्यासारख्या छोटी कंपनी चालवणार्यासाठी परदेश दौरा हे एक मोठं काम असतं. विमानाची तिकीटे, लोकल ट्रान्सपोर्ट, हाॅटेल बुकिंग हे सगळंच जिकीरीचं काम असतं. यात सगळ्यात मोठा कार्यक्रम असतो गुणाकाराचा. वीक करन्सीमुळे प्रत्येक वेळेस युरो, डाॅलर, पौंडप्रमाणे गुणीले ७०/६०/९० हे फारच त्रासाचं असतं. हे टाळायचं असेल तर एकतर मुकेश अंबानी असावं, नाहीतर कुठल्या तरी मोठ्या कंपनीचा executive. या सगळ्यातून जेव्हा दौरा without problem पार पडतो, तेव्हा गड जिंकल्याचं समाधान असतं. त्या परिस्थितीतून जाताना मनाची अवस्था कशी असते हे स्वत: अनुभवल्याशिवाय नाही कळणार.

२००६ चा Switzerland/UK चा दौरा. Switzerland ला मला पहिले Renaud नावाच्या कंपनीत जायचं होतं. Bevaix नावाचं गाव, गाव कसले खेडंच ते इनमिन २००-३०० घरांचं (हे तिथे गेल्यावरच कळलं). नेटवरून bed & breakfast शोधलं. ( यूरोप मधे हा एक साॅलीड प्रकार आहे bed & breakfast. Small scale industrialist साठी perfect fit. आता हे B&B मला २५ स्विस फ्रॅंक ला मिळालं म्हणजे ₹ ९०० फक्त, विश्वास बसतो का) मेलवरून विचारलं bevaix स्टेशन वरून यायचं कसं? होस्ट म्हणाला "पायी, जवळच आहे"

रविवार होता, सकाळी ७ वाजता झुरिक ला पोहोचलो. तिथे खालीच रेल्वे स्टेशन आहे. तिकीट बारी वर गेलो आणि मागितलं " बीव्हेक्स" ती माझ्या तोंडाकडे बघत राहिली. मी परत म्हणालो " बीव्हेक्स". तिथे इंग्रजी  चा आनंद आहे. कुणीच बोलत नाही . तिने नकारार्थी मन हलवली. माझं धाबं दणाणलं. म्हंटलं ही काय पंचाईत. शेवटी तिला स्पेलिंग लिहून दाखवलं "bevaix" ती म्हणाली " बिव्हे". मी सुस्कारा सोडला. म्हंटलं  दे बाई एक तिकीट. तिने तिकीट देताना जे काही सांगितले त्याच्यावरून हे कळले कि न्युशॅटल नावाच्या गावाला ट्रेन चेंज करायची आहे. 

Switzerland चा नयनरम्य परिसर, स्वर्गच जणू, पृथ्वीवरचा. आणि मी विचार करतोय रेल्वे प्रवासात, पुढची ट्रेन व्यवस्थित मिळेल ना याचा. neuchatel ला उतरलो. मनमाडला जसं पूर्वी ब्रॉडगेज वरून मिटरगेज व्हायचं तसंच काहीसं . पुढच्या प्रवासाची ट्रेन आली ५ डब्ब्यांची. डब्बे पण एकदम छोटे. toytrain च म्हणा ना! थोडंफार इंग्रजी येणाऱ्या स्टेशन वर उभ्या माणसांनी सांगितलं कि सहावं स्टेशन आहे बेव्हे. त्यांना बाय करून बसलो ट्रेन मध्ये. सुटली झुकझुकगाडी. सहज म्हणून ट्रेन मध्ये चक्कर मारली . ५ डब्बे फिरायला असा किती वेळ लागतो आणि अक्षरश: फाटली. तुमचा विश्वास बसणार नाही, त्या आख्या  ट्रेन मध्ये मी एकटा. CHARTERED ट्रेन. बसायला आडमाप जागा असून मी आपला उभा. सहावं स्टेशन म्हणून सांगितले तरी प्रत्येक स्टेशनवर बघायचं हे बिव्हे तर नाही ना ! खरं तर बघायचो कुणी अजून चढताय का ट्रेन मध्ये! पण माणूस नावाचा प्राणी दिसला तर शपथ. तिथल्या स्टेशनच्या पाट्या पण बारक्या. शेवटी एकदाचं आलं बा ते बिव्हे. पुढे काय वाढून ठेवलं आहे याचा विचार करत उतरलो. सकाळचे ११ वाजले होते.

नितांतसुंदर बिव्हे स्टेशन, पण तिथे मी एकटा, आता करू काय, विचारू कुणाला. स्टेशनवर फोन नाही. चिटपाखरू दिसेना. आणि दिसलं, पाखरू दिसलं. एक अप्रतिम सौंदर्य माझ्याच दिशेने चालत येत होतं. ती पंचविशीची आणि मी........जाऊ दे मी कितीचा ते महत्वाचं नाही. (तसं मी "बाराचा" आहे हे कित्तेक वर्षापासून म्हणतात).  विचार करा situation चा, आधीच मी स्वर्गात आणि समोरून येतय ते लावण्य, एकटं. मी राहुल ती सिमरन, संवाद............फोन नंबरची देवाणघेवाण.............उद्या भेटण्याच्या आणाभाका................ एका प्रेमकहाणीची सुरूवात. परत ये मित्रा, असं फक्त हिंदी चित्रपटात होतं. मी तिच्याकडे गेलो, म्हणालो "ताई", तिला कळत नव्हतं, तरी मी जास्तीत जास्त सभ्य असण्याचा प्रयत्न करत होतो. "could you please guide me, how to reach this address" तिकीटबारी वरच्या बाईने केला तसाच चेहरा या ताईने पण केला आणि म्हणाली "no english". मी dumbcharads खेळत तिला विचारलं "फोन कुठे आहे कळेल का?" तिने एका दिशेने बोट दाखवले आणि विरूद्ध दिशेने चालू पडली, निर्विकार चेहर्याने. (खरं सांगा तुम्हाला वाटलं ती हसून थोडी लाजून गेली म्हणून. पण त्या ताईशपथ सांगतो, तशी नाही गेली).


तिने सांगितलेल्या दिशेने मी चालत गेलो आणि एका हमरस्त्यावर आलो. डावीकडे एक restaurant दिसलं, जीवात जीव आला. तिथे पोहोचलो तर ४-५ pensioner सिगार आणि काॅफी पित बसले होते. मी जाऊन हाॅटेल मालकिणीला विचारलं की हे B&B कुठं आहे? (असं वाटलं ना की मी मालकिणीबद्दल भारी सांगणार. तर नाही, ती आपल्या ललिता पवार यांच्यासारखी होती) इथे एक बरं होतं "no English" म्हंटलं की संपलं. मी आशेनं त्या म्हतार्यांकडे बघितलं, त्यांनी मला बघून पेपरमधे तोंड खुपसलं. शेवटी ललिताबाईंना दया आली आणि त्यांनी मला फोन कुठे आहे ते दाखवलं. 

मी माझ्या होस्टला फोन केला. आता जर त्यांनी फोन उचलला नसता तर, असा विचार आला असतानाच तिकडून आवाज़ आला "हॅलो" (सुदैवाने हाेस्ट English speaking होता). मी म्हणालो भेट बाबा एकदाचा. तर म्हणाला डावीकडे चालत ये, मी इकडनं निघालोच, रस्त्यावर भेट होइलंच. मी म्हणालो " अरे पण मी तुला ओळखणार कसं" तर म्हणाला " बाळा हे Switzerland आहे, रस्त्यावर आपण दोघंच असू". 

मी निघालो आणि थोडं अंतर चालल्यानंतर समोरून तो आला. काॅलेजमधे असताना वैभवी दिसली की जशी धडधड व्हायची, अगदी तसंच वाटायला लागलं. (किती निर्लज्जपणा, जे वाटलं ते लिहीतोय). आता तोच आहे का अजून कुणी. तेव्हढ्यात तोच माझ्याकडे हसून मला म्हणाला "राजेश" आणि माझा एवढा वेळ धरून ठेवलेला जीव भांड्यात पडला.

B&B जवळंच होतं. मला छान अशा रूम मधे त्याने सोडलं. भूक मरणाची लागली होती. दाढ़ी आंघोळ करून बरोबर आणलेलं खावं असा विचार करत होतो. सकाळपासूनचा घटनाक्रम आठवत दाढीचं क्रीम गालावर लावलं आणि ब्रशनी पसरवत असताना जाणवलं की काहीतरी चिकट लागतय. मी हात फिरवला आणि बर्याच वेळानी खदखदून हसलो ................................. विचारांच्या नादात (आता ती माझ्यासाठी परत सिमरन झाली होती) मी old spice च्या ऐवजी Colgate लावलं होतं

क्रमश:

Thursday, 24 October 2013

झोप



"अजूनही तसाच झोपतो का ग तो?" मंगेशची आई माझ्याबद्दल वैभवीशी बोलताना

"मंडल्या, जागा आहेस का झोपला?" नितीनची आई, मी हॅालमधे आणि काकू किचनमधून आवाज देतात

माझ्या झोपेची महतीच तशी आहे. बर्याच जणांनी त्याचा अनुभव घेतला आहे. वेळ, काळ, स्थळ, जागा याचा आणि झोपेचा काही संबंध असतो याची मला जाणीवच नसायची. कुठेही, कधीही, कसाही मी झोपायचो.

१९९६ ची गोष्ट असेल. एकदा बेळगावला काही कामानिमीत्त गेलो होतो. येताना प्रायव्हेट बसचं तिकीट होतं, शर्मा ट्रॅव्हल. बस मुंबईला जाणारी आणि मला पुण्याला उतरायचं होतं. तेव्हा चांगली बस असणं हे भाग्याचं लक्षण असायचं. बस एकदम टकाटक होती. दिवसभर काम करून रात्री १० वाजता बसमधे बसलो. जेवण झाले होते. थोडे थंडीचे दिवस होते, जवळ एक सोलापूरी चादर होती. ड्रायव्हर च्या मागची पहिली सीट होती, भरपूर लेगस्पेसवाली. बसल्याक्षणी मला झोप लागली. डोक्यावरून चादर घेउन मी मस्त झोपी गेलो. सकाळी बहुतेक ६ वाजले असावेत. चादर ओढून डोकं बाहेर काढलं तर मला लोणावळ्याचं हाॅटेल फरियाज दिसलं. हाईट म्हणजे मला वाटलं की मी स्वप्न बघतेाय, म्हणून परत झोपलो. परत जाग आली तेव्हा खंडाळ्याच्या घाटात काच पुसण्यासाठी बस थांबली होती. मग लक्षात आपला लोच्या झाला ते. क्लीनर म्हंटलं "उठवलं का नाही रे पुण्याला" तर म्हणाला " पुना करके कितना बोंब मारा, तुम पहिला सीट पे बैठकें उठा नहीं तो मैं क्या करूँ?" गपगुमान खोपोलीला उतरून परत पुण्याला आलो.

SKF मधे थर्ड शिफ्ट करायचो. ज्यानी ही शिफ्ट शोधली त्याला माझे फ़ार तळतळाट लागले आहेत. ती संपवून मी बसमधे असा बेदम झोपायचो की ज्याचं नाव ते. लोकं माझी मजा करायचे, माझ्या स्टाॅपला मला ऊठवायचेच नाही. गाडी कोथरूडला जाऊन परत येताना ड्रायव्हर ला माझी कीव यायची, मग तो मला अंबर हाॅलच्या इथे सोडायचा. 


एकदा मी वड़ोदरा एक्सप्रेस नी मुंबईला येत होतो. साधारण रात्री ११:३० ला सुटते आणि सकाळी सेंट्रलला सोडते. मी जे बेदम झोपलो. सकाळी उठलो तेव्हा सीन असा होता की गाडीतले सर्व प्रवासी उतरून गेले, एक मी आणि खालच्या बर्थचा एक असे दोघंच होतो आणि तो शहाणा माझे बुट घालून निघण्याच्या तयारीत होता. मी म्हंटलं "ए भाऊ, काय करतोस" तर आम्ही झोपेत असताना त्याच्या चपलांचा कुणीतरी पोबारा केला होता. मला जाग आली म्हणून नशीब, नाहीतर सकाळी ६:३० वाजता "कुणी चप्पल देतं का चप्पल" म्हणत फिरावं लागलं असतं. 

माझा पहिला परदेश दौरा सिंगापूरचा १९९८ साली झाला. असंच रात्री ११ वा ११:३० चं फ़्लाइट असेल. विमान प्रवास त्याआधी जास्त नव्हता झाला. पहिला परदेश दौरा म्हंटल्यावर लोकं कशी excited असतात़. मी आपला पडी टाकायला मोकळा. सकाळी MD संजीव आणि Manager बोनी पाॅल माझ्याकडे बघून हसत होते. तर झालं असं होतं की रात्री air pockets आणि rough weather मुळे विमान बरंच डचमळलं होतं, लोकांमधे बराच तणाव निर्माण झाला होता. मी त्यावेळेला थोडा हललो, पण एसी चा व्हेंट adjust करून परत निद्रादेवीच्या कुशीत. 

हे माझे वाहनांमध्ये झोपणे मजेशीर आहे. म्हणजे स्वत:च्या बेडपेक्षा बस, विमान किंवा सगळ्यात भारी म्हणजे रेल्वेत मस्त झोप येते. एकवेळ घरात अंथरूण पांघरूण च्या नावाने शिमगा असेल, पण रेल्वेत एकदम टापटीप. वैभवी तर गमतीत म्हणते की कुठलाही ड्रायव्हर दिसला की राजेशच्या डोळ्यावर झोप तरंगायला लागते आणि स्टार्टर मारला की झोपेची आराधना चालू होते.

या झोपेने पहिला झटका दिला १९८९ साली, जेव्हा मी वैभवीला propose केलं होतं. "हो की नाही" या उत्तरेच्या अपेक्षेत रात्र जागून काढली होती. त्यानंतर काही प्रसंग यायचे (म्हणजे proposal चे नाही बरं का!), की झोप उडायची. पण प्रासंगिक, २-४ दिवसात झटका ओसरायचा आणि निद्रेशी दोस्तीचा कारनामा चालू रहायचा. 

पण आजकाल या सखीने चांगलाच काडीमोड घेतला आहे, अगदी वितुष्टंच म्हणा की! व्यवसाय, त्याच्या अनुषंगाने येणारे ताणतणाव, आपणच सेट केलेले सदैव uncomfort zone ठेवणारे goals आणि standards याच्यामुळे ही निद्रादेवी रूसली आहे. गाढ म्हणावी अशी झोप अशी लागंतच नाही. पण काय करणार, अंगावर घेतलय तर निभवावं तर लागणारच. सगळं कळतय आणि जेव्हा ते वळेल तेव्हा या दुरावलेल्या सखीशी परत मैत्री होईल............तो खरा सुदिन, चुकलेच, ती खरी सुरात्र!

नमन २

म्युनिक मध्ये सिटी टूर घेतली होती. अन्द्रेआस नावाचा गाईड होता एक साधारण १०० किलो वजनाचा. थोडा वजनामुळे चालायचा पण त्रास व्हायचा. दिवसभर बडबड करत होता, हा राजवाडा, museum, B M W ची factory, stadium आणि सगळ्यात शेवटी octoberfest. Octoberfest तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच कि तो beer फेस्टिवल आहे. म्युनिकला beer खूप brew होते. (प्रत्येक म्युनिकर वर्षाला १०३ लि beer पितो. जगात एक नंबर झेक १०७ लि: इति अन्द्रेआस). नावाप्रमाणेच इथे आबालवृद्ध beer पिण्यासाठी येतात. १२ ऑक्टोबर चा राजाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हि प्रथा चालू झाली. एक रस्ता आहे साधारण ७५० मीटर लांबीचा (चूकभूल देणे घेणे), त्याच्या दोन्ही बाजूला प्रचंड मोठे असे मंडप असतात, म्हणजे एका मंडपात ५-६००० लोकं मावतील असे . आणि तिथे एक कलमी कार्यक्रम चालू असतो तो म्हणजे beer ढोसण्याचा. त्या मंडपात जाण्यासाठी प्रचंड रांगा असतात (रांगा चं नका सांगू हो कौतुक आम्हाला).

तर octoberfest ला आम्ही संध्याकाळी ४ वाजता पोहोचलो. बस पार्किंगचे वांदे च होते. खूप लांब बस पार्क करून शेवटी त्या फेस्ट ला पोहोचलो. सूचनेप्रमाणे ६ वाजता परत यायचे होते. ग्रुप disburse झाला. मरणाची गर्दी. मी आणि अजून ५ जण अन्द्रेआस बरोबर लटकलो होतो. रस्त्याच्या शेवटी एका टेन्ट मध्ये प्रवेश मिळाला. म्हणजे त्या जाड्यामुळे. नाहीतर फक्त बीअर चा वासच घेऊन परत यावं लागलं असतं. अमृततुल्य मध्ये असतात तशी निव्वळ बाकडी असतात लांबच्या लांब, मध्ये एक टेबल. त्यावर बसायचं आणि मग त्या ललना घेऊन येतात ते १ लि चे टम्पास. आणि मग हाणायच अमृत जमेल तेवढं

आमच्यात एक जोगळेकर म्हणून होते. त्यांनी एक भारी jacket (अगदी किमतीत सांगायचं असेल तर ५-६ हजाराचं) घातलं होतं. गर्दीमध्ये उकडायला लागलं म्हणून बाजूला काढून ठेवलं. बीअर प्राशन झाले २ मग प्रत्येकी. घाई होती, ६ च्या आत बसमध्ये जाऊन बसायचे होते. आणि टायमिंग एकदम कडक, त्यामुळे तडक निघालो परत अन्द्रेआस आणि आम्ही ५ जण. फेस्ट मधून बाहेर पडलो, बसच्या दिशेनं जायला लागलो. अन्द्रेआस ला बिचार्याला चालायचा त्रास होत होता. अर्थात तो आम्हाला एका स्पॉट  पर्यंत सोडून अलविदा म्हणणार होता. तो स्पॉट साधारण २०० मी असेल आणि जोगळेकर थबकले आणि फक्त म्हणाले "jacket राहिलं" आता बोंबला. तेव्हा सांगताहेत बायको नि वाढदिवसाला घेतलं होतं २ महिन्यापूर्वी. म्हणजे सत्यानाश. अन्द्रेआस नि ताडलं काय झालं म्हणून. थोडा खल झाला, एवढी गर्दी तिथे, कोण ठेवणार ते आणि परत पोहोचण्याची वेळ, कडक जर्मन बस चालक यावरून सर्वानुमते असे ठरले कि त्या jacket वर पाणी सोडायचे. (कि बीअर सोडायची). जोगळेकरांनी  सुद्धा खुल्या मनाने बायकोच्या शिव्या खायची तयारी करून घेतली.

अन्द्रेअस ला अलविदा म्हणण्याची जागा आली. बिचार्याने आमच्यासाठी खूपच त्रास घेतला होता. वजनामुळे चालायचा त्रास असून सुद्धा आमच्याबरोबर न कंटाळता भटकला. फेस्टमध्ये  त्याच्या बीअर चे पैसे आम्ही दिले तीच काय टीप (१५ युरो मोजले हो वट्ट).

त्याला अलविदा करून आम्ही बस मध्ये अगदी वेळेवर पोहोचलो. जोगळेकरांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत होती, पण काही इलाज नव्हता. आमचा पुढचा कार्यक्रम डिनर चा होता एका Indian Restaurant मध्ये.

आम्ही पोहोचलो तर buffet मांडूनच ठेवला होता. सूप घेतले आणि ग्रुप मध्ये गप्पा चालू झाल्या. गप्पा अर्थात जोगळेकरांच्या jacket बद्दलच होत्या. तिथली गर्दी, आणि त्यामुळे कसं बाजूला काढून ठेवलं आणि विसरलो वैगेरे…………. आम्हाला पोहोचून २०-२५ मिनिटे झाली होती. आणि माझं लक्ष हॉटेलच्या मेन गेट कडे गेलं. अचानक मला चेहरा घामाने डबडबलेला एक जाडा माणूस दिसला आणि हो अन्द्रेआस च होता तो आणि त्याच्या उजव्या हातात होतं ते…………………………… जोगळेकरांचे jacket. 


आम्ही अवाक झालो होतो. आम्हाला बाय केल्यानंतर अन्द्रेआस ला काही करमेना. तो परत त्या शेवटच्या टेंट मध्ये चालत गेला. त्या ५-६००० लोकांच्या टेंट मध्ये ते jacket होतं त्याच बाकड्यावर. अन्द्रेआस नि त्यावर झडप च घातली आणि झपझप आमच्याकडे येऊ लागला.आमच्या गप्पामधून त्याला कळले होते कि आम्ही कुठल्या तरी  Indian Restaurant मध्ये जाणार होतो. ते तसं फेस्ट पासून लांब होतं. पण पठ्ठ्या आला शोधत. त्याचे बीअरचे पैसे देताना गुणिले ५५ चा हिशोब करणारा मी, मानभावीपणे त्याला जेवायचा आग्रह करत होतो. पण अन्द्रेआस काही बधला नाही. काही महत्वाचे काम आहे म्हणून सटकलाच. जोगळेकरांच्या चेहऱ्यावर ख़ुशी ओसंडून वाहत होती. माझे लक्ष बाय बाय करणाऱ्या अन्द्रेआस च्या घामेजलेल्या चेहऱ्याकडे गेले……………. त्यावर एक वेगळेच आत्मिक समाधान विलसत होते.

Wednesday, 23 October 2013

बनी तो जर्मनी

व्यवसायाच्या निमित्ताने माझे अनेक देशांमध्ये फिरणे झाले, त्यापैकी मला सगळ्यात जास्त आवडलेला देश म्हणजे जर्मनी. जर्मनीत मी तीनदा  गेलो एकदा एका दिवसाकरता (म्हणजे सकाळी मिलान वरून frankfurt आणि संध्याकाळी परत मिलान), दुसर्यांदा एका आठवड्यासाठी आणि तिसर्यांदा मी उणीपुरी १२ दिवसांची ट्रीप केली. (या माझ्या पहिल्या २ ओळीतच मित्रांना चलाखी कळली असेलच.
मी काही देशांना visit केली आहे पण "अनेक" लिहिले कि कसं वाक्याला एक वजन येतं. आता हाच शब्द पहा ना "उणीपुरी". शक्यतो ४-५ वर्षे एखाद्या देशात राहिले कि लिहितात "उणीपुरी ४-५ वर्षे काढली".  पण हे आपलं असंच आहे. म्हणजे कणभर करायचं आणि मणभर दाखवायचं. एवढं लिहिल्यानंतर माझ्या हुशार मित्रांना कळलंच असेल की मी कंपनीत मार्केटिंग बघतो. असो)

तर मी सांगत होतो जर्मनी बद्दल. भारत सोडून जर मला कुठल्या देशात राहायला सांगितलं तर मी जर्मनीचं नाव घेईल. (लिहायला काय हरकत आहे, विसा ऑफिसर चं बघू नंतर). नवीन तंत्रज्ञान, नैसर्गिक साधनसंपत्ती, शिस्त, माणुसकी या सगळ्यांचा अनोखा संगम मला जर्मनीत पाहायला मिळाला. (खरं तर सार्या युरोप ला हे लागू होतं असं म्हणतात). एका आठवड्याच्या ट्रीप मध्ये मी उत्तर जर्मनीत फिरणे झाले तर त्या १२ दिवसांच्या ट्रीप मध्ये मी बसनी खूप फिरलो. मुख्यत: दक्षिण जर्मनीत. अनेक कंपनीत visit केल्या, ज्या अक्षरश: खेडेगावात उभ्या केल्या आहेत. तिथे digital divide नावाचा काही प्रकारच नाही आहे. म्हणजे कुठेही गेलं तरी, सर्व जीवनावश्यक गोष्टी तसेच इंटरनेट, बँकिंग, courier अशा auxiliary services या सगळीकडेच उपलब्ध असतात.

नैसर्गिक साधनसंपत्ती चा समर्पक उपयोग हे जर्मनीचे वैशिष्ट्य. कुठल्याही हॉटेल मध्ये corridor मध्ये पाय ठेवल्यानंतर डोक्यावर लाईट पेटणार. वर्षातून २-३ महिने सूर्यप्रकाश असावा पण प्रत्येक घरावर सोलार panel आहेच. एकरांमध्ये सोलार फार्म उभे केले आहेत. फिरत असताना विंड मील चा जथा दिसलाच पाहिजे.

लोकं अतिशय कष्टाळू. FMB (Family Managed Business) हे जर्मनी चं अजून अप्रूप. मला वाटलं आपण एवढं ऐकतो, स्वतंत्र कुटुंब पद्धती बद्दल. त्या पार्श्वभूमीवर मला हे business model जरा विशेष वाटलं.

त्या १२ दिवसाच्या ट्रीप मध्ये बसमधून खूप फिरलो. बसचे पण रूल भारी. ४ तासापेक्षा driver ने सलग बस चालवायची नाही. ४ तास गाडी चालवल्यावर ४५ मिनिटे सक्तीचा stop. आराम करायचा, मगच पुढच्या प्रवासाला. एका दिवसात १२ तासापेक्षा duty करायची नाही. म्हणजे सकाळी ८ वाजता starter मारला कि रात्री ८ वाजता compulsory गाडी बंद. काहीही झालं तरी. highway ला फ्रेश होण्याची ठिकाणे पण मस्त. urinal चा वापर करायचा असेल तर युरो १ charge पडतो. (बर्याचदा मी पायावर पाय ठेवून बसायचो पण २-४ दा "पाण्यात" घालवले रु ५५ फक्त). दांडका च असतो. १ युरो चं कॉईन टाकल्याशिवाय आताच जाता येत नाही.

अजून एक मस्त पद्धत बघितली. mall मध्ये trolley एका ठिकाणी stored असतात. trolley पाहिजे असेल तर ५ युरो चं कॉईन टाकायचं कि एक तिचे lock उघडते. खरेदी झाली, कार मध्ये समान ठेवलं कि trolley परत store करायची. त्यावेळेस ती योग्य पद्धतीने lock केली कि ५ युरो परत. म्हणजे trolley कुठंही रस्त्यावर भरकटत राहत नाही तर जागेवर येउन बसते.

जुन्या वस्तू सांभाळण्याची यांना फार हौस. wuppertal ला अमोल कडे गेलो होतो. तिथे ११० वर्ष जुनी inverted मोनोरेल बघितली. शप्पथ सांगतो आयटम आहे ती ट्रेन.


बाकी technical गोष्टीबद्दल लिहायला बसलो तर पानं भरतील पण तुम्ही बोर व्हाल. त्यामुळे सांगता एका भारी किस्स्याने.

क्रमश: कालपासून पुढे

म्युनिक मध्ये सिटी टूर घेतली होती. अन्द्रेआस नावाचा गाईड होता एक साधारण १०० किलो वजनाचा. थोडा वजनामुळे चालायचा पण त्रास व्हायचा. दिवसभर बडबड करत होता, हा राजवाडा, museum, B M W ची factory, stadium आणि सगळ्यात शेवटी octoberfest. Octoberfest तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच कि तो beer फेस्टिवल आहे. म्युनिकला beer खूप brew होते. (प्रत्येक म्युनिकर वर्षाला १०३ लि beer पितो. जगात एक नंबर झेक १०७ लि: इति अन्द्रेआस). नावाप्रमाणेच इथे आबालवृद्ध beer पिण्यासाठी येतात. १२ ऑक्टोबर चा राजाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हि प्रथा चालू झाली. एक रस्ता आहे साधारण ७५० मीटर लांबीचा (चूकभूल देणे घेणे), त्याच्या दोन्ही बाजूला प्रचंड मोठे असे मंडप असतात, म्हणजे एका मंडपात ५-६००० लोकं मावतील असे . आणि तिथे एक कलमी कार्यक्रम चालू असतो तो म्हणजे beer ढोसण्याचा. त्या मंडपात जाण्यासाठी प्रचंड रांगा असतात (रांगा चं नका सांगू हो कौतुक आम्हाला).

तर octoberfest ला आम्ही संध्याकाळी ४ वाजता पोहोचलो. बस पार्किंगचे वांदे च होते. खूप लांब बस पार्क करून शेवटी त्या फेस्ट ला पोहोचलो. सूचनेप्रमाणे ६ वाजता परत यायचे होते. ग्रुप disburse झाला. मरणाची गर्दी. मी आणि अजून ५ जण अन्द्रेआस बरोबर लटकलो होतो. रस्त्याच्या शेवटी एका टेन्ट मध्ये प्रवेश मिळाला. म्हणजे त्या जाड्यामुळे. नाहीतर फक्त बीअर चा वासच घेऊन परत यावं लागलं असतं. अमृततुल्य मध्ये असतात तशी निव्वळ बाकडी असतात लांबच्या लांब, मध्ये एक टेबल. त्यावर बसायचं आणि मग त्या ललना घेऊन येतात ते १ लि चे टम्पास. आणि मग हाणायच अमृत जमेल तेवढं

आमच्यात एक जोगळेकर म्हणून होते. त्यांनी एक भारी jacket (अगदी किमतीत सांगायचं असेल तर ५-६ हजाराचं) घातलं होतं. गर्दीमध्ये उकडायला लागलं म्हणून बाजूला काढून ठेवलं. बीअर प्राशन झाले २ मग प्रत्येकी. घाई होती, ६ च्या आत बसमध्ये जाऊन बसायचे होते. आणि टायमिंग एकदम कडक, त्यामुळे तडक निघालो परत अन्द्रेआस आणि आम्ही ५ जण. फेस्ट मधून बाहेर पडलो, बसच्या दिशेनं जायला लागलो. अन्द्रेआस ला बिचार्याला चालायचा त्रास होत होता. अर्थात तो आम्हाला एका स्पॉट  पर्यंत सोडून अलविदा म्हणणार होता. तो स्पॉट साधारण २०० मी असेल आणि जोगळेकर थबकले आणि फक्त म्हणाले "jacket राहिलं" आता बोंबला. तेव्हा सांगताहेत बायको नि वाढदिवसाला घेतलं होतं २ महिन्यापूर्वी. म्हणजे सत्यानाश. अन्द्रेआस नि ताडलं काय झालं म्हणून. थोडा खल झाला, एवढी गर्दी तिथे, कोण ठेवणार ते आणि परत पोहोचण्याची वेळ, कडक जर्मन बस चालक यावरून सर्वानुमते असे ठरले कि त्या jacket वर पाणी सोडायचे. (कि बीअर सोडायची). जोगळेकरांनी  सुद्धा खुल्या मनाने बायकोच्या शिव्या खायची तयारी करून घेतली.

अन्द्रेअस ला अलविदा म्हणण्याची जागा आली. बिचार्याने आमच्यासाठी खूपच त्रास घेतला होता. वजनामुळे चालायचा त्रास असून सुद्धा आमच्याबरोबर न कंटाळता भटकला. फेस्टमध्ये  त्याच्या बीअर चे पैसे आम्ही दिले तीच काय टीप (१५ युरो मोजले हो वट्ट).

त्याला अलविदा करून आम्ही बस मध्ये अगदी वेळेवर पोहोचलो. जोगळेकरांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत होती, पण काही इलाज नव्हता. आमचा पुढचा कार्यक्रम डिनर चा होता एका Indian Restaurant मध्ये.

आम्ही पोहोचलो तर buffet मांडूनच ठेवला होता. सूप घेतले आणि ग्रुप मध्ये गप्पा चालू झाल्या. गप्पा अर्थात जोगळेकरांच्या jacket बद्दलच होत्या. तिथली गर्दी, आणि त्यामुळे कसं बाजूला काढून ठेवलं आणि विसरलो वैगेरे…………. आम्हाला पोहोचून २०-२५ मिनिटे झाली होती. आणि माझं लक्ष हॉटेलच्या मेन गेट कडे गेलं. अचानक मला चेहरा घामाने डबडबलेला एक जाडा माणूस दिसला आणि हो अन्द्रेआस च होता तो आणि त्याच्या उजव्या हातात होतं ते…………………………… जोगळेकरांचे jacket. 

आम्ही अवाक झालो होतो. आम्हाला बाय केल्यानंतर अन्द्रेआस ला काही करमेना. तो परत त्या शेवटच्या टेंट मध्ये चालत गेला. त्या ५-६००० लोकांच्या टेंट मध्ये ते jacket होतं त्याच बाकड्यावर. अन्द्रेआस नि त्यावर झडप च घातली आणि झपझप आमच्याकडे येऊ लागला.आमच्या गप्पामधून त्याला कळले होते कि आम्ही कुठल्या तरी  Indian Restaurant मध्ये जाणार होतो. ते तसं फेस्ट पासून लांब होतं. पण पठ्ठ्या आला शोधत. त्याचे बीअरचे पैसे देताना गुणिले ५५ चा हिशोब करणारा मी, मानभावीपणे त्याला जेवायचा आग्रह करत होतो. पण अन्द्रेआस काही बधला नाही. काही महत्वाचे काम आहे म्हणून सटकलाच. जोगळेकरांच्या चेहऱ्यावर ख़ुशी ओसंडून वाहत होती. माझे लक्ष बाय बाय करणाऱ्या अन्द्रेआस च्या घामेजलेल्या चेहऱ्याकडे गेले……………. त्यावर एक वेगळेच आत्मिक समाधान विलसत होते.

Tuesday, 15 October 2013

नमन

विजय बरोबर आर श्रीनिवासन साहेबांकडे जायचे ठरले होते . विजय माझा जवळचा मित्र. एका स्मॉल स्केल इंडस्ट्रीचा मालक . आर श्रीनिवासन (लोकं त्यांना श्रीनि सर या नावानी ओळखतात) १ २ ० ० कोटी रुपयाच्या श्रीनिवासन ग्रुप चे अध्यक्ष. विजयची आणि त्यांची ओळख गेल्या ३ वर्षांची. विजयचा हरहुन्नरी पणा श्रीनि सरांनी बरोबर जोखला होता. एका नवीन प्रोजेक्ट मध्ये श्रीनि सरांनी  त्याला भागीदार करून घेतले होते.

जेव्हा जेव्हा विजय मला अशात भेटायचा, श्रीनि सरांबद्दल भरभरून बोलायचा. श्रीनि सर असे साधे आहेत, मुलगा BMW मध्ये फिरतो पण श्रीनि सर कसे Indica मधेच फिरतात, त्यांचे decision making किती फास्ट आणि कसे योग्य.  . श्रीनि सर कसे दक्षिण भारतातून जॉब साठी पुण्यात आले. शिक्षण नाही, खिशात दमडी नाही, पडेल ते काम केलं. शून्यातून विश्व निर्माण केलं. आज १ २ ० ० कोटीचा कसा मालक  आहे. मला म्हणायचा तू एकदा त्यांना भेटायला पाहिजे मी म्हणायचो "अरे एवढा मोठा माणूस तो. मला भेटण्यात त्यांना काय इंटरेस्ट" मला म्हणाला "तुला त्यांना भेटण्यात इंटरेस्ट आहे ना, चल मग".

मंगळवारची संध्याकाळी ५ वाजताची वेळ ठरली. मनावर थोडे दडपण होते. विजय आणि मी श्रीनि group च्या त्या अलिशान office मध्ये शिरलो . आत जाताना विजय नि मला सांगितलं की गेल्या गेल्या त्यांच्या पाया पडायचं. ते साधारण सत्तरीचे आहेत हे माहिती होतं, पण तरीही हे पाया का पडायचं ते काही मला उमगलं नव्हतं. मी विचारलं "का", तर म्हणाला "अशी पद्धत आहे आणि ती का आहे हे विचारण्याच्या फंदात मी काही पडलो नाही, तुला awkward वाटत असेल तर तू पाया पडू नकोस." मी हो हि म्हणालो नाही आणि नाही पण. थोडं विचित्र वाटलं हे खरं.

ऑफिस सुंदरच होतं, म्हणजे कुठेही झकपक पणा नव्हता पण एक grace होती प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि गोष्टी म्हणाल तर जिथल्या तिथे. रंगसंगती अतिशय सुरेख. एक सुरेल instrumental CD चालू होती background ला. एकंदरीत वातावरण मस्तच होते. कामं पण व्यवस्थित चालू होती, कुठे गडबड नाही, गोंधळ नाही. सगळे जण शांतपणे आपापलं काम करत होते , जे फोन वर बोलत होते त्यांच्या आवाजाची पट्टी खालची होती. एकंदरीत काहीतरी वेगळं होतं या ऑफिस मध्ये एवढं नक्की जाणवलं.

विजयचा तिथे रोजचाच राबता होता. मला म्हणाला "सरांचा निरोप आहे, ५ मिनिटे थांबावे लागेल." तो कुणालातरी भेटायला एका केबिन मध्ये गेला. मऊशार सोफ्यावर बसून
मी इकडचे तिकडचे observation करत होतो. ५ मिनिटात विजय आलाच आणि म्हणाला "चल, आपल्याला बोलावलंय".

श्रीनि सर केबिन च्या बाहेर आले. विजय शिरस्त्याप्रमाणे त्यांच्या पाया पडला. मी पाया पडावं कि नाही या संभ्रमात असताना वाकल्यासारखे केले आणि आम्ही त्यांच्या केबिन मध्ये गेलो . मी श्रीनि सरांचे निरीक्षण करू लागलो. साधारण सवापाच फुट उंची, सावळा रंग, डोक्यावर अर्ध्यापेक्षा जास्त टक्कल, परीटघडीचा पांढरा शर्ट असं एक सर्वसाधारण व्यक्तिमत्व. कुठल्याही बाजूने हा गृहस्थ १ २ ० ० कोटीची उलाढाल असलेल्या कंपनीचा मालक वाटत नव्हता. "कसा आहेस" मला विचारले . साधारण दक्षिणात्य माणसाचे जसे मराठी असते तसेच त्यांचेही होते. संभाषण चालू होता होताच त्यांचा ऑफिस बॉय टक टक करून आत आला आणि म्हणाला "निघतो". सर म्हणाले "अरे रवि, थांब रे ५ मिनिटे बाहेर"

तो बाहेर गेल्यानंतर मला म्हणाले "हा मुलगा माझ्याकडे आहे १ २ वर्षांपासून. बायको गेली आहे बाळंतपणाला गावी. हा चालला आहे भेटायला. याच्या घरी म्हातारे आई वडील आहेत. खुळा आहे, घरी जाताना काही नेणार नाही. म्हणून मीच पाठवले आहे चितळे कडे एकाला, बाकरवडी, फरसाण आणि काजू कतली आणायला. येईलच एवढ्यात." मी अवाक होऊन ऐकत होतो, एवढा मोठा माणूस आपल्या ऑफिस बॉय बद्दल इतका विचार करत होता.

इतक्यात ते सगळे जिन्नस घेऊन तो बाहेर गेलेला माणूस आला. श्रीनि सरांनी हाक मारली "रवि ये रे, हे घेऊन जा सगळे गावी. दे सगळ्यांना. माझा नमस्कार सांग तुझ्या आई वडिलांना. बायकोला धीर दे सगळं व्यवस्थित होईल म्हणून. आणि हे घे पैसे" असं म्हणून ३ - ४ हजार रुपये देऊ लागले. रवि म्हणाला "अहो सर, राहू द्या आधीच advance आहे." सर म्हणाले "अरे तो ऑफिस चा, हे माझ्याकडून. आणि हे बघ" मिश्किलपणे म्हणाले "एक box इथे वाट काजू कतलीचा" रवि त्यांच्या पाया पडला आणि डोळे पुसत म्हणाला "येतो सर".

आणि मग माझी विचारपूस चालू केली. मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत होतो पण माझ्या मनात तो रवि, त्याच्याबद्दल असणारी श्रीनि सरांची तळमळ, त्याच्या आई वडिलांना सांगितलेला नमस्कार हेच चालू होतं. माणसाचे मोठे पण म्हणजे काय याचा मी अनुभव घेतला होता. तो काही माझ्या डोक्यातून जाता जात नव्हता.

"ठीक आहे मग, येत जा अधून मधून. गप्पा मारू यात. आणि काही चांगला product असेल तर सांग, प्रोजेक्ट करू." श्रीनि सर म्हणाले. मी म्हणालो "येतो सर." आणि त्यांच्या पायाला स्पर्श केला, मनोभावे…………या वेळेस विजयला ते मला सांगण्याची आवश्यकता नव्हती.

(या गोष्टीतील नावं आणि व्यवसाय काल्पनिक आहेत. पण घटना एकदम अस्सल आहे, अगदी स्वतः अनुभवलेली. त्यातूनही कुणी  अशीच माणसे आणि असाच प्रसंग अनुभवला असेल तर तो योगायोग समजू नये. कारण जीवनाला अर्थ देणारी अशी लोकं असतात यावर माझा दृढ विश्वास आहे)

Friday, 11 October 2013

लढा

काही लोकं अशी असतात़ की त्यांच्याबद्दलच्या काही गोष्टी किंवा ते व्यक्तिमत्वच आपल्या मनात घर करून राहिलेलं असतं. माझ्या पण आयुष्यात काही अशी लोकं आहेत. विशेष असं त्यांच्या हातून काही घडलं असेल असंही नाही, पण मला जे त्यांचे अनुभव आले ते जतन करून ठेवण्यासारखे आणि मी ते वेळोवेळी सांगतो देखील. आणि दरवेळी मी तेव्हढाच हर्षोत्फुल असतो.

SKF ची साधारण २०-२२वर्षापूर्वीची सेकंड शिफ्ट. बुधवार होता. मी आणि अजय नाईक ड्यूटीवर होतो. ७:४५ वाजता जेवण्याची वेळ झाली. नेहमी उत्साहानी बडबड करणारा अजय जरा मलूल वाटत होता. मी विचारलं " काय रे काय झालंय?" अजय म्हणाला "काही नाही रे जरा थकल्यासारखं वाटतंय" त्याला जेवण्याची प्लेट सुद्धा उचलायला अवघड जात होतं. मी त्याला म्हणालो "तु बस, मी घेउन येतो़ तुझी प्लेट" जेवताना म्हणाला " सकाळी swimming जरा जास्त झालं, ते त्रास देत असेल" अर्ध्या तासात जेवून आम्ही ड्यूटीवर हज़र झालो. शिफ्ट संपली तेव्हा कळलं अजय बरं वाटत नाही म्हणून लवकर घरी गेला. मला त्यात काही वावगं वाटलं नाही.

दुसर्या दिवशी गुरूवार म्हणजे सुट्टीचा वार. मी आपल्याच मस्तीत घालवला असेल.

शुक्रवारी सकाळी first shift ला आलो तेव्हा कळलं अजयला जहांगीर मध्ये अॅडमिट केलं आहे आणि त्याला काहीतरी गंभीर आजार झाला आहे. मी पण चक्रावलो, बुधवारी लक्षात आलं होतं की त्याची तब्येत बरी नाही आहे, पण अॅडमिट करण्याएवढी वाईट परिस्थितीही नव्हती. ३:३० वाजेपर्यंत अजयच्या आजाराबद्दल काही मोघम असं कानावर येत होतं. मी तसाही संध्याकाळी जहांगीर ला त्याला भेटायला जाणारच होतो, म्हंटलं तेव्हाच बघू काय प्रकार आहे तो.

रूम मध्ये गेलो तेव्हा अजयची पत्नी चिंताग्रस्त चेहरा करून बसली होती, पण अजयचा चेहरा मात्र हसरा होता. म्हंटला "ये रे राजा" (राजेशला राजा अशी राजेशाही हाक मारणारे काही मोजके लोक आहेत त्यापैकी अजय एक). त्याचं स्वागत बघूनच मी थोडा निर्धास्त झालो. पण पुढे तो जे हसर्या चेहर्याने सांगत गेला, त्यानी माझा चेहरा मात्र काळवंडत गेला. "त्याचं काय आहे, माझ्या हाता पायातली शक्ती पूर्ण गेली आहे, फक्त मी व्यवस्थित बोलू शकतो" "ठीक आहे, प्राॅब्लेम आहे, पण बोलू शकतो हे काय कमी आहे का?" अजयचा positive attitude बघून मी चाट पडत होतो. अजयला बोलायला खूपच आवडतं, अगदी बडबड्याच म्हणा ना. त्याचा sense of humor ही ज़बरदस्त. कंपनीच्या पार्टीमध्ये हा पठ्ठ्या center of attraction असायचा. आजार गंभीर आहे, पण मेंदू तर शाबूत आहे, बोलू शकतो आहे, पूढचं पूढं बघू असा साधा सरळ हिशोब होता. काहीतरी न्यूरोच्या related issue होता हे कळले होते. त्यानंतर त्याने सांगितलेला क़िस्सा मला थक्क करून गेला.

गुरूवारी अॅडमिट केल्या नंतर त्याला ३५००० रूपयाला एक अशी चार इंजेक्शनं त्याच्या शरीरात उतरवली होती. रात्री (की शुक्रवारी सकाळी) त्याला उपचार म्हणून electric shocks देण्यात येणार होते. याची बहुधा बडबड चालूच होती. Stretcher वरून घेउन जाण्यासाठी नर्स आली. त्या परिस्थितीतल्याही त्याच्या विनोदी झाक असलेलं बोलणं बघून ती म्हणाली "का हो तुम्हाला electric shocks देणार आहेत, tension नाही वाटत" त्यावर अजय म्हणाला " त्याचं काय आहे सिस्टर, ३५००० रूपयाचं एक अशी चार इंजेक्शनं ठोकून तुम्ही मला एवढा मोठा shock दिला आहे, त्याच्यासमोर हे shocks म्हणजे किस झाड़ की पत्ती" आता बोला !

पुढे त्या आजाराबद्दल कळलं लाखात एखाद्यालाच होतो. त्याचं नाव आहे Guillain Barre Syndrome. अर्थात त्या आजाराबद्दल कळायलाच तीन आठवडे गेले . वाचण्याची शक्यता खूपच कमी. Neurologist दिवटे मॅडम आणि जहांगीर हाॅस्पिटल यांनी खूपच व्यवस्थित उपचार केले. डाॅक्टर दिवटे म्हणाल्या की औषधापेक्षा तुम्ही त्या आजाराला कसं सामोरं जाता यावर recovery अवलंबून आहे. अजय वाखाणण्याजोग्या धैर्यानी त्या दुर्धर आजाराला सामोरा गेला, आणि त्यावर विजय मिळवून दिमाखात कंपनीत परत रूजू झाला.

आज अजय SKF अहमदाबाद चा plant head आहे. कालानूरूप आमचं बोलणं आता कमी होतं, पण त्याचा आजार आणि तो लढा क़ायम माझ्या लक्षात राहील.




Monday, 7 October 2013

मला लाभलेले पायगूण

कालच्या लेखावर वैभवी ची परमप्रिय मैत्रीण सिंगापूर निवासी  अनु सिंग (पूर्वाश्रमीची सोनल वाळिंबे) हिच्याकडून मैत्रीण प्रेमापोटी एक  comment आली, वैभवी चा पायगुण होता म्हणून झाले. मग मी विचार करायला लागलो (हे काय भलतंच, अशा नजरेने वाचू नका, मी पण करतो कधी कधी विचार) आणि लक्षात आले कि माझ्या आयुष्याचा डोलाराच कुणाच्या तरी  पायगुणावर उभा आहे. आणि अचानक मला पाय या अवयवा विषयी आणि लाथ बसणे या प्रक्रियेविषयी विशेष ममत्व वाटू लागले . 

भारती विद्यापीठातून १ २ जण  बजाज ऑटो मध्ये select झालो होतो त्यात अस्मादिकांचा नंबर लागला होता. १ २ ही जण कंपनीत रुजू व्हायला औरंगाबाद ला गेलो. मित्रांची हसीमजाक चालू होती, उदयाला नवीन आयुष्याची सुरुवात होणार होती, ३ ० दिवसानंतर पहिला पगार होणार होता. सुख स्वप्नांची कमी नव्हती. मेडिकल झाली . डॉक्टर बर्वे आणी डॉक्टर जहागीरदार होते. संध्याकाळी ५ वाजता सगळ्यांना बोलावले. आणि प्रत्येकाला सांगायला सुरुवात केली तू या department ला जा, तू तिकडे जा . मी आपला हातावर हात चोळत, पाय हलवत चुळबूळ करत बसलो होतो पण मला काही सांगतच नव्हते. सगळ्यात शेवटी माझ्याकडे आले, आणि मला सांगण्यात आले कि बाळा तू मेडिकल मध्ये reject झाला आहेस . धरणीकंप झाला, हात पाय थरथरू लागले . कॅम्पस मध्ये एक जॉब offer घेतली कि दुसरीकडे appear होता येत नव्हतं. बजाज ला जॉईन होण्याचा मटका लागला होता, ती पण लाईन  बंद झाली होती खूप प्रयत्न केले, पण उपयोग झाला नाही. आयुष्यात मिळालेली पहिली लाथ, म्हणजे पायगुण डॉक्टर बर्वेंचा .   डाॅक्टर बर्व्ंेंच्या पायगुणामुळे दुसरा जाॅब शोधला आणि SKF मध्ये जाॅईन झालो. 

SKF च्या मुलाखतीनंतर मला सांगितले की TRB grinding ला जा. मी दरवाजापर्यंत पोहोचलो नाही तोच personal manager ने परत बोलावले आणि आज्ञा दिली "असं कर, DGBB grinding ला जा" आज्ञा शिरसावंद्य मानून मी DGBB grinding कडे कूच करता झालो. खरंतर ती लाथच, पण मी "आज्ञा" "शिरसावंद्य" असे शब्द याच्यासाठी वापरले कारण ते माझ्या पथ्यावर पडलं होतं. का ते मला नंतर कळलं. TRB म्हणजे taper roller bearing चं grinding department म्हणजे trainee साठी काळ्या पाण्याची शिक्षा होती. तिथे कुणीही ३ महिन्यापेक्षा जास्त trainee टिकत नव्हता. DGBB म्हणजे deep groove ball bearing ला पाठवणारे तामोळी साहेब माझ्यासाठी पायगूणाचे ठरले.

एक वर्ष govt training केल्यावर मी कंपनी ट्रेनी झालो आणि एव्हाना माझ्या affair ची कुणकुण दोन्ही घरच्यांना लागली होती. मी नोकरीबरोबरच ICWA करण्याचा प्रयत्न करत होतो. पण लग्नाची भानगड निघल्यामुळे मी ICWA चा नाद सोडून दिला, आतली गोष्ट सांगतो, मला ते ICWA झेपतच नव्हतं. ते मी उगाचच वैभवीवर शायनिंग मारण्यासाठी नाटक करत होतो. थोडक्यात माझं लग्न ठरणे म्हणजे नियतीचाच आग्रह आणि पायगुण. (आता नियती म्हणजे कोण ते विचारू नका .)


आता लग्न तर ठरले, पगार रु २ ४ ० ० दरमहा फक्त. कंपनी ट्रेनी. म्हणजे थोडक्यात कमवायची अक्कल यायच्या आत गमवायचे मार्ग खुले होत होते . १ ८ ऑगस्ट ९ १ ला साखरपुडा झाला आणि २ डिसेंबर ची तारीखही ठरली. कुठल्याही angle ने मी लग्नाचा लायक उमेदवार नव्हतो. permanent जॉब नाही, पगार तुटपुंजा आणि वय २ ३ . २ १ ऑगस्ट ला एक अशक्य गोष्ट घडली. आमचे divisional manager पाटील साहेबांनी मला केबिन मध्ये बोलावले. सहसा ते कुणाशी बोलत नसत आणि ट्रेनी शी तर त्याहून नाही. वाटलं काय नारळ मिळतो काय आता? बोहल्यावर चढताना श्रीफळाची सोय झाली असे वाटायला लागले. धडधडत्या अंत:कारणाने पाटील साहेबांचे बोलणे ऐकू लागलो "त्याचे काय आहे मंडलिक, तुला आणि ३ कंपनी ट्रेनी ला ट्रेनिंग period कमी करून confirm करायचे ठरवले आहे. तुमच्या appointment ची तारीख १ ऑगस्ट आहे" आता फक्त वय वर्ष २ ३ ह्यामुळे लग्नासाठी मी लायक ठरत नव्हतो. (मराठी भाषेची कशी हीच गम्मत आहे "लग्नासाठी मी नालायक ठरत होतो" कसं वाटतं?) पण ते काही मी बदलू शकत नव्हतो.पाटील साहेबांनी लाथ दिली, sorry साथ दिली आणि मी होत्याचा नव्हता होता होता वाचलो. 

SKF नंतर rollon hydraulics मध्ये ८ वर्षं काम केले . २ ० ० २ मध्ये विकास दांगट या नावाप्रमाणेच दणकट व्यक्तिमत्वाच्या माझ्या मित्राने म्हंटले "आता किती दिवस दुसर्याची धुणी धुणार. बस झालं नौकरी करणं". माझ्या अंगात मुरलेला  साधं वरण भात सळसळला आणि मी कारणे द्यायला लागलो "जागा नाही, पैसे नाहीत, कसं काय जमेल" विकास उवाच "हि जागा, हे भांडवल, काही जमणार कसं नाही तेच बघतो." खेडेगावात एखादा मामा आपल्या भाच्याला बखोटीला धरून किंवा पार्श्वभागावर लाथ मारून पोहण्यासाठी कसं विहिरीमध्ये पोहायला ढकलायचा, तसंच मला विकासनी धंद्यात ढकललं. थोडक्यात त्या पायगुणा नि मी नोकरदारचा धंदेवाईक नोकरदार झालो. 


अशा पद्धतीने मी आज जो माझ्या पायावर उभा आहे, त्यात माझ्यातील अंगभूत गुणापेक्षा हे वेगवेगळे लत्ताप्रहार तथा पायगुण  जास्त कारणीभूत  आहेत  या बाबत माझ्या मनात तिळमात्र शंका नाही
 




Thursday, 3 October 2013

माझे (अव) गुण

लहानपणापासून मी एका प्रश्नाची फारच धास्ती घेतली आहे तो म्हणजे "मार्क्स किती मिळाले?". ह्या प्रश्नाचे उत्तर देता देता मी मोठा झालो, engineer झालो. यथावकाश लग्नही झाले, दोन मुले झाली. तो अवघड प्रश्न आयुष्यातून हद्दपार होता होताच मुलांच्या रूपानी परत शार्क माशाच्या जबड्या सारखा आ वासून तो प्रश्न समोर येऊ लागला  "मार्क्स किती मिळाले?".

"माझ्या मुलांनी कधी पहिला नंबर सोडला नाही" हे वाक्य माझ्या पालकांना म्हणायची मी कधी नौबत च येऊ दिली नाही. (माझी मुलही हा वडिलोपार्जित वारसा अगदी जिद्दीने पुढे चालवीत आहेत). माझ्या शालेय जीवनापसून ते अगदी कॉलेज पर्यंत माझे जे गुणसंकीर्तन झाले त्याची तुलना फक्त भारतीय अर्थव्यवस्थेशी होऊ शकते……………कायम दोलायमान. कधी वर तर कधी तळाला. (बहुतेकवेळा तळालाच). आणि अतिशय unpredictable.

तिसरी पर्यंत यवतमाळ ला शिकलो आणि चौथी ला सरस्वती भुवन औरंगाबाद येथे आलो. बरीच मुले scholarship चा फॉर्म भरत होते म्हणून आमच्या बिदरकर बाईंनी मलाही सांगितले, किंबहुना आईला सांगितले याचाही फॉर्म भरा. परीक्षा दिली आणि विसरून सुद्धा गेलो. काही महिन्यांनी आमच्याच कॉलनीत शेजारच्या कडे पेपर वाचत होतो आणि शिष्यवृत्ती चा निकाल दिसला. आपला "निकालच" लागला असेल या भावनेने वाचत असतानाच अघटित घडले, चक्क माझा नंबर झळकत होता. उड्या मारत घरी आलो, आईला सांगितले. पोळ्या करताना मातोश्रींनी ढूंकूनही न बघता म्हंटले "नीट बघ, तुझाच नंबर आहे का? नाहीतर....." Confidence च तसा होता.

Scholarship च्या पार्श्वभूमीवर ५ वीला पेठे हायस्कूलला डेरेदाखल झालो. पहिल्याच चाचणीत गणितात २४/२५ मिळवून झळकलो, आणि गाडी उताराला लागली. सातवीला तर पार प्रगतीपुस्तकावर चाचणी परीक्षेत लाल शेरे बसले आणि विषय कोणते तर गणित/विज्ञान. भूकंपच झाला की हो! पण आईबाबा जास्त रागवायचे नाहीत. म्हणजे त्यांना राग यायचा नाही असे नव्हते तर त्यांना माझी बौद्धिक कुवतच माहिती होती. त्यांना माहिती होते गाढवाला घोड्यांच्या रेस मध्ये पळ म्हणून सांगण्यात काही मतलब नाही.

आठवीला अंकगणित सुटले आणि भूमिती/बीजगणित आले आणि माझी बुडालेली नाव जरा व्यवस्थित तरंगू लागली. दहावीला शाळेतले महारथी शिक्षक आणि विभा देशपांडेंचा क्लास यांनी फटके व्यवस्थित बसू लागले. मेहराचा तेंडुलकर झाला म्हणा की! पालक शिक्षक सभेत ८०% च्यावर मार्कस् मिळण्याच्या संभाव्य मुला मुलींवर चर्चा व्हायची. माझे नाव कुठेच नसायचे. आमची आई हळूच कुठल्यातरी सरांना विचारायची " राजेशला मिळतील का हो ८०% च्यावर" आता त्यावेळचे गुरूजीही भिडस्त. ते आईच्या समाधानासाठी हो म्हणायचे. शेवटी एकदाचे ८४.७१% मिळाले आणि त्या माऊलीचा जीव भांड्यात पडला. तरी एका मित्राचे वडील म्हणालेच "अरे याला कमी मिळाले ठीक आहे, तुला कसे काय एवढे मिळाले. बोर्डाचं चुकलं बरं का काहितरी" आता बोला! (आता खरं सांगायला हरकत नाही......................मला पण आणि आमच्या घरच्यांना पण तसंच वाटत होतं)

नंतर मेकॅनिकल इंजि चा डिप्लोमा. इथे म्हणजे सगळा आनंदी आनंद होता. आधीच इंग्रजीचं ज्ञान अगाध, माझंही आणि सरांचही. चित्र विचित्र विषय. कशीबशी चालढकल चालू होती. मित्रांच्या मदतीने वर्कशाॅप, ड्रॅाईंग पार पडत होते. शेवटच्या वर्षात तर गॅदरिंगमधील सहभागामुळे internal चे मार्क्स फिट झाले होते. Theory मध्ये अक्षरश: काठावरती पास झालो होतो. गोळाबेरीज (माझ्यासारख्या गोळ्याला किती चपखल शब्द आहे) केली तर झीट यायचीच बाकी राहिली. चक्क first class आला होता. जनरल नाॅलेज च्या competition मारून, क्रिकेट/बॅडमिंटन मनसोक्त खेळून नैया पार झाली होती. (खरंतर जनरल नाॅलेज मध्ये माझा एक ज्युनिअर होता कोतवाल म्हणून. उत्तर तो द्यायचा, मी बक्षीस घेउन यायचो) 
डिप्लोमा नंतर खरं तर नोकरी ला लागायचो, प्लान पण तोच होता. बजाज मध्ये चांगली ८ ० ० रू  पगाराची नोकरी होती . पण साला या first क्लास नि घात केला. आई बाबाना  वाटले पोरांनी आता graduate व्हावे. त्यांना काय महिती होते हा first क्लास कसा आला ते. खरं तर बरं होते माहित नव्हतं, नाहीतर बजाज कंपनी राहू दे म्हंटले असतं आणि कुठल्या तरी ग्यारेज मध्ये कामाला लावलं असतं. 

पोटाला चिमटे काढून भारती विद्यापीठ ला PRODUCTION  engg  ला दाखल झालो . सुदैवाने हि branch जर सोपी होती. आता बर्याच जणांना हे माहितीच नाही आहे कि mechanical  engg  पेक्षा हि सोपी आहे ते . मी ते कुणाला न सांगता स्वतःची लाल करून घेत होतो. नाही म्हणायला m ३ m  4  जिथे आमचे डिप्लोमा वाले हमखास गचकायचे, तिथे झेंडा जोरात फडफडला होता . अर्थात त्याला कारणे बरीच होती. third year ला ज्याला प्राकृत भाषेत "लफडं " आणि संस्कृत भाषेत " affair " म्हणतात ते चालू झालं. वाटले आता आपण गचाकणार पण वाचलो, त्यात माझ्या हुशारीचे कौतुक नव्हते तर वर लिहिल्याप्रमाणे ती branch सोपी…………

distinction ने BE  झालो, पण कारण सांगितले न कि branch……………आता पुरे, च्यायला विनय म्हणून  कौतुक केलं तर अतीच चालू आहे . 

नंतर एक GRE नावाची परीक्षा होती. त्याचा स्कोअर हा तेव्हा प्रतिष्ठेचा विषय होता. मी आपलं " मेरा भारत महान" वैगेरे patriotism च्या नावाखाली त्याची बोळवण करून टाकली. आणि GATE, तो विषय तर मला आजही अप्रिय आहे. पण दुर्दैवाने माझ्या या attitude मुळे देश एका महान आयआयटीयन पासून वंचित झाला. असो. 

अशा पद्धतीने माझा मार्क्सवाद शिक्षणाच्या रूपाने संपूर्ण झाला. 

(या मार्क्स शब्दाचा एवढा धसका घेतला आहे की काही फेसबूक चे मित्र कार्ल मार्क्स वर काही लिहीतात, मी त्या पोस्टच्या वाटेलाच जात नाही)