Thursday, 27 February 2014

हे आहे असं आहे

जून २०१३ चा तिसरा आठवडा. तारीख आठवत नाही, पण शनिवार असावा. तैचुंग, तैवान मध्ये ३ दिवस neo कंपनीत grueling sessions नंतर परत यायला निघालो होतो. Howard Prince नावाच्या हॉटेल मधून सकाळी चेक out करत होतो. हॉटेल छानच होतं पण रेट नि धडकी भरवणारा नव्हतं. मला see off करायला पीटर ली आला होता. मुख्य दरवाजापाशी taxi येउन थांबली होती. अचानक counter ची कन्यका म्हणाली "excuse me,  you will have to wait for 5 minutes" खरं तर माझ्याकडे वेळ होता पण मी शायनिंग टाकत उगाचच मोबाईल मधल्या घड्याळाकडे बघत म्हणालो "Hurry up, please. I need to catch train to Taipei and my cab is already here." ती हसली आणि कुणी तरुणी हसल्या नंतर साधारण मध्यमवयीन पुरुषाचं जे होतं तेच माझंही झालं, मी पाघळलो. हॉटेल मधल्या एका माणसाने माझ्या taxi ड्रायवर ला सांगितलं कि इथे थांबण्याच्या ऐवजी पार्किंग मध्ये गाडी लाव आणि दहा मिनिटात ये. मला काही सुधरेना, आयला आधी माझी चेक out ची procedure थांबवली आता ड्रायवर ला सांगितलं इथे थांबू नको. म्हंटल काय राडा झाला कि काय?

हॉटेलच्याच एका माणसाने रिकामा corridor त्याच्या शोधक नजरेने पालथा घातला. हॉटेलचा स्टाफ, म्हणजे ६ मुली आणि ६ मुलं entrance ला ओळीने उभी राहिली. विम्बल्डन च्या बक्षीस समारंभात ते ग्राउंड वरची पोरंपोरी उभी राहतात तशीच. दोन रांगेमधील वाट सरळ लिफ्ट पर्यंत जात होती. एक माणूस लिफ्ट पाशी थांबला. मी हे सगळं कुतूहल मिश्रित काळजीने बघत होतो. कारण मला ट्रेन पकडायची पडली होती. पीटर ला मी म्हणालो "भाऊ, काय ठीक आहे ना सगळं" त्याने काही विचारायचा प्रयत्न केला, येउन म्हणाला "you will have to wait for 5 minutes" मी कारण विचारले तर त्याने नकारादाखल खांदे उडवले. मी पण जास्त भोचकगिरी नाही केली.

थोडी कुजबुज चालू असतानाच, दोन गाडया हॉटेलच्या corridor मध्ये दाखल झाल्या. पहिली lexus किंवा अशीच कुठली तरी आणि त्यामागे अजून एक टोयोटा किंवा तत्सम. हॉटेलचा manager पुढे गेला. पहिल्या कार मधून मागच्या दरवाजातून साधारण एक पन्नाशीचा माणूस बाहेर आला. well dressed, पण भपका नाही, blazer होता अंगावर. manager ने त्याच्याशी हस्तांदोलन करून bouquet present केला. त्याने मागच्या माणसाच्या हातात तो सोपवून दिला. त्याच्याशी दोन शब्द बोलून तो रुबाबदार माणूस त्या हॉटेलच्या मुलामुलींशी आस्थेने बोलू लागला. विम्बल्डन ला ती राणी आणि तो duke बोलतात ना तसेच. (हि मंडळी काय बोलतात हे एक न उलगडलेले कोडे आहे). एव्हाना आमच्या पीटरच्या चेहऱ्यावर हास्य उमलले होते. त्या रुबाबदार माणसाचे पीटर कडेही लक्ष गेले. पीटर नि हात हलवून आणि नंतर वाकून अभिवादन केले. असा सोपस्कार करून तो लिफ्ट पाशी गेला, पलटला आणि परत त्याने सुहास्य वादनाने हात वर करून बाय केल्यासारखे केले आणि तो आणि त्याच्याबरोबर अजून त्याची दोन माणसे लिफ्ट मधून वर गेली. अजून काही लोकं होती ती दुसर्या लिफ्ट मधून वर गेली. हे सगळं घडलं ५-७ मिनिटात. पोरं पोरी पटापट आपापल्या कामाला लागली.

मी आश्चर्याने पीटर कडे बघत होतो. त्यांनी ते ताडलं आणि मला विचारलं "did you get who was he" मी म्हणालो "नाही बा" तर तो वदला "He is Premier of Taiwan" मी करवादलो "don't tell me that" तर म्हणाला "believe me" आणि त्या counter वरच्या पोरीला म्हणाला "याला सांग, हि आमच्या इथली सर्वोच्च व्यक्ती आहे" ती हसली आणि म्हणाली "Sorry Mr Rajesh for the delay. Here is your bill" आणि दुसरा एक माणूस माझी bag घेऊन निघाला. माझी taxi सुद्धा दरवाजात परत हजर होती.

काही कळायच्या आत पीटर मला बाय म्हणालासुद्धा आणि taxi च्या ड्रायवर ने  कार चालू केली, आणि मी निघालो आपल्या देशाकडे.

(आज एक  नगरसेवक आला होता फाट्यावर कुठल्या कार्यक्रमासाठी. मी तो तमाशा बघितला. पांढऱ्या रंगाची Fortunner, आणि पाठोपाठ ३-४ Xylo/Bolero. फटाके, हार तुरे आणि काय काय)

हे आहे असं आहे

Tuesday, 18 February 2014

बदल

कसला बदल घडतोय न आयुष्यात. कुठं चालू झालं आणि कुठे येउन पोहोचलय. नशीबवानच आहे मी या युगात जन्मलो ते.

- मनमाडच्या रेल्वे स्टेशनवर आईच्या कडेवर लहान भाऊ, मी आजोबांचा हात पकडून. दोघांच्या हातात ब्यागा. रात्री बाराची अजंता एक्स्प्रेस. सीट मिळवण्याची मारामारी. सकाळी परभणीला पोहोचण्यासाठी. 
- १९८९, बाबांची मुंबई ला बदली. डेक्कन क्वीन चं तिकीट काढण्यासाठी सकाळी ५ ला पुणे स्टेशन ला लायनीत. साडेआठ ला घामाघूम होऊन बाहेर आलेलो मी. 
- १९९४-२०००. computerized तिकिटे काढणारा मी, माझ्याच टुर ची.  पण रांगेत २-३ तास.

आणि आता घरबसल्या तिकीट काढून आरामात प्रवास करणारा मी (IRCTC चा फ्यान आहे मी)

- विमान फक्त आकाशात बघण्यासाठी असतं, हेच डोक्यात बसलं होतं. पहिला विमान प्रवास १९९६ साली. तिकीट दर पाहून डोळे विस्फारलेले.

आणि आता thanks to Captain Gopinath. एयर डेक्कन नि कवेत आणलं आणि आता सुदैवानं परवडू पण शकतं. तिकीट घरबसल्या.

- तुमच्या घरात चार चाकी असेल असं जर बाबांना कुणी सांगितलं असतं तर त्यांनी त्यांनी त्याला येडयात काढलं असतं.
- अचानक १९९१ साली लहान भाऊ (लहान असला तरी करामती आहे तो) फियाट घेऊन आला.
- १९९१-१९९७, कधी बंद पडत, कधी ढकलत चालू ठेवलेली कार.

आणि मग तंत्रज्ञान बदललं. २००० ते आतापर्यंत फक्त एकदा गाडी रस्त्यात बंद पडली आहे.

- १९९१ पर्यंत शेजारच्यांच्या फोन वर मदार. ट्रंक call ची मारामार.
- ISD फार दूरची गोष्ट, STD करताना जीव खाली वर व्हायचा.बुथवर कंटाळवाणी  वाट बघणे. 
- १९९८-९९ साली कंपनीच्या फोन चं बिल महिन्याला रु ५०००.

आणि आता मोबाईल, STD जणू लोकल call. ISD पण फार महाग नाही. Skype, Facetime सगळं दिमतीला. एवढं  करून महिन्याचा खर्च रु ३०००

- सगळीकडे लाईन. विजेच्या बिलाची, फोनच्या बिलाची, पोस्टाची, बँक लाईन. आपला नंबर आला कि खिडकी बंद होणे.

आणि आता फोन बँकिंग. सगळं घरात बसून. मोलकरणीचा पगार, दुध बिल, पेपर बिल, इस्त्रीवाला असे मोजकेच पैसे कॅश मध्ये. बाकी नेट  बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड वर. बँकेत गेलोच नाही आहे कित्येक वर्षात.

सगळ्यात जास्त फरक पडला आहे तो माझ्यासारख्या मध्यमवर्गीयाच्या जीवन शैलीत. पण वाईट याचं वाटतं कि हाच वर्ग बोंब मारतो "६० वर्षात काहीच नाही घडले". अहो साधे ५०० डॉलर विदेशात घेऊन जायचे म्हंटले ना कि बँकेची permission लागायची. आणि आता सहजासहजी सह कुटुंब परदेशात जाताहेत, आरामात स्थायिक होत आहेत, पाहिजे तेव्हा परत येत आहेत. आणि वर तोंड घेऊन म्हणायचं काय तर मुंबई airport वर बेल्ट बंद पडला २ मिनिटासाठी कि उपहासाने "welcome to India" आणि मग एखाद्या गोर्याकडे बघून हसायचं,  आणि दाखवायचं काय जोक करतोय.

माझ्या ड्रायवर च्या घरी गेलो होतो. घर किती, तर १६० sqft चं. २ खोल्या. पुढच्या खोलीत अंघोळीची
 जागा ३x ३ फुट. दोन माणसं बसली तर तिसर्याला उभं राहावं लागतं. किती वर्ष राहतो आहे तर उणीपुरी ५० वर्षं. घरात माणसं किती, ४. नवरा, बायको, २४ वर्षाचा मुलगा आणि १९ वर्षाची मुलगी. बोला कसं मोठं केलं असेल, कधी त्याला बायकोशी एकांतात बोलायला मिळाले असेल. अशी लोकं गप्पं, जगताहेत आणि आम्ही सगळ्यात जास्त फायदा झालेले लोक ओरडतोय कि , "काही नाही, बकवास आहे".

सालं जिथे राहतो ती cooperative society नीट सांभाळू नाही शकत आपण. चार लोकं अंगावर आली तर फाटते आणि म्हणायचं कि यांना राज्य करता येत नाही.

टीका करा पण जर धरबंद ठेवू यात. गप्प बसा असं नाही म्हणत पण be part of solution. नेहमी प्रश्नच घेऊन उभे राहिलो तर कसे चालेल?

मित्रांनो, सकारात्मक बोलू यात, वागू यात. त्यातूनच काही चांगलं घडलं तर घडेल. नाहीतर नुसतं बोंबलंत राहिलो ना तर भविष्यात पण तेच करावं लागेल.

मनात आलेला प्रश्न:

- कनिष्ठ मध्यमवर्गीय चे आपण मध्यमवर्गीय झालो नंतर उच्च मध्यमवर्गीय झालो तरी आरडाओरड चालूच.मला माहिती आहे गरीब कुटुंब सुद्धा मध्यमवर्गीय होतंच असतील. ही कोकलायची सवय कुठल्या category त लागत असेल?


(माझ्यासारख्या तथाकथित मध्यमवर्गीय सुखवस्तु घरातल्या मुलांपेक्षा, रूढार्थाने गरीब घरातल्या, पण संवेदनशील अशा मुलमुलींच्या हातात उद्याच्या भारताचं भविष्य सुरक्षित आहे असं मला वाटतंय.)

Saturday, 15 February 2014

प्रगती

आजूबाजूला काही चांगल्या गोष्टी घडतात त्याची दखल घ्यायला हवी नाही का!

१. धूम्रपानाचे प्रमाण पुण्यात तरी कमी झाल्यासारखे वाटते. पूर्वी नाही तर कसल्या धुरकांड्या असायच्या. हॉटेल मध्ये, रस्त्यावर, कंपनीत. आता तर कुठल्याही कंपनीत स्मोकिंग banned आहे. सिगारेट प्यायची असेल तर पार गेट च्या बाहेर जावे लागते. बार मध्येही बघा सिगारेट पिणारे खूपच कमी दिसतात. माझ्यामते social awareness मुळे हे घडलं असावं. आणि महाग पण solid झाल्या आहेत सिगारेटी. माझ्या काळात फारच क्रेझ होती कॉलेज मध्ये सिगारेट प्यायची. आताचं माहित नाही. SKF मध्ये तर कुठेही सिगारेट प्यायला परवानगी होती. आता अजिबात नाही.

सिगारेट चा मेन प्रॉब्लेम हा आहे कि tension आल्यावर प्यायची जम तल्लफ येते आणि मग आधीच तणाव आणि वर सिगारेट हे lethal combination आहे. दारू, सिगारेट आणि चकणा याच्यासारखे बेकार combination दुसरे नाही.

पूर्वी बस, रेल्वेत किंवा विमानात हि सिगारेट प्यायला परवानगी असायची. कसला बेकार प्रकार होता तो. आता अजिबात बंद. आणि लोकंही पाळतात इमानेइतबारे.

(सौ चूहे खाके बिल्ली निकली हाज को)

२. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात मुलामुलींचा रेशो वाढत चालला आहे. ऐकता कि नाही रेडीओ वर. पुणे, लातूर, कोल्हापूर, बीड सगळीकडे ८७० वरून पार ९५० पर्यंत आली आहे फिगर. शासनाने मनावर घेतलं ना कि काय करू शकतात याची चुणूक आहे. (पोलिओ निर्मुलन प्रोग्राम आठवतो. रेल्वे स्टेशन, बस stand, airport, malls एक जागा सोडली नव्हती. दो बूंद जिंदगीके) माझे डॉक्टर मित्र शासनाच्या कडक धोरणावर नाराज असतील, पण काही इलाजच राहिला नव्हता.

otherwise कसला डेंजर प्रकार होता तो. automobile कंपनीत एक प्रकार असतो ppm (parts per million) म्हणून. म्हणजे विचार करा १० मध्ये १ जॉब reject झाला. ऐकायला काही वाटत नाही. पण म्हणजे दहा लाखात किती जॉब reject होतील १ लाख. rejection टार्गेट काय आहे माहिती आहे १०० ppm. मग कामाला लागतात लोकं. तसंच इथे विचार करा १०००: ८५० म्हणजे १ लाख पोरांच्या समोर पोरी किती? तर ८५००० आणि १० लाखाच्या समोर किती ८.५ लाख. दीड लाख कमी. काय राडा होईल बघा.

त्यामुळे ९५० वैगेरे पण नाही १००० पोरं  जन्मतात ना १००० पोरी पाहिजेत. 

३. पूर्वी एक घाणेरडा प्रकार असायचा. बिल्डींग च्या जिन्यातून येताना कोपर्यात कुणी थुंकू नये म्हणून देवदेविकांचे फोटो लावायचे. कसले hypocrites होतो ना. च्यायला कुणी थुंकू नये म्हणून देवांचा वापर. थुंकणारे पण येडे आणि हे फोटो लावणारे त्याहून येडे.

पण आता प्रमाण कमी झालंय या प्रकारचं. आनंद आहे.


अशीच प्रगती होवो. जरा परिवर्तनाचा वेग वाढला पाहिजे. बास!

Saturday, 8 February 2014

काम करू यात

दिल्लीत भावाकडे मलेशिया चे फोटो बघितले. उगाचच असूया वाटली. आयला एवढासा टीचभर देश पण काय प्रगती केली राव त्या देशानी. पण मग नंतर लक्षात आलं की सालं आकारमानानुसार किंवा लोकसंख्येंच्या मानाने भारताच्या पासंगालाही पुरणार नाही अशा असंख्य देशांनी आपण अचंबित व्हावं अशी प्रगती केली आहे. मग ते १०० स्क्वेअर किमी चं सिंगापूर असो, वा थायलंड असो. तैवान, इंडोनेशिया तर  एवढंच कशाला मुंगी एवढं माॅरिशस असो पण तिथलं ही quality of life आपल्या मुंबई पेक्षा बरंच बरं असतं. मी जाऊन आलोय म्हणून सांगतो, थायलंडची लोकं मला अतिशय arrogant वाटली. ज्या चीनचं आज जगभर कौतुक होतंय तिथली लोकं अतिशय आढ्यतेखोर आणि फेकूचंद दिसली. म्हणजे मी गेलेल्या delegation मधल्या customers ची चिन्यांनी बडदास्त ठेवली आणि बारमध्ये business deals फायनल केल्या त्यावरून मनोवृत्ती कळते. चीन मधल्या उद्योगांचा आर्थिक व्यवहार कसा चालतो हा संशोधनाचा विषय असतो.  ज्या जर्मनीला आपण क्वालिटीचा मापदंड समजतो तिथले लोकंही ही बर्यापैकी stubborn आणि rigid असतात. (किंबहुना एखादी गोष्ट या पद्धतीने करायची म्हणजे त्यात तडजोड नाही हे त्यांच्या quality मागचं कारण असू शकतं). चिंगुसपणा म्हणाल तर पश्चिमेकडच्या लोकांमधे हा ठासून भरला असतो. (अमेरिकन अपवाद). या सगळ्या पार्श्वभूमीवर बर्याच क्षेत्रात उजवा असलेला आपला देश हा एवढा मागे का राहिला याचे राहून राहून आश्चर्य वाटते. अर्थात चिमुटभर भेटलेल्या लोकांवरून अख्ख्या देशाचा अंदाज लावणं चुकीचंच, हे कळतं मला.




एकदा स्वारगेटच्या चौकात भिक मागण्यासाठी लहान पोरं आली होती. तेव्हा गाडीत अमेरिकन जेफ बसला होता. त्यांच्याकडे बघत जेफ म्हणाला "I have traveled so many countries around the world, but I have not seen such poor people anywhere else. As a society why can't you do something" शब्द त्याच्या तोंडून पडून गेले आणि घरं माझ्या काळजाला पडत होती. (आता please असं नका विचारू विचारू कि जेफ आफ्रिकेत गेला होता का)

राजकीय परिस्थिती बाजूला ठेवली तर मला असं वाटतं की काही बेसिक गोष्टीत आपण मागे पडलो आहे. स्वयंशिस्त, स्वच्छतेची कास, ईमानदारी या मुलभूत गुणांची वानवा ठायी ठायी दिसते. इतिहासाचं over glorification हा एक खूपंच मोठा अडसर वाटतो. (कुठेतरी वाचलं होतं इतिहासात रमलेला माणूस आणि चहात बुडवलेलं बिस्कीट सारखंच, लिबलिबीत) म्हणजे थोडक्यात सामाजिक मानसिकतेचं सक्षमीकरण करण्यात आपण कमी पडत आहोत.






आताच सत्या नाडेला बद्दल पोस्ट लिहिल्यावर एका comment ला उत्तर म्हणून खालील comment लिहावी लागली.


This is the problem. We pretend to be would be "huge potential" and so on. I read somewhere that MS is $ 72 Bn company and you know India's contribution, it is merely $ 1 Bn. US is in depression and still their automobile production is 9 Mn in nos and India 3.5 Mn.(communist China is 17 Mn). The machine tool industry (I belong to this) is $7 Bn in US, when it is completely shrunk. (China $ 20 Bn) as against India $ 1 Bn. You put together all excavator production of India and Caterpillar alone stands more than that. It's only China that is termed as potential market (though I hate to write this) and India is still "would be huge potential" market. Believe me बहुत पापड़ बेलने है. I do not think, Indra Nooyi, Vikram Pandit, Satya Nadela, Ajit Keskar,  Sunita Williams are selected for their respective job as they have some connection with India. It is because they have ability to meet requirements of job which they perform diligently and with integrity. Nothing else. No marketing gimmicks, no business development. Absolutely nothing. 

इमान ऐतबारे, अंग झटून काम करावं लागणार आहे, बस बाकी काही नाही. सध्यातरी "उभरती महासत्ता" वैगेरे म्हणणं सोडून देऊ यात.

मला हेही कळतं की, ब्लाॅगवर लिहून किंवा फेसबुकवर लिहून हे काही प्रश्न सुटणार नाहीत, पण या मूलभुत गुणांचा अंगीकार करण्याची गरज असल्याचा संदेश तर आपण एकमेकांना या माध्यमातून देऊच शकतो. कुणी सांगावं, आपल्याला जाणवणार्या चांगल्या गोष्टी शेअर केल्या तर, अनेक विचार याला जोडले जातील आणि हळू हळू का होइना परिवर्तनाच्या दिशेने जाऊ अशी भाबडी का असेना अशी आशा ठेवायला काय हरकत आहे.


Friday, 7 February 2014

मध्यमवर्गीय

- मी लॅपटाॅप bag ला लावलेला चेक इन bag चा tag मुद्दामून तसाच ठेवतो. लोकांना कळावे कि विमानाने आलो आहे.

- बोर्डिंग पास शर्ट च्या वरच्या खिशात ठेवून तो लोकांना दिसेल याची मी काळजी घेतो.

-  vallet पार्किंगला गाडी देताना मी कमालीचा आत्मविश्वास असल्यासारखा दाखवतो. पण मनात मात्र परत आल्यावर ड्रायव्हर ला किती टिप द्यायची, १० रू की २० रू, हाच विचार असतो (की द्यायचीच नाही)

- business standard किंवा economic times हातात असतो, डोळे त्यावरून फडफड करत असतात, ओ की ठो कळत नसतं. नज़र शेजारच्याच्या "महाराष्ट्र टाईम्स" किंवा लोकसत्तावर असते. त्याचं केव्हा वाचून होतं आणि केव्हा आपण झडप घालतो. (मग पुढारी किंवा संध्यानंद पण चालतो)

- रेल्वेत बसल्यावर विमानाने का जात नाही याची सहप्रवाशाला कारणं सांगताना मी "तिकीट महाग आहे" हे सोडून मी अनेक इतर कारणं सांगतो. मग त्यात उपकथानक पण जोडलं असतं. (मग अगदी रेल्वे प्रवास किती आरामाचा असतो हे तद्दन तकलादू कारण मी मीठ मिरच्या लावून सांगत असतो)

- हाॅटेल मधे टिप बाकीचे देतात म्हणून कासावीस अंतकरणाने देणारा मी, सफरचंद विकत घेताना मी उगाचच घासाघीस करत असतो.  आणि त्यातही ५-१० रू कमी केले तर छाती रूंद करून ताठ मानेनं चालायला लागतो.

- बर्याच दिवसांनी मित्र भेटला तर त्याने त्याची कार upgrade तर केली नाही ना! निरोप द्यायला जाताना हे सुद्धा मनात कारण ठेवणारा मी. (आणि आधीचीच कार असेल तर मनाला थोडं बरं वाटणारा मींच)

मध्यमवर्गीय असलो तरी श्रीमंत आहे असं दाखवणार्या, मनाने मात्र गरीब असणार्या माझी ही काही लक्षंणे. कुठे भेटलो तर हसू नका मला. थोडं सांभाळून घ्या. 

Monday, 3 February 2014

मनोगत-माझे आणि वैभवचे

(मनोगत माझे आणि वैभवीचे नाही आहे. नाहीतर लागलीच "काय लिहलं, बघू" भ्रमनिरस होईल)

वैभव, माझ्या कंपनीत काम करणारा. तुम्ही म्हणाल आज काल लैच कौतुक लावलंय या माणसाचं. (आणि सिंहगडचं पण. चार रविवार काय गेला नाही तर च्यायला चाळीस वर्षापासून जातोय असं लिहित सुटलाय. आता हे शेवटचं बरं का, बास) पण बघा आता, संसारी माणूस. बायका पोरं तिकडे साताऱ्याजवळ. हा राहतोय एकटा. सकाळी चार ला दिवस चालू होतो. आवरून पाच वाजता एका सोसायटीत जातो गाडया धुण्यासाठी. साडे सहा ला परत येतो. चहा नाश्ता स्वतः बनवतो आणि साडे आठ ला आमच्या इथे बाजूच्या कंपनीत येतो. अकरा वाजता माझ्या कंपनीत येतो. तिथे काम करतो. मग दोन वाजता जेवण झाले कि माझ्या नांदेड सिटी च्या घरी जातो. तिथे काम करतो. मग परत कंपनीत येतो. साफसफाई करून मग साडेपाच ला घरी जातो. परत घरी गेल्यावर स्वतःचा स्वयंपाक करतो. जेवतो आणि झोपतो. आणि सगळी रपेट सायकल वर. वाचूनच दमलात ना.

तर तो मला म्हणाला "साहेब, मी पण येतो तुमच्याबरोबर सिंहगडला. दर रविवारी." येतो सांगितल्या वेळेला. पाच मिनिटे अगोदरच. पायात चप्पल. अरे म्हंटल, बूट तर घे. तर म्हणतो "काही नाही फरक पडत".

लेकाचा कडाकड सिंहगड चढतो. मी इकडे धापा टाकत चढत असताना हा पट्ट्या मात्र सहजपणे गप्पा मारतो. माझी ऐकण्याची पण ताकद संपल्यावर एकटाच पुढे जातो. आणि वर जाऊन थांबतो, माझी कीव करत बघत असतो. मनातून मी जळफळत असतो. मला असं सारखं वाटतं कि तो गालातल्या गालात हसतो आहे. मी नसेल तर ३०-३५ मिनिटात चढेल हा सिंहगड.  वर पोहोचल्यावर अंगावर घामाचा टिपूस नसतो.

उतरताना मी शेर असतो. त्याच्या पायात चप्पल असल्यामुळे त्याला थोडे हळू चालावे लागते. मी पुढे जाऊन छद्मीपणे त्याच्याकडे बघून हसतो. वर जाताना तो पुढे असतो.  त्याचा मी बदला घेतल्यासारखे वाटते.सिंहगड पायथ्याला (बेस कॅम्प म्हणायचं का, तेवढंच हिमालयात जाऊन आल्यासारखे वाटते) पोहोचल्यावर दर वेळेस म्हणतो "मजा आली. पण तुम्ही सायकल घ्या, दम कमी लागल" 

वैभवचे फेसबुक account असले असते तर त्याचे मनोगत बहुधा असे असले असते.

दर वेळेस पोहोचलो कि साहेब दात घासत असतो. पण ठीक आहे,  आई तोपर्यंत माझा चहा बनवून देतात. तसा साहेब बराच म्हणायचा कि, त्याला म्हंटले "मी पण येत जाईन" तर चल म्हणाला. सायबाची खरी मजा येते, गड चढताना. लैच हापतो. हापिसात एवढी शायनिंग टाकतो, इथे पार शेळी होऊन जाते. कंटाळा येतो एवढं हळू चढायला. माणसानं कसं झप झप गेलं पाहिजे. पण मी पुढं जाऊन थांबतो. हो, परत साहेब मधच कुठं बसला तर केवढ्यात पडायचं. परत आई म्हणायच्या तुला कळत नव्हतं का, थांबायचं त्याच्याबरोबर.

वरती पोहोचल्यावर सायबाची order ठरलेली. कांदापोहे अन ताक. अरं, काय पोहे, जरा कांदाभजी घ्यावी तर म्हणतो नको. तब्येतीला चांगलं नाही. इतर वेळेस चिकन हाणताना त्याला नसते तब्येतीची काळजी. बरं आपण घ्यावं तर खिशात हात बी टाकू देत नाही. जाऊ द्या, घरीच बनवतो.

उतरताना सायबाला लैच जोर चढतो. सारखं पुढं जाऊन म्हणतो "वैभव, हळू रे बाबा, पडशील" वर चढताना आवाजात एवढा जोर आण कि म्हणा, तेव्हा तर बोलायला सुधरत नसतं. कंपनीत कसा चुरचुर बोलत असतो.

त्याच्या मागं लागलो आहे सायकल घे म्हणून, जरा माणसासारखा चढशील. म्हणतो तर खरं, घेतो म्हणून, केव्हा मुहूर्त काढतो काय माहित. कांदा पोहा खाऊ घालतो वरती, पण तुम्हाला आतली गोष्ट म्हणून सांगतो लैच चिंगूस आहे बर का, हा साहेब !!






काय फरक पडतो

आज सकाळी सिंहगडला गेलो होतो, नेहमीचा साथीदार वैभव बरोबर. पाण्याच्या बाटल्या इतस्तत: पडलेल्या बघून मी त्याला म्हणालो "पुढच्या रविवारी मोठ्या disposable bags आणू आणि या बाटल्या घेऊन जाऊ" (एका रविवारी हा उपक्रम बघितला होता) 

तेव्हढ्यात वैभवला एक कुटुंब दिसलं, ते सर्वंच मोठी बॅग घेऊन बाटल्या गोळा करत होते. मी त्यांना म्हणालो " आम्हाला पण द्या दोन बॅग्ज."

मग काय दोघेही बाटल्या पिशवीत भरत उतरू लागलो. समोर रिकामी बाटली दिसली की चक्क आनंद व्हायला लागला. 

असं करत दोघांच्याही बॅग्ज तुडुंब भरल्या. समोर रिकामी बाटली दिसत होती, पण उचलता येत नव्हती. उगाचच चरफडंत होतो. 

मनात आलं त्या रिकाम्या बाटल्यांशी आपला काही संबंध नाही तरी त्याबद्दल आनंद किंवा राग येत होता. ज्यांचं पोट या रिकाम्या बाटल्यांवर आहे त्यांच्या मनाची अवस्था कशी होत असेल नाही?

विचित्रंच!!

(सौ मंडलीक काॅमेंट लिहीत नाहीत, नाहीतर त्यांनी लिहलंच असतं "घर आवरलं होतं का कधी, आलाय मोठा सिंहगड आवरणारा" पण काय करणार "जे आहे ते आहे")

"तु असा वागलास, किंवा तु हे केलंस तर काय फरक पडणार आहे" हा सल्ला मला माझ्या आई वडिलांनी, जवळच्या मित्रांनी, अनोळखी लोकांनी अनेकवार दिला आहे. अाता या virtual world च्या काही सुहृदांनी पण दिला. 

पण असं म्हणून कसं चालेल. "काय फरक पडणार आहे" असा विचार मनात आला कि चांगले काम करण्याच्या इच्छेला तुम्ही तिथल्या तिथे मूठमाती देता. उद्या असं  होईल कि "आपलं घर किंवा स्नेहालय" सारख्या संस्थाना पैशाची गरज आहे आणि तुम्ही म्हणाल कि माझ्या तुटपुंज्या contribution नि काय होणार आहे. किंवा मी contribution नाही दिले तर संस्था काही बंद तर नाही पडणार.  झालं, तुम्ही इच्छेला मारणार. तुम्ही देवाला जाता. करोडो लोक जातात, तुम्ही असा विचार करता का माझ्या वाटेला कधी आशीर्वाद येईल. तिथे तुम्हाला वाटते कि देवाची शक्ती अमर्याद आहे. चांगल्या कामासाठी माणसाची शक्ती अमर्याद आहे. देव माणसात बघावा म्हणत असतील ते यामुळेच. "त्याने काय फरक पडेल" असा विचार येण्या ऐवजी "करून तर बघू, फरक पडला तर ठीकच, नाही पडला तर काय फरक पडतो" असा विचार करा, आणि बघा मग फरक पडतो कि नाही ते. 

Saturday, 1 February 2014

फुकटचा सल्ला.


रेल्वे प्रवास, विमानप्रवास.

- जितकं कमीत कमी सामानात प्रवास करता येईल तेवढं जमवा.

- रेल्वेमध्ये बर्थ च्या खालची जागा किंवा विमानात सीटच्या वरची जागा म्हणजे आपल्या घराचा  पोटमाळा आहे असं समजू नका. रेल्वे त खूप सामान असेल तर कार्गो van असते आणि विमानात bag मोठी असल्यास चेक इन करा.

- रेल्वेत बर्थ ची अदला बदल टाळा. (अगदीच अनिवार्य असेल तर ठीक. एकदा अहमदाबाद शताब्दी मध्ये C ९ मध्ये होतो. शेजारी एक नवविवाहित तरुणी बसली. तिचा नवरा आला आणि मला request केली sit बदलण्याबाबत. मी पण तरुणीचा विचार करत हो म्हणालो. सीट कुठे होती माहिती आहे C २ मध्ये. काही दिवसांपूर्वी राजधानीतून येताना एका बाईनी असलं डोकं पकवलं शेवटी गेलो २ डबे सोडून. असली होती ना, "आप please आज जरा राजधानी छोडके passenger से सेकंड क्लास मे आइए ना!" असं म्हणायला कमी केलं नसतं) विमानात तर सीट ची अदलाबदली नकोच. अहो श्रीनगरहून कन्याकुमारी चा विमानप्रवास ३ तासाचा असेल. अशा काय गप्पा मारायच्या असतात. आणि एवढीच हौस असेल तर रु १०० मोजून सीट बुक करा.
विमानात चढण्या अगोदर ठरवा कोण कसे बसणार ते. तुमच्यातच जर सीट बदली करायची असेल तर विमान उडल्यानंतर काही वेळाने करा. otherwise तुमच्यामुळे पूर्ण line खोळंबली असते.

- रेल्वे चा बर्थ म्हणजे आपल्या घराचा hall, किंवा बेडरूम, किंवा डायनिंग टेबल समजू नका. घरात जशा गुळण्या भरता तशाच इथे भरण्याची गरज नसते. एक दिवस थोडं कमी आवाज करून दात घासले तर काही फरक पडत नाही. जेवढे तुम्ही तिकिटासाठी पैसे मोजले असतात तेवढेच सहप्रवाशांनी पण, हे कायम लक्षात ठेवा.

- इनमिन एक ते दोन तासाचा विमान प्रवास असतो. airport ला सुसज्ज urinals असतात. त्याचा वापर सोडून ते air host किंवा होस्टेस जेव्हा refreshments serve करायला मध्ये पोहोचतात तेव्हाच  बरोबर urinal चा वापर करायची इच्छा कशी होते हे काही अजून कळले नाही.

- Airport  ला Security Check In च्या वेळेस "छ्या, काय फालतू system आहे. कसला वेळ लावतात" असल्या भंगार  comment करून स्वतःचे हसू करून घेऊ नका. CISF ची लोकं हि सैनिकासारखी असतात. त्यांना orders follow करायच्या असतात. त्यांच्यावरून सकाळी सकाळी तुम्ही स्वतःबरोबर दुसर्यांच्या मुडची वाट लावत असता. इथे वेळ लागला तरी, तंत्रज्ञानाने पुणे ते बंगलोर चा प्रवास २० तासा ऐवजी एक तासाचा झाला आहे हे लक्षात घ्या.

- विमान halt ला पोहोचता क्षणी उठून उभे राहण्याची काहीच गरज नसते. त्यामुळे वेळ वाचतो असे जर वाटत असेल तर मोठया गैरसमजात आहात.

- जेव्हा अशी घोषणा होते कि "सीट १६ ते सीट ३० यांनी प्रवेश घ्यावा" तेव्हा तुमचा सीट नंबर त्यात नसेल तर उगाच घुसाघूस करून हसे करून नका घेऊ.





- जेव्हा विमानात असे सांगतात कि mobile आणि इतर electronic गोष्टी बंद करा तेव्हा त्या बंद करा. हे तुमच्या safety साठी आहे. "त्याने काय होते" असा  विचार करण्याआधी या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहित आहे का याचा विचार करा.

- प्रवास असा करा कि तुम्ही पण एन्जॉय करा आणि दुसऱ्यांचा प्रवास पण सुखकर करा.

- Happy Journey  

तळटीप:

१. मला माहित आहे माझे फेसबुक चे मित्र सुज्ञ आहेत त्यांना या सगळ्या सूचनांची गरज नाही. मला हा फुकटचा सल्ला विमानतळावर किंवा  स्टेशनच्या platform वर दयावासा वाटतो. पण तिथे शक्य नाही म्हणून मार्क चा platform वापरत आहे.
२. लहान मुले, senior citizen, रुग्ण यांच्यासाठी हे नसून माझ्यासारखे धडधाकट पण विचित्र वागणाऱ्या साठी आहे.


हे पाळा आणि ताण टाळा (गप्पी मासे पाळा आणि हिवताप टाळा या धर्तीवर)


(६ लाख किमी ड्रायविंग झाले आहे. ५० किमी तासाला म्हणजे १२००० तास. ५०० दिवस. आयुष्यातील १८ महिने ड्रायव्हिंग सीट वर काढले आहेत. थोडा तो हक बनता है बॉस!) 

- तुम्हाला डोके असेल आणि आत मेंदू असेल तर दुचाकीवर हेल्मेट वापरा. तुम्ही जर निधडया छातीचे असाल तर कारमध्ये सीट बेल्ट लावा.

- सिग्नलला  उभे असताना समोर लाल सिग्नल आहे. पण बाकीचे जात आहेत म्हणून तुम्ही गेलात तर तो मुर्ख पणा आहे. आणि मागचा हॉर्न वाजवतो म्हणून तुम्ही निघालात तर तो महामूर्ख पणा आहे.

- तुम्ही गाडी चालवताना थांबून जर आजीला वा आजोबाला रस्ता क्रॉस करू दिलात तर त्यांचे आशीर्वाद लाख मोलाचे असतील. (कधी थांबा तर खरी आणि बघा कसे ते आजोबा तुम्हाला smile देतात ते). त्यांच्याबरोबरच लहान मुलांचे आभार आणि खरं तर कुणालाही तुमच्यामुळे जर सोय होत असेल तर आशीर्वाद वा शुभेच्छा गोळा करा ना बँकेत.

- जिथे तुम्हाला वाटेल कि हॉर्न दाबावा तिथे गाडीचा ब्रेक दाबा. आणि कितीही झालं तरी गाडी तुम्ही हवेतून उडवत नेऊ नाही शकत.

- जिथे जायचे त्याच्या दरवाजासमोरच गाडी पार्किंग करायची असा अट्टाहास ठेवू नका. थोडेसे पुढे गेलात ना कि भरपूर जागा मिळते आणि नाही तरी तुम्ही मॉर्निंग walk स्किप केलेलाच असतो.

- ट्राफिक जाम मध्ये अडकल्यावर गाडी घुसवाघुसवी करू नका. तुमचा थोडा संयम कदाचित गुंता सोडवण्यास मदत करेन.

- समोरच्या गाडीला उजवीकडे वळायचे असेल तर त्यांना जाऊ दया. (लांबून लक्षात आले कि स्पीड वाढवून त्याला वळू न देता आपलं घोडं पुढे दामटायची सवय असते) 

अशी गाडी चालवा आणि बघा तुमचा तणाव कमी होतो कि नाही ते. आणि झालाच तर पडीक आहोतच, मेसेज करून सांगायला विसरू नका.