Thursday 8 May 2014

कंजूष

डीएसके विश्व मधे एक डाॅ रीव्हस् नावाचे osteopathy ची प्रॅक्टीस करणारे डाॅक्टर राहतात. बायकोचा पाय दुखत होता म्हणून त्यांच्याकडे गेलो होतो. मी जसा उभा राहतो हे पाहून त्यांनी मला दोन पायावर equal वजन ठेवून कसं उभं रहायला पाहिजे ते दाखवलं. मग माझं पाकीट खिशातुन काढायला सांगितलं. जाड पाकीट बघून म्हणाले "oh rich man" मला हसायला आलं. कधीही न वापरलेले credit cards, फुकटात मिळालेले वेगवेगळ्या malls चे कार्ड, दुनियादारीच्या चिठ्ठ्या चपाट्या, बिलं आणि यांच्या आत कुठेतरी लपलेले १५० रू यामुळे जाड झालेल्या पाकीटाला बघून तो जर मला rich man म्हणत असेल तर मी कशाला झाकलेली सव्वा लाखाची मूठ सोडू. असो. तर ते म्हणाले हे पाकीट घालून तु खुर्चीवर नको बसू. दोन्ही heap ची alignment चुकते आणि त्याचा effect पाठदुखीवर होतो. त्यामुळे ते पाकीट काढून मी आॅफीसमधे बसू लागलो.



 काल माझ्या मित्राच्या वडिलांचं निधन झालं. मी गेलो होतो अंत्यविधीला. तिथंच आला बायकोचा मित्र सुशील. अंत्यविधी पार पडला. सर्व मंडळी घरी निघाली. मी आणि सुशील थांबलो होतो काय मदत लागते का विचारायला. शेवटी मित्र पण निघाला. अशा वेळेस वातावरणात एक दु:खाची किनार असते. सर्व लोकं गेल्यावर सुशील मला म्हणाला "चल चहा पिऊ". मळभ साचलेल्या मनावर चहा एक ज़ालिम उपाय आहे. (खरं तर त्याचबरोबर एक सिगरेट. पण गेले काही वर्ष या स्वर्गीय आनंदाला सोडचिठ्ठी दिली आहे). मी पण लागलीच होकार दिला. नगर रोडच्या कैलाश मधून बाहेर आलो आणि लागलीच चहाची टपरी दिसली. गाड्या लावून तीन चहाची आॅर्डर दिली. (माझा सारथी पण बरोबर होता). एक एक सीप घेत चहा संपवला. (मी चहा पण सीप घेतंच संपवतो. दारूला सीप आणि चहासाठी घुटका हे मला मंज़ूर नाही). आणि मग सुशील ने त्याचं खरंखुरं जाडजूड पाकीट काढलं आणि त्यातुन सगळ्यात कमी denomination ची नोट बाहेर काढली जी अर्थात शंभरची होती. पिण्याचं पाणी आणि सुट्टे पैसे याचं नियोजन आपला देश ६६ वर्षापासून करू नाही शकला याचं नेहमीच आश्चर्य वाटतं. (वाईट दिवस संपणार आहेत आता) चहावाल्याकडे सुट्टे पैसे नव्हते याची कल्पना आल्या आल्या मी खिशात पाकीट काढण्यासाठी हात घातला (आधीच मला आवडत नाही हे काम) आणि डाॅ रीव्हस् च्या सल्ल्यानी काम दाखवलं. पाकीट मी आॅफीसमधे टेबलच्या वर ठेवून मी ऐटीत आलो होतो. सुशील ने साहजिकंच माझ्याकडे मदतीच्या आशेनं पाहिलं. मी आपल्या
ओशाळल्या चेहर्याने उभा राहिलो. तो असा विचित्र चेहरा बघून चहावाला त्याच्या व्यवसायबंधूकडे गेला आणि सुट्टे मागू
लागला. एव्हाना सुशीलच्या मनात आलं असावं "येडा आहे का हा, साला खिशातून २० रू काढत नाही आहे" नसलेली पण गेलेली इज़्ज़त वाचवावी म्हणून मी माझ्या चालकाला बोलावलं, पण तो पर्यंत चहावाल्याने उरलेले पैसे दिले आणि माझी हौदसे गयी हुई बुंदसे लानेकी कोशिश नाकाम गेली. सुशीलने मला बाय म्हंटलं (कोपर्यापासून नमस्कार केला असेल) आणि आम्ही मार्गस्थ झालो.

सुशील गाडी चालवत असताना असाच विचार करत असेल "वैभीचा नवरा फेसबुकवर चुरचुर लिहीतो पण actual मधे लैच चिंगूस आहे" आणि आता हे वाचल्यावर म्हणेल "तिथं सांगायचं ना हे, इथं फेसबुकवर टॅग करतोय. येडाच आहे" एकंदरीत गोळाबेरीज एकच. (वैभवीला काही मित्र मैत्रिणी वैभे/वैभी, तर काही वैभू म्हणतात आणि काही भूभू म्हणतात. मला हे शेवटचं नाव फारंच आवडतं)

काही काही दु:खद प्रसंगावेळी असं काही वेगळंच घडतं की त्याने थोडंसं हलकं व्हायला मदत होते. 

No comments:

Post a Comment