Tuesday 6 May 2014

Sensitive

हो बरेच लोक मला म्हणतात मी संवेदनशील (sensitive) माणूस आहे.

- नितीन आगे बद्दल वाचतो मी, दाभोळकर आणि निर्भया ही ओरखडे ओढून जातात, २६/११ ला भयचकित होतो, मन विदीर्ण होतं, मुठी पण आवळल्या जातात कधी कधी. मग मला sense होतं कि माझी भावना हि केविलवाणी आहे. मी गपगुमान विसरतो आणि कामाला लागतो, पुढच्या खुनाची बातमी वाचेपर्यंत. हो मग, मी sensitive माणूस आहे.

- रस्त्यावर पडलेला माणूस पाहतो. रक्ताचा ओघळ दिसतोही. मनात खूप कालवाकालव होते. पण मग sense होतं कि चाळीस लाखाची order फायनल करायची आहे. साडेदहाची वेळ दिली आहे. वाईट वाटत वाटत मी हलकेच accelerator वर पाय दाबतो. त्याचं काय आहे, मी जरा sensitive आहे हो.

- सिग्नल ला गाडी उभी राहिली कि येतात २-४ चिल्लीपिल्ली काहीतरी मागण्यासाठी. जातोही हात खिशात २ रुपये फेकण्यासाठी देणगीच्या अविर्भावात. आणि मग sense होतं गाडीतला laptop चोरणार तर नाहीत ती. मी हळूच सेन्ट्रल lock चा खटका दाबतो. खरंच हो, मी फार sensitive माणूस आहे.

- कधी दिसतं डोळ्यांना कुठल्या तरी माय भगिनीची छेड काढतंय कुणीतरी, वडिलांच्या वयाच्या माणसाला त्याची चुकी असताना उद्दाम बोलताना. मग sense होतं कि ते "मेरे अपने" थोडीच आहेत. भोकर्या डोळ्यांनी बघत मी रस्ता काटून पुढे जातो. अहो विसरलात का, मी sensitive माणूस आहे म्हणून.

- आणि जातीय दंगलीच्या बातम्या, ओहो, इथे तर माझ्या संवेदनशीलतेचा कस लागतो. कधी झाड उन्मळून पडतं, तर कधी उत्स्फूर्त प्रतिक्रिया असते म्हणे. असो बापडी. मला लागलीच sense होतं की दंगल माझ्या दाराशी थोडीच आहे. मी पण मग चार भिंतीआड बसून बियरचे घुटके घेत tv च्या बातम्या ऐकत बसतो. आता कितीदा सांगू राव की मी sensitive आहे.

अजूनही कळलं नाही म्हणता, ठीक आहे, मग ओरडूनच सांगतो "हो हो मी sensitive माणूस आहे"

No comments:

Post a Comment