Saturday, 17 May 2014

CEO

वसंतराव फारच कडक गृहस्थ. शाळेचे मुख्याध्यापक. हेडसर म्हणायचे त्यांना. त्यांचा मुलगा समीर हि त्यांच्याच शाळेत. वडिलांचे लक्ष. संस्कार. नजरेत जरब. समीरचे पण सगळ्यांशी खेळीमेळीचे संबंध होते. वसंतरावाना आवडत नसे ते. त्यांना कसं सगळं टापटीप लागायचं. कुणी विद्यार्थ्याने दुसर्याला काही मागितलेलं अजिबात आवडत नसे. शाळेचा गणवेश पण कडक लागे. अजिबात हयगय नाही.

समीरच्या शेजारी बाकावर सुरेश नावाचा परोपकारी मुलगा बसायचा. एकदा इस्माईल नावाचा अत्यंत गुणी परीक्षेच्या वेळी खोडरबर विसरला, परोपकारी सुरेशने लागलीच समीरच्या कंपास मधील रबर काढून इस्माईल ला दिले. आणि हे सरांनी बघितले. पुढे मागे न बघता काडकन सुरेशच्या कानाखाली लावली आणि इस्माईल ला पायाचा अंगठा धरायची शिक्षा दिली. खरं तर शाळेत शोएब नावाचा व्रात्य मुलगा होता, सगळ्यांना खूप त्रास दयायचा. सरांचा त्याच्यावर खूपच राग होता. तोच राग त्यांनी इस्माईल या हुशार मुलावर काढला. 

एकदा आंतरशालेय स्पर्धा होती. समीरला शाळेचा लीडर म्हणून पाठवलं. हेड सर पण हजर होते. सरांना दिसलं कि आपल्याच नजरेखाली, आपल्याच शाळेत शिकलेलं पोरगं काही छाप पाडत नाही आहे. बुजतंय. काहीतरी चुकत होतं.

सरांनी समीरला सरळ दुसर्या शाळेत टाकलं. पोरगं थोडं चमकू लागलं. तिथे गणवेशही पक्का नव्हता, थोडं मोकळं ढाकळ वातावरण होतं. समीर त्या नवीन शाळेत रमू लागला. अधून मधून अभ्यास, खेळ यात प्राविण्य हि मिळवायचा, पण परत सहा महिन्यात गाडी बिघडायची. पण एकंदरीत स्वत:च्या शाळेपेक्षा या नवीन शाळेत समीर ची चांगलीच प्रगती होऊ लागली. पण हेड सर लक्ष ठेवून होते. नवीन शाळेची प्रार्थना वेगळी असली तरी शाळेतून परत आल्यावर स्वत:च्या शाळेची प्रार्थना समीर कडून ते वदवून घ्यायचे.

यथावकाश शाळा संपली. महाविद्यालयीन शिक्षण सुरु झालं. तिथंही परिस्थिती कभी ख़ुशी कभी गम अशीच होती. दोलायमान. उच्च शिक्षण करायचं होतं. donation लागणार होतं. सरांचा विरोध होता. पण बाकी मित्रांनी सांगितलं, आता मागे नका बघू. जगात यशस्वी व्हायचं असेल हे उच्च शिक्षण हवेच. सरांनी रसद पुरवली समीर उच्च शिक्षित झाला.

समीर वर वडिलांचे फार ऋण झाले. संस्कार तर होतेच पण शिक्षणाला आर्थिक मदत पण केली.

समीर नोकरीला लागला. छोटीच कंपनी होती. हळू हळू एक एक शिडी चढत तो कंपनी चा हेड झाला. हेड होतानाच कंपनीत वचक निर्माण केला होता. काही लोकं टरकूनच असायचे. समीरचे यश बघून वसंतराव पुन्हा तरुण झाले. वसंतरावांनी सांगितलं समीरला "आता मागे बघू नकोस, ती multinational कंपनी बघतोयस. पार डबघाईला आली आहे. कुणाचा कुणाला पायपोस नाही आहे. finance department मध्ये top management ला आव्हान देत एक जण आला आहे पण त्याचं काही खरं नाही. तो नाही टिकणार कंपनीच्या अवाढव्य आकारासमोर". सध्याची कंपनी छोटी असली तरी तिचं balance sheet strong झालं होतं. कुणी म्हणतात त्यात manipulation केलं, कुणी म्हणायचे कंपनी एकदम छान आहे वैगेरे. पण एकंदरीत समीरची पत मार्केट मध्ये वधारली होती. नातेवाईक आणि मित्रांमध्ये पण समीरचा बोलबाला झाला.

समीर ला सुद्धा ते आव्हान खुणावू लागलं. त्याने सरळ छोट्या कंपनीचा राजीनामा दिला. त्याचाच एक विश्वासू साथीदार होता त्याला हेड बनवला. आणि स्वत: multinational कंपनी चा CEO बनला. हि कंपनी मोठी असली तरी तिची वाट लागली होती. छप्पर फाटला होतं, toilet चे नळ गळत होते. लोकांचा पगार वेळेवर होत नव्हता, tax department च्या नोटीसा येउन पडल्या होत्या. नुसती  अंदाधुंद झाली होती. नाही म्हणायला systems जागेवर होत्या, बँकेत credential होतं अजूनही, ,मालमत्ता हि होती पण collateral security म्हणून गहाण होती.  आता या अशा अवाढव्य कंपनीला परत जागेवर आणण्याचा अवघड शिवधनुष्य समीर ने पेलायचं ठरवलं होतं. अनेक कामगार समीर कडे डोळे लावून बसले होते. त्यांच्या नजरेत आशेचा किरण होता.

वसंतराव एव्हाना समीरच्या दैदिप्यमान यशाने भारावले होते. इतक्या वर्षाच्या मेहनतीचं चीज झालं होतं. समीर च्या नवीन नोकरीचा पहिला दिवस. वसंतरावाना नमस्कार केला. त्यांनीही समीरला आशीर्वाद दिला. म्हणाले "बाळा, माझी तत्वं विसरू नकोस". समीर ने त्यांचा हात प्रेमाने दाबला.

कंपनीच्या गेट मध्ये शिरताच कंपनीतील जुने दोन अधिकारी समीरच्या आजूबाजूला उभे राहून चालू लागले आणि सांगू लागले "इथे परिस्थिती अवघड आहे. नवीन तत्व अंगीकारावी लागतील. तुमच्या वडिलांनी भले तुम्हाला काही शिकवले असेल. पण इथे त्या तत्वांनी जाल तर वांदे होतील तुमचे. आणि मुख्य म्हणजे शिक्षण संस्था आणि कंपनी यात फरक आहे." वडिलांचा उल्लेख झाल्याबरोबर समीरला त्यांनी केलेले कष्ट आठवले, त्यांचे संस्कार, त्यांची प्रार्थना शिवाय शिक्षणाची मदत. हे आठवल्या बरोबर समीरची नजर ताठ झाली आणि त्यांनी त्या दोघांकडे पाहिलं आणि काहीच प्रतिक्रिया न देता तो ताडताड कंपनीच्या प्रवेशद्वारातून आत गेला.

समीरच्या मनात काय आहे हे कुणालाच माहिती नव्हतं.

पण वडिलांच्या काही तत्वांना फाटा देण्याची हुशारी एव्हाना समीर मध्ये आली असावी. त्यांची कालातीत तत्व आणि नवीन जगाची बदलती समीकरणं घेऊन समीर ने कंपनीला गर्तेतून बाहेर काढावं असंच प्रत्येकाला वाटू लागलंय.

No comments:

Post a Comment