Tuesday 6 May 2014

Focussed

काय सांगायचं तुम्हाला, म्हणजे १९९२ मधे धंदा करण्याची ठिणगी पडली मनात, आणि त्यामुळे ज्योत पेटलीही. पण ती ज्योत झाली मेणबत्तीची किंवा फारफारतर पणतीची. म्हणजे त्या ज्योतीने कधी आयुष्यात अंगार फुलवला नाही किंवा ती ज्योत दुसर्यांना प्रकाश देणारी मशाल नाही झाली. पण मिणमिणत्या प्रकाशात स्वत:ला मार्ग दाखवत गेली. आणि मग काही विशिष्ट लोकांना भेटलं की मग आपलं खुजेपण लक्षात येतं. कळतं की focused माणसं़ काय कमाल करतात ते.

म्हणजे कसं ते सांगतो तुम्हाला. अथांग अशा समुद्रात कधी पोहलोच नाही हो. त्या भिरकावून देणार्या लाटा, तोंडात जाणारं खारं पाणी आणि मग अचानक पाण्यानें ओढून नेल्यावर लक्षात येतं की जमीनंच नाही खाली. फाटते हो. मग कसं आपला स्विमींग पूलच बरा. पाणी पण गोड. बुडायला लागलो की तळ असतोच. थोडा धक्का मारला की येतो पाण्यावर. फार प्राॅब्लेम झाला तर लाईफ गार्ड असतोच.

हिमालय कधी खुणावत नाही मला. कुणी सांगितलं त्या जीवघेण्या थंडीत जायला. श्वास पण धड घेता येत नाही. आपली मजल सिंहगडापर्यंत. सगळं कसं तब्येतीला सांभाळून.

कातडी वाचवायची, पोटात जास्त खड्डा नाही पडू द्यायचा, मेंदू वापरायचा पण डोकं दुखु लागलं की बास!

लोकं भेटतात हो, सागराला कवेत घेणारी, एव्हरेस्टला साद घालणारी, ध्यास ठेवणारी आणि मग नतमस्तक होतो. आणि गर्दभावलोकन करायला मी मोकळा होतो. हात पाय कुठे झाडायचं ते कळतं तरी.

डबक्याला जलाशय आणि टेकडीला गड मानला नाही हेच नशीब.

अर्ध हळकुंड मिळालं आहे, पण पिवळा झालो नाही हीच काय ती जमेची बाजू.

समुद्र किनार्यावर सकाळी चालत असताना लाटा आदळल्या पण त्या अशा. 

No comments:

Post a Comment