एका असोसिएशन तर्फे दोन व्यवसायांना मेन्टॉरिंग करण्याची संधी मिळाली आहे. अर्थात मी त्याला चर्चात्मक स्वरूप जास्त मानतो. कुणाला मेन्टॉरिंग करण्याइतकी माझी क्षमता अजून पूर्णपणे विकसित व्हायची आहे असं माझं प्रामाणिक मत आहे.
दोन्ही व्यवसाय विशेष आहेत. एक जण दाम्पत्य आहे ते फूड व्यवसायात आहे. त्यांच्या प्रॉडक्टस चे त्यांनी सॅम्पल आणले होते. अत्यंत दर्जेदार उत्पादनं वाटली मला. त्यांची चव, पॅकिंग हे अगदी आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार. हे कपल वयाच्या चाळीशीत. आणि नोकऱ्या सोडून व्यवसायात उडी मारली.
दुसरी स्टोरी तर निव्वळ कमाल आहे. मुलगा पंचविशीतल्या आतला. पश्चिम महाराष्ट्रातील एका टियर २ गावातल्या इंजिनियरिंग कॉलेज मधून पास आउट झाला. कॉलेजच्या फायनल इयर मध्ये जो प्रोजेक्ट केला त्यालाच कमर्शियल रूप देऊन व्यवसायात रूपांतर केलं आहे. पर्यावरणाच्या संदर्भात आहे, त्यामुळे त्याला थोडं शासकीय रेकग्निशन पण आहे.
दोन्ही केसेस मध्ये एक समानता आहे. दोन्ही व्यावसायिकांची पार्श्वभूमी ही पूर्णपणे ग्रामीण आहे. फूड व्यावसायिक जे आहेत त्यांनी आपले युनिट्स पुण्यात नव्हे तर आपल्या जन्मभूमीत थाटले आहेत. तिथल्या लोकांना रोजगार मिळवून दिला आहे. पुण्यात राहून सेल्स करतात आणि एक्स्पोर्ट पण चालू केलं आहे.
यांना कामाचा बराच अनुभव आहे. दुनियादारी चांगलीच बघितली आहे. पण तो इंजिनियर मुलगा मात्र निव्वळ कमाल आहे. इस्त्री न केलेले कपडे, कम्युनिकेशन अडखळत पण जे बोलतो ते अतिशय आत्मविश्वासपूर्ण, आपल्या प्रॉडक्ट चा परिपूर्ण अभ्यास आणि गो टू मार्केट ची नीती तयार. काही इन्स्टिट्यूट मधून त्याने आर्थिक ग्रॅन्ट मिळवली आहे. आणि जिथे भले भले लोक एका विचित्र भीतीपोटी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करायला कचरतात तिथे या पट्ठ्याने कंपनी फ्लोट करताना प्रायव्हेट लिमिटेड फर्म थाटली, आपल्या शेतकरी वडिलांना को डायरेक्टर बनवून.
पुढील एक वर्ष मला त्यांच्याबरोबर काम करायचं आहे. आणि त्यांना व्यवसायाच्या खाचाखोचा समजावून सांगायच्या आहेत. त्या दोघांबरोबरच्या माझ्या पहिल्या मीटिंगनंतर मला असं वाटतंय की मलाच व्यवसायाच्या युक्तीच्या चार गोष्टी कळणार आहेत.
एकंदरीत यो दोघांबरोबरच्या चर्चा हा मोठा इंटरेस्टिंग एक्सरसाइज असणार आहे.
No comments:
Post a Comment