आजोबा ही प्रायमरी थीम आणि म्हातारपणातले तब्येतीचे प्रॉब्लेम आणि त्यामुळे होणारी मानसिक आंदोलने या विषयावर संकर्षण ने आदि अनंत नावाचा पिक्चर काढला आणि तो मी बघितला तेव्हा पहिले मला तो टीव्ही चा प्रोग्रॅम आठवला आणि एकूणच विषय संकर्षण च्या मनात किती खोलवर रुजला आहे ते जाणवलं. मला असं वाटतं पॅशन... पॅशन म्हणतात ते हे.एखादा विषय इतका निगुतीने सांभाळून ठेवणे आणि संधी मिळाली की त्यावर काम करणे.
चित्रपटाचे रिव्ह्यू लिहिणे हा माझा प्रांत नाही. आणि ज्या बारकाईने श्रीनिकेत किंवा डॉ बिपीन मुव्ही बघतात तितक्या क्रिटिकल पद्धतीने मी तो बघत पण नाही. पण आदि अनंत क्रमप्राप्त होतं. कारण तो संकर्षणने लिहिलेला चित्रपट आहे. परभणी हा दोघातला कॉमन फॅक्टर आहे. काळाच्या ओघात परभणी माझ्या म:नपटलावर पुसट होत जातं, आणि त्याच वेळेस संकर्षण कुठल्यातरी माध्यमातून समोर येतो आणि परभणी परत मनात रुंजी घालते.
माझ्या मते पिक्चर चांगला जमला आहे. अनेक अवांतर गोष्टीत भरकटण्याचा फुल चान्स होता (जसे अनंतरावांचे तीन मित्र, पण सुदैवाने थोडक्यात आटोपलं आहे ते), पण आजारी वृद्धांचे प्रॉब्लेम्स या थ्रेड ला संकर्षणने आणि पर्यायाने दिग्दर्शकाने घट्ट धरून ठेवलं आहे. आदित्य आणि गायत्रीची प्रेमकथा, किंवा आदित्य चा नट म्हणून प्रस्थापित होण्याचा प्रयत्न, विभक्त कुटुंबपद्धती, त्यामुळे तयार झालेला कौटुंबिक कलह ही उपकथानकं मूळ कथेला ओव्हर पॉवर करण्याची दाट शक्यता होती, पण ती येतात आणि मूळ कथेला धक्का पोहचण्याआधी संपतात. अनंतराव असे हटवादी का आहेत आणि मला वृद्धाश्रमात नाही या घरातच राहायचं आहे हा हट्ट समजण्यासाठी मला कदाचित म्हातारं व्हावं लागेल. पण बदलत्या काळानुसार ते हटवादीपण सोडून प्रॅक्टिकल सोल्युशन स्वीकारण्याची तयारी व्हावी हा पण संदेश चित्रपट देऊन जातो. अनंतरावांचं ते रूप सुद्धा आवरतं घेतलं आहे ही अजून एक जमेची बाब. या सगळ्या गोष्टी मर्यादेत ठेवल्या हे लेखकाचे आणि दिग्दर्शकाचे यश आहे. ते व्यावसायिक यश आहे की नाही माहीत नाही पण आर्थिक गणिताला महत्व न देता मूळ सिद्धांताला धरून पिक्चर बनला आहे हे निर्विवाद. अशोक सराफ यांच्या सारख्या दिग्गज कलाकारासमोर संकर्षण आणि सखी गोखले हे तितक्याच ताकदीने उभे राहिले आहेत
एकच तक्रार होती. आउट न आउट शोकांतिके ऐवजी सुखांतीकेची झलक दाखवली असती तर बहार आली असती. म्हणजे अनंतरावांच्या दत्तगुरूंच्या भक्तीला आदित्य च्या संघर्षाची जोड मिळाल्यानंतर त्याला एखादा दर्जेदार प्रोजेक्ट मिळतो असा काही शेवट झाला असता तर पर्स्यू ऑफ हॅपिनेस मध्ये क्रिस ला स्टॉकब्रोकर चा मिळाल्यावर आपण क्रिस बरोबर टाळ्या वाजवतो तशाच टाळ्या वाजवत आपण थिएटर बाहेर पडलो असतो. असो.
संकर्षणने आपल्या मनाचं टिपिकल परभणीकर हळवेपण कधीही लपवून ठेवलं नाही. चित्रपटाच्या कथेत पण ती संवेदनशीलता जशीच्या तशी उतरली आहे. पहिल्याच प्रयत्नात संकर्षण ने चित्रपट क्षेत्रात दमदार कामगिरी केली आहे. त्याच्या येणाऱ्या आणि ऑन गोइंग प्रोजेक्ट्ससाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
वर्ड ऑफ कॉशन आणि मत: रॅशनल आणि प्रॅक्टिकल माईंडसेट असणाऱ्या लोकांना हा पिक्चर बोअर होईल असा माझा अंदाज आहे.
No comments:
Post a Comment