Sunday, 20 July 2014

परभणी १

काय म्हणावं याला, मंतरलेले क्षण. किंवा योगसाधनेत एक ती अवस्था असते, मेडिटेशन. त्या अवस्थेत म्हणे तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या सर्व problems चा विसर पडतो आणि तुम्हाला एका स्वर्गीय सुखाची अनुभूति होते. काल सकाळी ९:३० वाजल्यापासून सुरू झालेलं मेडिटेशन आज संध्याकाळी ७:३० वाजता संपलं. हो, हो तेच परभणीचे ३६ तास. तब्बल १८ वर्षानंतर आलेल्या माझ्या गावातील व्यतीत केलेले क्षण मला एक अमूर्त आनंद देऊन गेले आणि येणार्या कित्येक वर्षात या आठवणींच्या झोक्यावर मी पुन्हा पुन्हा हिंदोळणार आहे याबाबत मला शंका नाही.

परभणीच्या मित्रांबद्दल मी वेगळे काय लिहीणार. प्रेम, जिव्हाळा या सगळ्या शब्दांचा अनुभव परभणीच्या लोकांकडून अनेक जणांनी घेतला आहे, मी त्याला अपवाद कसा असणार! शिवा आणि निलेशनी घेतलेलं माझं यजमानपद, कर्डेकर डाॅक्टरांची निर्व्याज मैत्री, पोटेकर कुटुंबानी दाखवलेलं आपलेपण, मी केशवराव डंकांचा नातू म्हंटल्यावर RBD चे माझ्या पायाकडे धावलेले हात हे निव्वळ कल्पनातीत होतं. मी काही यांचे आभार मानून ऋणातून उतराई वैगेरे होण्याच्या भानगडीत पडत नाही. ते ओझं राहू द्यावं म्हणतोय, वेळ येईल तेव्हा उतरवीन खांद्यावरून.

बाकी मला एक पटलं की मी पक्का परभणीकर आहे, अगदी ३० वर्षांपासून फारकत घेतली तरीही. अगदी दिलेली वेळ न पाळणे हा गुण माझ्यात देखील तंतोतंत उतरला आहे. फक्त रेल्वेचं भाडं देउन तिकीट काढल्यामुळे त्याच्या वेळा पाळण्याइतका व्यवहार्य अवगुण माझ्यात आला आहे. परभणीकर रेल्वे सुद्धा सोडून देऊ शकतो.

असो, खालील दोन चित्रे माझ्याशी निगडीत. एक माझं आजोळ. यठिकाणी साधारण ३५ वर्षापूर्वी १२ खोल्यांचं घर होतं. त्याच्या बाहेर एक सुंदर बाग़ होती, जिथे केवड़ा, आंबा, चिकू, जांभूळ अशी झाडं होती, असंख्य फुले असायची. उन्हाळ्यात कमीत कमी ३० लोकांची पंगत बसायची. अशा एका स्वर्गीय राजमहालाचं आज असं खंडहर झालेलं बघून मी गलबललोच. पण काय करणार कालाय तस्मै नम:

आणि दुसरं आहे आमचं घर. तिथे आता लहान मुलांची शाळा आहे. मी फोटो काढतोय बघून एका बाईंनी विचारलं कशासाठी, मी कारण सांगितलं. बाई पण चुकचुकल्या अन म्हणाल्या तुमची वास्तु भाग्याची आहे. काय म्हणणार कालाय तस्मै नम: 


Saturday, 19 July 2014

परभणी

मित्रांनो,

सोशल नेट्वर्किंग साईट मुळे हरवलेले मित्र भेटतात, नातेवाईक एकमेकांच्या contact मध्ये येतात असं ऐकलं होतं. माझ्या बरोबर मात्र एक अघटित घडलं कि मला माझ्या मनातून हरवलेलं गावच पुन्हा मिळालं. परभणी. माझ्या मनाच्या एका कोपर्यात या गावाचे अढळ स्थान आहे. काळ सरकत गेला आणि त्या मनाच्या कोपर्यावर नवीन युगाची, कामाची पुटं चढत गेली, विविध घटनांची जळमट चढत गेली आणि खोटं कशाला सांगू थोडं विस्मृतीत गेल्यासारखं झालं. नाही म्हणायला "तुमचं native कुठलं हो?" या प्रश्नावर माझं उत्तर होतंच "परभणी" एक ठिणगी पडायची आणि तिथेच विझायची. आणि फेसबुक शी संपर्क झाला. पहिले २/३ वर्षं हे काय प्रकरण आहे ते समजण्यात गेले. आणि खरं तर गेल्या एक दीड वर्षात मी यावर active झालो. आणि तुम्हा सगळ्यांची ओळख झाली. Lives in परभणी, माझ्यासाठी Friend Request accept करायला एवढं कारण पुरेसं होतं आणि त्या मैत्रीच्या हाताला नंतर कधीच झिडकारलं नाही अगदी एकाही मित्राला. त्याला कारण ही तसंच. कुणाशी वाद च झाला नाही. आजही मला फेसबुक चे अनेक जण भेटतात आणि मी सांगितलं कि मी मुळचा परभणीचा तर "परभणीत talent ठासून भरलं आहे" हे वाक्य येतंच आणि हि दाद तुम्हाला दिलेली असते.

आणि या पार्श्वभूमीवर माझ्या मनात यायला लागलं, कि आपण परभणीला जायला हवं. खरं तर दोन्ही आजोळ भौतिकदृष्ट्या काळाच्या पडद्यावरून गायब झालेले. बहुतेक नातेवाईक परभणी सोडून औरंगाबाद, पुणे, मुंबई इथे स्थलांतरित आणि हो अमेरिका विसरलं. घर विकलं त्यामुळे मनाला ओढ लागावी असं काहीच राहिलं नाही. नाही म्हणायला एका लग्नासाठी आलो होतो आणि दोनदा नांदेड ला जाताना मुक्ताजीनच आवंढा गिळत दर्शन हि घेतलं. आणि त्याचवेळेला तुमच्या सगळ्यांची आभासी जगात झालेली ओळख दृढ होत गेली. संध्याकाळी laptop सुरु केला कि तुमची नावं दिसायला लागली आणि इतकेच नाही तर तुमच्या पोस्ट/comment वाचताना तुमच्याशी connect होऊ लागलो. आणि मग ठरवलं, कि जायचंच. आणि हा घाट घातला.

जवळचे मित्र, नातेवाईक मला वेडा ठरवत आहेत, असं आभासी जगातल्या लोकांना कुठे भेटायला वैगेरे जायचं असतं का म्हणून. खरं सांगतो, पण मी सुद्धा हे फक्त परभणी आहे म्हणून एवढा उत्साह दाखवतो आहे. असो.

तर स्नेह तर झालाच आहे, तो वृद्धिंगत व्हावा हीच इच्छा

आपला



राजेश मंडलिक

.









माझी थोडक्यात ओळख सांगतो.

राजेश भास्कर मंडलिक, जन्म: २४/०५/१९६८ पेपर वर परभणी ला पण खरं तर नांदेड ला
वडिलांचे नाव: कै भास्कर अनंतराव मंडलिक,  मृत्यू: १८/०६/२००९  वडील , MSEB मध्ये ३८ वर्षे नौकरी करून १९९९ साली Dy EO म्हणून सेवानिवृत्त अत्यंत  लोकप्रिय, मदतीला तत्पर.  कॅन्सर ने मृत्यू
आईचे नाव: कुमुद भास्कर मंडलिक (पूर्वाश्रमीचे नाव: कुमुद केशवराव डंक)
आईचे घर: मुक्ताजीन, परभणी बस स्थानक शेजारी,
आईचे वडील केशवराव डंक ही एक प्रतिष्ठित व्यक्ती होती. मुक्ताजीन मध्ये परभणीतील अनेकांची लग्न झाली आहेत. उन्हाळाच्या सुट्टीत कमीकमी २५ जणांची पंगत असायची. 
वडिलांचे घर: आधी वडगल्ली (बिडकर यांचे घर) नंतर शास्त्रीनगर, पोलिस ground च्या शेजारी. धोंड आणि कहात यांच्या बाजूला.
परभणी, बीड, यवतमाळ, औरंगाबाद, नासिक, पुणे, मुंबई, पुणे असा प्रवास.
शिक्षण: DME (Govt Polytechnic औरंगाबाद १९८६)
             BE Production Engineering (BVCOE पुणे १९८९)
व्यवसाय: SKF आणि Busak+Shamban २००२ त्यानंतर स्वत:चा बिझिनेस Ultra Precision Spindles.
पत्नी: डॉ वैभवी मंडलिक MD Pathology स्वत:ची lab चालवते
मुलगा: यश (Second year mechanical Engg) आणि नील (पाचवी)
भाऊ: उन्मेष मंडलिक BE सिविल स्वत:चा बिझिनेस त्याची पत्नी : अर्चना BE इलेक्ट्रोनिक्स, MSEB मध्ये AE


पहिला चान्स

१९९९, माझा पहिला परदेश दौरा. Switzerland आणि UK. (तसं ९८ ला सिंगापूर ला गेलो होतो, पण इतक्या कमी दिवसाचा होता की जातो म्हणेपर्यंत दरवाजाची घंटी वाजवली होती) याचे खरंतर बरेच क़िस्से आहेत. पण काही गंमतशीर गोष्टी.

आता ५५०० sqft इतक्या प्रचंड जागेवर विस्तारलेल्या माझ्या वटवृक्षाची सुरूवात १९९४ साली सोमवार पेठेतल्या १०० sqft च्या रोपट्या रूपी एका गाळ्यात झाली होती. (भनकला का बे तु. लोकं वाचताहेत म्हणून वटवृक्ष अन काय काय. भयाडा, २० वर्षामधे लोकं हज़ारों कोटींची उलाढाल करतात, ७-८ आॅफीसेस भारतात असतात, एखादं दुसरं परदेशात असतं. अन तु बसला एकाला कवटाळून, गप्प बस) तर दिवसभर प्रथम M 80 नंतर Hero Honda Splendor यावर १०० किमी ची रपेट केल्यावर मी या गाळ्यात धंद्याला बसायचो. (ए, हसू नका रे. असंच म्हणायचं) रात्री ९-९:३० पर्यंत कधी रिकाम्या workbench कडे पाहत तर कधी फालतूचा time pass करत फार कष्ट केले असं दाखवत घरी धापा टाकत पोहोचायचो. नाही म्हणायला गाळा स्वत:चा असल्यामुळे भातुकली सारखा का असेना पण बिझीनेस करत होतो. Hobby  business म्हणतात ना तसंच काहीसं. त्या गाळ्यामधे गाळ्यात गेलो नाही हेच काय नशीब. (धंदा कोटींचा केला नाही कारण हे अशा फ़ालतू कोट्या करण्यातच आयुष्य वाया चाललं आहे) 

१९९९ फेब्रूवारी महिना. अशाच एका रम्य संध्याकाळी आॅफीस मधे माशा मारत बसलो असताना एक टपाल आलं. स्वत: च जावून आणलेल्या कामाशिवाय आणि पर्चेस आॅर्डर शिवाय त्या १०० sqft च्या विशाल आॅफीस मधे खरंतर माशांशिवाय काहीच यायचं नाही. पण आलं, त्यादिवशी ते टपाल आलं. 

उघडलं. आणि आतमधे जो खलिता होता तो वाचून एखाद्या ट्रक रिपेअर करणार्या ला रतन टाटांचं लेटर आल्यावर जसं वाटेल तसंच वाटलं. Switzerland मधील Voumard नावाच्या एका अग्रगण्य मशीन टूल कंपनीच्या पेगार्ड नामक MD चं पत्र होतं. त्या पत्राचा मतितार्थ असा होता: (आज जरा इंग्रजी लिहीण्याचा मूड नाही, त्यामुळे मराठीच सहन करा) 

Dear Mr Mandlik, (इतकं जमतं हो), लुकास टीव्हीएस चेन्नई कडून आम्हाला असं कळलं की तुम्ही आणि Mr Waghela पुण्यात spindle repair करता. तुम्हाला आमचे spindle repair करण्यासाठी आम्ही तुम्हाला training
देऊन तुम्हाला authorize करू इच्छितो आणि त्या कारणासाठी तुम्हाला Switzerland मधील Neufchâtel नामक गावी आमंत्रित करत आहोत. 

एक अर्धा तास तर काही सुधरलंच नाही. पुन्हा पुन्हा वाचत होतो, म्हंटलं कुणी चेष्टा केली की काय. आजच्या वेगवान
communication  च्या जगात जे लिहीलं ते हास्यास्पद वाटेल पण जे आहे ते आहे .

सगळी लिंक लागली. दोन महिन्यापूर्वी लुकास चेन्नई वरून एक माणूस Voumard चा spindle घेऊन आला होता.
Repair करून दिला. पण बोंबलायला बरोबर झाला की नाही, ते कसं कळणार. मला म्हणाला "तुमच्या repair ची quality कशी बघणार" मी म्हणालो "घेऊन जा, चालला तर पैसे पाठवा" (जन्म मराठवाड्यातला, त्यामुळे "आधी पैसे!" हे कधी जमलंच नाही). नंतर पैसे आले म्हणजे मटका बसला होता फ़िट. या लुकासच्या हेड ने Voumard ला लिहीलं असावं "दोघं जण पुण्यात तुमच्या spindle ची वाट लावतात. अजुन वांदे व्हायच्या आत, त्यांना शिकवा, कसे repair करायचं ते" आणि त्यांची परिणिती हे प्रेमपत्र. 

Tuesday, 15 July 2014

९४

 आपल्याला आंतरराष्ट्रीय भानगडीतलं काहीच कळत नाही. आता हेच पहा ना

बिचारा शाम्या. रोज मामाच्या हातचे फटके खायचा. आई वडिलांचे छत्र हरवलेल्या पोराचे त्याचा मामा रामराव खूपच हाल करायचा. एक दिवशी तर मरेस्तोवर मारला आणि घराबाहेर टाकून दिला. जायचाच वरती तेव्हढ्यात सुरेश भाऊ नि पाहिलं त्याला, उचलून सरळ हॉस्पिटल ला नेलं. सुरेशभाऊ, वार्ड चा नगरसेवक, एकदम हरहुन्नरी पण महत्वाकांक्षी. त्यानं योग्य ती काळजी घेतली आणि बरं करून रस्त्याच्या कोपऱ्यावर बूट पोलिश करायला जागा दिली आणि सांगितलं "शाम्या, लेका हि जागा तुझी. नीट रहा आता इथं. मागं धोंडीबा चं शेत आहे, पण मी सांभाळून घेतो त्याला. तू काळजी नको करू."

दिवस जाऊ लागले. शाम्या मोठा होऊ लागला. बूट पोलिश करता करता भाजी चा stall लावला. तिथंही जम बसला. शाम्या चा शामराव झाला. पण हे होत असताना धोंडीबा च्या पोरांना त्रास दे, त्याची शेतात जाण्याची पायवाट बळ्काव असले उदयोग चालू असायचे. एव्हाना धोंडीबा चे पोरं मोठी झाली. आडवी जायची शामराव ला पण ताकतीला कमी पडायची म्हणजे आर्थिक. याचं कारण शामराव ची सुरेश भाऊ शी जवळीक. सुरेश साहेब आता मुख्यमंत्री झाले होते, आणि बऱ्याच अंशी त्यांचे पैशाचे व्यवहार शामराव च बघायचा.

शामराव च्या दादागिरीने सुरेशभाऊ चा त्या area त चांगलाच वट जमला होता. तिथं सुरेश साहेब फुल कंट्रोल ठेवायचे.

एके दिवशी कहरच झाला. शेतात येण्याची शाम राव ने पायवाट अडवली म्हणून जाब विचारायला धोंडीबाची पोर गेली तर दणकट अशा शामराव ने त्यांना धुतला. सुरेशभाऊ च्या मदतीने शामराव ला माहित होतं कि आपलं कुणी वाकडं करू शकत नाही ते.

शामराव मारतोच आहे आणि धोंडीबाच्या पोरांचे हाल कुत्रंही खात नाही आहे.

मोसाद फारच डेंजर आहे म्हणे, म्हणून सगळं कोड वर्ड मध्ये.

(शामराव: ज्यू, रामराव: हिटलर, सुरेशभाऊ: अमेरिका, कोपर्याची जागा: इझ्रायल, धोंडीबा चं शेत: Palestine,
पैशाचे व्यवहार: बँकिंग, धोंडीबा आणि त्याची पोर: आताची मरणारी पॅलेस्टिनी जनता)

इतकं करूनही हा मेसेज WhatsApp वर मोसाद पर्यंत पोहोचलाच आणि त्यांनी माझा नंबर शोधून मला परत मेसेज पाठवला

"भैताडा, भारत-पाकिस्तान संबंधात काश्मिर बद्दल तुझं काय मत आहे"

मी: अं, अं........अंSSS

मोसाद: अं, अं काय करतोस, आधी स्वत:च्या देशाबद्दल नीट माहिती घे, मग आमच्या देशाबद्दल बोल.

फोनचा नंबर बदलतोय. नवीन नंबर मिळाला की कळवतोच. 

Thursday, 10 July 2014

शुभेच्छा

आठवतीय महिन्या दीड महिन्यापूर्वीची पोस्ट, मदतीसाठी टाकली होती, एका दहा वर्षाच्या मुलासाठी. त्यावेळेस नाव नव्हतं लिहीलं, पण आज सांगतो मानस त्याचं नाव. माझ्या पुतणीचा मुलगा. आजाराचं नाव Extensive Venous Malformation. वेगळाच आजार. काही तज्ञ डाॅक्टरांच्या सल्ल्यावरून भारतात effective treatment नसल्यामुळे अमेरिकेत Boston Children Hospital मधे treatment घ्यावी असं ठरवलं. आणि मानसच्या आई वडिलांनी हे शिवधनुष्य पेलायचं ठरवलं. हा हा म्हणता एक एक अडथळा पार करत सर्व कुटुंब १४ जुलैला अमेरिकेला रवाना होत आहे. मानसच्या वडिलांनी कसं हे सगळं जमवून आणलं, आपल्या तर डोक्याच्या बाहेरचं आहे बुवा! माझ्या मदतीच्या आवाहानाला साद देउन काहींनी मदतीचा हात पुढे केला तर काहींनी सदिच्छा दिल्यात.  काहींनी उपयुक्त माहिती दिली तर काहींनी दुसरं कोण मदत करू शकतं हे सांगितलं. एकंदरीत सर्व अनुभवलं.(आजकालच्या व्यवहारी जगात मदत मागितली म्हणून unfriend नाही केलं,  हेच नशीब)

या कुटुंबाबद्दल एवढंच म्हणू शकतो की "अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन आशा"

मकरंद आणि वृषाली, तुमच्या प्रबळ इच्छाशक्तीला मनापासून सलाम आणि हार्दिक शुभेच्छा.

शुभेच्छा 

Friday, 4 July 2014

भेट

स्थळ: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, वेळ: सकाळची ३;३०

मी रेलींगला टेकून उभा, माझ्या शेजारी तो ४-५ वर्षाचा, हो हर्ष त्याचं नाव
त्याच्या बाजूला त्याची आई तिशीतली. तिच्या डोळ्यात आस नवर्याला भेटण्याची (६ महिन्यानंतर येत असावा)
हर्षच्या डोळ्यात झोप पांगुळलेली.
प्रतीक्षा…… आला……नाही……… निराशा…………हिरमुसणे……. परत वाट पाहणे

आणि आवाज आला "हर्ष चल, बाबा आला" हर्ष पेंगुळलेलाच. परत आवाज "हर्ष चल, बाबा दिसतोय"
पेंगुळलेल्या डोळ्यात थोडी हालचाल. थोडं स्मित.

ओढतच नेलं आईने हर्षला. एव्हाना हर्ष पूर्ण जागा.
trolley ओढत आलेला बाबा. बायकोची आणि त्याची नजरभेट. आनंद साठलेला.

हर्ष आईच्या मागे लपलेला. हळूच बाबांकडे बघणारा. ओळख पटवायची प्रयत्न करणारा.
बाबाच्या डोळ्यात उत्सुकता. हा येत का नाही आपल्याकडे. ६ महिन्यात इतका दुरावा.

बाबाने हात पसरले. ओळख पटली. हर्ष आवेगाने धावत बाबांकडे. आणि क्षणार्धात बाबांच्या कुशीत.
बाबाने हर्षला मारलेली घट्ट मिठी. हर्ष विसावलेला पूर्ण विश्वासाने, आनंदाने.
एका खांद्यावर डोके ठेवून डोळे पुसणारी हर्षची आई.

मी तिथेच रेलिंग च्या जवळ. अनिमिष. धुसर. तो T २ चा झगमगाट विसरून, ब्रम्हांड बघत थिजलेला.

कुटुंबैव वसुधम

भेट 

Wednesday, 2 July 2014

Insurance

ह्या अमेरिकेने जगाला काही चांगल्या गोष्टी दिल्या आणि काही वाईटही. या बेकार गोष्टीबद्दल बोलायचं झालं तर हे insurance policy. (तसही बेकार गोष्टीबाबत आपल्याला एकदम फर्मास लिहिता येतं) म्हणजे काय विकतात हो, मृत्यूची भितीच ना! तुम्ही मराल तर तुमच्या घरच्यांना आजच्या सारखं जीवन जगायला मिळेल. म्हणजे मी खस्ता खात जगायचं आणि मी मेल्यानंतर घरच्यांनी मजेत राहायचं. मला तर हि काही theory कळली नाही. आता हि मेडिक्लेम policy. माझी, बायकोची आणि दोन्ही पोरांची मिळून एक ५.५-६ लाखाची एका चांगल्या देशी insurance कंपनी ची policy आहे. आठ एक हजार premium आहे. काही वर्षापूर्वी १२००० रुपयाच्या क्लेम ला अक्षता लावल्या. पण ठीक आहे. तर परवा एक मोठया हॉस्पिटल पार्टनर असलेली आणि एका जर्मन शहराचं नाव असलेली  insurance कंपनी आली आणि साधारण तेव्हढंच कव्हरेज असलेली policy दाखवली आणि premium किती तर तेवीस हजार. मी म्हणालो "दादा, आठ हजार कुठे आणि तेवीस हजार कुठे" तर मला वेगवेगळे आजार, त्याचा खर्च आणि काय काय सांगत बसला. म्हंटल "तात्या, आता बास. तू आता जगातले यच्चयावत रोग मला होतील आणि त्याच्यावर उपाय म्हणून हि policy मी घ्यावी असं तुला वाटत असेल तर पुरे" आणि मग त्याला बाय केलं.

आता हि अमेरिकन बाई Rhonda Byrne. तिने Secret लिहिलं. त्याच्यात ती काय म्हणते, तुमच्या मनात पूर्ण विश्वासाने एखादी गोष्ट आली कि पूर्ण universe ते पूर्ण व्हायला मदत होते. आणि मग तुम्हाला कार  घ्यायची इच्छा असेल तर कार पार्किंग ची जागा तयार करा. कार  येईल. आता त्या धर्तीवर मी समजा मेडिक्लेम किंवा life coverage ची insurance policy घेतोय म्हणजे आजारी पडण्याची किंवा खपण्याची तयारी करतो आहे असं होत नाही का?

तेव्हा आपलं worth आपणच ठरवायचं, त्याला सुटेबल अशी policy घ्यायची आणि  शांत बसायचं. जास्त डोक्याला भगभग  करून घ्यायची नाही.