Wednesday 10 December 2014

कभी ख़ुशी कभी ग़म

मिलिंदने उरलेलं शेवटी खाणार्या माणसाचा उल्लेख केला आणि माझं मन अगदी ३०-३२ वर्षं मागे गेलं. आम्ही चार, बाबा-आई-मी-उन्मेष आणि काकांची फ्यामिली काका-काकू-जयेश-स्वाती. आम्ही एकत्र दोन अविस्मरणीय ट्रीप केल्या. एक गोवा आणि दुसरी उत्तर भारत. दोन्ही वेळेसच्या आठवणीनी  ह्या मनाचा एक कोपरा व्यापून राहिला आहे. आणि माझाच का आमच्या सगळ्यांचाच.

आम्ही चौघं, मी, उन्मेष, जयेश, स्वाती साधारण एकाच वयोगटाचे. सातवी आठवीतले १३-१४ वर्ष वय. त्यात स्वाती सगळ्यात लहान. आधीच शेंडेफळ अन त्यात तीन भावात एकंच बहीण, त्यामुळे सगळ्यांचीच लाडकी.  त्यावेळेस ट्रीपला हॉटेल मध्ये जेवण करताना मोठे चार एका टेबल वर आणि आम्ही बारके एका टेबल वर अशी विभागणी व्हायची. आमचे शरद काका, म्हणजे एकदम राजा माणूस. खूप मजा करायचे. ते पैज लावायचे, ज्यांनी ताटात लं सगळं संपवलं त्यांना बक्षीस. कधी चोकलेट, कधी रुपया तर कधी काही. आमच्या भावंडापैकी माझं संपायचं आणि थोडं फार जयेशचं संपायचं पण स्वाती आणि उन्मेषच कधीच नाही. मग ते माझ्याकडे बघायचे आणि मी त्यांच्या उरलेल्या अन्नाकडे. मनातून खुश व्हायचो. आणि सगळी ताट बिलकुल साफ करायचो. हा सिलसिला कित्येक वर्षं चालला.

मोठेपणी हा किस्सा सांगताना माझं नाव "मी खाईल" मिखाईल असं सांगताना सगळेच खदखदून हसायचे. पण आजही माझं आणि जयेश चं ताट चाटून पुसून साफ असतं. स्वाती तसंही कमीच खाते. उन्मेषच्या ताटात मात्र अजूनही residual असतात.

वर्षं सरली. स्वाती कॅनडा त असते. जयेश ठाण्यात असतो. उन्मेष पुण्यात असतो पण भेट दोन आठवडयात. सगळे आपापल्या रगाड्यात आहेत. माझ्या खाण्यावर हि बंधन आली आहेत. त्यामुळे सध्या माझंच ताट चाटून पुसून स्वछ करून टाकतो. आणि काय करणार दुसर्या टेबलवर बसणाऱ्या  चार जणांपैकी शरद काका, आशा काकू आणि माझे बाबा हे अनंताच्या प्रवासाच्या गेले आहेत. त्यामुळे सध्या ताट नाहीतर त्या तीन रिकाम्या जागांकडे आशाळभूतासारखा बघतो आहे.

******************************************************************************
दुसरे पंडितजी. त्यांनी सांगितले कि त्यांचे मित्र त्यांचे किती कौतुक करतात ते. या उलट माझं. माझा एक मित्र आहे. औरंगाबादला बरोबर होतो. हुशार आहे. पण स्वत:ला अति शहाणा समजतो. म्हणजे माझ्या साध्या हलक्या शब्दातल्या पोस्ट ला पार हलक्या दर्जाची आहे हे दाखवण्याचं कसब त्याच्या अंगात आहे. बरं याला मी इतक्यांदा तोंडावर पाडलं आहे. कारण आपण एकदा काय बोलतो आणि नंतर काय याचा अर्थ अर्थी काही संबंध नसतो. पण तोंडावर आपटून याचं नाक वरंच असतं. किमान पंचवीस वेळा तरी या मित्राने विनोदी पोस्टमधून काहीतरी गंभीर, सामाजिक पोस्टमधून अध्यात्मिक, आत्मनिंदा केली असेल तर पुढे जाऊन न मागता सल्ला देणे अशा मुळ पोस्टच्या आसपासही न फिरकणार्या पासिंग कॉमेंटस नी पार डोकं पकवून टाकलं आहे. आपला जुना मित्र आहे ८३ पासून, म्हणून इतके दिवस गपगुमान ऐकून घेतलं. आता मात्र मित्रा, तुझी हुशारी तुलाच लखलाभ. कधी भेटलोच तर चहा पिऊ, बियरही पिऊ पण बंगलोरची हवा कशी अन पुण्याला महागाई किती इतकं बोलू, बास!

No comments:

Post a Comment