Thursday, 25 December 2014

अजून एकदा सिंहगड डायरी

काय होतं, मनात काही नसतं हो. पण बोलतात लोकं अन मग मन फसतं हो. आता हेच बघा ना. काल उतरत होतो सिंहगडावरून. समोरून मुलींचा घोळका आला. ४-५ जणी होत्या. साधारण पंचविशीच्या. समोर तीन जणी आणि मागे दोघी जण. त्या दोघी मैत्रिणी आणि एकीने दुसरीला ग्रुपमध्ये आणलं असावं. त्यांचं नाव समजा अ आणि ब. (खूप नावं लिहिली पण सध्या फ्रेंड लिस्ट मोठी झाल्यामुळे वेगवेगळी नावे आहेत. फेसबुकचे वातावरण जरा मचुळले आहे सध्या. त्यामुळे अ आणि ब यावर समाधान माना) तर तिघींमध्ये एक भैरवी होती. भैरवी अ आणि ब कडे बघून म्हणाली "ए, तुम्ही दोघी किती सेम टू  सेम दिसता" तर अ म्हणाली "हो मग, आम्ही शेजारीच राहत एकमेकांच्या."

एकटाच होतो. मनातल्या मनात हसत निघालो.

*******************************************************************************

BSNL म्हणजे भगवान से भी नही लगता……. म्हणे

*******************************************************************************

पूर्ण उतरलो. नेहमीच्या शेतात गाडी पार्क केली होती. मी पोहोचलो तेव्हा सीन असा होता, कि एक साधारण तिशीची  स्त्री, अर्थातच सुंदर. लग्न झाल्यापासून सुंदर स्त्रियांशीच माझी का गाठभेट होते हे एक न सुटलेलं कोडं आहे. हा, तर त्या बाईंनी माझ्या कारचा ड्रेसिंग टेबल केला होता. बॉनेट वर पर्स अन त्यातून मेक अप चं सगळं सामान. त्या कारच्या खिडकीत बघून केश संभार सावरत होत्या. त्यावेळेस दुसरी एक कन्यका साईड मिरर मध्ये पापण्यांना ब्रश ने काही तरी छळत होती. कारच्या एका बाजूला ह्या दोन तर पलीकडे अजून दोन कन्यका लिपस्टिक चा मुक्त वापर करत होत्या. बॉनेट पूर्ण भरलेलं.

मी थक्क होऊन बघत बसलो. म्हणजे ड्रेसिंग टेबल कडे. कन्यका आणि त्या सिनियर मग्न होत्या. मी मागे येउन उभा राहिलो, घसा खाकरला. पण कुणी बघायला तयार नाही. मी काही बोलणार तेवढयात त्या सिमरन चं, आलियास सिनियर, माझ्याकडे लक्ष गेलं. अन फणकार्याने म्हणाली "काय बघताय काका" त्या रागाचा अंदाज घेत तो काका हा शब्द शिसासारखा कानात गेला. मी बोललो "अहो माझी कार" तर ती म्हणाली "ओह सॉरी हं, लक्षात च नाही आलं." वर मंजुळ आवाज करत म्हणाली "रागावलात का". हे ती असं ती हसत म्हणाली अन मी फसत गेलो. काही न बोलता कार चालू करून स्पीड पकडणार तेव्हढ्यात मागे डिकीवर हात आपटून कार थांबवा असा इशारा केला. आता ती मला काय करणार अशी कल्पना करत थांबलो तर समोर बॉनेट आणि वायपर च्या मधे तिने भली मोठी हेयरपिन अडकवली होती. ती ओढून घेतली.

देवी माझ्यावर प्रसन्न् आहे मित्रांनो. नाहीतर विचार करा, मी घरी पोहोचलो आहे. सोसायटीच्या गेटवर वैभवी उभी आहे. तिचे लक्ष कुठेही न जाता हेयरपिन कडे जातं....................Rest in pieces च्या मायला.

********************************************************************************

कोपर्या कोपर्यावर मोबाईल मधून फोटो उडवणारी जनता बघून वाटते, कि गेल्या शतकात लोकांनी जितके फोटो उडवले असतील तितके या दशकात याबाबत मला शंका नाही.
********************************************************************************
सिंहगड वरून परत येताना डावीकडे पाटी दिसते " Advocate अमृता मालुसरे". मला बर्याचदा वाटतं, एक दिवशी कार थांबवावी, घरात जावं आणि विचारावं "ताई, तुम्ही त्या वीर तानाजी मालुसरे यांचे वंशज का" त्यांनी हो म्हणावं आणि मग मला त्या काळातील त्यांच्याकडे असलेली पत्रे किंवा काही वस्तू दाखवाव्यात. मी त्या वस्तूवर हात फिरवत इतिहासात हरवून जावं आणि आपसूक माझ्याकडून ललकारी पडावी "क्षत्रिय कुलवंतस राजाधिराज गोब्राह्मण प्रतिपालक श्रीमंत शिवाजी महाराज की जय"

*******************************************************************************

अजून एकदा सिंहगड डायरी

No comments:

Post a Comment