Thursday 18 December 2014

शेती

हर्षल बोलला म्हणून यथाशक्ती यथाबुद्धी लिहायचा प्रयत्न करतोय.

तर शेती उद्योगाला प्रचलित उद्योगासारखा बघावं का?

सगळ्यात प्रथम आपण मार्केटचा विचार करू. तर भारतासारख्या देशात शेतीच्या उत्पादनाला मरण नाही. खाणारी तोंडे इतकी आहेत कि जे उगवेल ते खपेल. ही luxury इतर उद्योगाला नाही आहे. म्हणजे सगळ्यात महत्वाचा पार्ट, ग्राहक, याची चिंता करायची गरज नाही आहे. मग एखाद्या उद्योगाला लागणारे घटक शेतीत कसे काम करतात, ते बघू.

१. शिक्षण: कुठलाही उद्योग चालू करताना त्याचं शास्त्रीय शिक्षण गरजेचं असावं. आता लागलीच कुणी तरी म्हणेल कि बिल गेटस कुठे शिकला होता. तर अपवाद हे नियम नाही होऊ शकत. मला असं वाटतं कि शेतीचा शास्त्रीय अभ्यास देणाऱ्या संस्थांनी जास्त meticulously काम करायला हवे. शेतीच करायची तर काय करायचं शिकून, हा attitude सोडून द्यावा. शेती करण्याच्या शास्त्रीय पद्धतीशिवाय vocational ट्रेनिंग द्यायलाच हवे. अभियांत्रिकी उद्योजक आणि शेतकरी यात मला हा पहिला फरक जाणवतो. (आता कुणी आजकालचा शेतकरी शिकला नाही असं कुणी सांगितलं, असा वाद घालू नये. जे दिसतं ते लिहितो)

२. उत्पादन: कुठलेही उत्पादन करायचे तर ढोबळ मानाने एखाद्या मटेरियल चे स्वरूप बदलतो. मग तो लोखंडी बार असो कि सोने असो. आता हे बेसिक raw material मिळण्यात धोके असतात. पण विचार करा, शेतीचे raw material काय, तर शेत जमीन, बी बियाणं, खत आणि मुख्य म्हणजे पाणी. आता ह्या पाण्याची उपलब्धता करून देणे कुणाच्या हातात आहे. निसर्गाच्या. निसर्ग पाणी देतो असं एक वेळ गृहीत धरू. पण शेतकऱ्याला ते योग्य वेळी, योग्य प्रमाणात मिळते का हि कुणाची जबाबदारी आहे. त्या उपरही म्हणू कि शेतकर्याने पाणी वाचवले पाहिजे. पण बदलत्या परिस्थितीत हे ज्ञान त्याला कुणी दिले आहे का? थोडक्यात प्रचलित उद्योगाला raw material चे धोके कमी तर शेतीला सगळीच अस्थिरता.

३. वातावरण: गारपीट, बेधुंद पाऊस, वादळ ह्याला शेती जितकी vulnerable असते तितका दुसरा कुठला उदयोग असतो? तर उत्तर आहे कुठलाच नाही. आणि नुकसान तरी कसं तर हाताला आलेलं पीक भुईसपाट. म्हणजे आमच्या इंडस्ट्री मध्ये माल बनवला, ट्रक ने पाठवताना, ट्रक नदीत पडला आणि संपलं. हि अशी टांगती तलवार सतत डोक्यावर.

४. प्रोसेसिंग: धान्य, फळं, भाज्या बनवल्या, उत्पादित केल्या. पण पुढं काय. शेतकऱ्याला योग्य मोबदला देऊन हे ग्राहकाला पोहोचवायची व्यवस्था कुठे आहे. म्हणजे जास्त उत्पादन केलं तर प्रोसेसिंग करता येत नाही म्हणून फेकून द्यायचं अन कमी उत्पादन झालं तर उत्पन्न कमी. किंवा मधले दलाल लाटणार.

५. अर्थशास्त्र: बाकी मग बँकेचे लोन, त्याचा इंटरेस्ट, त्याचा उत्पन्नाशी ताळमेळ याचं काही धोरण शेतकऱ्याकडे असतं का आणि जर असेल तर त्यावर त्याचा कंट्रोल असतो का? त्याला त्याच्यातलं ज्ञान आहे का? ते ज्ञान गरजेचे नाही का? आहेच तर मग कोण देतं त्यांना हे ज्ञान? असे असंख्य प्रश्न उभे राहतात. आणि देत असून जर इतक्या घाऊक भावात आत्महत्या होत असतील तर शिकवणार्यांच काही तरी चुकतंय. शेतीचं यांत्रिकीकरण केव्हा करायचं, किती जमीन असली म्हणजे break even point त्या उत्पन्नाला येतो. आपण बर्याचदा ह्या ज्ञानाची खिल्ली उडवतो, पण याचा उपयोग धंद्यात होतो हे नक्की.

असो. पोस्ट मध्ये लिहिल्याप्रमाणे "भारत हा शेतीप्रधान देश आहे" यापलीकडे काहीच माहित नाही, आमच्या उदयोगात आम्ही काही ठोकताळे बांधतो, त्यातूनही प्रॉब्लेम येतात पण त्याची तीव्रता कमी. जे गोत्यात येतात ते स्वत:च्या कर्माने येतात. मला असं वाटतं शेतीचं तसं नाही. शेतीमध्ये शेतकऱ्याच्या कंट्रोल च्या बाहेरच्या खूप गोष्टी आहेत. आणि त्यासाठी सरकारच्या मदतीची गरज आहे. म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं तर SWOT analysis केलं तर strength खूपच कमी आहेत शेती उदयोगात तर weakness खूप जास्त. opportunity ला मरण नाही पण threats चा भडीमार आहे. मुख्य म्हणजे आमच्या उदयोगात threats या hypothetical असतात तर शेतीत ते वास्तव आहे.

त्यामुळे कुबेर म्हणतात त्याप्रमाणे शेतीला बाकी उद्योगासारखे ट्रीट करता येणार नाही. वरील मुद्द्यांवर शासनाने काम केलं तर १०-१५ वर्षानंतर त्या दृष्टीने विचार करता येईल. पण जर शेतीला आणि पर्यायाने शेतकऱ्याला सक्षम केलं नाही तर आत्महत्येचं पाप आपल्याच अंगावर आहे हे ध्यानात असू द्यावे.

(सदर लेखक हे लोकांचे भले करण्याच्या नावाखाली वाटेल ती पापं करणाऱ्या भांडवलशाहीचे मायक्रो लेवल चे का असेना पुरस्कर्ते आहेत. चूभू देणे घेणे)

No comments:

Post a Comment