Wednesday 17 December 2014

अज्ञानी

आता याला confession म्हणा की अजून काही. पण हे खरं आहे. सांगायला लाज वाटते पण शेती आणि शेतकरी या विषयी फारंच कमी माहिती आहे मला. दररोज होणार्या आत्महत्या या बातम्या वाचून जीव जळतो, पण क्षणभरच. नंतर परत ये रे माझ्या मागल्या. कदाचित सारं आयुष्य शहरात गेलं माझं, त्यामुळे कनेक्ट होत नसेल.

शेती, तिचे पावसावर अवलंबून असणे, बि बियाणांचे भाव, खतं- कीटकनाशकांचा वापर, बँकांचे interest rates याची एकमेकांशी विचित्र सांगड होऊन शेतकरी पार आत्महत्या करायला प्रवृत्त होतो यासारखी दुर्दैवाची गोष्ट नाही. त्याचं अर्थकारण किती complex असेल की अगदी होलसेल मधे लोकं जीव देत आहेत. शेतीचं यांत्रिकीकरण करणं योग्य की अयोग्य, त्याने ट्रँक्टर कधी घ्यावा, अंहं एकदम ढ.

खरंतर शेतकरी, अन्नदाता आपला. त्यांची अशी ससेहोलपट बघताना मन द्रवते, पण त्यावर उपाय काय यावर मत प्रकट करण्याइतकीही अक्कल आपल्याला असू नये याचं वाईट वाटतं.

असो. काही गोष्टींचा अभ्यास पुर्णपणे अभ्यास न करता अक्कल पाजळवायला अन जाहीरपणे लिहायला आपण पेपरचे संपादक थोडी आहोत.

आपल्याला शेतीमधलं कळत नाही हे लिहीताना वाटलं, बरं आहे, आपण निर्लज्ज  नाही आहे ते.

****************************************************************************

फेसबुकवर बर्याचदा जातीवरून चर्चा होते. शेतीसारखंच या क्षेत्रातलं माझं ज्ञान तोडकं आहे. आणि का अज्ञानी असू नये. लहानाचा मोठा झालो, पण जातीबद्दल ना कधी घरी विषय ना शाळेत. दहावीनंतर डिप्लोमा ला गेलो. तिथं रमेश नारखेडे नावाचा जीवलग मित्र झाला. तो काही लोकांना जयभीम म्हणायचा. मी एके दिवशी विचारलं, तु नमस्कार च्या ऐवजी जयभीम का म्हणतोस. पहिल्यांदा राग आला त्याला, पण मला खरंच काही माहित नसल्यामुळे शांत झाला.  मग तो मला कॉलेजच्या शेजारी आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर घेऊन गेला. आणि सांगितलं भीमराव आंबेडकर आणि त्यांचं महत्व. दोस्ती दृढच राहिली.

यथावकाश लग्न झालं. आंतरजातीय. विरोध झाला, नाही नाही जातीवरून नाही, अस्मादिक डॉक्टर नव्हते म्हणून. ज्या घरात मला दिलं आहे ते तर राष्ट्रीय संमेलन. माझं आंतरजातीय, वैभवीची बहिण क्षितीजा चं arranged आंतरजातीय, भाऊ अमोल त्याचंही स्वजातीत नाही. चुलत भाऊ शंतनु ची बायको ब्राम्हण, बहिण राधिका चं पंजाब्याशी लग्न. दुसरा चुलत भाऊ संजयची बायको ख्रिश्चन तर चुलत बहिणीचा नवरा ब्राम्हण. मामे बहिण चारू चा नवरा तमिलियन तर मावस बहिण शिल्पाचा नवरा काश्मिरी. प्रसादचं arranged आंतरजातीय. इतकंच काय वैभवीच्या आजोबांनी ब्राह्मण बायको शी लग्न केलं होतं. जमलो कधी अन जातीवरून भांडायचं म्हंटलं तर कुणी कुणाशी भांडायचं.

मी कधी कुणाची जात नाही काढली न माझी कुणी. (एकच आहे पण तो च्युत्या आहे हे जगाला माहित आहे).

मधे मला एका मोठ्या कंपनीतून फोन आला "तुमच्या employees ची जात लिहून पाहिजे" मी विचारलं "का" तर म्हणाला आमच्या कंपनीचा नियम आहे. मी बोललो "employee ला घेताना जात विचारायची नाही हा माझा नियम आहे" तर म्हणाला "सांगावीच लागेल" मी म्हणालो "फोन ठेवतो, परत फोन करू नका" तर साहेबाला घेऊन आला. सगळं कळल्यावर मला म्हणाले "government ला डाटा द्यायचा आहे, प्रायव्हेट सेक्टर मधे मागासवर्गीयांचं स्थान काय?" बोललो "हे आधी सांगायचं ना मग, नियम आहे म्हणून काय सांगता" पोरांना बोलावलं "या कारणासाठी जात विचारतोय" डाटा अमनने गोळा केला अन कंपनीला दिला. (नंतर मग बर्याच कंपन्यांनी मागितला)

जात अजूनही आपल्या समाजात इतकी खोलवर रूजली आहे हे मला फेसबुकवरच कळतं, अन मनस्वी दु:खही होतं. लोकं कधी समोर वार करतात तर कधी आड़ून.

जातव्यवस्था फ़ारशी माहित नसलेला मी एक अज्ञानी माणूस आहे. 

No comments:

Post a Comment