Sunday, 25 February 2024

अमोल

 काय होतं की बरेचदा भवताल तुमच्या व्यक्तिमत्वाला पूरक असतं आणि व्यावसायिक यश तुम्हाला मिळतं. तुम्हाला वाटतं की दुनिया मेरी मुठ्ठीमें. पण अंगभूत हुशारी असूनसुद्धा केवळ दैव साथ देत नाही आणि सोशल इको सिस्टम ची फार मदत होत नाही आणि त्यामुळेच तळ्यातील अनेक  बदकांपैकी तो मात्र कुरूप म्हणून ओळखला जातो. शिक्षणात तो बी इ इलेक्ट्रॉनिक्स होतो. आयुष्याच्या ज्या काळात उमेदीने करिअर घडवण्याची संधी आणि उमेद असते त्याच काळात त्याला मानसिक आजार होतो. जिथं स्वतःचं करिअर उभं करायचं म्हणून कामात गुंतून घ्यायचं त्या वयात त्याला हॉस्पिटल च्या वाऱ्या कराव्या लागतात. त्या सगळ्या वावटळीच्या आयुष्यात तो बरा पण होतो आणि संसार करण्यासाठी सज्ज होतो. पण तसं घडायचं नसतं. त्याचा तो संसार मोडतो. परत तो मानसिक आजाराच्या गर्तेत लोटला जातो. त्याही संकटाला परत तो धैर्याने तोंड देतो. आर्थिक अस्थैर्य तर होतंच, पण तो आल्या दिवसाला तोंड देत पुन्हा एकदा उभा राहण्याचा प्रयत्न करतो. साथ देणारी मिळते, त्यांच्या संसारवेलीवर एक फुलही उमलते. त्याची नोकरीतील कारकीर्द पण स्थिरता देऊ लागते. 

पण नियती पुन्हा एकदा क्रूर धक्का देते. एका विचित्र अपघातात तो त्याची पत्नी आणि ते फुल गमावतो. 

एखादा अशा एका पाठोपाठ येणाऱ्या संकटाने कोलमोडून गेला असता. पण वरकरणी अत्यंत अस्थिर आयुष्य जगणारा तो बहुधा आतून खूप स्ट्रॉंग होत जात असावा. 

हळूहळू शैक्षणिक क्षेत्रात तो आपलं बस्तान बसवू लागतो. कुठून त्याच्या अंगात शक्ती येते हे माहीत नाही पण २०१७ साली तो शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद इथून वयाच्या ४१ व्या वर्षी एम इ इलेक्ट्रॉनिक्स होतो. 

प्रोफेसर म्हणून आता स्थिर स्थावर होत असतानाच पुन्हा एक संकट पुढे दत्त म्हणून उभं राहतं, करोना. परत त्याची नोकरी जाते. 

पण एव्हाना संकटाशी दोन हात करण्याची त्याला बहुधा सवय झाली असावी. आता त्याची शैक्षणिक प्रतिभा फुलत होती. औरंगाबादच्या एका चांगल्या इंजिनियरिंग कॉलेज मध्ये तो इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंग चा प्रोफेसर म्हणून काम करू लागतो. 

ही स्टोरी आहे माझा मावस भाऊ अमोल देवडे याची. का कुणास ठाऊक या मावस मामे भावांच्या मनात माझ्या बद्दल एक विचित्र भीती होती असं ते आज सांगतात. पण तीन चार वर्षांपूर्वी ती भीती गेली आणि अमोल माझ्याशी संवाद साधू लागला. त्याला त्याच्या करिअर मध्ये काही प्रश्न उभे राहिले तर तो मला प्रत्यक्ष भेटीत किंवा फोन करून विचारू लागला. मी सुद्धा त्याला यथाबुद्धी उत्तरं देऊ लागलो. मानसिक आजार अधून मधून डोकं वर काढत होताच. त्याला मी एकदा व्यायामाचं महत्व सांगितलं. तो तेव्हापासून दररोज सकाळी फिरायला जातोच. एकदा मला म्हणाला “दादा, तू कसला फिरतोस रे. एकदा मला पण ने की” आम्ही दोघांनी मिळून त्याचा औरंगाबाद-पुणे-दिल्ली-हैद्राबाद-औरंगाबाद असा ट्रॅव्हल प्लॅन बनवला. त्याने खूप प्रश्न विचारले अगदी मला कंटाळा येईपर्यंत. तिथेही मी त्याला जमेल तसं त्याच्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न केला. 


मागच्या महिन्यात त्याने फोन करून आश्चर्याचा सुखद धक्का दिला. त्याने सांगितलं “दादा, मी इलेक्टरो मॅग्नेटिक्स या विषयावर पुस्तक लिहिलं आहे”. शप्पथ सांगतो, मला शंका आली की याचा मानसिक आजार परत उद्भवला आहे. प  यावेळेस माझी शंका खोटी ठरली याचा मला प्रचंड आनंद झाला. आणि त्याने सांगितलं की गेले आठ दहा वर्षे तो या पुस्तकावर काम करतोय. त्या पुस्तकाचं प्रकाशन माझ्या हस्ते व्हावं अशी त्याने मला गळ घातली. मी नाही म्हणायचं कारणच नव्हतं. एक वारकरी दुसऱ्या वारकऱ्याला नमस्कार करतो तसा मी त्याला मनोमन नमस्कार केला. काल एका हृदयांगम घरगुती सोहळ्यात त्याच्या पुस्तकाचं विमोचन झालं. 

कॉलेजमध्ये तरुणाईशी संवाद साधताना मी वयानुरूप करिअर कसं बिल्ड करावं यावर बोलताना अपवाद म्हणून बोमान इराणी किंवा के एफ सी च्या कर्नल सँडर्स चं उदाहरण देतो. यापुढे ४८ व्या वर्षी जीवनाला कलाटणी देणाऱ्या अमोलचं उदाहरण देणार आहे. 


इतके वर्ष जग ज्याला कुरूप बदक म्हणून ओळखत होतं तो खऱ्या अर्थाने राजहंस निघाला याचा मला खूप आनंद होत आहे. शैक्षणिक क्षेत्रात काम करत त्याची अजून पुस्तकं येवोत आणि या पुढील अमोलचं आयुष्य आर्थिक, मानसिक, शारीरिक आणि सामाजिक या सर्वच क्षेत्रात स्थिर आणि भरभराटीचे जावो या हार्दिक शुभेच्छा तर मी देतोच आहे पण तुम्हा सर्वांना पण त्या देण्यासाठी नम्र आवाहन करत आहे. 


Tuesday, 20 February 2024

महाराष्ट्र देशा

 बरेच दिवसांपासून लिहावंसं वाटत होतं, पण मग वाटायचं जाऊ द्या, कशाला लिहायचं आणि मुख्य म्हणजे लिहून काही फायदा होणार आहे का, की नुसतंच वांझोटे रडगाणे होणार आहे. पण आता जेव्हा दुसऱ्या राज्यात माझ्या महाराष्ट्राची इज्जत निघाली तेव्हा मग वाटलं की भडास काढून टाकावी. 

तर समस्त महाराष्ट्रातील राजकारणी लोकांनो, तुम्ही हा जो खेळ लावला आहे ना या राज्यात, त्याला थांबवा यार. एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या नादात आपल्या राज्याची जनता भरडली जात आहे. 

एक काळ होता, महाराष्ट्रात राहतो आहे हे म्हंटल्यावर समोरचा माणूस आदराने बघायचा. इतकंच नाही, तर माझा एक मित्र हेमंत गुजरात मधून काही वर्षांपूर्वी पुण्यातील कंपनीत जॉब करण्यासाठी आला. तेव्हा हेमंत म्हणाला "काय टॅलेंटेड लोक आहेत राव इथे आणि कसली कष्टाळू". अशा हुशार आणि कष्ट करणाऱ्या राज्यात खरंतर किती औद्योगिक प्रोजेक्ट्स यायला हवे होते? पण जरा स्क्रोल करा आणि सांगा की ज्यामुळे रोजगार निर्मिती असे किती प्रोजेक्ट गेल्या काही वर्षात आले. ज्या टाटा ने जमशेदपूरला आपल्या उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली आणि नंतरचा मोठा प्लांट पुण्यात टाकला त्या टाटाने आपले सर्व एक्स्पान्शन प्लॅन्स महाराष्ट्राबाहेर केले आहेत. टाटा नॅनो आली तेव्हा ते सिंगूरला गेले. तिथे ममता बॅनर्जीने वाटाण्याच्या अक्षता दिल्यावर चान्स होता की तो प्लांट महाराष्ट्रात येईल. पण तो गेला सानंद गुजरात मध्ये. आज त्याच सानंद मध्ये टाटा दिमाखात इ व्ही बनवत आहे. इतकंच नाही तर बाजूच्या फोर्डने गाशा गुंडाळल्यावर त्यांच्या साडे चारशे एकर पैकी ३०० एकर टाटा ने जागा घेतली आणि भविष्यातील इ व्ही सेक्टर मधील मोठी फॅसिलिटी बनवत आहे. मिहान मध्ये टाटा एरोस्पेस ची फॅक्टरी असताना सुद्धा टाटा एअरबस प्रोजेक्ट वडोदराला गेला. 

ज्या मुंबईवर डॅनिश इंजिनियर हालसेक लार्सन आणि सोरेन टुब्रो तीसच्या दशकात फिदा झाले होते आणि त्यांनी एक प्रचंड व्यावसायिक लार्सन अँड टुब्रो वसवली आणि फुलवली, त्या एल अँड टी ने सगळे मोठे प्रोजेक्ट्स महाराष्ट्राबाहेर नेले. आज हझिरा मधील एल अँड टी ची एस्टॅब्लिशमेंट बघितली तर डोळे दिपतात. बाकी सगळी इन्व्हेस्टमेंट त्यांनी बंगलोर आणि चेन्नई मध्ये केली. 

धीरूभाईंनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात मुंबईत केली आणि पाताळगंगा मध्ये प्लांट टाकला. पण जिथं मोठ्या स्केल मध्ये रोजगारनिर्मिंती होते त्यातील एक प्लांट आला हाझीरा मध्ये तर दुसरा जामनगर मध्ये. 

एरोस्पेस या सनराईज इंडस्ट्री मधील सारे प्लांट्स हे हैद्राबाद, बेळगाव, कोलार, बंगलोर या एरियात येत आहेत. 

मोबाईल उत्पादक फॉक्सकॉन तळेगाव मध्ये प्लांट टाकणार, २५००० कोटी रुपयाची गुंतवणूक होणार अशी वाजतगाजत घोषणा केली गेली. पण आपल्या राजकारणाच्या नाकाखालून ती होसूर ला गेली, इतकेच नव्हे तर फॉक्सकॉन बरोबर टाटा इलेक्ट्रॉनिक्स, रायझिंग स्टार, सालकॉम्प, डिक्सन टेक्नॉलॉजीज, विस्ट्रॉनअसे अनेक मोबाईल उत्पादक नुसते आलेच नाहीत तर पी एल आय स्कीम खाली मोबाईलचं दणकावुन उत्पादन चालू झालं पण. लाखो लोकांना रोजगार मिळाला. किया मोटर्स चा प्लांट अनंतपूर जवळ तर ओला, एथर चे अनुक्रमे बंगलोर आणि होसूर मध्ये. रेल्वे मध्ये इतकं प्रचंड काम चालू आहे. लातूर मध्ये एक प्लांट आल्याचं ऐकवात आहे, वंदे भारत साठी पण बाकी सगळी डेव्हलपमेंट दुसऱ्या अनेक राज्यात. वरती उल्लेख केलेल्या तळेगाव मध्ये जनरल मोटर्स बंद पडून दोन वर्षे झाली आहेत आणि मोठा प्लॅन घेऊन जीएम टेकओव्हर केलेल्या ह्युंदाई अनेक अडचणी फेस करत आहे. 

महाराष्ट्रातील जनतेला आणि पर्यायाने राजकारण्यांना कळत नाही आहे की आपली प्रॉडक्टिव्ह विचारधारा ही अत्यंत अन प्रॉडक्टिव्ह कामात, विचारात अडकवली जात आहे. गावांची नावं बदलायची सुरुवात व्हायला पाहिजे होती ती अहमदाबाद पासून, पण तिथं आय आय टी, आय आय एम आणली जाते, मारुती सुझुकीचा, होंडा मोटारसायकल चा प्लांट आणला जातो, तिथं भौतिक आणि बौद्धिक संपदेची निर्मिती केली जाते आणि आम्ही एकेकाळचे उद्यमशील लोक गावाचे नाव बदलले म्हणून म्हणून खोट्या आनंदात मश्गुल तर होतोच, वर परत दुसरे सरकार त्या नावाचं एक्स्टेंशन करून पाठ थोपटून घेतं. बिहारमधील औरंगाबाद त्यांच्या खिजगणतीत नसतं पण उस्मानाबाद बरोबर ध्यानात राहतं. जिथला राजकीय नेता पॉवरफुल तिथं सगळ्या सोयी. अरे, ज्या पुण्यातून राज्यात सगळ्यात जास्त रेव्हेन्यू तयार होतो तिथली मेट्रो वर्षानुवर्षे होत नाही आणि जिथं फक्त थोडाफार ट्रेड होतो तिथली मेट्रो चार वर्षांपूर्वी तयार पण होते अन बिन प्रवाशाची धावत असते. त्याच पुण्याच्या विमानतळाची गेले दीड दशक चर्चा चालू आहे, तितक्या वेळात बंगलोर चं अद्यावत विमानतळ तर झालंच परत वर दुसरं टर्मिनल कार्यन्वित झालं. खेड एस इ झेड सारखा एखाद दुसरा प्रोजेक्ट सोडला तर फार काही इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन काम करताना दिसत नाही आणि बंगलोर जवळ तुमकूर इथे  इंडस्ट्रियल मशीन टूल पार्क, जापनीज इंडस्ट्रियल पार्क ची जवळपास बाराशे एकराची डेव्हलपमेंट चालू आहे.  

रस्त्याबाबत तर वाईट वाटतं. एक काळ होता महाराष्ट्रातील रस्ते सगळ्यात भारी होते. आता त्याच्या बरोबर उलटी परिस्थिती आहे. 

राजकीय परिस्थिती तर सगळ्याच राज्याची बेकार आहे हो. पण आपल्या राजकारणी लोकांनी जी वाट लावून ठेवली आहे ती हास्यास्पद आहे. त्याचा राग येत नाही, लाज वाटते. आणि याला एकच राजकीय पक्ष किंवा आजच्याच काळातील राजकीय नेते कारणीभूत आहेत असं नाही आहे तर याचं डिग्रेडेशन गेले दोन अडीच दशकांपासून चालू आहे. संकुचित मनोवृत्ती, भ्रष्टाचार, जातीय दलदलीत खोलवर बुडालेली आपल्यातूनच निवडून आलेली  नेते मंडळी,  या सगळ्यांच्या तालावर नाचणारी भोंगळ नोकरशाही, या सर्वांच्या मनमानी कारभाराचं जोखड वागवणारी, जातीय आणि धार्मिक भावना अणकुचीदार झालेली आम्ही जनता असा काहीतरी विचित्र प्रकार आपल्या आवडत्या महाराष्ट्राच्या नशिबी आला आहे.  

वेळ अजूनही गेली नाही आहे. आजही जीडीपी मध्ये सगळ्यात जास्त काँट्रीब्युशन महाराष्ट्राचं आहे, सगळ्यात जास्त जि एस टी महाराष्ट्रातून गोळा केला जातो. स्वतःच्या भौतिक, अभौतिक, सांपत्तिक प्रगतीबद्दल उदासीनता आपल्या कामातून झिडकारली तर पुन्हा एकदा देशगौरवासाठी असं अभिमानास्पद काम इथे घडेल की या मंगल आणि पवित्र महाराष्ट्र देशा प्रति नतमस्तक राहू, त्याला प्रणाम करू अशी आशा तर नक्कीच ठेवू शकतो. 

Monday, 19 February 2024

बदल

 गेल्या काही वर्षात एक विचित्र बदल मला माझ्यात जाणवतो आहे. ते म्हणजे पूर्वी उठसुठ माझ्या घशात हुंदका दाटून यायचा. कढ जमा व्हायचे. अक्षरश: काहीही निमित्त पुरायचं. 

अगदी साधी गाणी हो, म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर “दिव्यत्वाची जेथ प्रचिती” “एका तळ्यात होती बदके पिले सुरेख” “देव देव्हाऱ्यात नाही” “अबीर गुलाल” “टाळ बोले चिपळीला” अशी अगदी साधी गाणी. मध्ये तर अगदी गंमत झाली पण खूप दिवसांनी ऐकलं की काय कोण जाणे पण “केतकी गुलाब जुही” ऐकल्यावर डोळ्यांना घाम आला. पंडित जसराज आणि पंडित भीमसेन जी यांची एक मालकंस रागातील जुगलबंदी आहे. बरं शास्त्रीय आलापी तील मला काही ज्ञान पण नाही आहे, पण ती लागली आणि अंगावर रोमांच उभे राहून डोळ्यात पाणी जमा झालं. 

मागे एक पोस्ट पण लिहिली होती की कंपनीत काहीही चांगलं बोलताना घसा जड व्हायचा. कुणी कंपनीत माझे जुने मित्र किंवा सिनियर, म्हणजे उदा: अजय नाईक, नुकतेच निधन पावलेले आदरणीय चव्हाण सर किंवा समाजसेवेत उत्तुंग स्थान अचिव्ह करणारे ममता ताई, अशोक हे कंपनीत आले आणि त्यांची ओळख करून द्यायची म्हणजे माझी फार अवघड परिस्थिती व्हायची. 

बाकी कुणाचा मृत्यू वगैरे झाला तर मी पार ढासळून वगैरे जायचो. 

पण सालं अशात काय बदल झाला माहीत नाही, पण डोळ्यातून पाणी फार कमी येतं. आता हे वयोमानानुसार आलेलं व्यावहारिक शहाणपण आहे की आधी संवेदनशील असलेलं मन आता मुर्दाड वगैरे झालं आहे, काय माहित. गाणी ऐकून डोळ्यात पाणी तर इतिहास झाला आहे. इतकंच काय पण “पत्र लिही पण, नको पाठवू शाईमधूनी काजळ गहिरे” ही इंदिरा बाईंची कविता म्हणताना कातर होणारा माझा स्वर आता निर्विकार येतो. 

सगळ्यात मला माझीच आजकाल काळजी वाटायला लागली ते म्हणजे जवळच्या नातेवाईकांचा मृत्य झाल्यावर ज्या शांततेत मी स्वीकारलं, तेव्हा माझीच मला भीती वाटली. ७ जुलै २०१९ ला माझ्या कंपनीतील चार मुलं गेली तेव्हा ते जे मी मृत्यूचं भयानक रूप बघितलं अन तेव्हा जे थिजलो त्यानंतर प्रत्येक मृत्यू स्वीकारताना मनावर दगड सहज ठेवू शकलो. 

परवा मात्र एक अशी घटना घडली की आपल्यात ती जुनी हळवी भावना अजूनही मनाच्या कोपऱ्यात धुगधुगत आहे हे जाणवलं. आधीच्या पोस्ट मध्ये ज्यांचा उल्लेख केला त्या लक्ष्मीकांत यांनी मला दीनानाथ ला बोलावलं. तिथं मी एका तरुण जोडप्याला भेटलो. त्यांना पाहिल्या पहिल्याच मनात कालवाकालव झाली आणि वाटलं की यांच्या बरोबर काहीतरी अघटित घडलं आहे. कयास दुर्दैवी होता, पण खरा निघाला. त्यांनी पाच वर्षाचं मूल तीन एक आठवड्यापूर्वी गमावलं होतं. त्यातून आलेली हतबलता, सैरभरता मी बघत होतो आणि त्याचं दुःख माझ्या अंगात झिरपत होतं. दोन एक तास त्यांच्या अवतीभवती असल्यावर त्यांची निरोप घ्यायची वेळ आली. काय बोलावं सुचत नव्हतं. मी त्यांना थोडक्यात आमच्या फळणीकरांची स्टोरी सांगितली. एक जळजळीत लहानपणीचं आयुष्य, वयाच्या पंधरा सोळा वर्षे जगल्यावर स्थिरस्थावरता आली आणि ज्या विधात्याने सुखाचं दान मुलाच्या रूपाने त्यांच्या पदरात टाकलं त्या विधात्यानेच ते हिरावून नेलं आणि सुख दुःखाच्या हिंदोळ्यातील फरक होता फक्त सात दिवसाचा. त्या दुःखावेगातून उभं राहिलेलं आपलं घर, या बद्दल सांगितलं त्यांना आणि त्यांचा झरकन निरोप घेतला. दिनानाथच्या पायऱ्या उतरताना मला जाणवलं की माझा घसा आवंढा गिळत होता आणि बोट डोळ्याच्या कडा पुसत होत्या. 

पूर्वी असं काही झालं की मला वाटायचं की आपण किती कमकुवत मनाचे आहोत. त्यादिवशी मात्र मनाला बरं वाटलं. मधल्या काळात ही जी स्वतःचीच भीती वाटायला लागली होती आपण आपलं मानव्य हरवत चाललो की काय असा आत्मक्लेश व्हायचा त्याला उत्तर मिळालं. भौतिकतेने आपल्या मनाला अजूनही जखडलं नाही आहे, सहवेदनेचा अंश थोडा तरी शिल्लक आहे ही भावनाच सुखावह आहे. 

आपलं जगणं काय हो, काजव्याचं. जितकं ते लाभलं आहे ते चांगल्या पद्धतीने जगावं ही प्रार्थना करण्याशिवाय तरी  आपल्या हातात फारसं काही उरत नाही. 


Friday, 16 February 2024

पिंपळगावकर

 "The people who crazy enough to think they can change the world are the ones who do" स्टीव्ह जॉब्स चं हे फेमस वाक्य आहे. आणि तो हे म्हणाला आहे की असामान्य व्यक्तिमत्वांबद्दल. महात्मा गांधी, मार्टिन ल्युथर किंग, नेल्सन मंडेला अशी काही महान नावं स्टीव्ह जॉब्सने त्याच्या त्या प्रसिद्ध भाषणात घेतली आहेत. पण मी आज गोष्ट सांगणार आहे तुमच्या माझ्या सारख्या साध्या माणसाची. साधा, सामान्य नव्हे. सामाजिक, आर्थिक स्तरावर त्या माणसात आणि आपल्यात फारसा फरक नाही, पण तो माणूस जे काम करतो आहे ते माझ्या लेखी असमान्यत्वाच्या जवळ पोहोचणारे. पहिल्या वाक्यात लिहिल्याप्रमाणे क्रेझी माणसंच असं काहीतरी अचाट काम करू शकतात. सरकारी नोकरदार असणारा, परभणी-औरंगाबाद या कार्यक्षेत्रात वैद्यकीय विभागात इक्विपमेंट मेंटेनन्स क्षेत्रात काम करणारा माणूस जेव्हा "२०२५ पर्यंत भारत, पूर्ण देश थॅलेसेमिया मुक्त करणार" अशी जेव्हा प्रतिज्ञा करतो तेव्हा अचंबित व्हायला होतं. हा क्रेझिपणा नव्हे काय? 

काल मी परत त्यांना दीनानाथ मध्ये भेटलो. मिटिंगसाठी बोलावलं होतं. परत एक बच्चू ला जीवनदान दिलं आपल्या अथक प्रयत्नातून. गेल्या चार ते पाच वर्षात थॅलेसेमिया झालेल्या किमान २५ मुलामुलींचा जीव त्यांनी बोन मॅरो ट्रान्सप्लांट सारख्या खर्चिक उपचारपद्धतीच्या माध्यमातून वाचवला आहे. 

काल दीनानाथ मध्ये त्यांच्या बरोबर एक तरुण जोडपं होतं. पूर्ण सैरभैर झालेलं. दोन एक महिन्यांपूर्वी थॅलेसेमिया मेजर असलेला त्यांचा पाच वर्षांचामुलगा त्यांनी गमावलेला. डिप्रेशन मध्ये येऊन या जोडप्याने आपापले जॉब सोडून दिलेले. दिवसभर दीनानाथ मध्ये फिरत होते. मी त्यांना भेटल्यावर अक्षरशः पाणी पाणी झालो होतो. त्यांना सुद्धा आधार द्यायचं अवघड पण अत्यंत नोबल काम हा आपला माणूस करतोय.

शासनाच्या माध्यमातून या आजाराबाबत "एकला चलो रे" करत जागरूकता निर्माण करणारे लक्ष्मीकांत पिंपळगावकर, तुम्हाला सलाम आहे. "आपलं घर" च्या वैद्यकीय सुविधा तुमच्या या कार्यासाठी सदैव राहतील हे मी फळणीकर सरांना न विचारताच कबूल केलं आहे आणि फळणीकरांनी आनंदाने त्याला होकार दिला आहे. 

तुमच्या सारखे लोक या जगात आहेत म्हणून ही जागरहाटी चालू आहे. 

Wednesday, 14 February 2024

नागपूर भाषण

काही दिवसांपूर्वीच्या पोस्टमध्ये लिहिल्याप्रमाणे मला फेसबुकने अनेक सुहृद दिले आहेत. त्यापैकी एक आहे नागपूर मध्ये वास्तव्य असणारी वैशाली करडे पालेकर. स्वतः अत्यंत हुशार, संवेदनशील. तिचे पती डॉ नंदकुमार हे एक स्कॉलर. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख. त्यांचा एकुलता एक मुलगा मल्हार सध्या आय आय टी मध्ये बी टेक मेकॅनिकल करतो आहे. सात एक वर्षात जितक्यांदा नागपूरला गेलो त्यातील प्रत्येकवेळी करडे कुटुंबाला भेटलो आहे. करडे पती पत्नी मी जेव्हा कधी भेटेल तेव्हा त्यांच्या प्रेमादराने भिजवून टाकतात. 

यावेळी नागपूरला गेलो तेव्हा भेट झालीच. पण त्या भेटीत डॉक्टर नंदकुमार यांनी एक वेगळीच अपेक्षा व्यक्त केली. विद्यापीठात त्यांच्या डिपार्टमेंटला उद्योजकता या विषयावर संवाद साधावा. तरुणाईशी संवाद हे माझ्या पर्सनल गोल शीट मध्ये पहिल्या तीन मध्ये येतं. सकाळी मिहान, नंतर हिंगणा एम आय डी सी आणि संध्याकाळी ज्यासाठी गेलो ते सहाचं लग्न यामध्ये दुपारी तीन ते साडेचार टाईम स्लॉट फ्री होता. आणि करडे सरांनी तीच वेळ सजेस्ट केली. मी लागलीच हो म्हणालो. 

दुसऱ्या दिवशी माझी काही तयारी नव्हती, पण मी एक प्रेझेंटेशन बनवलं आहे "उद्योजकता, सेटको आणि मी". त्याचा वापर पहिल्यांदाच केला आणि एक तास माझा प्रवास सांगितला. मुलांनी प्रश्न सुद्धा अगदी रास्त विचारले. 

नागपूर माझं आवडतं शहर आहे. व्यावसायिक कामाची माझी पहिली ओळख झाली ती औरंगाबाद मध्ये माझा आत्येभाऊ विलास कुलकर्णी यांच्या विल्को एंटरप्राइज मध्ये आणि त्यानंतर १९८३-१९८७ या वर्षात मी माझ्या बहिणीच्या दुकानात, नागपूर येथील महालातील ठाकूर आणि कंपनी, उन्हाळ्यात मदत करायला जायचो तेव्हा ती ओळख दृढ झाली. त्याच नागपूर मध्ये प्रतिष्ठित अशा विद्यापीठात मला विचार मांडता आले त्याबद्दल खूप समाधान वाटले. त्यासाठी डॉ नंदकुमार करडे यांचे मनःपूर्वक आभार मानतो. आणि त्यांची ओळख जिच्यामुळे झाली, जी मला हक्काने मोठा भाऊ मानते त्या वैशाली प्रति कृतज्ञता व्यक्त करतो. 

फेसबुकने मनाला आनंद देणाऱ्या अनेक क्षणांचा साक्षीदार होण्याचं भाग्य दिलं आहे. त्यापैकीच नागपूर मधील माझं हे पहिलं भाषण आहे यात शंका नाही. 

Saturday, 10 February 2024

my thoughts

After working for 35 years in the industry, I have realized that the final responsibility of any happenings in the business, be it failure or success, lies with the leader. A leader or top management has to take onus of all the results, irrespective of its nature. 

Just to elaborate on my thoughts, let me tell you one example. 

Its very close to heart statement of every business owner or top management that "We don't get right people." Or "The newly appointed person is not delivering results" or many times top management is skeptical of ability of team to deliver the performance. But end of the day, fact remains that it is you who have selected team members. It is you who thought that you would train team member for the job but you failed to offer the best of training. It is you who has gone on the face values of person and could not assess if the person is right fit for the position. 

I have seen in many cases that top management blames team for the business failures. But if one dives deep in to the subject, it is leader who fails to understand changes in the market and could not act in response to it. It is leader who does not understand market requirement, be in terms of product or customer segmentation or quality deliverance. If leader fails to design systems and team walks on wrongly designed path, team is bound to fail. 

Leaders, have a big heart to accept your mistakes. Be courageous to take ownership of your act. When you blame team, remember other four fingers are pointing at you.  

३५ वर्षे इंडस्ट्री मध्ये घासल्यानंतर बाकी काही लक्षात आलं की नाही माहित नाही पण एक गोष्ट मात्र नक्की कळली आहे आणि ती म्हणजे व्यवसायात काहीही घडू दे, म्हणजे यश मिळू दे की अपयश पदरात पडू दे, त्याची जबाबदारी मात्र बिझिनेस लीडर वर असते. बिझिनेस लीडर किंवा टॉप मॅनेजमेंटने प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःला जबाबदार धरणं हे आणि हेच त्रिवार सत्य आहे. मग तो व्यवसाय कोटीच्या कोटी उड्डाणे करू दे किंवा धूळ चाटू दे. 

मला काय म्हणायचं ते थोडं उलगडून सांगतो. 

अनेक बिझिनेस लीडर्स चं एक आवडतं स्टेटमेंट आहे आणि ते म्हणजे "आम्हाला व्यवसायात चांगली लोक मिळत नाहीत" किंवा "तो नवीन अपॉईंट केलेला मॅनेजर खूप मोठा फेल्युअर आहे" किंवा बऱ्याचदा वरिष्ठ व्यवस्थापकीय मंडळ हे व्यावसायिक कामगिरी जर खराब झाली तर टीम मेंबर ला जबाबदार धरतात कारण आघाडीवर ते लोक लढत असतात. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवं की ज्या टीमला तुम्ही नावं ठेवता आहात त्यांची निवड तुम्हीच केली आहे. "तुम्ही" असा विचार केला की आज त्या टीम मेंबर कडे स्किल्स नाही आहेत तर मी त्यांना शिकवेल पण तुम्ही ते नाही करू शकलात. तुम्हीच आहात ज्यांनी तुमच्या टीम मेंबर ला त्याच्या फेस व्हॅल्यू वर निवडलं आणि तुमच्या लक्षात नाही आलं की त्या पोझिशन साठी ही योग्य व्यक्ती नाही आहे. 

मी बऱ्याचदा बघितलं आहे की वरिष्ठ व्यवस्थापकीय मंडळ हे टीमला व्यावसायिक अपयशासाठी जबाबदार धरतं. पण जर खोलवर विचार केला तर लक्षात येईल की बहुतेकदा लीडरशिप टीम असते जिला मार्केट मधील बदल लक्षात येत नाहीत आणि मग त्या अनुषंगाने व्यवसायात, तिच्या कार्यपद्धतीत  बदल घडवत नाहीत. नवग्राहकांची गरज किंवा ग्राहकांची नवीन गरज याबद्दल अभ्यास कमी पडतो, आपल्या प्रॉडक्ट मध्ये नवनवीन कोणत्या सुधारणा हव्या आहेत, ग्राहकाभिमुख बदल काय घडत आहेत, गुणवत्तेच्या बाबतीत काय सुधारणा हव्या आहेत याबद्दल सजगता नसते. लीडर्स किंवा वरिष्ठ व्यवस्थापक जेव्हा या बदलाला सामोरे जाण्याची सिस्टम डिझाईन करण्यात अपयशी ठरतं आणि मग सारी टीम ही चुकीच्या मार्गावर चालू लागते. अशा केस मध्ये फेल्युअर येणार हे सांगण्यासाठी कुणा भविष्यवेत्त्याची किंवा व्यवस्थापन पंडिताची गरज लागत नाही. 

तेव्हा व्यावसायिक लीडर्स मित्रांनो, अशी चूक तुमच्याकडून झाली असेल तर ती कबूल करण्याची सद्सद्विवेक बुद्धी शाबूत ठेवा. जेव्हा अपयशासाठी तुमच्या टीमकडे बोट दाखवत असाल तर लक्षात घ्या की चार बोटे तुमच्याकडे निर्देश करत आहेत. 

Thursday, 8 February 2024

 आमच्या आपलं घर मध्ये काही अमेरिकन मेडिकल प्रोफेशनल्स आले आहेत. आपलं घर च्या माध्यमातून सामाजिक सेवा देण्यासाठी. दिवसभर सिंहगडाच्या जवळपास खेडेगावात वणवण केल्यावर, संध्याकाळी आश्रमात काही सांस्कृतिक कार्यक्रम ठेवला जातो. त्याचा भाग म्हणून काल मनीषा निश्चल यांचा गाण्याचा कार्यक्रम ठेवला होता.


मनीषा निश्चल या अनेक वर्षांपासून आपलं घर शी कनेक्टेड आहेत. त्यांनी थीम निवडली होती, लता मंगेशकर यांची निवडक गाणी. कार्यक्रमाचं संचालन करण्यासाठी सूत्रधार होतेच, पण परदेशी पाहुण्यांना त्या गाण्यातील भाव इंग्रजी मध्ये सांगणं गरजेचं होतं. फळणीकर सरांनी मला ती जबाबदारी दिली. 


इंग्रजीत सूत्र संचालन करण्यासाठी गाण्याबद्दल मी लिहायला बसायचो, पण काही काम यायचं आणि ते मागे पडायचं. शेवटी एकंच दिवस उरला आणि कामाचा धबडगा बघता माझ्या लक्षात आलं की मला हवा तसं काही लिहिलं जाणार नाही. 


मला अचानक या विषयावरील हुकमी नाव आठवलं, प्रिया प्रभुदेसाई. फेसबुकच्या आभासी जगात जी मला पाच पन्नास रत्न मित्र मैत्रिणी म्हणून मिळाले आहेत त्यापैकी एक. मनीषा मॅडमने मला बारा एक गाण्याची लिस्ट दिली होतीच. मी प्रियाला पाठवली. प्रियाने काही तासातच त्यातल्या बहुसंख्य गाण्याबद्दलच्या तिच्या भावना आणि उरलेल्या दोन तीन गाण्याबद्दल दुसऱ्या दिवशी पाठवल्या. 


कार्यक्रम सणसणीत झाला. मनीषा मॅडम ती पंधरा गाणी क्लासिक कल्ट अशी निवडली होती आणि ती साजरी पण केली अगदी ताकदीने. त्यांच्या बरोबर असलेले वादक पण अगदी कसलेले होते. 


मी इंग्रजीत दिलेली गाण्याची माहिती आणि त्यामागील भाव भावना यापण परदेशी पाहुण्यांना आवडल्या. अर्थात त्यात माझ्या सादरीकरणापेक्षा प्रियाच्या लिखाणाला ती पावती होती हे मी जाणून आहे.


धन्यवाद प्रिया. आभार मानणं क्रमप्राप्त आहे कारण ते स्क्रिप्ट लिहायला मी फार वेळ तुला दिला नव्हता. 


आणि अर्थात मनीषा निश्चल यांचे या रंगतदार कार्यक्रमासाठी हार्दिक अभिनंदन.

 सकाळी पावणे अकरा ला लुधियाना स्टेशनवर कार आलीच होती. तिथून मी होशियारपूर ला पहिल्या कस्टमर कॉलसाठी गेलो.  तिथं मिटिंग चालू असतानाच मला इंडिगो चा मेसेज आला की माझी रात्री सव्वा दहाची चंदिगढ-पुणे फ्लाईट खराब वातावरणामुळे रद्द केली गेली आहे. मिटिंग चालू असल्यामुळे त्यावर काही करू शकत नव्हतो. कॉल पूर्ण झाल्यावर मला लुधियानात मिटिंग होती. परतीच्या प्रवासात मी इंडिगो कस्टमर केअर ला फोन केला. त्यांनी मला रिशेड्युल मध्ये संध्याकाळी पावणे सात ची फ्लाईट ऑफर केली जी मला शक्य नव्हती. कारण माझा दुसरा कॉलही होणार नव्हता आणि मुख्य म्हणजे मी वेळेवर पोहोचेल की नाही याची गॅरंटी नव्हती कारण तो प्रवास साडेतीन तासाचा होता. 

चंदिगढ चं वातावरण खूपच बेकार होतं. सूर्य नावाला दिसत नव्हता. इंडिगो ने मला दुसऱ्या दिवशीची सकाळी सहा वीस ची फ्लाईट सांगितली जी घेण्यात धोका होता. शेवटी विचार करून मी दुपारी १२:२० च्या फ्लाईट ला होकार दिला जी व्हाया बंगलोर संध्याकाळी सात वाजता ला पुण्यात पोहचवणार होती.

मी चंदिगढ मध्ये एक हॉटेल बुक केलं आणि माझे एक कस्टमर कम मित्र आहेत, त्यांच्या बरोबर डिनर मिटिंग अरेंज केली. रात्री दहा वाजता हॉटेल ला येऊन झोपलो. दुसऱ्या दिवशी वेळेवर एअरपोर्ट ला पोहोचलो. वातावरण थोडं बरं होतं. मला अजून एक कळलं होतं की चंदिगढ बंगलोर जाताना विमान इंदोर ला हॉपिंग करणार होतं. पण सकाळी सव्वा अकरा वाजता पाऊस चालू झाला आणि अर्ध्या तासात पूर्ण झाकोळून गेलं आणि पावसाचं तांडव नृत्य चालू झालं आणि ढग फुटीसारखा तुफान पाऊस चालू झाला. पुढील एक तास पर्जन्यदेव बरसत होते. आमचं इनकमिंग फ्लाईट हे जयपूरला वळवण्यात आलं. मला वाटलं आपली आता पुन्हा लागते पण सुदैवाने पाऊस उघडला आणि वातावरण क्लिअर झालं. बारा वीस च्या माझी फ्लाईट आता दोन पंचवीस ला निघणार होती. चंदिगढ-इंदोर-बंगलोर या प्रवासाला सव्वा तीन तास लागणार होते आणि माझी बंगलोर पुणे पाच पन्नास ची फ्लाईट चुकणार हे फिक्स झालं होतं.

मी तिथं माझ्या प्रॉब्लेम बद्दल बोलायचा प्रयत्न केला पण त्यांनी मला इंडिगो तुन फोन येईल असं सांगितलं. शेवटी बोर्डिंग चालू झालं. मी रांगेत उभा राहिलो पण दोन मिनिटात माझ्या नावाचा पुकारा झाला आणि मला थांबायला सांगितलं. रांग पुढं सरकत होती आणि मी आशाळभूतपणे ग्राउंड स्टाफ कडे "मेरा क्या होगा" हा प्रश्न चेहऱ्यावर ठेवून पाहत होतो. स्टाफ मला फक्त हाताने "जरा धीर धरा" इतकंच सांगत होती.

सगळं बोर्डिंग पूर्ण झालं आणि मला सांगण्यात आलं की बंगलोर हुन रात्री आठ पन्नास च्या फ्लाईट मध्ये मला सीट देण्यात आली आहे आणि माझे बोर्डिंग पास बॅक ऑफिस मधून प्रिंट होऊन येत आहेत. बोर्डिंग पास आले आणि मला स्टाफने पटकन बोर्ड करायला सांगितलं. मी पास स्कॅन केला आणि आणि धावत एरोब्रिज मधून जात होतो. दरवाजाजवळ जाईपर्यंत माझ्या लक्षात आलं की मला पहिला बोर्डिंग पास हा चंदिगढ बंगलोर ऐवजी चंदिगढ इंदोर असा दिला आहे. मी दरवाजा वरील स्टाफ ला सांगितलं तर तो म्हणाला की काही प्रॉब्लेम नाही, ऍडजस्ट होईल. मी म्हणालो की तुझ्या सिनियर स्टाफला विचार तर तिच्या प्रॉब्लेम लक्षात आला. तिने बॅक ऑफिस ला फोन केला आणि मला सांगितलं की तुम्ही फ्लाईट मध्ये बसा मी व्हाट्स अप वर बोर्डिंग पास मेसेज करते.

मी म्हणालो तो पास आला नाही तर मला इंदोर ला डिप्लेन व्हावं लागेल. "सर, भरोसा रखिए, मैं  भेजूंगी आपका बोर्डिंग पास" आणि तिने मला विनंती करून फ्लाईट मध्ये जायला सांगितलं. 

टेक ऑफ करण्यासाठी विमान रन वे वर आणि व्हाट्स अप वर मला करेक्ट बोर्डिंग पास आला.

तुम्हाला वाटेल पुराण संपलं असेल इथं. तर नाही. इंदोरला फ्लाईट हॉप करताना तिथल्या ग्राउंड स्टाफच्या मॅनिफेस्टो मध्ये माझं नाव नव्हतं. परत तिथं सिनियर स्टाफ आला. फोनाफोनी झाली. माझ्या व्हाट्स अप वर आलेल्या बोर्डिंग पास चं व्हेरिफिकेशन झालं आणि माझ्या भोवती कोंडाळे करून असलेला स्टाफ गेल्यावर मी वाचत असलेलं पुस्तक परत माझ्या लॅपटॉप बॅग मध्ये ठेवावं तर वर कॅरेज मध्ये माझी लॅपटॉप बॅगच नव्हती. नजर भिरभिरत असताना दिसलं की ग्राउंड स्टाफ अन आयडेंटिफाईड बॅग म्हणून घेऊन चालला होता. मी माझं बोर्डिंग पासचं लफडं निस्तारत असताना भावाने विचारलं होतं म्हणे ही बॅग कुणाची आहे. कुणी उत्तर न दिल्याने घेऊन चालला होता. शेवटी बंगलोर ला आलो. तिथंही पाऊण तास फ्लाईट लेट होत रात्री साडेअकरा ला माझी एकवचनी वरात घरी पोहोचली आणि साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण झाली.

Thursday, 1 February 2024

 कधी कधी वाटतं आपुनही भगवान है. पण मग नशीब दणकन जमिनीवर आणतं. फार नाही काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे की माझ्या मनात विचार आला की आपलं काम किती भारी आहे. दणकावून काम करणे, कामासाठी पायाला भिंगरी लागल्यागत फिरणे, प्लॅनिंग पण असं मस्त करणे की रेल्वे, फ्लाईट या मिळेल त्या मोडने प्रवास करणे, त्याची तिकिटं, हॉटेल बुकिंग, टॅक्सी वगैरे वगैरे. गेल्या एकोणतीस वर्षांच्या फिरतीत फार कमी वेळा माझी फ्लाईट वा रेल्वे रद्द किंवा चुकली असं झालं आणि त्याचं मला फार कौतुक. 

पण आता पंजाबच्या दौऱ्यात या सगळ्या कौतुकाला सुरुंग लागला. लोकांच्या वेगवेगळ्या प्रवासात जे होऊ शकतं ते माझ्या एकाच प्रवासात झालं. म्हणजे पुण्यात परत पोहोचेपर्यंत येडा झालो होतो. 

मी मानेसर ला जाऊन एक दिवस काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी वंदे भारत ने लुधियाना ला जाणार होतो. दिवसभर होशियारपूर आणि लुधियानात काम करून रात्री चंदिगढ-पुणे फ्लाईट ने परत यायचं अशी दोन दिवसांची टूर होती. 

शक्यतो मी दिल्लीला जाताना सकाळी ७:४० ची एअर इंडिया ची फ्लाईट घेतो. यावेळेस काय झोल मध्ये बुकिंग करत होतो, पण सकाळ ७:४० ऐवजी संध्याकाळी ६:४० चं फ्लाईट बुक झालं. ते केलं खरं पण मंगळवारी सकाळी साडेअकरा ला मेसेज आला की संध्याकाळची फ्लाईट कॅन्सल झाली. एअर इंडिया वाले म्हणाले की पुढच्या तीन दिवसातील कुठलंही बुकिंग घ्या जे मला शक्य नव्हतं. मंगळवारी जाणं क्रमप्राप्त होतं कारण पुढे अनेक प्लॅन केले होते. दादापुता करत त्याने मला चार च्या फ्लाईट मध्ये जागा दिली. घाई गडबड करावी लागली. त्यात माझ्या ड्रायव्हर ला माझा बिझिनेस पार्टनर हॉस्पिटल ला घेऊन गेला होता. मी साडेबारा ला निघालो कंपनीतुन. रस्त्यात नवश्या मारुतीपाशी ड्रायव्हर एक्सचेंज झाला. 

मानेसर ला नेहमी जातो तेव्हा आमचं एक छोटेखानी हॉटेल फिक्स आहे. पण यावेळी दुसऱ्या दिवशी वंदे भारत ने सकाळी सहा वाजता निघायचं होतं. म्हणून मग नेट वरून शोधून पहाडगंज मधील एक हॉटेल बुक केलं. ते अशा अंतरावर होतं की सकाळी मी पायी पाच मिनिटात स्टेशन ला पोहोचेल. 

मी हॉटेल ला पोहोचलो खरा पण माझ्या आयुष्यातील मी सगळ्यात लहान रूम पाहिली. म्हणजे यदाकदाचित दारू पिऊन मी रूम मध्ये गेलो आणि झिंगुन आडवं पडायचं म्हंटलं तरी कुठल्या तरी भिंतीला अडकून तिरपा झालो असतो. एनिवे, फक्त रात्र काढायची होती. झोपलो आणि सकाळी सहाची वंदे भारत पकडली. वंदे भारत चं रेकॉर्ड आहे की ती ऑन टाईम असते. पण रेल्वे हरियाणा पंजाब प्रदेशात शिरली आणि तुफान धुकं चालू झालं.

सकाळी ९:२० ला पोहोचायचो मी तो पावणे अकरा ला लुधियानात उतरलो. 

क्रमश: 

(प्रवास तुम्हाला काय काय शिकवतो हे दोन भागातून तुम्हाला कळेल, म्हणून पोस्ट लिहितो आहे)