"The people who crazy enough to think they can change the world are the ones who do" स्टीव्ह जॉब्स चं हे फेमस वाक्य आहे. आणि तो हे म्हणाला आहे की असामान्य व्यक्तिमत्वांबद्दल. महात्मा गांधी, मार्टिन ल्युथर किंग, नेल्सन मंडेला अशी काही महान नावं स्टीव्ह जॉब्सने त्याच्या त्या प्रसिद्ध भाषणात घेतली आहेत. पण मी आज गोष्ट सांगणार आहे तुमच्या माझ्या सारख्या साध्या माणसाची. साधा, सामान्य नव्हे. सामाजिक, आर्थिक स्तरावर त्या माणसात आणि आपल्यात फारसा फरक नाही, पण तो माणूस जे काम करतो आहे ते माझ्या लेखी असमान्यत्वाच्या जवळ पोहोचणारे. पहिल्या वाक्यात लिहिल्याप्रमाणे क्रेझी माणसंच असं काहीतरी अचाट काम करू शकतात. सरकारी नोकरदार असणारा, परभणी-औरंगाबाद या कार्यक्षेत्रात वैद्यकीय विभागात इक्विपमेंट मेंटेनन्स क्षेत्रात काम करणारा माणूस जेव्हा "२०२५ पर्यंत भारत, पूर्ण देश थॅलेसेमिया मुक्त करणार" अशी जेव्हा प्रतिज्ञा करतो तेव्हा अचंबित व्हायला होतं. हा क्रेझिपणा नव्हे काय?
काल मी परत त्यांना दीनानाथ मध्ये भेटलो. मिटिंगसाठी बोलावलं होतं. परत एक बच्चू ला जीवनदान दिलं आपल्या अथक प्रयत्नातून. गेल्या चार ते पाच वर्षात थॅलेसेमिया झालेल्या किमान २५ मुलामुलींचा जीव त्यांनी बोन मॅरो ट्रान्सप्लांट सारख्या खर्चिक उपचारपद्धतीच्या माध्यमातून वाचवला आहे.
काल दीनानाथ मध्ये त्यांच्या बरोबर एक तरुण जोडपं होतं. पूर्ण सैरभैर झालेलं. दोन एक महिन्यांपूर्वी थॅलेसेमिया मेजर असलेला त्यांचा पाच वर्षांचामुलगा त्यांनी गमावलेला. डिप्रेशन मध्ये येऊन या जोडप्याने आपापले जॉब सोडून दिलेले. दिवसभर दीनानाथ मध्ये फिरत होते. मी त्यांना भेटल्यावर अक्षरशः पाणी पाणी झालो होतो. त्यांना सुद्धा आधार द्यायचं अवघड पण अत्यंत नोबल काम हा आपला माणूस करतोय.
शासनाच्या माध्यमातून या आजाराबाबत "एकला चलो रे" करत जागरूकता निर्माण करणारे लक्ष्मीकांत पिंपळगावकर, तुम्हाला सलाम आहे. "आपलं घर" च्या वैद्यकीय सुविधा तुमच्या या कार्यासाठी सदैव राहतील हे मी फळणीकर सरांना न विचारताच कबूल केलं आहे आणि फळणीकरांनी आनंदाने त्याला होकार दिला आहे.
तुमच्या सारखे लोक या जगात आहेत म्हणून ही जागरहाटी चालू आहे.
No comments:
Post a Comment