Sunday, 25 February 2024

अमोल

 काय होतं की बरेचदा भवताल तुमच्या व्यक्तिमत्वाला पूरक असतं आणि व्यावसायिक यश तुम्हाला मिळतं. तुम्हाला वाटतं की दुनिया मेरी मुठ्ठीमें. पण अंगभूत हुशारी असूनसुद्धा केवळ दैव साथ देत नाही आणि सोशल इको सिस्टम ची फार मदत होत नाही आणि त्यामुळेच तळ्यातील अनेक  बदकांपैकी तो मात्र कुरूप म्हणून ओळखला जातो. शिक्षणात तो बी इ इलेक्ट्रॉनिक्स होतो. आयुष्याच्या ज्या काळात उमेदीने करिअर घडवण्याची संधी आणि उमेद असते त्याच काळात त्याला मानसिक आजार होतो. जिथं स्वतःचं करिअर उभं करायचं म्हणून कामात गुंतून घ्यायचं त्या वयात त्याला हॉस्पिटल च्या वाऱ्या कराव्या लागतात. त्या सगळ्या वावटळीच्या आयुष्यात तो बरा पण होतो आणि संसार करण्यासाठी सज्ज होतो. पण तसं घडायचं नसतं. त्याचा तो संसार मोडतो. परत तो मानसिक आजाराच्या गर्तेत लोटला जातो. त्याही संकटाला परत तो धैर्याने तोंड देतो. आर्थिक अस्थैर्य तर होतंच, पण तो आल्या दिवसाला तोंड देत पुन्हा एकदा उभा राहण्याचा प्रयत्न करतो. साथ देणारी मिळते, त्यांच्या संसारवेलीवर एक फुलही उमलते. त्याची नोकरीतील कारकीर्द पण स्थिरता देऊ लागते. 

पण नियती पुन्हा एकदा क्रूर धक्का देते. एका विचित्र अपघातात तो त्याची पत्नी आणि ते फुल गमावतो. 

एखादा अशा एका पाठोपाठ येणाऱ्या संकटाने कोलमोडून गेला असता. पण वरकरणी अत्यंत अस्थिर आयुष्य जगणारा तो बहुधा आतून खूप स्ट्रॉंग होत जात असावा. 

हळूहळू शैक्षणिक क्षेत्रात तो आपलं बस्तान बसवू लागतो. कुठून त्याच्या अंगात शक्ती येते हे माहीत नाही पण २०१७ साली तो शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद इथून वयाच्या ४१ व्या वर्षी एम इ इलेक्ट्रॉनिक्स होतो. 

प्रोफेसर म्हणून आता स्थिर स्थावर होत असतानाच पुन्हा एक संकट पुढे दत्त म्हणून उभं राहतं, करोना. परत त्याची नोकरी जाते. 

पण एव्हाना संकटाशी दोन हात करण्याची त्याला बहुधा सवय झाली असावी. आता त्याची शैक्षणिक प्रतिभा फुलत होती. औरंगाबादच्या एका चांगल्या इंजिनियरिंग कॉलेज मध्ये तो इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंग चा प्रोफेसर म्हणून काम करू लागतो. 

ही स्टोरी आहे माझा मावस भाऊ अमोल देवडे याची. का कुणास ठाऊक या मावस मामे भावांच्या मनात माझ्या बद्दल एक विचित्र भीती होती असं ते आज सांगतात. पण तीन चार वर्षांपूर्वी ती भीती गेली आणि अमोल माझ्याशी संवाद साधू लागला. त्याला त्याच्या करिअर मध्ये काही प्रश्न उभे राहिले तर तो मला प्रत्यक्ष भेटीत किंवा फोन करून विचारू लागला. मी सुद्धा त्याला यथाबुद्धी उत्तरं देऊ लागलो. मानसिक आजार अधून मधून डोकं वर काढत होताच. त्याला मी एकदा व्यायामाचं महत्व सांगितलं. तो तेव्हापासून दररोज सकाळी फिरायला जातोच. एकदा मला म्हणाला “दादा, तू कसला फिरतोस रे. एकदा मला पण ने की” आम्ही दोघांनी मिळून त्याचा औरंगाबाद-पुणे-दिल्ली-हैद्राबाद-औरंगाबाद असा ट्रॅव्हल प्लॅन बनवला. त्याने खूप प्रश्न विचारले अगदी मला कंटाळा येईपर्यंत. तिथेही मी त्याला जमेल तसं त्याच्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न केला. 


मागच्या महिन्यात त्याने फोन करून आश्चर्याचा सुखद धक्का दिला. त्याने सांगितलं “दादा, मी इलेक्टरो मॅग्नेटिक्स या विषयावर पुस्तक लिहिलं आहे”. शप्पथ सांगतो, मला शंका आली की याचा मानसिक आजार परत उद्भवला आहे. प  यावेळेस माझी शंका खोटी ठरली याचा मला प्रचंड आनंद झाला. आणि त्याने सांगितलं की गेले आठ दहा वर्षे तो या पुस्तकावर काम करतोय. त्या पुस्तकाचं प्रकाशन माझ्या हस्ते व्हावं अशी त्याने मला गळ घातली. मी नाही म्हणायचं कारणच नव्हतं. एक वारकरी दुसऱ्या वारकऱ्याला नमस्कार करतो तसा मी त्याला मनोमन नमस्कार केला. काल एका हृदयांगम घरगुती सोहळ्यात त्याच्या पुस्तकाचं विमोचन झालं. 

कॉलेजमध्ये तरुणाईशी संवाद साधताना मी वयानुरूप करिअर कसं बिल्ड करावं यावर बोलताना अपवाद म्हणून बोमान इराणी किंवा के एफ सी च्या कर्नल सँडर्स चं उदाहरण देतो. यापुढे ४८ व्या वर्षी जीवनाला कलाटणी देणाऱ्या अमोलचं उदाहरण देणार आहे. 


इतके वर्ष जग ज्याला कुरूप बदक म्हणून ओळखत होतं तो खऱ्या अर्थाने राजहंस निघाला याचा मला खूप आनंद होत आहे. शैक्षणिक क्षेत्रात काम करत त्याची अजून पुस्तकं येवोत आणि या पुढील अमोलचं आयुष्य आर्थिक, मानसिक, शारीरिक आणि सामाजिक या सर्वच क्षेत्रात स्थिर आणि भरभराटीचे जावो या हार्दिक शुभेच्छा तर मी देतोच आहे पण तुम्हा सर्वांना पण त्या देण्यासाठी नम्र आवाहन करत आहे. 


No comments:

Post a Comment