Monday, 19 February 2024

बदल

 गेल्या काही वर्षात एक विचित्र बदल मला माझ्यात जाणवतो आहे. ते म्हणजे पूर्वी उठसुठ माझ्या घशात हुंदका दाटून यायचा. कढ जमा व्हायचे. अक्षरश: काहीही निमित्त पुरायचं. 

अगदी साधी गाणी हो, म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर “दिव्यत्वाची जेथ प्रचिती” “एका तळ्यात होती बदके पिले सुरेख” “देव देव्हाऱ्यात नाही” “अबीर गुलाल” “टाळ बोले चिपळीला” अशी अगदी साधी गाणी. मध्ये तर अगदी गंमत झाली पण खूप दिवसांनी ऐकलं की काय कोण जाणे पण “केतकी गुलाब जुही” ऐकल्यावर डोळ्यांना घाम आला. पंडित जसराज आणि पंडित भीमसेन जी यांची एक मालकंस रागातील जुगलबंदी आहे. बरं शास्त्रीय आलापी तील मला काही ज्ञान पण नाही आहे, पण ती लागली आणि अंगावर रोमांच उभे राहून डोळ्यात पाणी जमा झालं. 

मागे एक पोस्ट पण लिहिली होती की कंपनीत काहीही चांगलं बोलताना घसा जड व्हायचा. कुणी कंपनीत माझे जुने मित्र किंवा सिनियर, म्हणजे उदा: अजय नाईक, नुकतेच निधन पावलेले आदरणीय चव्हाण सर किंवा समाजसेवेत उत्तुंग स्थान अचिव्ह करणारे ममता ताई, अशोक हे कंपनीत आले आणि त्यांची ओळख करून द्यायची म्हणजे माझी फार अवघड परिस्थिती व्हायची. 

बाकी कुणाचा मृत्यू वगैरे झाला तर मी पार ढासळून वगैरे जायचो. 

पण सालं अशात काय बदल झाला माहीत नाही, पण डोळ्यातून पाणी फार कमी येतं. आता हे वयोमानानुसार आलेलं व्यावहारिक शहाणपण आहे की आधी संवेदनशील असलेलं मन आता मुर्दाड वगैरे झालं आहे, काय माहित. गाणी ऐकून डोळ्यात पाणी तर इतिहास झाला आहे. इतकंच काय पण “पत्र लिही पण, नको पाठवू शाईमधूनी काजळ गहिरे” ही इंदिरा बाईंची कविता म्हणताना कातर होणारा माझा स्वर आता निर्विकार येतो. 

सगळ्यात मला माझीच आजकाल काळजी वाटायला लागली ते म्हणजे जवळच्या नातेवाईकांचा मृत्य झाल्यावर ज्या शांततेत मी स्वीकारलं, तेव्हा माझीच मला भीती वाटली. ७ जुलै २०१९ ला माझ्या कंपनीतील चार मुलं गेली तेव्हा ते जे मी मृत्यूचं भयानक रूप बघितलं अन तेव्हा जे थिजलो त्यानंतर प्रत्येक मृत्यू स्वीकारताना मनावर दगड सहज ठेवू शकलो. 

परवा मात्र एक अशी घटना घडली की आपल्यात ती जुनी हळवी भावना अजूनही मनाच्या कोपऱ्यात धुगधुगत आहे हे जाणवलं. आधीच्या पोस्ट मध्ये ज्यांचा उल्लेख केला त्या लक्ष्मीकांत यांनी मला दीनानाथ ला बोलावलं. तिथं मी एका तरुण जोडप्याला भेटलो. त्यांना पाहिल्या पहिल्याच मनात कालवाकालव झाली आणि वाटलं की यांच्या बरोबर काहीतरी अघटित घडलं आहे. कयास दुर्दैवी होता, पण खरा निघाला. त्यांनी पाच वर्षाचं मूल तीन एक आठवड्यापूर्वी गमावलं होतं. त्यातून आलेली हतबलता, सैरभरता मी बघत होतो आणि त्याचं दुःख माझ्या अंगात झिरपत होतं. दोन एक तास त्यांच्या अवतीभवती असल्यावर त्यांची निरोप घ्यायची वेळ आली. काय बोलावं सुचत नव्हतं. मी त्यांना थोडक्यात आमच्या फळणीकरांची स्टोरी सांगितली. एक जळजळीत लहानपणीचं आयुष्य, वयाच्या पंधरा सोळा वर्षे जगल्यावर स्थिरस्थावरता आली आणि ज्या विधात्याने सुखाचं दान मुलाच्या रूपाने त्यांच्या पदरात टाकलं त्या विधात्यानेच ते हिरावून नेलं आणि सुख दुःखाच्या हिंदोळ्यातील फरक होता फक्त सात दिवसाचा. त्या दुःखावेगातून उभं राहिलेलं आपलं घर, या बद्दल सांगितलं त्यांना आणि त्यांचा झरकन निरोप घेतला. दिनानाथच्या पायऱ्या उतरताना मला जाणवलं की माझा घसा आवंढा गिळत होता आणि बोट डोळ्याच्या कडा पुसत होत्या. 

पूर्वी असं काही झालं की मला वाटायचं की आपण किती कमकुवत मनाचे आहोत. त्यादिवशी मात्र मनाला बरं वाटलं. मधल्या काळात ही जी स्वतःचीच भीती वाटायला लागली होती आपण आपलं मानव्य हरवत चाललो की काय असा आत्मक्लेश व्हायचा त्याला उत्तर मिळालं. भौतिकतेने आपल्या मनाला अजूनही जखडलं नाही आहे, सहवेदनेचा अंश थोडा तरी शिल्लक आहे ही भावनाच सुखावह आहे. 

आपलं जगणं काय हो, काजव्याचं. जितकं ते लाभलं आहे ते चांगल्या पद्धतीने जगावं ही प्रार्थना करण्याशिवाय तरी  आपल्या हातात फारसं काही उरत नाही. 


No comments:

Post a Comment