Friday, 19 September 2025
स्लो लिव्हिंग
Tuesday, 22 July 2025
भरतीचा माज नाही, अन ओहोटी ची लाज नाही-वैभव जोशी
काल च्या पोस्टवर गानू सरांनी एक कॉमेंट केली की माझ्या स्वभावामुळे मला आयुष्यभरची मैत्री आणि लॉयल्टी मिळत असेल लोकांची. तर नम्रपणे सांगतो की असलं काहीही होत नाही. नंतर त्यांनी लॉयल्टी बद्दल लिहिलं पण मी मनातले विचार लिहून टाकतो.
तर मी हे सगळं करतो ते माझ्या मनाला आनंद मिळावा म्हणून. यातून आयुष्यभराची मैत्री मिळते का तर माझ्याकडून मैत्रीत शत प्रतिशत देण्याची दानत आहे पण समोरून ती यावी ही अपेक्षा नाही. लॉयल्टी तर फार दूरची गोष्ट. अं हं, मला मोक्ष मिळाला किंवा संतत्व आलं आहे, असं तुमच्या मनात आलं असेल, तर थांबा. असलं काही झालं नाही आहे तर हे इव्हॉल्व्ह झालेलं मन आहे. खूप फटके खाऊन, धक्के पचवून. उदाहरणार्थ काही घटना सांगतो:
अनाथाश्रमातील पोरगा. त्याला जॉब दिला. संस्थापकांनी सांगितलं की मुलासारखा सांभाळा. सांभाळलं. सहा वर्षाने पोराने स्पर्धक कंपनीशी हातमिळवणी केली. (तिथे झेपलं नाही म्हणून मग परत मित्राच्या कंपनीत जॉब मिळावा म्हणून शब्द टाकला. आणि आता तिथेच आहे)
सहा वर्षे करत इंजिनियरिंग केल्यावर कुठंच जॉब मिळत नाही म्हणून एका पोराच्या मामाने जॉब द्या म्हणून रदबदली केली. दिला. त्याचं लग्न आहे म्हंटल्यावर लांब प्रवास करत थंडीत कुडकुडत हजेरी लावली. सात वर्षांनी आर्थिक गैरव्यवहार करत स्पर्धक म्हणून उभा राहिला. कधीही भेटलो की पोरगा पायाला हात लावायचा. मला वाटायचं पाया पडतोय. तो पाय ओढण्याची संधी शोधत होता.
एका पोराच्या लग्नाला गेलो होतो, खेड्यात. गरिबी पाहून गलबलून आलं. नालीवर मंडप टाकला होता. भातावर मटन रस्सा बरोबर बोटी डालो असं मुलाचा मामा म्हणायचा पण त्यात तुकडे होते कुठं. ती गरिबी पाहून त्या गावात एकटाच लांब गेलो आणि मनसोक्त रडलो. त्या पोरावर तुफान काम केलं. आज तोच पोरगा स्पर्धा करत, तुम्हाला संपवतो अशी भाषा करतो.
एक पोरगा जॉईन झाल्यावर त्याची कहाणी ऐकली. घरात अठरा विश्व दारिद्र्य. पोराने प्रचंड कष्ट करत इंजिनियरिंग केलेलं. म्हणून मनात दया. बिझिनेस पार्टनर चा विरोध असताना पोराला यथाबुद्धी मदत करत राहिलो. काही तरी फालतू कारण सांगत बाहेर पडला आणि परत तेच इर्षात्मक स्पर्धा.
अशा एक ना अनेक कहाण्या. काही सुखद पण आहेत, पण वर उल्लेखलेल्या जास्त. खूप जास्त.
अनेक वेदना झाल्यावर. त्यावर फुंकर मारत गेलो. पण ती फुंकर म्हणजे शीळ आहे असे भासवत गेलो. त्यालाच बहुधा संवेदना म्हणत असावेत.
आता मन निर्ढावलं आहे. स्वार्थी झालं आहे. त्यामुळे आता कुणाची मैत्री मिळावी म्हणून काहीही करत नाही. आता करतो ते फक्त स्वतःसाठी. माझ्या आनंदासाठी. मग त्याला कुणी मनस्वी म्हणत असतील, कुणी येडा म्हणत असतील. गानू सरांसारख्या मित्रांना कौतुक पण वाटत असेल. मित्रत्वाच्या नात्यात मी माझ्या बाजूने १००% देण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही त्याला तसाच रिस्पॉन्स दिला तर आनंदच आहे. नाही दिला तरी अजिबात वाईट वाटणार नाही.
मित्र वैभव जोशी म्हणतात तसं "भरतीचा माज नाही, अन ओहोटी ची लाज नाही".
Sunday, 20 July 2025
रोहडू
तर झालं असं होतं की आमच्या कंपनीत एक मुलगा जॉईन झाला. एकदा शिळोप्याच्या गोष्टी करताना मी सहज त्याचं मूळ गाव विचारलं. तर त्याने सांगितलं "रोहडू", सिमला च्या पुढे १०० किमी. आणि त्याच्या घराचे फोटो दाखवले. ते अप्रतिम फोटो बघून माझ्या तोंडून सहज एक वाक्य निघून गेलं " एकदा जायला हवं तुझ्या गावाला". (त्यावेळी नुकताच मी वैभव कुलकर्णी दिग्दर्शित रॅबिट हाऊस नावाचा पिक्चर बघितला होता आणि तिथली पार्श्वभूमी हिमाचल होती). त्या पोराने ते माझं वाक्य पकडलं "एकदा जायला हवं तुझ्या गावाला". मानेसरला आलो की त्याचा पहिला प्रश्न असायचा "सर, रोहडू जायचं आहे ना? घरचे लोक तुमची वाट बघत आहेत" म्हणजे त्याने घरी पण सांगून ठेवलं होतं. मी नाही म्हणायचो. की तो लागलीच "ठीक आहे नेक्स्ट व्हिजिट ला".
यावेळेस पुण्यात भेटलो, तेव्हा त्याने परत तोच प्रश्न विचारला. यावेळेस मी ठरवूनच टाकलं की मानेसर ला गेलो की रोहडू ला जायचं. १९ आणि २० जुलै तशीही सुट्टी होतीच.
दिल्ली रोहडू व्होल्वो सर्व्हिस आहे. व्हाया चंदिगढ, सिमला. १३ तास प्रवास. पुणे ते बंगलोर मी के एस आर टी सी च्या व्हॉल्वो तुन बेफाम प्रवास केला आहे. त्यामुळे गेल्या ६-७ वर्षात बसने प्रवास न केल्याचं मनात आलेलं खोडून टाकलं. बस १ तास लेट झाली आणि रोहडू ला उतरलो. सकाळचा प्रवास विस्मयचकित होऊन बघितला. सिमला ते रोहडू १०० किमी अंतर आहे पण त्याला चार तास लागले. पण त्या काळात जे निसर्ग दर्शन झालं त्याने पार येडा झालो.
आणि त्याही पलीकडे पागल झालो ते पहाडी लोकांच्या आदरातिथ्य मुळे आणि ज्या कुटुंबाकडे मी आलो त्यांची सफरचंदाची आणि पेर (याला इथे नाशपती म्हणतात) ची बाग पाहून. अक्षरश: हजारो सफरचंद लगडलेल्या झाडांच्या मध्ये असलेलं ते घर, तिथली प्रचंड कष्ट करणारी यजमान लोक, त्यांची ती पहाडी हेल असणारी कानाला वेगळीच वाटणारी हिंदी, मनात विचार आला तरी वाहनाचा आवाज आणि रादर कुठलाही आवाज न येणारा भवताल, नीरव शांतता हे सगळं मी तीस तासा मध्ये अनुभवलं. शेतात खुडून आणलेल्या मश्रुमची भारी भाजी, राजमा भात, वेगळ्याच गव्हाची चपाती, बटाटयाची भाजी सारण म्हणून वापरलेलं आणि तळलेली जाड पुरी ज्याला इथे फोलडू म्हणतात, लाल रंगाचा भात, अफीम टाकून आपले उकडीचे मोदक असतात तसं सिडू, आपल्या धिरड्यासारखं लागणारं लौटे अशा लोकल डेलिकसी त्या कुटुंबाने आवर्जून खाऊ घातल्या.
या सोबतीला दिला अमाप आदर आणि प्रेम. पंच्यांशी वर्षाच्या दादूपासून आणि उच्चशिक्षित समवयीन नानूपासून ते आमच्या माणसाच्या लहान बहिणीपर्यंत सगळ्यांनी आवर्जून गप्पा मारल्या. यजमान आणि यजमानीण त्यांची शेताची कामं सांभाळून माझी सरबराई करत होते.
एका छोट्या ब्रेक नंतर पण आगळ्यावेगळ्या मोठ्या मनाच्या लोकांना भेटून परत निघालो आहे, ते पुन्हा कधी यायचं आहे त्याचा विचार करतच.
(बाय द वे, वर उल्लेख केलेले नानू, त्यांची चेहरेपट्टी साधारण पणे नानाजी देशमुखांशी जुळणारी. रामभक्त आहेत ते. खरी गंमत पुढे आहे. माघ महिन्यात ते अस्खलित उर्दू मध्ये रामायण कथा सांगतात. आणि ती ऐकण्यासाठी दोन्ही धर्माचे लोक भक्तिभावाने आले असतात)
रोहडू
Friday, 4 July 2025
महाराष्ट्र शासन
मुंबई
संदर्भ: विकसित महाराष्ट्र
महोदय,
सगळ्यात प्रथम आपण नागरिकांकडून २०४७ सालापर्यंत विकसित महाराष्ट्र होण्यासाठी आपण सूचना मागवत आहात त्याबद्दल धन्यवाद. माझे विचार खाली देत आहे. ते आपल्यापर्यंत पोहोचतील आणि त्यावर कार्यवाही होईल याची खात्री नाही, तरी नागरिक कर्तव्य पार करण्यासाठी हा खटाटोप करत आहे.
१. सगळ्यात प्रथम शहरातील आणि एकूणच महाराष्ट्रातील रस्ते: एक काळ असा होता की इतर राज्यातील रस्त्यांपेक्षा महाराष्ट्रातील रस्ते खूप चांगले होते. पण आता परिस्थिती एकदम उलट झाली आहे. तेलंगणा, कर्नाटक, मध्यप्रदेश, हरियाणा या राज्यातील चांगल्या रस्त्यांचा अनुभव मी स्वतः घेतला आहे. पण त्याच वेळेस महाराष्ट्रातील अनेक शहरातील रस्ते मात्र उद्विग्न करणारे आहेत. जगभरातील रस्ते हे चांगल्या क्वालिटीचे असताना, भारतातील आणि त्यातही महाराष्ट्रातील रस्ते हे अत्यंत घाणेरड्या स्थितीत आहेत हे खेदाने नमूद करावे वाटते.
२. स्वच्छता आणि घन कचरा व्यवस्थापन: जगभरातील कोणतंही राष्ट्र हे भारतापेक्षा स्वच्छ आहे हे कुणीही सांगू शकेल. त्याबाबतची सामाजिक, राजकीय आणि नोकरशाहीची अनास्था ही अनाकलनीय आहे. रस्त्याने, नदीमध्ये, समुद्र किनाऱ्यावर दिसणारी यामुळे लाज वाटते. याची जबाबदारी ही सर्व समाजावर आहे पण त्याला शिस्त लावण्याची जबाबदारी मात्र नोकरशाही आणि शासनाची आहे असं मला वाटतं.
३. पाणी उपलब्धता: चांगल्या गुणवत्तेचं पाणी मिळणं ही जनतेची बेसिक गरज आहे. गुणवत्ता सोडा पण मराठवाड्यात आजही दररोज पाणी उपलब्ध होत नाही ही वस्तुस्थिती आहे. पाणी स्रोत आणि नद्यांचं पुनरज्जीवन करून पाणी टंचाई हा विषय चर्चेत यायला नको अशी सिस्टम बनवणं हे गरजेचं आहे.
४. वीज उपलब्धता: मी एक लघु उद्योजक आहे. क्वालिटी वीज मिळत नसल्यामुळे आणि मिळणारी वीज वेळोवेळी खंडित झाल्यामुळे उद्योजकांचे प्रचंड नुकसान होते.
५. कायदा आणि सुव्यवस्था: महाराष्ट्रातल्या अनेक शहरात कायदा आणि सुव्यवस्था याचा बोजवारा उडालेला आहे. बलात्कार, चोऱ्यामाऱ्या, खून असे मेजर गुन्हे तर घडतच आहेत पण वाहतूक व्यवस्थेबद्दल सुद्धा पोलिसांनी जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. लोकांनी शिस्त पाळणं गरजेचं आहे हे मान्य आहे, पण ती जर पाळली जात नसेल तर तर कायद्याचा बडगा दाखवून बेशिस्त लोकांवर कारवाई करण्याचं काम हे शासनप्रणीत यंत्रणेचं आहे.
६. सामाजिक सलोखा: गेल्या काही वर्षात धार्मिक आणि जातीय मुद्द्यांवर समाजात प्रचंड ध्रुवीकरण झालेलं दिसत आहे. काही विशिष्ट धर्माला लक्ष्य बनवून त्यांना वेगळं पाडण्याचे कट कारस्थान हे सातत्याने होत असते. समाजात पडणारी ही दरी लॉन्ग टर्म साठी धोकादायक आहे. दुभंगलेला समाज हा कधीही सशक्त राज्य किंवा राष्ट्र बनवू शकत नाही. धार्मिक ध्रुवीकरणाबरोबर जातिधिष्ठित राजकारणाला आणि पर्यायाने समाजकारणाला खतपाणी घातलं जात आहे.
७. शिक्षण आणि वैद्यकीय सुविधा: शिक्षण आणि वैद्यकीय सुविधा देताना जरी खाजगीकरण झालं असेल तरी शासन त्यातून पूर्ण स्वतःला वगळू शकत नाही. तसं झालं तर गरीब लोकांना या सुविधांचा लाभ घेणं अवघड होत जाईल. विकसित राज्यात किंवा देशात या सुविधांवर शासनाचं प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष नियंत्रण असतंच.
Where the mind is without fear
and the head is held high;
Where knowledge is free;
Where the world has not been broken up
into fragments by narrow domestic walls;
Where words come out from the depth of truth;
Where tireless striving stretches its arms toward perfection;
Where the clear stream of reason has not lost its way
into the dreary desert sand of dead habit;
Where the mind is led forward by Thee
into ever-widening thought and action —
Into that heaven of freedom,
my Father, let my country awake.
By Rabindranath Tagore
Sunday, 29 June 2025
मध्ये अशीच एक पोस्ट वाचली की आजकाल फोन्स फक्त कामासाठी येतात, सहज असे फोन येत नाहीत. माझंही झालं आहे असं खरं. माझ्या कॉलेज चे आणि शाळेचे काही मित्र यांच्याशी कधीतरी माझा मूड झाला की फोन करतो. नाही म्हणायला फेसबुकच्या काही लोकांना पण माझे असे उगाच फोन झाले आहेत. पण प्रमाण फार कमी.
पण आमच्या घरात दोघे जण आहेत, ज्यांचे त्यांच्या सुहृद लोकांशी असे सहज फोन चालू असतात. एक आई आणि दुसरी वैभवी. आईचं तर समजू शकतो मी. मागच्या पिढीची आहे ती, परत मी दिवसभर घरात नसतो. आजकाल नील पण नसतो. मग फोन वर बोलण्याशिवाय दुसरा विरंगुळा कुठला?
पण वैभवी. ती डॉक्टर आहे. लॅब चालवते. पण तिचे दररोज असे कुठले ना कुठले सहज फोन चालू असतात. तिचे तीन ग्रुप आहेत. एक बी जे तल्या मैत्रिणींचा. चार जणी आहेत त्या. त्यांचा मूड झाला की चार जणी मिळून व्हाट्स अप कॉल करतात आणि अमाप गप्पा मारतात.
दुसरा ग्रुप, चुलत बहिणींचा. तिथे त्या पाच जणी आहेत. तिथे पण ग्रुप कॉल चालू झाला की एक दीड तासाची निश्चिंती असते.
तिसरा ग्रुप आहे मामे मावस भाऊ बहिणींचा. ९ जणांचा. तिथे परत मामे मावस बहिणींचा सब ग्रुप आहे. म्हणजे त्यात तीन भाऊ नाही आहेत. हा कहर ग्रुप आहे. प्रत्येकाच्या वाढदिवसानंतर त्यांचा तो व्हर्च्युअल साजरा होतो. मग त्यात ते सर्व गाणे म्हणतात, ज्याचा कुणाचा वाढदिवस आहे त्याच्या किंवा तिच्यासाठी. कुठलाही फॅमिली प्रोग्रॅम झाला की त्याबद्दल एक फोन होतो. आणि कार्यक्रमात केलेली मजा ते परत झूम कॉल करून अनुभवतात.
या सगळ्या ग्रुप कॉल्स ची वेळ पण ठरली आहे. रात्री साडे नऊ. मग तो कधी एक तास, कधी दीड तर कधी अगदी दोन तास पण चालतो. बरं या ग्रुप कॉल शिवाय यातील प्रत्येकाशी परत दोन तीन दिवसातून वैयक्तिक फोन होतोच.
आणि याशिवाय मग वैभवीची आई, बहीण, मुलगा यश यांच्या बरोबर अलमोस्ट दररोज, तर भाऊ अमोल, दीर उन्मेष, नव्याने नाते जोडलेल्या विहिणबाई, अजून काही बी जे च्या मित्र मैत्रिणी यांच्याबरोबर आठवड्यातून एखादा फोन होतोच होतो.
गंमत म्हणजे तिच्या ग्रुप कॉल मध्ये बऱ्याचदा फक्त हसण्याचे आवाज येतात. शब्द काहीच ऐकू येत नाहीत. इथे फोन झाल्यावर, त्यातही ग्रुप कॉल नंतर ती डबल फ्रेश होते.
असे आम्ही फोनच्या बाबतीतले दोघे दोन ध्रुव. कधी मला तिच्या या फोन्स चा राग पण येतो पण बहुतेकवेळा तिचा हेवा वाटतो. खुश राहण्यासाठी मला काहीतरी अफाट घडावं असं वाटतं, वैभवी मात्र अशा एखाद्या सहज केलेल्या फोनने सुद्धा खुश खुश होऊन जाते.
Tuesday, 24 June 2025
२०१७ साली जेव्हा अ..... अभियंत्याचा प्रकाशित झालं तेव्हा तीन समाजसेवी संस्थांना विनंती केली की त्यांनी कार्यक्रमात सहभागी व्हावं. त्या विनंतीला मान देत श्री विजय फळणीकर यांचं आपलं घर (जे आता माझं ही घर आहे), श्री अशोक देशमाने यांचं स्नेहवन आणि सौ अंबिका टाकळकर यांची आरंभ. त्यांच्या कार्यक्रमातील सहभागाने प्रकाशन सोहळा अजून छान झाला. तिघांचं काम अफलातून आहे आणि उपस्थितांना खूप भावलं.
आज कार्यक्रमाची थीम "उद्योजकता" आहे. कारण पुस्तकाच्या नावात, "An Engineers Journey to Entrepreneurship" ते अगदी ठळकपणे ते आलं आहे. मग मी विचार केला की यावेळी मला भावलेल्या तीन उद्योजकांना विनंती करावी की त्यांनी कार्यक्रमात सहभागी व्हावं. माझ्या नम्र आवाहनाला मान देत मधुरा कॉम्प्रेसर चे बापू कदम, रॅपटेक इंजिनियरिंग चे नितीन बोऱ्हाडे आणि आमच्या क्षेत्रात स्त्री उद्योजिका कमी असतात आणि तरीही त्यात उतरून यशस्वी पणे मशीन शॉप चालवणाऱ्या मनीषा पाठक या तिघांचा छोटा सत्कार करणार आहोत. यामध्ये भावना फक्त उद्योजकतेला नमस्कार करणे हा आहे.
आणि अर्थात श्री मनीष गुप्ता आणि श्री आनंद देशपांडे यांना ऐकणं ही एक पर्वणी असणार आहे.
तुम्ही पण या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी.
स्थळ: एम इ एस ऑडिटोरियम, मयूर कॉलनी, कोथरूड पुणे
तारीख आणि वेळ: २५ जून २०२५, संध्याकाळी ६:३० वाजता
Saturday, 21 June 2025
व्यासपीठावरील मान्यवर डॉ आनंद देशपांडे, माझे बिझिनेस मेंटॉर श्री मनीष गुप्ता, पुस्तकाचे अनुवादक माझा मित्र सदानंद बेंद्रे, प्रकाशिका प्रतिमा, माझे प्रेरणा स्थान डॉ वैभवी मंडलिक आणि उपस्थित माझे सर्व मित्रगण.
खरंतर व्यासपीठावर उद्योजकतेच्या विद्यापीठाचे कुलगुरू, उपकुलगुरू बसलेले आहेत, त्यांच्यासमोर उद्योजकता या विषयावर मी काही बोलणं संयुक्तिक ठरणार नाही. तसंही मला अनेक जण "डेली वेजेस चा एम डी" असं गंमतीत म्हणतात. त्यामुळे पुस्तक जरी माझ्या उद्योजकीय प्रवासावर लिहिलं असेल तरी उद्योजकता या विषयावर प्रमुख पाहुणे बोलतील. मी थोडी या पुस्तकाची स्टोरी सांगतो.
२०१७ साली अ......अभियंत्यांचा प्रकाशित झाल्यावर त्याचा इंग्लिश अनुवाद करा असं बऱ्याच जणांनी सुचवलं होतं. सोशल मीडियाची ही गंमत आता सर्वांना माहित आहे. कॉमेंट मध्ये कुणी "पुस्तक लिहा" असं लिहिलं की आपल्याला लगेच लेखक असल्याचा भास होऊ लागतो. मला तसा झाला आणि मी मराठी पुस्तक लिहिलं, पण परत फसणार नव्हतो अशी मनाशी गाठ बांधली होती. पण एका तरुणाने मला मेसेंजर वर अगदी कळकळीची विनंती केली की इंग्लिश अनुवाद करा, तेव्हा मी परत पाघळलो. म्हणजे तरुण असूनही पाघळलो हे कृपया लक्षात घ्यावं. आणि हा इंग्लिश अनुवाद करावा या विचाराने उचल खाल्ली. तेव्हा हे चॅट जीपीटी, ए आय वगैरे प्रकरण नसल्यामुळे तो अनुवाद कुणी करावा हा यक्षप्रश्न उभा राहिला. कारण मला वेळ नव्हता. वेळ नव्हता हे तुम्हाला सांगण्याचं कारण आहे. खरं कारण हे आहे की स्पोकन इंग्लिश बरं असलं तरी साहित्यिक इंग्लिश बद्दल आनंदच होता. साहित्यिक मराठी बद्दल पण आनंदच आहे, असं कुणीतरी बोलल्याचं ऐकू आलं मला. पण मग आमचे फेसबुकचे शशी थरूर, सदानंद ची आठवण आली. आजूबाजूला बायकांचा गराडा असणे हे सोडलं तर थरूर साहेब आणि सदानंद यांची इंग्लिश शब्दसंपदा माझ्यालेखी सारखीच आहे.
त्याने काम हातात घेतलं, पण तब्येतीचा इश्यू झाल्यामुळे काम थोडं रेंगाळलं आणि दोन एक वर्षांनी मला ते बाड मिळालं. ते वाचल्यानंतर सदानंद चं मला खूप कौतुक वाटलं. म्हणजे एक सांगतो तुम्हाला की हे पुस्तक म्हणजे भाषांतर नाही आहे तर भावानुवाद आहे. मराठी मनाचा भाव जसाच्या तसा इंग्लिश मध्ये उतरवणे हे थोडं अवघडच काम पण नंदूने ते काम लीलया केलं आहे. तसं असलं तरी एव्हाना माझा उत्साह पण मावळला होता.
दुसरी एक गंमत अशी होती की या पुस्तकातील बरेच लेख हे मी वयाच्या चाळीशीत लिहिले होते. आता पंचावन्न क्रॉस केल्यावर मलाच ते खूप बालिश वाटू लागले होते. पण या सगळ्या शंका कुशंकांना खारिज करत नंदू, गौरी आणि साकेतच्या प्रतिमा भांड यांनी हा अनुवाद प्रकशित करण्यात प्रोत्साहित केलं. तुमचे धन्यवाद.
मी तयार झालोच होतो तेव्हा अजून एक गडबड झाली. काही दिवसांपूर्वी मी माझे कस्टमर ग्राईंडमास्तर चा सी इ ओ, समीर केळकर याने लिहिलेल्या गराज टू ग्लोबल या पुस्तकाच्या लॉन्च प्रसंगी त्याची मुलाखत घ्यायला औरंगाबाद ला गेलो होतो. तिथे सिनियर केळकर सरांनी आपल्या भाषणात म्हंटलं "मी समीर ला विचारलं, आपण असा काय तीर मारला की तू पुस्तक लिहितो आहेस" मी विचार केला की जवळपास २०० कोटी टर्नओव्हर असलेल्या आणि ३० एक देशात हाय क्वालिटी मशिन्स एक्स्पोर्ट कंपनीचे फाउंडर म्हणत असतील की "असा काय आपण तीर मारला आहे" तर त्या न्यायाने मी तर धनुष्याकडे बघितलं पण नव्हतं. पण वैभवी म्हणाली की ऑल रेडी तू खूप चुका केल्या आहेस, ही पण करून टाक.
थोडक्यात तुम्हाला सांगायचं तर की पुस्तक नाही आवडलं तर त्याची जबाबदारी वैभवी, गौरी आणि सदानंद यांच्यावर आहे. पण मराठी पुस्तक जसं आवडलं तसं हे पण आवडेल अशी खात्री आहे.
अ ..... अभियंत्याचा प्रकाशित होताना तीन समाजसेवी संस्थांच्या प्रेझेन्स मुळे त्या सोहळ्याला चार चांद लागले होते. फळणीकर सरांचं आपलं घर (जिथे मी आता सचिव पण आहे), अशोक देशमाने चं स्नेहवन आणि अंबिका टाकळकरचं आरंभ. या वेळेस मी थोडा वेगळा विचार केला. तीन उद्योजकांना विनंती केली की त्यांनी या कार्यक्रमासाठी येऊन एक वेगळा आयाम द्यावा. तिघांशी पण माझी वैयक्तिक ओळख आहे. मनात विचार आल्या आल्या अनेक लोक मनात आली. कार्यक्रम नेटका व्हावा म्हणून त्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी या तिघांना आमंत्रित केलं. चिठया टाकल्या म्हणा हवं तर.
बाकी दोन प्रमुख पाहुण्यांबद्दल मी काय बोलणार? एक द्रोणाचार्य आहेत, ज्यांचे लेक्चर्स मागे कुठे तरी बसत, काही लिंक्ड इन पोस्ट, यु ट्यूब वरील मुलाखती बघत अनेक गोष्टी शिकतो आणि दुसरे तर खऱ्या अर्थाने बिझिनेस मेंटॉर आहेत. त्यांच्यामुळे प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफमध्ये खऱ्या अर्थाने ट्रान्सफॉर्मेशन आलं आहे.
एकाच आयुष्यात शून्यापासून दहा हजार कोटी टर्नओव्हर करणाऱ्या लोकांबद्दल फक्त मासिकात वाचून होतो. आज देशपांडे सरांबरोबर बोलायला मिळतं आहे, त्यांच्या हस्ते या पुस्तकाचं विमोचन होत आहे यापेक्षा भाग्य काय मोठं असणार आहे? सरांना कदाचित लक्षात नसेल पण त्यांच्या वक्तशीरपणाचे आणि नवीन उद्योजकांना ते कसे प्रोत्साहित करतात याचे माझ्याकडे चार पाच किस्से आहेत. त्यातील एक कि ज्यात मी इन्व्हॉल्व्ह होतो, तो सांगितल्याशिवाय राहवत नाही आहे. काही वर्षांपूर्वी तेजश्री कांबळे ने माझी आकाशवाणी वर उद्योजकतेवर मुलाखत घेतली होती, ज्याची लिंक्ड इन वर टाकली होती. त्यावर देशपांडे सरांची कॉमेंट होती की "मराठीत उद्योजकतेवर इतक्या सोप्या भाषेत खूप कमी ऐकलं आहे. प्रत्येक मराठी उद्योजकाने ही मुलाखत ऐकावी" थोडी मी तिखट मिरची लावली असेल, पण अशा धरतीची कॉमेंट होती. मी सरांना मेसेज पाठवला की ही कॉमेंट मी बाकी सोशल मीडियावर मुलाखत लोकांनी ऐकावी म्हणून वापरू का? मला वाटलं होतं, सरांचा काही मेसेज येणार नाही. पण त्यांचा होकाराचा मेसेज आला आणि मग ती मुलाखत अनेक लोकांपर्यंत पोहोचली. अजून दोन चार किस्से आहेत, पण वेळेअभावी थांबतो. सर, धन्यवाद तुम्ही हे निमंत्रण स्वीकारलं. खूप प्रिव्हिलेज्ड फील करतो आहे.
एम जी सरांचं माझ्या आयुष्यात असलेल्या काँट्रीब्युशन बद्दल मी आतापर्यंत इतक्यांदा बोललो आहे की मला आता एम जी डिव्हीडंड वगैरे मागतील की काय अशी भीती वाटते. अर्थात अभी बोल ही देता हू सर, मी सुद्धा अर्ह समस्ती ला किंवा टीजी ओ बी ला इतके लोक पाठवले की सरांना पण भीती वाटते की मी त्यांच्याकडे कमिशन मागतो की काय? पण जोक्स अपार्ट, दुसऱ्या अँजिओप्लास्टी नंतर मी इतका अगोनी मध्ये गेलो होतो आणि तेव्हाच माझी एमजी सरांशी ओळख करून दिली गेली. आताही आव्हानं आहेतच पण त्याला दोन हाताने सामोरे जाण्याची मानसिकता बाळगून आहे आणि त्याचं श्रेय एम जी सरांना जातं. म्हणून मी पुस्तकात त्यांना डॉ मनीष गुप्ता संबोधलं होतं. काही कारणाने त्यांनी मला ते काढायला लावलं. पण माझ्यासाठी दोन कार्डिओलॉजिस्ट आहेत, एक डॉ हरदास आणि दुसरे एम जी सर.
बाकी सगळ्यात शेवटी दोन कुटुंबं. एक सेटको आणि दुसरे मंडलिक परिवार. दोन्ही ठिकाणी अत्यंत सशक्त, कष्टाळू, माझं मनस्वीपण सांभाळणारे लोक काम करत आहेत. ते तसे आहेत, म्हणून हे सगळं घडत आहे. त्यामुळे सेटको टीमचे आणि मंडलिक परिवाराचे आभार. आणि सरते शेवटी या टेक्नॉलॉजी चे आभार कारण ती नसली असती तर मी कधी व्यक्त झालो नसतो आणि हे जे काही होतं आहे ते काहीच झालं नसतं.
तुम्ही आज सगळे इथे आलात, नेहमीच तुम्ही लोकांनी प्रोत्साहित केलं आहे. त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार.
आता मी थांबतो, दोन उद्योजकतेच्या स्टॉलवर्ट्स ना आपल्याला ऐकायचं आहे. मी ही खूप उत्सुक आहे. धन्यवाद.