Monday 10 March 2014

मुश्ताक भाई

सध्या आमच्या engineering industry मध्ये तथाकथित recession चालू आहे. पण काही कंपन्या अशा असतात ना कि तिथे मंदी, recession वैगेरे शब्द अस्तित्वातच नसतात. अशीच एक कंपनी माझ्या जवळची मुश्ताक भाई यांची महाराष्ट्र इंजिनीअर प्रायवेट लिमिटेड.

नाही, पण असं काय आहे ना कि मी लिहावं मुश्ताक भाई बद्दल. अशा बर्याच कंपन्या असतात कि ज्यांचे मालक हरहुन्नरी असतात, खूप शिकून सवरून आपापल्या परीने व्यवस्थित मार्केटिंग करून कंपनीचा डोलारा सांभाळत असतात. गम्मत खरी इथे आहे. मुश्ताक भाई फक्त चौथी पास आहेत. १९८९ साली फक्त रु ५००० भांडवलावर (ते पण उधारीचे) एक लेथ घेऊन धंदा चालू केला. स्वत: काम आणायचे, स्वत:नीच करायचे आणि स्वत: डीलीवरी देऊन यायची. पण धडाडी, कल्पकता, हुशारी या जोरावर मुश्ताक भाई आज जवळपास १०० लोकांना सांभाळतात. त्यांचं अदयावत (CNC) अशा मशिन्सची भलीमोठी कंपनी आहे. म्हणजे जवळपास ४० VMC/ HMC आणि turning centers, २ भल्यामोठ्या VTL, ३ जिग बोरिंग, २ grinding मशिन्स, १ CMM  असा भला मोठा पसारा आहे. माझ्या Engineers नसलेल्या मित्रांना कदाचित याचा अंदाज येणार नाही, म्हणून मी जरा पैशाच्या हिशोबात सांगतो. त्यांचा साधारण रु १० कोटीचा वर्षाचा लेबर चा टर्न ओवर आहे. म्हणजे with material जर म्हणायचे झाले तर रु २५ कोटी फक्त.

इंग्रजीचा गंध नाही. पण आज देश विदेशात त्यांच्या इथून material supply केले जाते. स्वत: मुश्ताक भाई जर्मनी, फ्रांस, बेल्जिअम, सिंगापूर या देशात जाऊन आले आहेत. काही नाही,एक इंग्लिश येणारा मित्र घ्यायचा आणि जायचे. २-४ कोटीच्या मशिन्स घेऊन यायच्या.

आणि माणूस स्वभावाला एकदम दिलदार. पोरांना भारीच सांभाळतात. "माणसं टिकत नाहीत" वैगेरे फालतू complaints त्यांच्याकडे चालतच नाहीत. एकदा माणूस लागला त्यांच्याकडे कि त्यांचाच. आणि का नाही हो. वसंत म्हणून हुशार operator. वयाच्या २२ व्या वर्षी मुश्ताक भाई कडे लागला. आज वसंत जवळपास २० वर्ष आहे त्यांच्याकडे आहे, आता सुपरवायझर झाला आहे. wagon r मधून फिरतो. निलेश आहे, मी १२ वर्षापूर्वी त्याला बघितलं तेव्हा एक सुपर वायझर होता (डिप्लोमा आहे तो). आज अख्खी factory सांभाळतो. मुश्ताक भाई पण त्याला i २० देताना कचरत नाहीत.

मुश्ताक भाई, स्वच्छतेचे एकदम भोक्ते. factory तर एकदम कडक पण बघण्यासारखी त्यांची केबिन. भपका नाही पण सुबक. आतच फ्रीज. भरलेला. स्वत: चहाचे आशिक. पण पाहुण्यांनी शब्द काढावा आणि मुश्ताक भाई दोन मिनिटात हजर करणार. कोल्ड ड्रिंक, ice टी. लेमन टी, कॉफी आणि बरोबर बिस्कीट. crockery पण दर्जेदार. engineering industry चालवतात पण कायम पांढरा शर्ट, तो पण परीटघडी चा. आयुष्यभर हात काळे केलेल्या माणसाचं हे पांढऱ्या रंगाचं प्रेम मला कायम अचंबित करत आलं आहे.

व्यसनं पण केली, अतिरेक हि झाला पण धंद्यावर कधी आच नाही येऊ दिली. ५ वर्षापूर्वी हाजी झाले. सगळी व्यसनं सोडून दिली. आता बाह्य रूप तर स्वछ आहेच पण तब्येत हि बढीया. हात मिळवला कि कळतं, हा कुणावर पडला तर काय हाल होतील ते. सामाजिक कार्यातही पुढे. कायम त्यांच्या कडे मदत मागायला लोकं असतात आणि मी त्याच्यात पडत नाही पण कळतं कि कुणी त्यांच्या केबिन मधून रिकाम्या हातानी जात नसावा.

मला नेहमी म्हणतात "च्यायला, मी तुझ्यासारखा शिकलेला पाहिजे होतो" मी म्हटलं "कशाला, बिझनेस प्लान, sales forecast, cash flow याचा अभ्यास करता करता चाचपडत राहतो मी आणि ३-४ लाखाचं equipment आणेपर्यंत तुम्ही ३०-४० लाखाचं मशीन घेऊनही आले असता". ७-८ वर्षापूर्वी मला म्हणाले "हि वेब साईट काय भानगड आहे रे" मी समजावलं. निलेशला बोलावलं "काही नाही महिन्याभरात आपली वेबसाईट पाहिजे." तीन आठवडयातच मला बोलावलं. दाखवली "कशी आहे www.maharashtraengineers.com" मी चाट. सहा महिने माझी साईट develop करायला घेतलेला मी, तीन आठवड्याची करामत बघून चकित झालो होतो. थोडे काही suggestions दिले आणि म्हणालो "साईट चं नाव फारंच मोठं झालं हो. upload झाली आहे का?" म्हणाले "काय, mepl.com करू" ४ दिवसात www.mepl.com.

आजही  मुश्ताक भाई सकाळी ९ वाजता कंपनीत हजर असतात, रात्री साडेआठ वाजेपर्यंत जी तोड काम करतात. बरोबर दुपारी २ वाजता घरून आणलेला डबा खातात. कधीही त्यांना भेटायला गेलो कि त्यांच्याकडे वेळ नाही असं नाही. ते केबिन मध्ये आपल्याशी बोलत असतात. आणि कुठल्याही कस्टमर चा फोन आला तरी त्यांना कुठल्या मशीन वर जॉब चं काय operation चालू आहे हे मुखोद्गत असतं. मार्केटिंग, production, बिझिनेस development, finance अशी विविध department पुस्तकी पद्धतीने हाताळणारा मी मुश्ताक भाई ना observe करत असतो, एखादा IIM चा विद्यार्थी मुंबई च्या डब्ब्यावाल्याचा अभ्यास करतो तसा.

(लेखातील नावं बदलली आहेत, पण मागे लिहिल्याप्रमाणे कुणाला असेच मुश्ताक भाई भेटले तर तो योगायोग समजू नये. कारण असे मुश्ताक भाई जागोजागी सापडतात आणि माझ्यासारख्या मरगळलेल्या जीवांना उभारी देत असतात) 

No comments:

Post a Comment