Tuesday 4 March 2014

संभ्रम

दोन दिवसांपूर्वी चाकणला चाललो होतो. समोर एक सिक्स सीटर काळा धुर भकभक सोडत चालली होती. शेजारी अमन बसला होता. मी म्हणालो "कसलं विष ओकत आहे ना ही सिक्स सीटर". तर अमन म्हणाला " हमम…पण त्या रिक्शा ड्रायव्हरचं पोट आहे त्याच्यावर. त्याच्यासाठी अमृतंच ते"

खरं आहे "एकासाठी जे विष असतं ते दुसर्यासाठी अमृत असु शकतं"

गाणी बजावणी चालू असलेली वरात. जोरात आवाजाचा ब्रास बॅंड. कानाला प्रचंड त्रास. जे माझ्या कानाला बेसूर वाटतं ते त्या वाजवणार्याच्या घरच्यांना मंजुळ वाटत असेल कदाचित.

(खरं तर मला या प्रकारात त्या घोड्यावर बसलेल्या गाढवाचंच नवल वाटतं. या युगात त्याला आवडतं बरं हे सगळं नाटक करायला)

एक मजेदार किस्सा सांगतो. अमेरिकन जिम एकदा माझ्या घरी आला होता. गणपती होते तेव्हा घरात. दाराशीच बायकोने स्वस्तिक ची रांगोळी काढली होती. एकतर तो बूट घालूनच घरात शिरत होता. त्याला मी सांगितले जर बूट काढावा लागेल. विचित्र नजरेने बघत त्याने काढले बूट. आणि दरवाजातून आत शिरताना त्याला स्वस्तिक दिसले. पायाच्या अंगठ्याने स्वस्तिक ला स्पर्श करत त्याने विचारले "what is this?" जीवाच्या आकांताने मी ओरडलो "don't touch it with your feet" त्याने चमकून विचारले "why" मी म्हणालो "this is our sacred sign" जिम निर्विकार चेहऱ्याने म्हणाला "this looks similar to Hitler's Nazi sign. how is that this is your holy sign?"  माझ्याकडे उत्तर नव्हतं.

मला पवित्र वाटणारं दुसर्या कुणासाठी तिरस्काराचं कारण नक्कीच असु शकतं.

पथारी पसरून फूटपाथवर भाजी विकणारी आजीबाई आणि रेवड्याची हातगाडी ढकलत आणि शेजारीच चालणार्या त्याच्या चिमुकलीशी गप्पा मारताना जाणारा तो विक्रेता जेव्हा ट्राफीक जाम करत असतात़, तेव्हा मी पुर्णपणे संभ्रमात पडलो असतो.

कळतच नाही ना मी संभ्रमात आहे की कुठल्या..................भ्रमात. 

No comments:

Post a Comment