Tuesday, 28 April 2015

परभणी १

परभणी.........माझ्या मनाच्या कोपर्यात अलगद बसलेलं गाव. खरंतर मी कधीही सलग राहिलो नाही आहे परभणीत. अहो, इतकंच काय, माझा जन्मही नांदेड चा. पण कुणीही कधीही विचारलं की तु कुठला की माझ्या तोंडून आपसूक निघून जातं, परभणीचा. म्हणजे अगदी चेन्नई, बंगलोर, दिल्ली या गावातही ह्या प्रश्नाचं उत्तर परभणीच. आणि अगदी सांगतो "you know Aurangabad. 3 hours train journey from A'bad". शाळेतली उन्हाळ्याची आणि दिवाळीची सुट्टी ही मी परभणीतच घालवली.

माझं आजोळ, म्हणजे आईचं घर, मुक्ताजीन. बस स्टँडच्या च्या शेजारी ज्या आता पडक्या वास्तू दिसतात ते माझ्या आजोबांचं घर. केशवराव डंक. आणि जी मोकळी जमीन दिसते तिथं होती मुक्ताजीन. जिनिंग अँड प्रेसींग. कापसाची सरकी काढून त्याच्या गाठी बनवायची प्रेस.

घर, ज्याला चौसोपी म्हणता येईल असं. स्वयंपाकघर, त्याच्या शेजारी देवघर आणि जेवणाची खोली, त्यानंतर न्हाणीघर. या रांगेतल्या खोल्यांसमोर ८ फूटी मोकळी जागा. त्यात तुळशीवृंदावन आणि पाणी गरम करण्याचा अगड बंब.  त्यासमोर मग धान्याची कोठी, अन बाकी किराण्याचं सामान ठेवण्याची खोली. त्यापुढे बायकांची शिळोपाच्या गप्पा मारण्याची खोली. त्याच्या उजव्या बाजूला दिवाणखाना. तर डावीकडे माजघर. त्यापुढे एक छोटी खोली, मामाची. समोर वर्हांडा. तिथल्या दोन आरामखुर्च्या. लाकडी. त्याचे हात वाढवता यायचे. दिवाणखान्यात गाद्या, तक्के त्यावर पांढर्या शुभ्र चादरी. बाकी जमिनीवर सतरंजी. त्यावर एका बाजूला लिहीलेलं केशवराव डंक.

उत्तरेकडे मोकळ्या जागेत हौद, जिथे आम्ही पोरं आंघोळी करायचो. त्या परसामागे प्रातर्विधी उरकायची जागा. मी ती कधी बघितलीच नाही ती. आम्ही रेल्वे पटरी ओलांडून पलीकडे जायचो. जर्मनीत मायकेलच्या घरी टॉयलेटमधे लायब्ररी, कार्पेट वैगेरे बघितल्यावर मला परभणीची रेल्वे पटरी आठवली.

मग गोठा. तिथे उभ्या असलेल्या म्हशी अन गायी. त्यांचा चारा अन कधी एकदा त्या भार्यात निघालेला अजगर.

अन तिथून चालत पूर्वेकडं आलं की स्वर्ग, म्हणजे बाग. फळांमधे चिक्कू, आंबा अन जांभळं. फूलांमधे गुलाब, मोगरा, रातराणी, चाफा. आणि या सगळ्यांवर कहर म्हणजे केवडा. तिथे वळचणीला कुठेही बसलो तर मोटेतून सोडलेल्या पाण्याचा खळखळता आवाज. पुण्यात रामटेकडीला वर गेलो की एसआरपीएफ ला पाण्याची टाकी दिसते. तिथून पाणी खळाळत बागेला जातं. मी केवळ तो आवाज ऐकायला तिथे जातो.

दक्षिणेकडे आजोबांची कचेरी, अन मग जीनचं प्रशस्त आवार. उंबराची, पिंपळाची अन अजून एक न आठवणारी झाडे. त्या झाडांखाली उन्हाळ्यात बाजेवर झोपून आकाशात मोजलेल्या चांदण्या.

आणि मग प्रत्यक्ष जीन, तिथे असलेल्या पांढर्या शुभ्र कापसाच्या राशी. अन मांडून ठेवलेल्या गाठी. त्या राशीत उंचावरून मारलेल्या उड्या. अन गाठींमधे लपाछपी.

जीनमधली तळघरात असलेली आणि यंत्राशी जिथे माझी पहिली ओळख झाली ती अजस्त्र हायड्रॉलिक बेलिंग प्रेस अन माझे विस्फारलेले डोळे. बाजूला इंजिनियर साहेबांचं, मिस्त्री, घर. त्यांची पोरं इसाक अन भुर्या. चहाखारीची पहिली चव, अन ते खाताना माझ्याकडे बघत डोक्यावर बोटं मोडत दृष्ट काढणारी अम्मी.

त्याच्या अलीकडे फाटक. अन त्या फाटकात रेल्वेच्या अजस्त्र इंजिनकडे भयचकित नजरेने बघत डब्यातल्या प्रवाशांना टाटा करणारी आम्ही मावस मामे भावंडं.

क्रमश: 

Sunday, 26 April 2015

सानिया

आज काल फेक अकौंट आणि फेक प्रोफाईल याबद्दल बराच उहापोह चालू आहे. माझा पण अनुभव शेयर करतो. अरे, कान टवकारून, डोळे विस्फारून बघू नका. माझा अनुभव जरा वेगळा आहे.

गेल्या वर्षी सामनात लिहित असताना पहिल्या लेखाला प्रतिक्रिया आली मेल ने, ती अशी

"नमस्कार काका, कसे आहात?.......आधी माझी ओळख करुन  द्यायला हवी नाही का?....Hii..मी सानिया.सध्या १२ वीत आहे. खरेतर subject लिहायचा असतो mail करताना पण subject काय लिहावा तेच समजेना म्हणून नाही लिहिला...sorry. काका, तुमचे सामना-फुलोरा मधील 'फिरता फिरता' हे article मी नेहमी वाचते..खूप छान लिहता तुम्ही....मेरा भारत महान....(नाव बरोबर आहे ना?..नीट आठवत नाहीय..पण संपूर्ण लेख मात्र आठवतोय..)..तर भन्नाटच होता. आई म्हणते जे आवडते त्याला मनापासून दाद द्यावी.आपले विचार पोहोचवावेत समोरच्या पर्यंत. तुमच्याकडून असेच लेखन होत राहो..आणि तुमच्या दृष्टीकोनातून,अनुभवातून आमच्या समोर जगाचे विविधांगी पैलू उलगडत राहोत हिच सदिच्छा..तुमच्या पुढील आयुष्यासाठी आणि लेखनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा..Thank u so much and all the best .."

लागोलाग सानिया ची फ्रेंड रिक्वेस्ट आली. तर प्रोफाईल पिक एका फ़ेमस शास्त्रज्ञाच.
मुलगी मुंबईतली. बारावीत ली. मराठी पहा तिचं. आणि प्रोफाईल पिक्चर नाही. मला तर ग्यारंटी वाटली, फेक अकौंट आहे हे. आणि मी त्या दृष्टीने डाव टाकत राहिलो. ती बिचारी १७ वर्षाची पोर. तिला काय कळणार छक्के पंजे. ती आपली प्रत्येक प्रश्नाला उत्तर देत राहिली, प्रत्येक पोस्टला तिचं मत इमानएतबारे मांडत राहिली. अप्रतिम मराठीत. पण मत मेसेज बॉक्स मध्ये, पोस्ट वर कॉमेंट म्हणून नाही. माझं मत पक्कं होत गेलं, कि हे प्रकरण आहे म्हणून. मी शेवटचा डाव टाकला "तुझ्या वडिलांचा नंबर दे म्हणून" तिने दिला. मी तिच्या सानियाच्या वडिलांशी बोललो. काय लोकं आहेत राव. एकदम जमिनीवरचे. आई वडील शिक्षक. ३००-३५० गरीब मुलांना शिकवतात.

मला माझीच लाज वाटली. सालं, काय झालं आपल्या मेंदूचं, मातेरं. सगळीकडे संशय. विश्वास म्हणून नाहीच कुणावर.

त्यानंतर मात्र मी सानियाच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देत राहिलो. मनापासून. तिची वाक्यं ही वानगीदाखल देतो खाली, ज्यावरून कळेल ही मुलगी किती सेन्सिबल आहे ते

"गुगल वर तुमचे सुपरपॉवर हे आर्टिकल वाचले. एकंच शब्द लिहावासा वाटतो Eunoia "

"हाय, इतक्या उशिरा टेक्स्ट केला म्हणून सॉरी. तुमच्या फ्रेंड लिस्ट मध्ये पंडित पॉटर आहेत. त्यांनी अर्गासोक टी या विषयावर पोस्ट वाचली. माझ्या फार्मेंटेड ड्रिंक्स च्या माहितीप्रमाणे ह्या टी चा तब्येतीच्या फायद्या विषयीच्या दाव्याला काहीही शास्त्रीय आधार नाही. तुम्ही कळवा पंडित काकांना"

"विज्ञानाचा प्रसार आणि त्या विषयी भारतीय प्रसार माध्यमाची भूमिका या विषयावर तुमचं काय मत आहे?"
(काय मत आहे? काहीच नाही. फुल दांडकं उडालं माझं.)

"तुमच्या म………… मरणाचा यावर चार ओळी वाचल्या. माणसाने संकुचित, कुपमंडूक वृत्ती सोडून व्यापक विचार करायला हवा, असंच म्हणायचं आहे का तुम्हाला"

काल तिचा वाढदिवस झाला. तिला शुभेच्छाही दिल्या काल. आज ही पोस्ट च लिहून टाकली, सानियासाठी.

सानिया, काल लिहिल्याप्रमाणे तुझ्या सारखी मुलं मुली भेटली कि परिस्थिती जितकी समजली जाते तितकी वाईट नाही असं वाटतं.

(नाव बदललं आहे.)

Thursday, 23 April 2015

काय करणार मग

आतापर्यंतच्या आयुष्यात मला ५-६ जण असे मित्र मैत्रिणी भेटले की जे कारण नसताना माझा अपमान करत असतात. म्हणजे मी त्यांच्या अध्यात नसतो, मध्यात हि नसतो. जो काही माझा आणि त्यांच्यातला संवाद असतो तो, मग ती टिंगल टवाळी असो, कि एखाद्या सिरियस विषयावर डिस्कशन असो, माझ्यातर्फे त्या व्यक्तीचा आब राखून आणि त्याच्या माझ्या मैत्रीची योग्य ती जाण ठेवून होत असतो. अर्थात असा माझा समज आहे.  ह्यातील काही समवयीन आहेत, काही मोठे आहेत, काही वयाने लहानही आहेत. समवयीन मित्रांना "छोड दो, दोस्त हि तो है" तर मोठ्यांना "जाऊ दे बा, वयाने मोठे आहेत" तर लहानांना "जाऊ दे चल, लहान आहे अजून माझ्यापेक्षा" असं म्हणून मी माझ्यापुरता तो विषय बंद करतो. अर्थात संवाद चालू राहतो. पण त्यात मजा नसते, आपुलकी नसते. त्या मित्रांना हि जाणवतं ते. मग ते मधेच कधीतरी मऊसुत बोलतात कि मी हि झालेला अपमान विसरून जातो आणि मैत्रीचा झरा परत खळाळत राहतो.

पण हे असं पुन्हा पुन्हा होत राहतं.

साधारण पणे माझ्या मनाच्या हंडयात एका मित्राने केलेले २५ एक अपमान मावू शकतात. ते झाले कि मग मात्र मी त्या व्यक्तीला फाट्यावर मारतो.

अर्थात मी त्यांच्याशी बोलणं थांबवत नाही. म्हणजे  त्यांना हाकलून देत नाही तर मीच त्यांच्यापासून दूर पळून जातो. अगदी कोसो दूर. कधीही आता ते मला भेटू नयेत हि इच्छा ठेवून. आता त्या व्यक्तीची आठवण माझ्या मनात एक मानवी पुतळा म्हणून राहते. ममता, प्रेम, मैत्री, आदर, जिव्हाळा या भावना आटून गेलेल्या असतात. कधी चुकून माकून समोर आलेच तर हाय- Hello, तोंड देखलं हसू अगदी बेमालूम पणे करतो. मादाम तुसाद मध्ये कसं आपण एखाद्या पुतळ्याशेजारी उसनं हसू आणत उभं राहतो तसंच.

माझ्या तोंडावर हसू असलं तरीही मी मनातून त्या माणसाला फाट्यावर च मारलेले असते.

काय करणार मग  

Wednesday, 22 April 2015

घर नको मला घर

सगळे असंच करतात, म्हणून आपण पण असंच वागायचं या नियमाखाली आयुष्यात बर्याच गोष्टी घडतात. स्वत:चं घर असायला हवं ही अशीच एक गोष्ट. भारतासारख्या देशात घराचं value proposition काय हा नेहमीच डोक्यात वळवळणारा प्रश्न. घर घेतलं, म्हणजे asset झाली या वाक्याची सत्यासत्यता काय? आणि मग सुरू होतात नोशनल असणार्या पण कागदोपत्री वाढणार्या किंमतीची गणितं.

पुण्यासारख्या शहरात २ बीएचके घरासाठी शहराच्या बाहेर ही ५० ते ६० लाख मोजावे लागतात. ८% रेट ऑफ़ इंटरेस्ट रू ४ लाख जमा होतील. म्हणजे महिन्याला ₹ ३५००० खर्च करण्याची ताकद तुमच्यात येते. दोन वर्षापूर्वी कॉलनी नर्सिंग होम शेजारी ३ बीएचके, फर्निश्ड फ्लँट ₹ २२००० ला मी स्वत: भाड्याने पाहिला होता. आणि परत तो सुपर बिल्ट अप प्रकार. पांढरा हत्ती असलेला स्वीमिंग पूल, दोन तीन वर्षात इक्विपमेंट कंडम होणारी जिम, काहीही कामाची नसलेली लँडस्केपिंग असल्या भंगार गोष्टीचे पैसे आपण बिल्डरच्या घशात टाकत असतो. जसे दिवस चाललेत तसे आतले धोकादायक रस्ते, बंडल क्वालिटीच्या आणि छोट्या लिफ्ट, कारच्या किंमतीएवढी पार्किंगची किंमत असा काहीही मनमानी प्रकार चालू आहे. परत कार्पोरेशन टँक्स आणि सोसायटी मेंटेनन्स वेगळा भरावाच लागतो.

घरात जितके पैसे महिन्याला येतात त्याच्या २०-२५%  EMI येत असेल तर घर विकत घेण्यात अर्थ आहे. नाहीतर इतर महत्वाच्या खर्चाला कात्री लावावी लागते.

या पार्श्वभूमीवर भाडे देऊन का राहू नये असा मनात विचार डोकावत राहतो.

बाकी त्याचे फायदे बघा

- कॉऑपरेटिव्ह सोसायटी नावाच्या विनोदी प्रकारापासून सुटका.
- घर बदलण्याची टांगती तलवार डोक्यावर असल्यामुळे घरातलं सामान वजनाला हलकं (पर्यायाने किमतीला), जेवढं पाहिजे तितकंच (पोटमाळे आहेत, म्हणून भरा सामान असं राहणार नाही)
- ज्या भागात नोकरी, शाळा त्यानुसार घर शोधण्याचं स्वातंत्र्य
- म्हातारपणी वृद्धाश्रमात जाताना घराची attachment नाही.
- घर नावाच्या मालमत्तेवरून वारसांची भांडणं नाही.
- दुसरं काही, परदेशदौरा वैगेरे, करण्यासाठी पैसे राहतात.
- परत ज्या बदलता येतील त्या गोष्टी आयुष्यात बदलाव्या. घर बदलण्यात आनंद मानावा.

पहिल्या वाक्यात लिहीलेलं value proposition चं गणित पाश्चिमात्य देशात राहणारे लोकं जास्त योग्य पद्धतीने सांगू शकतील. एकच उदाहरण देतो. अमेरिकेन मित्राने दीड वर्षापूर्वी शिकागो मध्ये (म्हणजे २० किमी दूर, पुण्यापासून वाघोली वैगेरे अंतर) २ एकराच्या प्लॉट वर ४००० sqft चं घर ४७०००० डॉलर्स ला विकलं.  म्हणजे जवळपास ३ कोटी रुपयाला. आता विचार करा, एक तर पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर सारख्या शहरात ३ कोटी रुपयात २ एकराचा प्लॉट अन ४००० sqft घर मिळेल का? शिकागो मध्ये घराशिवाय मिळणाऱ्या गोष्टी आणि त्या या शहरात मिळू शकतील का?

कंपनी साठी आम्ही जागा विकत घेतली. अमेरिकन लोकांनी विरोध केला. जमिनीत पैसे invest करण्यापेक्षा equipment मध्ये पैसे गुंतवा, कंपनीची पत वाढेल. आम्ही काही बाही स्टोर्या सांगून पटवलं. अन जमीन विकत घेतली. आता बोंबलायला ती न NA होत आहे न पुढे काही काम करता येत आहे.

हि थियरी मी  स्वत:च्या पोरांना तरी पटवू शकेल का?…………. कदाचित "हो".








Saturday, 18 April 2015

माझाही मसाज

बँकॉक पटायाची टूर. सहकुटुंब सहपरिवार. साल २०११. खरं सांगू, मला नाही आवडली थायलंडची टूर. अाढ्यतखोर आणि चालू वाटले, थाई लोकं. अर्थात आपल्या भारतीयांनीच झुंडीच्या झुंडी जावून अन नंतर येड्यासारखे वागून आपली प्रतिमा बेकार बनवली असावी. जे काय असेल ते, मला कृत्रिम अशी पर्यटनस्थळं, इंजेक्शन टोचून माणसाळवलेले वाघ, हॉटेल रिसेप्शन चे शंकखोर लोकं, छ्या नाही जमलं. असो, विषय वेगळा आहे.

थाई मसाज, याबाबतीत मी फार ऐकून होतो. अर्थात ही केसरीची टूर. सगळीच मंडळी आमच्यासारखी मध्यमवर्गीय. हं, केरळ ट्रीपचा खर्च प्रत्येकी ३५,००० होतो. थोडे अजून टाकून फॉरेन ट्रीप करू, असे म्हणून आलेले. टूर मँनेजर ने घोषणा केली, उद्या आपण थाई मसाज ला जाणार आहोत. ५०० बाथ का काहीतरी चार्ज होता. माझ्या मनात हो की नाही याविषयी काही प्रश्नच नव्हता. आणि बायको पण म्हणाली, जाऊ म्हणून. 

झालं, दुसर्यादिवशी आमची वरात पोहोचली. शासन मान्यताप्राप्त वैगेरे लिहीलं होतं, मसाज सेंटरला. आत गेलो. शांतता च शांतता. बोलणार्या पोरी अतिशय हळू आवाजात, इकडून तिकडून सुळकन चालत होत्या. वैभवी माझ्या कानात म्हणाली "काय रे, तुला मसाज करायला माणूस च असेल ना?" मी आपला साळसूदपणे म्हणालो, "काय माहित नाही बुवा, पण असेल ही माणूस बहुतेक" मला माहित होतं खरं काय ते, पण बोंबलायला ते सांगितलं असतं, तर तिथून परत गेलो असतो. मी म्हणजे अगदी सत्यनारायणाच्या पुजेला बसताना जसा सभ्य चेहरा असतो तसा करून खुर्चीत बसलो होतो. हृद्यात फुटणार्या उकळ्या, खरंतर शरीराच्या अनेक भागात, चेहर्यावर दिसू नये म्हणून आटोकाट प्रयत्न करत होतो. 

झालं, आमचा नंबर आला. बायकांना वेगळा हॉलमधे नेलं, आणि आम्हा पुरूषांना वेगळ्या. तिथल्या गाद्या संपल्यामुळे मला अजून एका वेगळ्या मोठ्या खोलीत नेलं. मिणमिणता प्रकाश होता खोलीत. मंद संगीत चालू होतं. माझ्याशिवाय दोन चार फॉरेनर्स उताणे पडले होते. 

मला कपडे काढायला सांगितलं, ओहो सॉरी सॉरी, कपडे चेंज करायला सांगितलं. त्यांचा ड्रेस दिला. घळघळीत एकदम. ते कपडे चढवून गादीवर पडलो. आणि मग आली ती सुहास्यवदना. या थाई बायकांचं एकतर वय कळत नाही, पण असेल पन्नाशीची. पन्नास वजन हो. हलकी फुलकी, हो म्हणजे कळलंच नंतर ते. कटी बद्ध. हेलनची ती कटी, झीनतची आहे ती कमर आणि टुणटुण ची आहे ती कंबर असं आमचे सर शाळेत शिकवत. तर हीची होती ती कटी. बाकी नाकीडोळी नीटस. परीच जणू. 

आमचा पुण्यातला मसाज करणारा माणूस चालू व्हायच्या आधी पाया पडतो. म्हणजे मसाज करताना मी गचकलोच तर देवापर्यंत त्याचा नमस्कार पोहोचेल म्हणून. त्याची पद्धतही तशीच, रगडवणारी. आश्चर्य म्हणजे या कन्यकेनेही नमस्कार केला. आयला, म्हंटलं काय करते ही बया. 

पण काही नाही, तिने हाता पायाच्या बोटापासून सुरूवात केली. आणि मग हात, पाय याला ती हलकेच दाब देत राहिली. कधी कुठे दुखलं की मी कळवळायचो, तर तेव्हा हलकेच कानात किणकिणायची "any problem" मी नाही म्हणालो की हलकेच हसायची. मग माझे पाय ओणवे करून त्यावर तिने हलकेच बसण्याचा कार्यक्रम झाला तर कधी पाठीवर रेलून पाठीचा हलकेच व्यायाम झाला. मला पालथं झोपवून पाठीवर हलकेच बसून तिने हात मुडपले. असा सगळा एक ४५ मिनीटाचा कार्यक्रम झाला. खरं तर अजून वेगवेगळे हलकेच व्यायाम झाले, पण आता मला ते सोयीस्कर रित्या आठवत नाही आहेत.  (मला माहित आहे मित्रांनो, हा परिच्छेद वाचताना नाही नाही ते विचार तुमच्या मनात येत आहेत. त्यामधे "काय सज्जन माणूस आहे हा, पासून ते, येडंच आहे हे" इथपर्यंत वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असतील. असो. मला कल्पना आहे, तुमच्या विचारप्रतिभेला इतके धुमारे फुटताहेत की परिच्छेद हा शब्दही अश्लील वाटतो आहे)

टूर मँनेजर ने ५० ते १०० बाथ टीप द्यायला सांगितली होती. मी अर्थातच ५० बाथ दिली अन बाहेर आलो. वैभवी बाहेर उभीच होती, म्हणाली "काय रे, इतका गुलूगुलू काय हसतो आहेस?" मी बोललो "काय नाय बुवा, कुठं काय?" तर म्हणाली "काय फरक वाटला सतीशमधे (पुण्यातला मला बडवणारा) आणि इथल्या माणसामधे" मग तिला सांगितलं कोण होतं ते, तर म्हणाली "आरशात रंग बघ स्वत:चा. काळ्या रंगात गुलाबी रंग मिसळून जांभळा दिसतो आहेस" तिचं वर्णन ऐकल्यावर वैभवीने पुढं विचारलं "तिला म्हणाला नाहीस ना, गृहकृत्यदक्ष आहेस का म्हणून" मला खरं तर वैभवी काय बोलत आहे काहीच कळत नव्हतं . राग, लोभ, अपमान या सगळ्या भावनांवर मी विजय मिळवला होता. 

दोन दिवसांनी मी उड़त परत भारतात आलो. म्हणजे विमानानेच. 

त्यानंतरही  मला सतीश, आजकाल कुणी प्रदीप म्हणून राक्षस आला आहे, रगडतच आहे. पण दु:खाचे असंख्य उन्हाळे सोसल्यावर सुखाचा एखादा पावसाळा बघायला मिळतो या न्यायाने मला परत बँकॉकला जायला मिळेल, अन यावेळेला कदाचित कंपनीच्या सेल्स मीटला एकट्यानेच, यावर माझा दृढ़ विश्वास आहे. 

- सदर पोस्ट बँकॉकच्या मसाजने तावून सुलाखून निघालेले अन त्यामुळे आता प्रंचंड उर्जाधारक असलेले राहुल गांधी यांना समर्पित. राहुलजी, तिकडे हलकेच घेतलं असेल, पोस्टही हलकीच घ्या.

(तिथली करन्सी बाथ आहे, हा एक विलक्षण योगायोग आहे) 

Thursday, 16 April 2015

दिव्यत्वाची जेथ प्रचिती

तो शाहरुखचा डायलॉग आठवतो का ओम शांती ओम मधला. तुम्हाला खरं सांगू का "ओम शांती ओम' म्हंटल कि मला कर्ज मधला "मेरी उमर के नौजवानो" वाला रिषी कपूर च आठवतो. पण असो तर तो डायलॉग "आप दिलसे अगर कुछ चाहो तो सारी कायनात……" वैगेरे. माझ्याबरोबर अशा असंख्य गोष्टी घडल्या आहेत. एक अगदी अशातली. २०१० सालची.

आम्ही सी डी ओ मेरी शाळेचे विद्यार्थी गेट टुगेदर जमवत होतो. त्या कार्यक्रमासाठी जुने फोटोग्राफ वापरून एक सीडी बनवण्याचा प्लान होता. फोटो तर गोळा झाले. गाणीही जुळवली. आमच्या शाळेत कुसुमाग्रज, शिवाजीराव भोसले, ना धो महानोर अशी ऋषितुल्य मंडळी येउन गेली होती. अन त्यांच्या सिक्वेन्स ला मला पुत्र व्हावा ऐसा मधील "दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती" हेच गाणं हवं होतं. २०१० ला यु टयूब वर हे गाणं मिळत नव्हतं. आजही तुम्ही हे गाणं सर्च केलं तर तुम्हाला मूळ गाण्याची फक्त एक लिंक मिळेल. सगळ्या फोटोंना गाणी जुळवून झाली. पण दिव्यत्वाची……. राहिलं होतं फक्त.

मग काय माझा शोध चालू झाला. प्रथम आमचा एरिया पालथा घातला. म्हणजे फातिमानगर. फातिमानगर? या भागात हे गाणं मिळालं असतं तरच एक आश्चर्य. तिथे कुणीतरी सांगितलं "बुधवार पेठेत जा" मी निघालो. बायकोने विचारलं "कुठे निघालास?" मी सांगितलं "बुधवार पेठेत". बस, आता बाकीचं लिहित नाही. त्यावर दुसरा लेख तयार होईल.

तिथे तीन चार दुकानं पालथी घातली. नाही मिळालं. या सगळ्या प्रकारात दोन दिवस गेले.

अलूरकर बंद झालं होतं. म्हंटल त्याच्या आजूबाजूला काही मिळतं का ते बघावं. थोडं पुढं गेल्यावर नळ  स्टोप च्या अलीकडे एक दुकान सापडलं. मराठी माणूस होता. अख्खं दुकान उलटं पालटं केलं. दोन तास अथक प्रयत्न केल्यावर थांबलो. तो म्हणाला "लक्ष्मी रोड ला पंकज मध्ये बघा". झालं दुसर्या दिवशी पंकज मध्ये. तर तिथेही तीच तऱ्हा. ते जास्त प्रोफेशनल. कॉम्प्युटर मध्ये मारलं. त्याने सांगितलं "नाही बा" मी प्रचंड हिरमुसलो.

ते गाणं इतकं चपखल होतं, कि मला दुसरं कुठलं गाणं मनाला पटतच नव्हतं. पण काय करणार, कुठे मिळतच नव्हतं. दु:खी मनाने प्रताप कडे निघालो, पौड रोड ला अजंता अव्हेन्यू मध्ये राहतो. जाताना विचार करत होतो, कुठलं बसेल गाणं? पण काही सापडत नव्हतं. मन पुन्हा पुन्हा "दिव्यत्वाची……" कडे येउन थबकत होतं.

ह्या विचारात असतानाच पौड रोड ला कृष्णा हॉस्पिटल च्या अलीकडे एक दुकान दिसलं. सीडी मिळत होत्या. म्हंटल चला, एक लास्ट ट्राय मारू. कार पार्क करून केली. दुकानात घुसलो. सेल्समन ने विचारलं "काय हवंय" मी काही बोलण्याच्या मनस्थितीतच नव्हतो. दुकानात नजर फिरवली. उजवीकडच्या rack वर पिवळा कव्हर असलेला दोन सीड्यांचा बॉक्स दिसला "मनातली गाणी". सेल्समन शी न बोलता मी सरळ तो बॉक्स हातात घेतला अन उलटवून गाण्यांची नावं बघत होतो. तर थेट डोळे  दुसर्या सीडीतल्या चौथ्या गाण्यावर जाऊन स्थिरावले "दिव्यत्वाची जेथ प्रचिती……" चित्रपट: पुत्र व्हावा ऐसा, गायिका: आशा भोसले, गीतकार: बा भ बोरकर, संगीत: वसंत प्रभू .

अन मी जोरात ओरडलो "Yes"
*****************************************************************************


दिव्यत्वाची जेथ प्रचिती
तेथे कर माझे जुळती

गाळुनिया भाळीचे मोती
हरिकृपेचे मळे उगवती
जलदांपरी येउनिया जाती
जग ज्यांची न करी गणती

यज्ञी ज्यांनी देउनि निजशिर
घडिले मानवतेचे मंदिर
परी जयांच्या दहनभूमिवर
नाहि चिरा नाही पणती

जिथे विपत्ती जाळी, उजळी
निसर्ग-लीला निळी काजळी
कथुनि कायसे काळिज निखळी
एकाची सगळी वसती

मध्यरात्रि नभघुमटाखाली
शांतिशिरी तम चवऱ्या ढाळी
त्यक्त, बहिष्कृत मी ज्या काळी
एकांती डोळे भरती

(माझं आवडतं कडवं बोल्ड केलं आहे. येडा होतो ऐकल्यावर)


म…… मरणाचा

गतआयुष्यातील अजाणतेपणा मुळे झालेल्या चुकांचे परिमार्जन मरेपर्यंतच्या आयुष्यात जर झाले नाही (अर्थात हे परिमार्जन हि माझ्या अजाणते मधेच होणार ही माझी सोयीस्कर समजूत आहे) अन मरताना काही बरळलो, तर तिच्या मारी खांदे द्यायला चार माणसे जरी भेटले तरी स्वत:ला नशीबवान समजेल. 

अन काही न बरळता मेलो तर काही सिक्रेट्स माझ्याबरोबर जळून मरतील. 
कसली कोट्यावधी सिक्रेट्स दररोज गाडली जात नसतील नाही जगात, प्रत्येक मृत्यूबरोबर. तो डाटा स्टोर करायला जगातल्या यच्चयावत कंपन्यांचे सर्वर्स  पुरे पडायचे नाहीत. 

येड्पाटलो विचार करतानाच. 
*************************************************************************************************************************

तुम्ही नाचता, मग आम्ही पण नाचणार. त्यांना लाऊड स्पीकरची परवानगी, मग आम्हाला पण. त्यांना मिरवणूक, मग आम्हाला मिरवणूक. 

जो समाज पहिल्यांदा "आता पुरे" म्हणेल तो खरा प्रोग्रेसिव्ह. मरायच्या आधी बघायला मिळालं हे स्थित्यंतर तर आनंद आहे.

***************************************************************************************************************************

हे वाचून मेल्यानंतर मला ओसामासारखं गायब व्हावसं वाटतय. समुद्राच्या तळाशी फेकून द्यावं कुणीतरी. मासेबिसे ऐश तरी करतील

म…… मरणाचा 

Friday, 10 April 2015

मुस्तफ़ा

सकाळी निघालो, कंपनीत जायला. ८:३० ची वेळ. जांभुळकर चौकातून उजवीकडे वळल्यावर तो दिसला. जेमतेम १० वर्ष वय. नीटस होता. तब्येतीला ठीकठाक. आमच्या नीलसारखा. मला लिफ्ट मागितली. कधीतरी मी उचलतो लोकांना. परत हे पोर, नीलसारखं. आपसूक ब्रेकवर पाय दाबला गेला. पोरगं आलं मागून धावत. बसलं कारमधे. संवाद चालू झाला. साहजिकच होतं म्हणा ते.

मी: कुठं सोडू.
तो: क्या
मी: अरे, किधर छोड़ू, मराठी बात नहीं करता क्या
तो: नहीं, मराठी नहीं आती. मुसलमान हूँ
मी: पुना के हर मुसलमान को मराठी आता है। क्या नाम है तेरा। कितना उम्र?
तो: मुस्तफ़ा. लखनऊ से आया हूँ, तीन महिने हो गये।दस साल का हूँ

मी: किधर छोड़ू । किधर जा रहा है
मुस्तफ़ा: खेडं शिवापूर.
मी: स्वारगेट छोड़ता हूँ। उधरसे कैसा जायेगा
मु: ऐसाही लिफ्ट माँगते। पैसा जो लाना है
मी: दर्गा जा रहा है क्या?
मु: नहीं, खाला के घर जाना है। वो देगी २०० रू.
मी: तो अकेला जायेगा क्या इतना दूर
मु: क्या करू, अम्मी बोली, घर मे खाने के लिये कुछ भी नहीं। आज पैसे नही मिले तो भूखा रहना पड़ेगा।
मी: तेरे पिताजी किधर है?
मु: अब्बा हडपसर के आगे लोणी मे कही मोटर गँरेज मे काम करते। आते नही घरपे, अम्मी को पैसे नही देते। इसके लिए खालासे उधार लाऊँगा।

मला नाही राहवलं, विचार केला. दहा वर्षाचं हे पोर, नीलएवढं. तीन महिन्यापूर्वी पुण्यात आलेले. टल्ली खात खेड शिवापूरला एकटं जाणार. ९ ची वेळ. पोहोचणार कधी. येणार कधी.

मी: एक काम करते है, मैं १०० रू देता हूं. चलेगा.
मु: अम्मी बोली, घर मे कुछ भी नही. सब सामान लाना है, २०० रू लाना.

मी पुलगेट ला गाडी बाजूला घेतली. २०० रू दिले.

मी: पैसा दे रहा हूँ। उड़ाएगा नही ना, इधरउधर
मु: नही, सीधा अम्मी के हात मे दूँगा। सच्ची बात करता हूँ। झूठ नही बात करूँगा
मी: यहाँ से रास्ता मालूम है क्या? जाएगा?
मु: हा, जाऊँगा

ही अशी परिस्थिती आहे आपल्याइथे. दहा वर्षाचं कोवळं मुल. २०० रू साठी पुण्याहून, खेड शिवापूरला जातंय, एकटं. आणि इकडे माझ्यासारखा भांडवलशाहीचा पाईक २०० रूपयात फेसबुकचं एक स्टेटस विकत घेतोय, गरीबांचं भलं करण्याच्या नावाखाली. आणि असल्या विषम व्यवस्था असलेल्या अशक्त समाजाच्या हातात आहे म्हणे उद्याच्या आर्थिक महासत्तेचं भविष्य सुरक्षित.

मी विचारांच्या वावटळीत असताना मुस्तफ़ा गाडीतून उतरला "thank you" म्हणत. अन २०० रू होते त्याच्या चिमुकल्या मुठीत घट्ट आवळलेले. झपझप चालू लागला, अम्मीकडे. मी अनिमिष नजरेने त्याला परत एकदा पाहिलं.  त्याच्या नजरेतून त्याने मला निरागसपणे हसू पेरत बाय केलं.........नीलसारखं 

Saturday, 4 April 2015

रिक्षा

खर्चाच्या बाबतीत मी असा फार काटकसरी वैगेरे नाही आहे. किंबहुना जरा माझा हात ढिल्ला च आहे. पण तरीही कुठलीही गोष्ट विकत घेताना किंवा उपभोग घेताना मला जर माझ्या अपेक्षेपेक्षा चांगलं मिळालं तर मी खूप खुश होतो. हे प्रवासाच्या साधनाबद्दल हि लागू होतं. रेल्वे माझं फेवरीट. मला नेहमीच वाटत आलं कि आपण जे तिकीट काढतो त्या मानाने रेल्वे खूप जास्त देते. बस प्रवासात KSRTC चा मी फ्यान आहे. तिकीट, त्यांची स्वच्छता, त्यांचं टायमिंग, बस चे stop यात KSRTC सगळ्यात बेस्ट आहे. पण MSRTC मला नाही झेपत. मुंबई पुणे मुंबई या निळ्या रंगाच्या कॅब मस्त आहेत. तितकाच काही प्रायवेट कॅब सर्विस चा मी तिरस्कार करतो. गेली २१ वर्ष मी कुठल्या न कुठल्या चाकावर फिरतो आहे.

या सगळ्या प्रवासात जर मला कुठल्या वाहनाचा मनापासून तिरस्कार करत असेल तर तो रिक्षा या प्रकाराचा. रिक्शाचं तकलादू डिझाईन, मी ज्या ज्या वेळी रिक्षात बसलो त्यावेळी असलेली त्यांची अवस्था, कुठल्याही ऋतूत तुमचं कुठल्याही प्रकारे रक्षण न करू शकेल अशी विचित्र आसन व्यवस्था आणि या सगळ्यावर कडी करणारी रिक्षा चालावणार्याची माजोरडी वृत्ती. या सगळ्या गोष्टीमुळे इतर सर्व वाहनांवर विलक्षण प्रेम करणारा मी रिक्षा आणि रिक्षावाला याचा मी मनस्वी तिरस्कार करतो. 

आणि हि भावना एका रात्रीत आलेली नाही. वर्षानुवर्षे सतत च्या अनुभवामुळे वयाच्या ४७ व्या वर्षी या निष्कर्षाला मी पोहोचलो आहे. अपघात झाला तर रिक्षा जी चोळामोळा होते त्यावरून त्याच्या डिझायनर ची हे असलं बनवण्याची काय प्रेरणा आहे हे अभ्यासणं खरंच उद्बोधक ठरेल. ते Piaggio कंपनीच्या रिक्षा म्हणजे ऑटोमोबाईल डिझाईन चं सगळ्यात घाणेरडं रूप आहे हे माझं स्पष्ट मत आहे. हे आत्ता रियर इंजिन वाल्या रिक्षा आल्या म्हणून ठीक तरी आहे, पण ९६ साली मी अहमदाबाद ला पुढे इंजिन असलेल्या रिक्षात बसल्यावर अशी हालत झाली कि २० व्या किमी ला मी म्हणालो "भाऊ, हे तुझे २२० रु. मी जातो परत कसंही. पण तुझ्या रिक्षातून नाही". पावसाळ्यात माणूस भिजतो, हिवाळ्यात थंडी वाजते, उन्हाळ्यात गरम हवा लागते आणि प्रदूषण असेल तर डोळे चुरचुरतात अशी विचित्र बसण्याची जागा बनवणाऱ्या ला माझा कोपर्यापासून नमस्कार. 

आणि ह्या वरचा कहर म्हणजे उद्दाम वृत्ती. आतापर्यंतच्या शेकडो रिक्षा प्रवासात मला एकही रिक्षावाला धड मिळू नये हे नवलच नव्हे काय. पार माझ्या आजोबांपासून ते थेट माझ्यापर्यंत घरातल्या प्रत्येकाचं रिक्षावाल्याबारोबर पैशावरून भांडण झालं आहे. मागच्या आठवड्याची गोष्ट. स्वारगेट वरून MH १२ AU ३८८ या रिक्शाचं रात्री तीन वाजत माझ्या घरापर्यंत मीटर वर १२६ रु झाले. इनमिन ५ किमी अंतर. ४० रु पेक्षा किमी ला भाव. अरे, कुणाला येडं बनवता राव. बरं इतकं करून तुम्ही एकाच्या दोन अन दोनच्या चार रिक्षा करता का? मी असा फसवून गरीब होत नाही पण तुम्ही हि श्रीमंत होत नाही. तुमच्या गाडीत बसल्यावर भरधाव वेगाने चालवता, अन गाडीत गिऱ्हाईक नसेल तर रस्त्याच्या मधून १०-२० च्या स्पीड ने चालवून पूर्ण ट्राफिक चा खेळ खंडोबा करता. ऐन मोक्याच्या ठिकाणी रिक्षाचा मागचा भाग बाहेर काढून उभे राहता. ट्राफिक मध्ये अडकाअडकी झाली अन आपण समोरून आलो कि हे बरोबर उलटया बाजूने येणार अन आपल्याकडे बघणारच नाही. सगळ्यात हॉरिबल प्रकार म्हणजे रात्री बेरात्री बाहेर गावाहून आलो कि ते जे अपमानित करून बोलवतात. डोक्यात जातात. "ओ चष्मेवाले" "ए निळा शर्ट वाला आपला" "लाल छडी आपल्याकडे" एकदा शिवाजीनगर ला एक खेड्यातला माणूस आपल्या सुस्वरूप तरुण मुलीबरोबर आला होता. दोन चार रिक्षावाले उभे होते. त्यातला एक मुद्दामून "चला, मामा सोडू का कुठे?" आणि मग खिदळत एकमेकांना टाळी. एकदा मुसळधार पावसात एयरपोर्ट ला एक रिक्षावाला घरी सोडायला तयार नव्हता. शेवटी एका मित्राला बोलावून येरवडा ला सोडायला लावलं आणि मग तिथून गेलो.

योग्य ते पैसे घ्या हो. नाही म्हणत नाही मी पण त्या पैशाचा योग्य मोबदला तर दया. आणि तसा दिला तर राजीखुशीने एक्स्ट्रा पैसे देतोच आम्ही. मग आता ओला कॅब  किंवा मेरु आली कि कसली पळता भुई थोडी झाली. लहान पोरासारखं रडता आहात आता. यांना धंदा करू नका देऊ म्हणून, त्यांच्या ड्रायवर लोकांना मारता. अरे काय राव. दम असेल तर करा कि दोन हात इमानऐतबारे.

या देशात मुळातच पब्लिक ट्रान्स्पोर्ट नाही आहे. अन त्यामुळे तुम्ही धंदा करू शकता. तुमच्या इतक्या वर्षीच्या बेदरकार स्वभावामुळे आता तुमच्या धंद्यावर आच आली आहे.

पब्लिक ट्रान्स पोर्ट बद्दल सुंदर वाक्य आहे "विकसित देश तो नाही कि जिथे गरीब लोक कार घेण्याचं स्वप्न बघतात तर विकसित देश तो आहे जिथे श्रीमंत लोक फिरण्यासाठी पब्लिक ट्रान्सपोर्ट चा वापर करतात"

विचार करा, हे असं होईल तेव्हा काय होईल ते. देव तुम्हाला सद्बुद्धि देवो. अजून काय लिहू.