परभणी.........माझ्या मनाच्या कोपर्यात अलगद बसलेलं गाव. खरंतर मी कधीही सलग राहिलो नाही आहे परभणीत. अहो, इतकंच काय, माझा जन्मही नांदेड चा. पण कुणीही कधीही विचारलं की तु कुठला की माझ्या तोंडून आपसूक निघून जातं, परभणीचा. म्हणजे अगदी चेन्नई, बंगलोर, दिल्ली या गावातही ह्या प्रश्नाचं उत्तर परभणीच. आणि अगदी सांगतो "you know Aurangabad. 3 hours train journey from A'bad". शाळेतली उन्हाळ्याची आणि दिवाळीची सुट्टी ही मी परभणीतच घालवली.
माझं आजोळ, म्हणजे आईचं घर, मुक्ताजीन. बस स्टँडच्या च्या शेजारी ज्या आता पडक्या वास्तू दिसतात ते माझ्या आजोबांचं घर. केशवराव डंक. आणि जी मोकळी जमीन दिसते तिथं होती मुक्ताजीन. जिनिंग अँड प्रेसींग. कापसाची सरकी काढून त्याच्या गाठी बनवायची प्रेस.
घर, ज्याला चौसोपी म्हणता येईल असं. स्वयंपाकघर, त्याच्या शेजारी देवघर आणि जेवणाची खोली, त्यानंतर न्हाणीघर. या रांगेतल्या खोल्यांसमोर ८ फूटी मोकळी जागा. त्यात तुळशीवृंदावन आणि पाणी गरम करण्याचा अगड बंब. त्यासमोर मग धान्याची कोठी, अन बाकी किराण्याचं सामान ठेवण्याची खोली. त्यापुढे बायकांची शिळोपाच्या गप्पा मारण्याची खोली. त्याच्या उजव्या बाजूला दिवाणखाना. तर डावीकडे माजघर. त्यापुढे एक छोटी खोली, मामाची. समोर वर्हांडा. तिथल्या दोन आरामखुर्च्या. लाकडी. त्याचे हात वाढवता यायचे. दिवाणखान्यात गाद्या, तक्के त्यावर पांढर्या शुभ्र चादरी. बाकी जमिनीवर सतरंजी. त्यावर एका बाजूला लिहीलेलं केशवराव डंक.
उत्तरेकडे मोकळ्या जागेत हौद, जिथे आम्ही पोरं आंघोळी करायचो. त्या परसामागे प्रातर्विधी उरकायची जागा. मी ती कधी बघितलीच नाही ती. आम्ही रेल्वे पटरी ओलांडून पलीकडे जायचो. जर्मनीत मायकेलच्या घरी टॉयलेटमधे लायब्ररी, कार्पेट वैगेरे बघितल्यावर मला परभणीची रेल्वे पटरी आठवली.
मग गोठा. तिथे उभ्या असलेल्या म्हशी अन गायी. त्यांचा चारा अन कधी एकदा त्या भार्यात निघालेला अजगर.
अन तिथून चालत पूर्वेकडं आलं की स्वर्ग, म्हणजे बाग. फळांमधे चिक्कू, आंबा अन जांभळं. फूलांमधे गुलाब, मोगरा, रातराणी, चाफा. आणि या सगळ्यांवर कहर म्हणजे केवडा. तिथे वळचणीला कुठेही बसलो तर मोटेतून सोडलेल्या पाण्याचा खळखळता आवाज. पुण्यात रामटेकडीला वर गेलो की एसआरपीएफ ला पाण्याची टाकी दिसते. तिथून पाणी खळाळत बागेला जातं. मी केवळ तो आवाज ऐकायला तिथे जातो.
दक्षिणेकडे आजोबांची कचेरी, अन मग जीनचं प्रशस्त आवार. उंबराची, पिंपळाची अन अजून एक न आठवणारी झाडे. त्या झाडांखाली उन्हाळ्यात बाजेवर झोपून आकाशात मोजलेल्या चांदण्या.
आणि मग प्रत्यक्ष जीन, तिथे असलेल्या पांढर्या शुभ्र कापसाच्या राशी. अन मांडून ठेवलेल्या गाठी. त्या राशीत उंचावरून मारलेल्या उड्या. अन गाठींमधे लपाछपी.
जीनमधली तळघरात असलेली आणि यंत्राशी जिथे माझी पहिली ओळख झाली ती अजस्त्र हायड्रॉलिक बेलिंग प्रेस अन माझे विस्फारलेले डोळे. बाजूला इंजिनियर साहेबांचं, मिस्त्री, घर. त्यांची पोरं इसाक अन भुर्या. चहाखारीची पहिली चव, अन ते खाताना माझ्याकडे बघत डोक्यावर बोटं मोडत दृष्ट काढणारी अम्मी.
त्याच्या अलीकडे फाटक. अन त्या फाटकात रेल्वेच्या अजस्त्र इंजिनकडे भयचकित नजरेने बघत डब्यातल्या प्रवाशांना टाटा करणारी आम्ही मावस मामे भावंडं.
क्रमश:

No comments:
Post a Comment