तुम्हाला म्हणून सांगतो वयाच्या ४५ व्या वर्षी पर्यंत जात हा काय प्रकार होता माहितच नव्हतं. जी काय ओळख झाली ती फेसबुकवर. सुरुवातीला चार पाचशे मित्र होते तेव्हा हे सुसह्य तरी होतं. जास्त मित्र झाल्यावर आता त्याची धग जाणवायला लागली आहे. मी स्वत: आंतरजातीय विवाह केलेला. कंपनी चालवताना सुद्धा जात, धर्म या गोष्टीला अजिबात थारा नाही. पण आज काल इतर वेळेस अत्यंत हृदय स्पर्शी शब्दात मनोगत व्यक्त करणारे माझे काही मित्र, जेव्हा कुठल्या तरी दुसर्याच मुद्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून जातीवर गोळ्या झाडतात तेव्हा नवल तर वाटतेच, पण मनस्वी दु:ख होते.
कुठल्याही हि इतिहासातल्या गोष्टीकडे जातीचा चष्मा लावून ती पाहिली जाते तेव्हा त्याचा चुथडा होतो. मी स्वत: खूप मोठा अभ्यासक वैगेरे नाही आहे पण वाचन मात्र केलं आहे. आतापर्यंत माझ्याही मनात शंका उत्पन्न झाल्या आहेत, पण ते कालसुसंगत असेल असं वाटून समाधान करून घेतलं. चिवडत नाही बसलो. मग ते टिळकांचा गणेशोत्सव असो कि गांधींचं न समजणारं राजकारण असो. त्या काळात त्यांचं वागणं सुसंगत असेलही. त्या काळातल्या लोकांना हे सगळं करा, हे सांगण्याचं द्रष्टेपण तर त्यांच्यात होतं. पण मग नंतर आता ह्या सगळ्या प्रकारची गरज नाही हे तर्काधिष्ठित पद्धतीने सांगणारे द्रष्टे नेते आहेत कुठे. जे आहेत ते कालबाह्य गोष्टींचा उपयोग करून एकमेकांवर कुरघोडी करण्यात रममाण झाले आहेत. आणि आपण त्यांचेच समर्थक. आयला, जी मंडळी सावरकरांचा माफी वीर म्हणून त्यांच्या पुण्यतिथीला अन जयंतीला उद्धार करतात तीच मंडळी गो हत्या बंदी वेळेस मात्र "सावरकर म्हणाले,गाय उपयुक्त पशु आहे" चे फलक फडकावत होते. नव्वदीत उभारलेल्या सॉफ्टवेअर इंडस्ट्री ला २००० मध्ये Y २K प्रॉब्लेम न कळणाऱ्या पिढीचे प्रतिनिधी आपण ७०-१०० वर्षानंतर ती लोकं कशी चुकीची होती यावर खल करत बसतो.
नेते तर सोडाच, तर आपण संताना सोडलं नाही. ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, रामदास यांच्या जाती काढून एकमेकांवर गरळ ओकतो. हे म्हणजे अती झालं. नाठाळ च आपण. पण आपल्या डोक्यात काठी न मारणारे तुकाराम नाही आहेत हे आपलं दुर्दैव.
मुळात आपली चेतना, मग ती रागाची असो वा अभिमानाची असो, ती चेतवायला जातीचा वापर केला जातो हेच मुळात लांच्छनास्पद आहे. आम्हाला आमच्या गरिबीची लाज वाटत नाही, आमच्या इथे स्वच्छतेच्या नावाने बोंबाबोंब आहे, आपण भ्रष्टाचार हा शिष्टाचार समजतो, स्वतंत्र होऊन ६७ वर्ष झाली तरी उन्हाळा आला कि पिण्याचं पाणी नाही अशी बोंब मारत असतो. ह्या कुठल्याही गोष्टीची ना खेद ना खंत. आपण आपली जात अन धर्म सांभाळण्यात गर्क आहोत. आपण जातीवंत अन धर्मपालक विष्ठावान दुर्गंधी पसरवण्यात धन्यता मानतो.
असो. जुलै २०१३ पासून फेसबुक जोरात फडफडावयला लागलो. तेव्हापासून जात शब्दाचा उल्लेख असलेली एक पोस्ट टाकली अन ही आता दुसरी. आता यापुढे नाही.
जात
असो. जुलै २०१३ पासून फेसबुक जोरात फडफडावयला लागलो. तेव्हापासून जात शब्दाचा उल्लेख असलेली एक पोस्ट टाकली अन ही आता दुसरी. आता यापुढे नाही.
जात
No comments:
Post a Comment