बर्याचदा मी रामटेकडी ला सकाळी फिरायला जातो. म्हणजे बर्याचदा जातही नाही. तिथे चालताना महाराष्ट्राच्या दैदिप्यमान इतिहासाचा नेहमीप्रमाणे अर्धवट अभ्यास करावा काय याच्यावर आज काल चिंतन करतो. जिथे गाडी पार्क करतो त्याच्या समोरच्या बाजूला एक चहाची टपरी आहे. म्हणजे स्थावर नाही तर एका टेम्पो ची टपरी बनवतो. एक तर महापालिकेच्या हद्दीत आहे, पण लांब. अधिकृत परवाना असण्याचं काही कारण नाही. तशी फार गर्दीही नसते त्याच्याकडे. अर्थात मी सकाळी ६ ला जात असल्यामुळेही असेल कदाचित, पण तुरळक गिऱ्हाईक. आम्ही सगळे चालायला येणारे गाड्या रामटेकडीला टेकून, म्हणजे चहाच्या टपरीच्या विरुद्ध बाजूला गाडी लावतो.
परवा (आम्ही मराठवाड्यातले लोकं खर्या परवापासून ते साधारण एक वर्ष या काळाला परवा असे संबोधतो.) मी चालून परत आलो तेव्हा साधारण सीन असा होता. एका तिशीतल्या तरुणीने तिची भलीमोठी कार टपरीच्या बाजूला लावली होती. तरुणी आपण for a change भलीमोठी होती असं समजू यात. ती बहुधा पहिल्यांदा च आली होती. बहुधा नाही,नक्कीच. कारण चालताना मी खाली बघण्याचा अभिनय करत असलो तरी माझं लक्ष असतं चालणाऱ्या लोकांकडे. त्या तरुणीला माहितच नव्हतं की तिथे चहाची टपरी असते म्हणून. पण तिथे नो पार्किंगचा बोर्ड ही नव्हता. त्यामुळे गाडी लावण्यात काही चूक नव्हती.
पण त्या अनधिकृत चहाच्या टपरी मालकाला त्याचा खूप राग आला. साहजिकच आहे म्हणा. पुण्याची प्रथाच नाही का ती. लक्ष्मी रोड ला लोखंडी पाट्या टाकतात च की दुकानासमोरची जागा अडवायला. तिथे पण स्कूटर लावलेली चालत नाही दुकान मालकाला. इथे तर अख्खी कार च लावली होती. त्याचा चहाचा टेम्पो त्याच्या जागेवर जाण्या इतकी जागा कन्यकेने ठेवली होती. आता त्याने तो टपरीवजा टेम्पो अशा पद्धतीने लावला होता की ड्रायव्हर साईड चा दरवाजा उघडायला तसूभर ही जागा नव्हती. मी पोहोचलो तेव्हा ती पोरगी त्या टपरीधिपती ला काकुळतीने सांगत होती की "मला माहित नव्हतं, इथे तुमचा टेम्पो लागतो म्हणून. मी चुकून गाडी लावली. पण माझ्या पाठीत खूप दुखतं, त्यामुळे मी बाजूच्या सीट वरून कसरत करत ड्रायव्हर सीट पर्यंत नाही जाऊ शकत. तर तुम्ही प्लीज दोन मिनिटासाठी टेम्पो काढा, मी कार काढते. तुम्ही परत टेम्पो तुमच्या जागेवर लावा." लॉजिकल नाही का! बरं हे ती अजीजीने सांगत होती.
तर तो टपरीचा बादशहा तिला सांगत होता "तुम्हाला काय करायचं ते करा, टेम्पो काय इथून हलणार नाही." आणि आवाजाचा तोच बाज, ज्याची आता आपल्याला सवय झाली आहे. ती तरुणी पार रडकुंडीला आली होती.
अशा ठिकाणी भोचक पणा करायची सवय आहेच. मी विचारल्यावर परत त्या विशिष्ट टोन मध्ये बाईचं कसं चुकलं ते सांगण्यात आलं. मी त्या तरुणीला विचारलं "तुम्हाला खरंच ही गाडी दुसऱ्या बाजूने जावून काढता नाही येणार का?"ती नाही म्हणाल्यावर मी बोललो किल्ली द्या कारची"तर ती म्हणाली अहो, पण काका त्यांना टेम्पो काढायला काय प्रॉब्लेम आहे? काका म्हणून सुद्धा मी माझ्या रागावर नियंत्रण ठेवत तिला बोललो "तुम्हाला घरी लवकर जायचं असेल तर किल्ली दया" तिने अविश्वासाने बघत किल्ली दिली तेव्हा मी तिला सांगितलं "टेन्शन नका घेऊ. समोर माझी कार उभी आहे. अन ही त्याची किल्ली" तर ओशाळत नको म्हणाली. (etios च्या बदल्यात Camray काही वाईट सौदा नव्हता खरं तर). कार काढून दिली. आभार प्रदर्शनाचा सोपस्कार पार पडला. आणि आम्ही आपापल्या वाटेने निघून गेलो.
आता मला पडलेले प्रश्न:
- टपरीच्या राजाचं बरोबर की चूक? असा आडमुठे पणा काय कामाचा? बरं असं पण नव्हतं की चार गिऱ्हाईक थांबलेत त्याचा चहा पिण्यासाठी, काका हलवाई ला लोका लाईनीत थांबतात तसे. (आता किती वर्षं चितळेचं उदाहरण देणार). म्हणजे ती कार निघेपर्यंत, तो टेम्पो लावायला थांबू शकत होता.
- याच ठिकाणी तरुणीच्या जागी एखादा गडी असला असता अन त्याचं अन टपरीधिपतीचं भांडण झालं असतं तर मी कुणाची बाजू घेतली असती? कारण कायद्याने ती टपरी अनधिकृत आहे, तिथे नो पार्किंग चा बोर्ड नाही आहे. म्हणजे गाडी लावणं चूक नाही आहे.
- मी अशी मदत करणे बरोबर आहे का? इथे प्रश्नाचं मूळ उत्तर न शोधता सोपं उत्तर देऊन बोळवण केली नाही का?
बाकी तरुणी होती म्हणूनच तू मदत केली वैगेरे अशा दुय्यम वादात आपण पडायला नको.
महाराष्ट्राच्या इतिहासशास्त्रावर अर्धवट अभ्यास करण्याऐवजी वर्तमान काळातील नागरिकशास्त्रावर चिंतन, चालताना करायचे ठरवले आहे.
No comments:
Post a Comment