Monday 25 May 2015

पंचम

काल झी क्लासिकवर पंचम नाईट बघत होतो. गायक गायिका घोचू होते. पण ऑर्केस्ट्रेशन येड लगाव होते. सगळे वादक अप्रतिम. तीन साथीदार आले होते रे पंचमचे. सत्तरीचे असतील. कॉंची रे कॉंची वर तिघांनी वाजवलं. 600 च्या पॉलीश पेपर वर संगीत यार. अन सलामी दिली "ये दोस्ती हम नही छोडेंगे" ट्रंपेटवाल्याने असे सूर छेडले की शेवटी माझा घसा दुखायला लागला. 

आर डी चं नाव काढलं की मला एक गाणं हटकून आठवतं अन ते म्हणजे एक चतुर नार. संगीतप्रतिभेचा तो एक उत्तुंग अविष्कार आहे असं मला नेहमीच वाटत आलं आहे. विनोदाच्या अंगाने जाणारं हे गाणं ऐकणार्याच्या डोळ्यात पाणी कधी आणतं हे कळत ही नाही. विविध वाद्यांचा इतका सुरेल वापर फार कमी गाण्यांमधे दिसतो. आणि साथीला किशोरदा अन मन्ना डे. फाटलेला सुर सुद्धा सुरात म्हतुम्हाला सांगतो आर डी ने हे एकच गाणं जरी आयुष्यात बनवलं असतं तरी आपण आजच्या इतकंच प्रेम त्यांच्यावर केलं असतं. 


पंचमवर मी एक प्रोग्राम बघत होतो. विधू विनोद चोप्रा बोलत होते. 
"पंचमदाचे लागोपाठ २८ पिक्चर फ्लॉप गेले होते. पण मला १९४२ साठी मला पंचमच हवे होते. मी ऐकून होतो, पंचमदाकडे काम नाही आहे. मी गेलो दादाकडे अन गीत दिलं. सांगितलं, संगीत लावा, मी येतो आठवड्याभरात. एक लडकी को देखा तो गाणं. मी पोहोचलो पंचमदाकडे. विचारलं, झालं. दादाने गाणं ऐकवलं. चाल त्याकाळात जशा चाली होत्या म्हणजे ढाकचिक ढाकचिक. (विधू विनोद इथे पीस ऐकवतात अन आपले कान का नाही फाटले असं वाटतं) मी पंचमदाना बोललो " हे काय आहे दादा. मला हे नकोय. मला ओरिजनल पंचमदा पाहिजे. मी उद्या परत येतो" मी परत गेलो दुसर्यादिवशी. 
तो संगीताच्या दुनियेचा बेताज बादशहा, ज्याच्या नावावर ३५० पेक्षा जास्त चित्रपटाचं संगीत होतं, ज्याने वेगवेगळ्या वादनांचा अद्भुत अविष्कार दाखवला तो स्वरांचा जादुगार माझ्यासारख्या काल आलेल्या नवख्या चित्रपट प्रोड्युसरला विचारत होता "Vidhu, am I still doing this film" 
आणि मी पंचमदाचे दोन्ही हात हातात घेत बोललो "Of course दादा, हे काय विचारणं झालं" 
अन मग पंचमदाची बोटं हार्मोनियमवर फिरू लागली आणि एक लडकी को देखा ची अप्रतिम सुरावट जन्माला आली" 
तुम्हाला सांगतो जिथे फुलं वेचली तिथे गोवर्या वेचायची वेळ आली म्हणजे काय याची तंतोतंत अनुभूती विधू चोप्रांची मुलाखत ऐकताना आली. घसा दुखू लागला, डोळे पाणावले. पुढं १९४२ चं जादूई संगीत सुपर हीट झालं पण तो गौरव पहायला आर डी या दुनियेत नव्हता. 
उफ्फ! लिहीतानाही थरथरतो आहे .

No comments:

Post a Comment