Friday, 22 May 2015

Fun day विमानप्रवासाचे

विमानप्रवास तुझ्या नशीबात आहे असं जर कुणी मला नव्वदीच्या सुमारास कुणी सांगितलं असतं तर विनोद म्हणून सोडून दिलं असतं. पण त्यानंतर दहाच वर्षानी कँप्टन गोपीनाथ नावाच्या सुहृदाने एयर डेक्कन नावाची सामान्यांना परवडणारी विमानसेवा चालू केली अन मग माझ्यासारखे अनेक विमानाला फक्त आकाशाकडे बघून आनंद मानणारे प्रवास वेळेच्या बचतीचा आनंद घेऊ लागले. पुढं मग आत्ता नंबर वन ला असलेली, गो इंडिगो आली, वादग्रस्त वाडियांची गो एयर, तामिळनाडूच्या अर्थकारणात धूमाकूळ घालणार्या मारन कुटुंबाची मालकी असलेली अन नुकतीच मुळ मालकाला परत गेल्याने उर्जित झालेली स्पाईस जेट अशा कंपन्यांची सद्दी चालू झाली अन विमानतळं ओसंडून वाहायला लागली. ज्या गोपीनाथांनी नो फ्रील लाईन एयरलाइन ही कल्पना वास्तवात आणली त्यांना मात्र किंगफिशरच्या राक्षसी महत्वकांक्षेने संपवले आणि स्वत: किंगफिशरही गळपाटली. 

असो. तर सांगायचा मुद्दा हा की माझ्यासारख्या सर्वसामान्यांना परवडेल असे विमानदर तर झाले, पण आम्ही विमानतळावर किंवा विमानात वागायचं कसं हे कुठं कुणी सांगितलं. इतर अनेक गोष्टीप्रमाणे अनुभव आले की शिकतील या मानसिकतेतून काही सांगितलंच नाही. अन मग विमान कर्मचारी अन प्रवासी आणि सहप्रवासी यातील वाद चालू झाले. विमानसेवक किंवा सेविका, ग्राउंड स्टाफ़ पहिल्यांदा प्रवास करणार्यांना फटकून बोलू लागल्या. नेहमी प्रवास करणारे पहिल्यांदा प्रवास करणार्यांकडे काही चूक झाली की हिणकस नजरेने बघू लागले. "Shit, this airport has turned out to be bus stand" किंवा "is this aero plane or second class का रेल्वे का डिब्बा" असले कुजकट डायलॉग पडू लागले. यामागे चूक अर्थात विमानकंपन्यांची. तुमच्या विमानातले टॉयलेटस, केबिन लगेज कसं ठेवायचं, फ्लाईटमधे कसं वागायचं याच्या सूचना प्रवाशापर्यंत पोहोचाव्यात म्हणून काय प्रयत्न करता हो तुम्ही. 

विमानाचे भाडे कमी झाल्यामुळे तो प्रवास सामान्य माणसाच्या आवाक्यात आला आहे, त्याचा आनंदच आहे. पण ज्या देशामधे जहॉ सोच वही शौचालय सारखी जाहिरात करावी लागते तिथे हे विमानातले अत्याधुनिक टॉयलेटस आणि बाकीही कसं वापरायचं हे सांगायला नको. ते एयरलाईन वाले ज्या सुचना देतात त्यातली बेल्ट कशी लावायची ही एकमेव सुचना कामाची असते. बाकी सेफ्टी इंन्स्ट्रक्शन चा, खरोखर अपघात झाला तर त्याचा  उपयोग नसतो. पण मग विमानात कसं वागल्याने प्रवास आनंदी होईल हे सांगायचं एयरलाईन्सचं काम नाही. वेबसाईटवर लिहा, पत्रक वाटा, टीव्ही वर अँड दया. पण जर तुम्ही सांगितलंच नाही तर आम्ही पहिल्यांदा प्रवास करणारे काय अंतर्ज्ञानी आहोत काय?

दुसरं एक जाणवतं ते प्रवाशांची बिनडोकगिरी. आणि हे प्रवासी म्हणजे विमानाने नेहमी प्रवास करणारे अतिशहाणे. एयरलाईन वाले सांगतात ना ७ किलोच्या वर हँड बँगेज नको म्हणून. तुम्ही च्यायला ट्रंकाच्या ट्रंका केबिनमधे आणता. अरे तो काय घरचा पोटमाळा आहे का? कसं चालेल. त्या जागेत बँग बसवताना तर तुमची फाटतेच, बाकीच्यांनाही inconvenience होतो. अन यांचा मोह काय तर लगेज बेल्टवर थांबायला नको. नवीन प्रवासी आला, जो बिचारा इमानऐतबारे छोटी बँग घेऊन येतो, की भरलेल्या केबिन्स बघून गांगरून जातो अन मग चुका होतात. 

विमान हॉल्टला पोहोचायच्या आधी लँपटॉपधारक पहिले उभे. काय मुलखाची घाई असते, भगवान जाणे. काय ऑफीसमधे जाऊन दिवे लावतात माहित आहे. नवीन प्रवाशाला वाटतं, आपल्याला सोडून हे विमान उडेल म्हणून मग तोही धावपळ करतो. धक्काबुक्की मग. हेच लॅपटॉपधारक वेटिंग हॉलमधे बसायला दिलेल्या खुर्चीवर बॅग ठेवून विमानाची वेळ होईपर्यंत ढाराढूर झोपले असतात. म्हातारे कोतारे, बायका उभ्या असताना ह्या नवश्रीमंतांना त्याची जाणीव ही नसते. 


आज सकाळी चेन्नैहून बंगलेरला आलो. इनमिन ४० मिनीटाची फ्लाईट. म्हणजे होस्टेसची इतकी घाई असते की हॉट बेव्हर्जेस ते सर्व्ह करत नाहीत. त्या ४० मिनीटात चार अण्णा मुतायला उभे. बरं विमानतळावर आधी तासभर आले असतात. तिथे भरमसाट टॉयलेटस आहेत. उतरल्यावर असतात. पण नाही आम्हाला त्या ४० मिनीटातच धार मारायची असते. पण हे असं नाही, हे कुणी सांगितलं आहे का? नाही. मग नाके मुरडायची, विचित्र नजरेने बघायचं, मनस्ताप करून घ्यायचा अन द्यायचा. 

परवा एयर इंडियाच्या पोस्टवर कॉमेंटी पडल्या त्या एयरइंडियाच्या होस्टेस काकू असतात म्हणून. ही मानसिकता कधी आणि का तयार झाली हा एक प्रश्नच आहे. फायनली ती एयर होस्टेस आहे, तुमची तास, दोन तास किंवा प्रवासाच्या वेळेइतकी यजमानीण. तिने सुंदर अन तरूण असावं ही अपेक्षा का ठेवावी? तिने चटपटीत असावं, पटापट पाहिजे ते आणून द्यावं आणि थोडं पोलाईट असावं याच्यापलीकडे तिने अजून काही असावं हे चुकीचं वाटतं. शेवटी ती होस्टेस आहे, मॉडेल नाही.


विमानतळावर सिक्युरिटी असते. सकाळची सहाची फ्लाईट. म्हणजे आपण पाचला एयरपोर्ट ला आलो असतो. सकाळी पाच वाजता सिक्युरिटीचेकच्या लाईनीत एक महाशय अपुर्या इन्फ़्रास्ट्रक्चर च्या नावाने सीआइएसएफ़ वर डाफरत असतात. आता तो सीआइएसएफ़ चा जवान. तो आपला दिलेल्या आज्ञा पाळतो. त्याला काय कळतं बँग चेकिंगच्या 
कन्व्हेयरची लांबची किती असावी ते. तो बिचारा त्याचं काम करत असतो. तुम्ही मात्र सकाळी तुमचा आणि बाकींच्यांचा 
मुड़ ख़राब करून टाकता. 

विमानात तर सीट ची अदलाबदली नकोच. अहो श्रीनगरहून कन्याकुमारी चा विमानप्रवास ३ तासाचा असेल. अशा काय गप्पा मारायच्या असतात. आणि एवढीच हौस असेल तर रु १०० मोजून सीट बुक करा.

विमानात चढण्या अगोदर ठरवा कोण कसे बसणार ते. तुमच्यातच जर सीट बदली करायची असेल तर विमान उडल्यानंतर काही वेळाने 
करा. otherwise तुमच्यामुळे पूर्ण line खोळंबली असते. 

- जेव्हा अशी घोषणा होते कि "सीट १६ ते सीट ३० यांनी प्रवेश घ्यावा" तेव्हा तुमचा सीट नंबर त्यात नसेल तर उगाच घुसाघूस करून हसे करून नका घेऊ. 

जेव्हा विमानात असे सांगतात कि mobile आणि इतर electronic गोष्टी बंद करा तेव्हा त्या बंद करा. हे तुमच्या safety साठी आहे. "त्याने काय होते" असा  विचार करण्याआधी या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहित आहे का याचा विचार करा. 

प्रवास असा करा कि तुम्ही पण एन्जॉय करा आणि दुसऱ्यांचा प्रवास पण सुखकर करा.


असो. खूप तारे तोडले. नागरिकशास्त्रं वाचावं बदलत्या काळाचं. बाकी काय! 

No comments:

Post a Comment