Thursday 21 May 2015

मराठवाडी

आमच्या मराठवाड्यात कुणीही ओळखीचं भेटलं की पहिले नातं शोधण्याची खुप घाई करतो. माझे बाबा भास्करराव मंडलिक तर याबाबत फार ख्यात होते. कुणी भेटलं की "अरे म्हणजे माझे मामा ना राजाभाऊ, त्यांची पुतणी मंगल हं तिच्या मुलाचं अँडमिशनचं करायचं आहे." तो समोरचा गांगरूनच जायचा. तो गुण माझ्यातही उतरला आहे. कुणाचाही संदर्भ निघाला आणि थोड्या माहितीतला असेल तर "अरे, नात्यात आहे आपल्या" झालं मान न मान तु मेरा मेहमान. एक मात्र आहे, कितीही लांबचा नातेवाईक असू द्या, मनात एक विश्वासाची भावना तयार होते. अर्थात आजकाल मदत करणे अन मदत घेणे दोन्ही कालबाह्य होत चाललं आहे. त्या न्यायाने वयोपरत्वे ही सवय कमी होत गेली आणि मागच्या आठवड्यात मलाच झटका बसला.

मी आणि नील कारने कुठेतरी चाललो होतो. आकाशवाणी वर शाम ए गजल असा काहीसा कार्यक्रम चालू होता. सॉलीड तयारीच्या आवाजात एक बाई साज छेडत होत्या. गजल आणि माझं काही फार सख्य नाही. अगदी अलीकडे अण्णा, नंदू आणि गजलरंगसारख्या कार्यक्रमाने गोडी वाढवली. नाहीतर मी आणि गजल म्हणजे जरा सांभाळूनच. नाही म्हणायला जगजीतसिंग, किंवा झालच तर मेहंदी हसन साहेबांची रंजीश ए सही, किंवा फरीदा खन्नुमची "आज जाने की जिद ना करो" वैगेरेची ओळख आहे, पण ती चार लोकात सामान्य ज्ञान आहे हे दाखवण्याइतकंच. दर्दी वैगेरे नाही. हा, तर सांगत होतो की आवाज सॉलीड तापला होता बाईंचा. आणि शायरी पण नजाकतदार होती. मी आपलं सहजच बोलून गेलो " अरे नील, मला वाटतं या बेगम अख्तर असाव्यात" नील आपला हं म्हणत रूबिक क्युब सोडवत बसला. गजल संपल्यावर सादरकर्ता म्हणाला "नीदा फाजली के इस कलाम को पेश किया था बेगम अख्तरने" नीलने चमकून माझ्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात अपार कौतुक दाटून आलं होतं, बापाबद्दल. आयला, बापाला बेगम अख्तर माहिती आहे, म्हणजे फारच झालं. मी पण त्या कौतुकाच्या वर्षावात न्हात कार चालवू लागलो. मिनीटभरच झाला असेल. रूबिक क्युब खेळतच नील म्हणाला "पप्पा, या बेगम अख्तर म्हणजे फरहान अख्तरची आई का हो"

धडपडलोच मी. पण लॉजीक बरोबर होतं.

मी सांगितलं मग त्याला बाईंबद्दल. त्याला काय कळलं हे देवच जाणे.

तसा भास्कर मंडलिकांचा अन नीलचा सहवास ५ वर्षाचा, २००४ ते २००९. पण दोघांचं सॉलीड सूत होतं. सूत कशाला दोरखंडच. जाताना बाबा बहुतेक नीलच्या डोक्यावर हात ठेवून गेले असावेत. जे काही गुण उतरलेत त्यापैकी एक तर कळला. बाकीचे गुण आता काळ सांगेल.

आम्ही अस्सल मराठवाडी.

No comments:

Post a Comment