Saturday 18 April 2015

माझाही मसाज

बँकॉक पटायाची टूर. सहकुटुंब सहपरिवार. साल २०११. खरं सांगू, मला नाही आवडली थायलंडची टूर. अाढ्यतखोर आणि चालू वाटले, थाई लोकं. अर्थात आपल्या भारतीयांनीच झुंडीच्या झुंडी जावून अन नंतर येड्यासारखे वागून आपली प्रतिमा बेकार बनवली असावी. जे काय असेल ते, मला कृत्रिम अशी पर्यटनस्थळं, इंजेक्शन टोचून माणसाळवलेले वाघ, हॉटेल रिसेप्शन चे शंकखोर लोकं, छ्या नाही जमलं. असो, विषय वेगळा आहे.

थाई मसाज, याबाबतीत मी फार ऐकून होतो. अर्थात ही केसरीची टूर. सगळीच मंडळी आमच्यासारखी मध्यमवर्गीय. हं, केरळ ट्रीपचा खर्च प्रत्येकी ३५,००० होतो. थोडे अजून टाकून फॉरेन ट्रीप करू, असे म्हणून आलेले. टूर मँनेजर ने घोषणा केली, उद्या आपण थाई मसाज ला जाणार आहोत. ५०० बाथ का काहीतरी चार्ज होता. माझ्या मनात हो की नाही याविषयी काही प्रश्नच नव्हता. आणि बायको पण म्हणाली, जाऊ म्हणून. 

झालं, दुसर्यादिवशी आमची वरात पोहोचली. शासन मान्यताप्राप्त वैगेरे लिहीलं होतं, मसाज सेंटरला. आत गेलो. शांतता च शांतता. बोलणार्या पोरी अतिशय हळू आवाजात, इकडून तिकडून सुळकन चालत होत्या. वैभवी माझ्या कानात म्हणाली "काय रे, तुला मसाज करायला माणूस च असेल ना?" मी आपला साळसूदपणे म्हणालो, "काय माहित नाही बुवा, पण असेल ही माणूस बहुतेक" मला माहित होतं खरं काय ते, पण बोंबलायला ते सांगितलं असतं, तर तिथून परत गेलो असतो. मी म्हणजे अगदी सत्यनारायणाच्या पुजेला बसताना जसा सभ्य चेहरा असतो तसा करून खुर्चीत बसलो होतो. हृद्यात फुटणार्या उकळ्या, खरंतर शरीराच्या अनेक भागात, चेहर्यावर दिसू नये म्हणून आटोकाट प्रयत्न करत होतो. 

झालं, आमचा नंबर आला. बायकांना वेगळा हॉलमधे नेलं, आणि आम्हा पुरूषांना वेगळ्या. तिथल्या गाद्या संपल्यामुळे मला अजून एका वेगळ्या मोठ्या खोलीत नेलं. मिणमिणता प्रकाश होता खोलीत. मंद संगीत चालू होतं. माझ्याशिवाय दोन चार फॉरेनर्स उताणे पडले होते. 

मला कपडे काढायला सांगितलं, ओहो सॉरी सॉरी, कपडे चेंज करायला सांगितलं. त्यांचा ड्रेस दिला. घळघळीत एकदम. ते कपडे चढवून गादीवर पडलो. आणि मग आली ती सुहास्यवदना. या थाई बायकांचं एकतर वय कळत नाही, पण असेल पन्नाशीची. पन्नास वजन हो. हलकी फुलकी, हो म्हणजे कळलंच नंतर ते. कटी बद्ध. हेलनची ती कटी, झीनतची आहे ती कमर आणि टुणटुण ची आहे ती कंबर असं आमचे सर शाळेत शिकवत. तर हीची होती ती कटी. बाकी नाकीडोळी नीटस. परीच जणू. 

आमचा पुण्यातला मसाज करणारा माणूस चालू व्हायच्या आधी पाया पडतो. म्हणजे मसाज करताना मी गचकलोच तर देवापर्यंत त्याचा नमस्कार पोहोचेल म्हणून. त्याची पद्धतही तशीच, रगडवणारी. आश्चर्य म्हणजे या कन्यकेनेही नमस्कार केला. आयला, म्हंटलं काय करते ही बया. 

पण काही नाही, तिने हाता पायाच्या बोटापासून सुरूवात केली. आणि मग हात, पाय याला ती हलकेच दाब देत राहिली. कधी कुठे दुखलं की मी कळवळायचो, तर तेव्हा हलकेच कानात किणकिणायची "any problem" मी नाही म्हणालो की हलकेच हसायची. मग माझे पाय ओणवे करून त्यावर तिने हलकेच बसण्याचा कार्यक्रम झाला तर कधी पाठीवर रेलून पाठीचा हलकेच व्यायाम झाला. मला पालथं झोपवून पाठीवर हलकेच बसून तिने हात मुडपले. असा सगळा एक ४५ मिनीटाचा कार्यक्रम झाला. खरं तर अजून वेगवेगळे हलकेच व्यायाम झाले, पण आता मला ते सोयीस्कर रित्या आठवत नाही आहेत.  (मला माहित आहे मित्रांनो, हा परिच्छेद वाचताना नाही नाही ते विचार तुमच्या मनात येत आहेत. त्यामधे "काय सज्जन माणूस आहे हा, पासून ते, येडंच आहे हे" इथपर्यंत वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असतील. असो. मला कल्पना आहे, तुमच्या विचारप्रतिभेला इतके धुमारे फुटताहेत की परिच्छेद हा शब्दही अश्लील वाटतो आहे)

टूर मँनेजर ने ५० ते १०० बाथ टीप द्यायला सांगितली होती. मी अर्थातच ५० बाथ दिली अन बाहेर आलो. वैभवी बाहेर उभीच होती, म्हणाली "काय रे, इतका गुलूगुलू काय हसतो आहेस?" मी बोललो "काय नाय बुवा, कुठं काय?" तर म्हणाली "काय फरक वाटला सतीशमधे (पुण्यातला मला बडवणारा) आणि इथल्या माणसामधे" मग तिला सांगितलं कोण होतं ते, तर म्हणाली "आरशात रंग बघ स्वत:चा. काळ्या रंगात गुलाबी रंग मिसळून जांभळा दिसतो आहेस" तिचं वर्णन ऐकल्यावर वैभवीने पुढं विचारलं "तिला म्हणाला नाहीस ना, गृहकृत्यदक्ष आहेस का म्हणून" मला खरं तर वैभवी काय बोलत आहे काहीच कळत नव्हतं . राग, लोभ, अपमान या सगळ्या भावनांवर मी विजय मिळवला होता. 

दोन दिवसांनी मी उड़त परत भारतात आलो. म्हणजे विमानानेच. 

त्यानंतरही  मला सतीश, आजकाल कुणी प्रदीप म्हणून राक्षस आला आहे, रगडतच आहे. पण दु:खाचे असंख्य उन्हाळे सोसल्यावर सुखाचा एखादा पावसाळा बघायला मिळतो या न्यायाने मला परत बँकॉकला जायला मिळेल, अन यावेळेला कदाचित कंपनीच्या सेल्स मीटला एकट्यानेच, यावर माझा दृढ़ विश्वास आहे. 

- सदर पोस्ट बँकॉकच्या मसाजने तावून सुलाखून निघालेले अन त्यामुळे आता प्रंचंड उर्जाधारक असलेले राहुल गांधी यांना समर्पित. राहुलजी, तिकडे हलकेच घेतलं असेल, पोस्टही हलकीच घ्या.

(तिथली करन्सी बाथ आहे, हा एक विलक्षण योगायोग आहे) 

No comments:

Post a Comment