Monday 9 January 2017

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मराठी ब्रिफिंग

२७ डिसेंबर २०१६ रोजी पुण्यातील क्रिसलीस इंत्रेप्रेन्युअर फोरम च्या पुढाकाराने १८२ जणांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आपलं नाव नोंदवलं. ह्या १८२ जणांनी "पाण्याखाली सगळ्यात लांब मानवी साखळी" असा विक्रम प्रस्थापित केला. या आधीचा हा विक्रम १७३ जणांनी इटली मध्ये नोंदवला होता.

हे आव्हान क्रिसलीस चे चेअरमन श्री मनीष गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली पेललं. या विक्रमाची तयारी जवळपास ६ महिन्यापूर्वी चालू झाली होती. क्रिसलीस चे कौन्सिल लिडर्स श्री प्रमोद भालेराव, श्री हरीश भाबड, श्री पराग पाटील, श्री मिलिंद शालगर आणि श्री महेंद्र यादव यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.

भारतात जवळपास २०० लोकं एका वेळेस स्कुबा डायव्हिंग करून ही मानवी साखळी तयार करण्यासाठी मागणारी पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्यामुळे, जगात दुसरीकड कुठेे हा विक्रम करता येईल याची चाचपणी केली गेली. अन त्यातून मग थायलँड च्या को ताव नावाच्या बेटाची निवड करण्यात आली. को ताव हे बेट स्कुबा डायव्हिंग साठी स्वर्ग समजण्यात येतो अन जगभर त्या कारणासाठी प्रसिद्ध आहे.

हा विक्रम साकारताना बऱ्याच आव्हानांना क्रिसलीस ला सामोरे जावे लागले. सगळ्यात पाहिलं आव्हान होतं, २०० पेक्षा जास्त लोकांना या साठी तयार करणे, आणि मग या सगळ्यांचं ट्रेनिंग घडवून आणणे. आणि गंमत म्हणजे या लोकांपैकी खूप जणांना पोहायला पण येत नव्हतं. पण कौन्सिल मेंबर्स चे अविरत कष्ट आणि सहभागी डायव्हर्स च्या मदतीने शेवटी १८२ लोकं विक्रमासाठी तयार झाले.

या विक्रमाची माहिती देताना श्री मनीष गुप्ता म्हणाले "सुरुवातीला एक मिनिटांसाठी पाण्याखाली राहणे ही खूप मोठी गोष्ट वाटली नाही. पण २६ डिसेंबर ला रंगीत तालमीच्या दिवशी, आमच्या लक्षात आलं की हे अवघड आहे. त्या दिवशी पाण्याखाली एक तास राहून ही आम्ही ती साखळी तयार करू शकलो नाही. आम्ही खूप निराश झालो. पण आम्ही सगळ्यांनी आमच्या योजनेत बदल केला आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे २७ डिसेंबर ला आम्ही सकारात्मक भावनेने विक्रमाला गवसणी घालायला सज्ज झालो. सकाळी च आम्ही सगळ्यांनी राष्ट्रगीत म्हंटले आणि एक वेगळीच ऊर्जा आम्हा सगळ्यांच्या मनात तयार झाली. हा विक्रम आम्ही राष्ट्राला अर्पण करण्याचा निर्धार व्यक्त केला. या वेळेपासून साधारण तीन तासांनी आणि जवळपास ३० मिनिटे पाण्याखाली राहून आम्ही १८२ जणांनी "पाण्याखालील सगळ्यात लांब मानवी साखळी" च्या जागतिक विक्रमावर मोहोर उमटवली.

या विक्रमाचं अजून एक वैशिष्ट्य असं की १८२ लोकांपैकी फक्त एक स्कुबा डायव्हिंग साठी प्रमाणित होता, २०% लोकांना पोहोणे येत नव्हतं, ९ वर्षांपासून ते ६० वर्ष वयापर्यंत लोकं सहभागी झाले होते, ५० स्त्रिया होत्या. हे सारे सभासद उद्योजेकतेशी संबंधित होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते एकाच देशातल्या म्हणजे भारत, एकाच राज्यातल्या म्हणजे महाराष्ट्र, एकाच गावातील म्हणजे पुण्यातील होते.

मिस पॉलिना यांना गिनीज च्या इंगलंडच्या ऑफिस तर्फे या विक्रमाची सत्यासत्यता पडताळण्यासाठी पाठवलं होतं. तिने श्री मनीष गुप्ता यांना या विक्रमामागची संकल्पना विचारली. तेव्हा श्री गुप्ता म्हणाले "पहिली गोष्ट म्हणजे, मानवतेसाठी सगळ्यांनी एकत्र यावं. म्हणजे विश्वाची एकात्मकता. आणि दुसरं म्हणजे असं काही आमच्या कडून घडावं की साऱ्या देशाला अभिमान वाटला पाहिजे. खेळाडू किंवा कलाकार यांना देशाला अभिमान वाटाव्या अशा गोष्टी करण्याच्या खूप संधी असतात. आमच्या सारख्या साध्या लोकांना अशीच संधी आम्ही उपलब्ध करून दिली"

या उपक्रमामध्ये आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी ओर्बीट्झ टूर्स अँड ट्रॅव्हेल्स यांनी नियोजन केले तर  सहभागी लोकांना स्कुबा डायव्हिंग चं प्रशिक्षण हे अबसोल्युट स्कुबा यांनी दिलं

No comments:

Post a Comment