बऱ्याचदा मला माझा बिझिनेस म्हणजे एक परीकथा वाटते. इतक्या स्टोऱ्या तयार झाल्या आहेत ना आयुष्यात, मग ते बिझिनेस कसा चालू झाला, वेस्टविंड चं authorisation, मशीन शॉप चालू करणं, सेटको शी जॉईंट व्हेंचर. एक ना अनेक.
इन सिटू टेपर ग्राइंडिंग मशीन बनवणे ही पण एक भन्नाट स्टोरी आहे. अशी मशीन असेल याचा मी विचार कधीच नव्हता केला. पण २००९ साली मला टाटा मोटर्स ची एक २.९ मीटर लांब स्पिंडल शाफ्ट बनवण्याची ऑर्डर आम्हाला मिळाली. ऑर्डर दिली होती ती श्री ढाळे साहेबांनी. आम्ही तो बनवलाही स्पिंडल शाफ्ट. तो "शरमन" नावाच्या मशीन वर बसवताना मी टाटा मोटर्स च्या पी ई डिपार्टमेंट मध्ये हजर होतो.
टाटा मोटर्स मध्ये मी मेंटेनन्स मॅनेजर सिंग साहेब, यांच्याशी बोलत होतो. मी त्यांना विचारलं की इतका लांब शाफ्ट तुम्हाला का बनवावा लागला? तर ते म्हणाले की स्पिंडल मध्ये फार काही प्रॉब्लेम नव्हता फक्त त्याच्या समोरच्या BT 50 टेपर बोअर मध्ये 0.1 mm इतका रन आउट होता.
आणि ते पुढे मला म्हणाले "राजेश, तू तरुण इंजिनियर आहेस. जरा डोकं वापरून अशी मशीन का नाही बनवू शकत की ज्यामुळे आपण स्पिंडल टेपर मशीन वर च ग्राइंड करू शकू. म्हणजे हे लांब शाफ्ट मशीन वरून काढायची गरज पडणार नाही." आणि पुढे ते म्हणाले "मी खरंतर असं इक्विपमेंट बनवण्याचा प्रयत्न केला होता पण कामाच्या प्रेशर मुळे पूर्णत्वाला नाही नेऊ शकलो"
सिंग साहेबांच्या आयडिया वर मी विचार करू लागलो. गुगल मदतीला धावून आलं. शोधलं तर लक्षात आलं की अमेरिकेत दोघे जण आहेत ज्यांच्याकडे इन सिटू टेपर ग्राइंडिंग चं मशीन त्यांनी बनवलं आहे. पण ती प्रोसेस त्यांनी एकदम सिक्रेट ठेवलं होती. त्यातल्या एकाने माझ्या मेल ला पॉजिटीव्ह उत्तर दिल्यावर मी त्याला पुढची मेल लिहिली.
"ऍलेक्स, तू मला त्या इक्विपमेंट ची किंमत पाठव आणि त्यात त्याच्या किमतीसोबत भारतात पाच जॉब करण्याची प्राईस पण ऍड कर. म्हणजे आमचा माणूस पण त्यावर ट्रेन होईल" ऍलेक्स ने तीस लाखाचं बांबू कोट पाठवलं. मला ते झेपणं शक्यच नव्हतं.
मी त्याचा नाद सोडला. आणि पेंटा डिझायनर्स च्या निसळ साहेबांना फोन केला. निसळ साहेबांनी २००३-०४ मध्ये आमच्यासाठी काही भन्नाट ऍटोमेशन प्रोजेक्ट आणि स्पेशल पर्पज मशिन्स डिझाईन केल्या होत्या. डिस्कशन झाल्यावर आणि काही फॉलो अप कॉल्स झाल्यावर त्यांनी मला कन्सेप्ट ड्रॉइंग पेन्सिल स्केच करून पाठवलं आणि सांगितलं "कार्यबाहुल्यामुळे मी यापुढे तुमच्या इक्विपमेंट वर काम नाही करू शकत" निसळ साहेब खरोखर बिझी असतात. मला आश्चर्य नाही वाटलं.
माझा पार्टनर प्रदीप आणि मी डिझायनर नाही आणि या इक्विपमेंट चं यश हे त्याच्या सुबक डिझाईन मध्ये असणार हे जाणवलं होतं. मी खूप डिझायनर्स ना कॉन्टॅक्ट केला. पण सगळ्यांनी नकार कळवला.
शेवटी काखेत कळसा अन गावाला वळसा या न्यायाने आमच्या शेजारीच असलेला विश्वास कुलकर्णी आमच्या मदतीला धावून आला. त्याने इन सिटू टेपर ग्राइंडिंग चं मशीन डिझाईन केलं आणि बनवलं पण.
चार महिने लागले मशीन बनायला. आमचे हितचिंतक आणि बिझिनेस मध्ये रिस्क घ्यायला सदैव तत्पर असणाऱ्या तांबोळी साहेबांनी त्यांच्या व्ही एम सी वर ट्रायल घ्यायला परवानगी दिली. तारीख होती २४ मे २०११. इक्विपमेंट यशस्वी झालं. वाढदिवसाची इतकी सुंदर भेट मला याआधी मिळाली नव्हती.
पुढील सहा महिन्यात आमचे ग्राइंडिंग ऑपरेटर अविनाश च्या मदतीने भारतभर २५ एक जॉब्स यशस्वी केले. हे करताना आम्हाला आम्ही बनवलेल्या इक्विपमेंट मध्ये काही प्रॉब्लेम्स जाणवले आणि आमच्या प्रोसेस मध्ये पण. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता अविनाश साईट वर जाणे. ते बाहेर गेले की कंपनीतल्या कामाचा बोजवारा उडायचा. आणि मग मशीन एका गावाहून दुसऱ्या गावाला कुरियर ने पाठवताना होणारी तोडफोड, मशीन चं वजन जास्त झालं, काही फंक्शनल प्रॉब्लेम्स. आम्ही ती ऍक्टिव्हिटी थांबवण्याचं ठरवलं. आपण आजतागायत आम्हाला कस्टमर चे त्या इक्विपमेंट ची सर्व्हिस घेण्यासाठी फोन कॉल्स येत होते.
त्याच कॉल्स मुळे हे इक्विपमेंट यशस्वी करण्याची आस जिवंत राहिली. २०१४ मध्ये आम्ही सेटको यूएसए च्या डिझाईन डिपार्टमेंट ची मदत घ्यायचं ठरवलं. डिझाईन डायरेक्टर ब्रायन जेव्हा पुण्याला आला तेव्हा आम्ही ते मशीन त्याला दाखवलं. त्याला आवडलं ते. मग आम्ही ते अमेरिकेला पाठवलं. तिथे जेसन नावाच्या अत्यंत हुशार इंजिनीअर ने त्यावर रिडिझायनिंग चं काम केलं. ते त्याने आमच्याकडे परत पाठवेपर्यंत सेटको इंडिया मध्ये निकेतन नावाचा डिझायनर जॉईन झाला होता. त्याने ते आव्हान स्वीकारलं. मॅन्युफॅक्चरिंग साठी ड्रॉइंग्स बनवले. प्रदीप त्याचे इनपुट्स द्यायला सदैव तयार होताच.
ज्याने आमची नुकतीच कंपनी सोडली तो अनिल वाकुडे आणि आता त्याची जागा घेतलेला संतोष यांनी वेंडर्स आणि आमच्या मशीन शॉप च्या टीम (तेलंग, तुषार, नितीन, किरण आणि अविनाश) बरोबर इक्विपमेंट चे पार्टस बनवले. रियाझ आणि विवेक ने असेम्ब्ली त पुढाकार घेतला. मणिभाई, जे खरंतर कारचे सारथी, पण ते सुद्धा इक्विपमेंट तयार होईपर्यंत झटत होते. आणि डोक्यावर बर्फ ठेवून शिस्तबद्ध काम करणाऱ्या सलीम ने सुंदर कंट्रोल पॅनल बनवलं.
इक्विपमेंट खूप सुंदर झालं आहे. खूप वर्षांपासून पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात उतरलं आहे. स्पिंडल मेंटेनन्स या क्षेत्रात हे मशीन हंगामा करणार या बद्दल माझ्या मनात शंका नाही. कारण या प्रोसेस ने कस्टमर चे खूप पैसे आणि मुख्य म्हणजॆ मनस्ताप वाचणार आहे.
आणि बिझिनेस तर येईल च पण हे इक्विपमेंट म्हणजे सेटको च्या एकूणच टीम वर्क ची एक मिसाल असणार आहे. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पणे सेटको इंडिया चा प्रत्येक जण हे इक्विपमेंट बनवण्यात सहभागी झाला होता. आणि त्यामुळेच इन सिटू स्पिंडल टेपर ग्राइंडिंग इक्विपमेंट बनवणारी भारतातील पहिली आणि सध्या एकमेव आणि जगातल्या काही मोजक्या कंपन्यांमध्ये सेटको इंडिया चा समावेश झाला आहे. आणि हे बिरुद मिरवण्यात आम्हाला नेहमीच अभिमान वाटेल.
No comments:
Post a Comment