Monday 9 January 2017

सिल्व्हर ज्युबिली

तर झालं असं की माझ्या लग्नाला या वर्षी पंचवीस वर्षे झाली. हो, ते ऍक्टिव्हेट डीऍक्टिव्हेट च्या नादात ते फेसबुकवर टाकायचं राहून गेलं. अन पोरांच्या परीक्षेच्या नादात वैभवी विसरली. दोघांचे नाद वेगळे.

या पंचविसाव्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी काही तरी आणायचं ठरवलं. सगळ्यात पहिले वैभवी कडून माझ्यासाठी एक झकास लेदर बॅग मीच ऑनलाईन ऑर्डर करून टाकली. अन मी वैभवी साठी काही घ्यावं म्हणून वेस्टसाईड ला गेलो.

मॉल चालू होऊन दहा बारा वर्षे झालीत खरं तर. पण मला ती खरेदी काही अजून अंगवळणी पडली नाही आहे. पण इथे मनाचा हिय्या करून घुसलो.

काही ड्रेस घ्यावा म्हणून मी वूमन सेक्शन ला गेलो तर पहिले अंतर्वस्त्रांचा विभाग. मी त्यातून अंग चोरून ड्रेस सेक्शन कडे जात असतानाच एक साधारण साठीच्या बाईने इतका तिरस्कारयुक्त कटाक्ष माझ्याकडे टाकला की मी खाल मानेनं तिथून बाहेर सटकलो. (हा कटाक्ष म्हणजे द्रौपदीने मयसभेत दुर्योधनाकडे जसा टाकला असेल तसा इति: जयंत)

मग मी माझा मोर्चा कॉस्मेटिकस विभागाकडे वळवला. सगळ्यात पहिले तर थंडीत स्विमिंग पूल वर आपण पाण्याच्या तापमानाचा अंदाज घेतो तेव्हा जसं पुलभोवती चक्कर मारतो तसा मी अंदाज घेत त्या सेक्शन ला प्रदिक्षणा मारल्या. माझी घालमेल बघून एक सुहास्य वदना, अर्थात सुंदर, मला म्हणाली "sir, may I help you"

मी म्हणालो "ताई, मला ह्या ज्या सगळ्या बाटल्या आहेत त्यापैकी फक्त लिपस्टिक्स माहित आहे. बाकी मेक अप साठी जे सामान लागतं त्याबद्दल मला फार माहिती नाही आहे. तूच मला समजावून एक सेट बनवून दे"

मग तिने विचारलं "मॅडम चं कॉम्पलेक्शन कसं आहे"

मी म्हणालो "गोरी आहे, पण तुमच्या पेक्षा कमी" यावर ती झक्क लाजली. तिने मग सात आठ मेक अप च्या गोष्टी काढून दिल्या. पण त्यात परफ्युम नव्हता.

परफ्युमसाठी तिने बाजूच्या सेक्शन मध्ये नेलं. तिथल्या माणसाने चार पाच परफ्युम च्या बाटल्या हुंगवल्यावर मला एक कॉफी बीन्स ची बाटली हुंगायला दिली. मी बीन्स चा वास घेण्याऐवजी कॉफी हातात घेऊन इथे ग्राइंड करून कॉफी वगैरे मिळते का हे इकडे तिकडे पाहू लागलो. ते पाहून तिथल्या गौरांगना ग्राहक फिस्कन हसल्या. मला चूक उमगली अन त्या सेल्समन चा माझ्याकडे पाहण्याचा दर्याद्र भाव पण दिसला.

लो रिअल च्या कोस्मटीक्स अन तो फ्रेंच परफ्युम याचं बिल पाहून मला झीट आली. मी परत कॉफी बॉटल मागवली अन हुंगली तेव्हा शुद्धीवर राहिलो.

सगळं घेऊन घरी आलो अन बिलाचं दुःख विसरत वैभवीला ऐटीत तो मेक अप बॉक्स दिला. तर तिने पहिला प्रश्न विचारला "किती उडवले". मूड प्रसन्न रहावा म्हणून मी तिला "किंमत काय विचारतेस?लग्नाचा पंचविसावा वाढदिवस....." वगैरे सांगितलं. "बरं ठीक आहे. उद्या नील चा मॅथ्स चा पेपर आहे. तो जास्त महत्वाचा आहे, मी हे नंतर बघते". आमची अर्धांगिनी वदली.

जे काही आहे ते असं आहे अन छान आहे.

(लग्नाच्या वाढदिवसाची पोस्ट आहे, त्यामुळे मॉल मधल्या ताईशी मारलेल्या काल्पनिक गप्पा इथे लिहीत नाही)

No comments:

Post a Comment