Monday 9 January 2017

डुक्कर

परवा एकदम फिल्मी सिन घडला.

मी मॉर्निंग वॉक घेताना आझादनगर एरिया तुन चालत होतो. थोडा खडबडीत रस्ता चालू झाला अन मला एका डुकराच्या पिल्लाचा किंचाळण्याचा आवाज आला. दहा पावलं चालल्यावर मला उजवीकडचं ते भीषण चित्र दिसलं.

एक डुकराचं पिल्लू जमिनीवर गडबडा उलटं पालटं होऊन लोळतंय अन सहा सात भटकी कुत्री जीव तोडून त्याच्यावर तुटून पडली आहेत. अत्यंत त्वेषाने ती कुत्री त्या डुकराच्या पिलाचा जीव घेण्यास उतावीळ झालीत अन त्या भीतीने ते पिल्लू असहाय्य होऊन ओरडतंय.

त्या कुत्र्यांवर दगड भिरकावण्यासाठी मी एखादा दगड शोधत असतानाच एक विस्मयकारी घटना घडली.

डावीकडच्या झाडीतून तीन एक अशी बलदंड डुकरं माझ्या समोरून त्या कुत्र्यांवर चाल करून गेली. डोळ्यांची पापणी लवते न लवते तोच ती तीन डुकरं त्या कुत्र्यांवर मोठ्याने आवाज करत कुत्र्यांना ढुशी मारू लागली.

बाजी पालटली. आता भीतीने बोंबलायची पाळी कुत्र्यांची होती. xडीला पाय लावून त्या कुत्र्यांची इकडे तिकडे पांगापांग झाली.

ते डुकराचं पिल्लू आता धापा टाकत, पण जीव वाचल्याच्या आनंदात खाली मान करून उभं होतं.

आणि ते तीन डुकरं डोळ्यातून अंगार बरसंवत त्या पिलाला मधोमध ठेवत त्याच्या भोवती गोलगोल फिरत होती. जणू म्हणत होती "हातच लावून दाखवा कुणी या पिल्लाला. फोडून काढू"

क्षणार्धात घडलं हे सगळं आणि मी स्तिमित होऊन सगळं बघत होतो.

माणसाला लागलेल्या दुर्गुणापासून डुक्कर जमात कोसो दूर आहे, हे पाहून डुकरांबद्दल मला अतीव आदर वाटू लागला.

No comments:

Post a Comment