Monday, 9 January 2017

जेव्ही

जयंत विद्वंस, फेसबुकवरील लेखक म्हणून एक परिचित नाव. जयंताची अन माझी ओळख कुठे अन कधी झाली हे लक्षात ही नाही. अर्थात ते लक्षात ठेवायची गरज पण नाही म्हणा. फेबु वरच्या त्याच्या ओळखीपलीकडे त्याचे गुण काही जणांना माहिती असतील त्यापैकी मी एक. त्याचा सगळ्यात हेवा वाटणारा गुण म्हणजे त्याचं कोटीभास्कर असणं. कोट्या म्हंटल्या की आपल्याला पु ल आठवतात. पण त्या कोट्या पुस्तकात वाचलेल्या. पण जयंतच्या कोट्या याची देही याची डोळा ऐकण्याचा योग्य बऱ्याचदा आला. आता या पुस्तकाच्या संदर्भात त्याने पहिला फोन केला तेव्हा त्याची सुरुवात "नमस्कार, आमचे बोलविते धनी" अशी झाली.

दोन वर्षाखाली सूर्य शिबिराला आम्ही जमलो होतो. जयंताला काही स्विमिंग पूल मध्ये पोहायला यायचं नव्हतं. जय दुसाने आग्रह करत त्याला म्हणाला "अहो पोहू नका. नुसतं काठावर बसून आम्हाला पहा" एक सेकंद पण न दवडता जयंत म्हणाला "नको, परत तुम्हीच म्हणाल जयंत आम्हाला पाण्यात बघतो"

स्पष्टवक्तेपणा हा जयंताचा दुसरा गुण. तो काही आवडलं नाही तर फटकन बोलून मोकळा होतो. मैत्रीत जास्त वाहवत जात नाही आणि वाद जास्त चिघळत ठेवत नाही.

त्याच्या अन माझ्या कार्यबाहुल्यामुळे आम्ही काही फार भेटत नाही एकमेकांना. पण जेव्हा भेटतो तेव्हा मैफल सजलेली असते. तो स्वतः वन लायनर टाकतो. पण त्याचे कान अन डोळे बाकीच्यांना न दिसणाऱ्या गोष्टी टिपत असतात. जेव्हा त्याचा निरोप घेतो तेव्हा पुढचे दिवस मनात हास्याची कारंजी उडत राहतात. अन मग तो त्याच्या शैलीत कुणाला चिमटे काढत, कधी हसवत तर कधी अंतर्मुख करत त्याचा वृत्तांत उतरवतो तेव्हा एक ट्रीट मिळते.

१ जानेवारी ला हा फेसबुकचा लेखक अन मित्र अधिकृतरित्या    "लेखक जयंत विद्वंस" असा ओळखला जाईल याचा मला मनस्वी आनंद होत आहे. अन त्या कार्यक्रमाचा मी बोलका साक्षीदार असणार आहे याचं अप्रूप ही.

(ले. जयंत विद्वंस असं लिहिणार होतो, पण "हे म्हणजे लेट जयंत विद्वंस का?" अशी जयंताने अभद्र कोटी केली असती म्हणून मग लेखक जयंत विद्वंस असं एडिट केलं)

No comments:

Post a Comment