Monday, 9 January 2017

निरोप

मी दोन जॉब केले, एक एस के एफ आणि दुसरा रोलॉन हायड्रॉलिक्स. त्यात एस के एफ समुद्र होता अन मल्टिनॅशनल. माझ्यासारखा झिंगुर आला काय अन गेला काय त्यांना काही फरक पडला नसेल. पण रोलॉन मी जॉईन केली तेव्हा स्टार्ट अप व्हेंचर होतं अन मी जॉब सोडला तेव्हा आठ वर्षात चार लोकांचे ३० झालो होतो. थोडा आत्मस्तुतीचा धोका पत्करून सांगू इच्छितो की रोलॉन ची आठ वर्षे मी सेल्स मध्ये नंबर वन होतो. (बाकी आत्मस्तुतीचा धोका मी रोज च घेतो इथे). मी राजीनामा दिला तेव्हा माझा मॅनेजर बोनी पॉल म्हणाला "अरे राजेश, कसले वांदे होतील राव, तुझी रिप्लेसमेंट शोधायला. एरिया इतका डेव्हलप झाला आहे अन माणूस नाही"

मी बोनी ला सांगितलं "हे बघ, मी काही दुसरा जॉब करत नाही. तुला माणूस मिळेपर्यंत मी थांबतो. इतकंच नाही तर तुला माणूस पण मी शोधून देतो. अन माझी रिप्लेसमेंट इतकी अवघड नाही रे. एक नाही पाच लोकं उभे करू आपण. तू सिलेक्ट कर मग"

बोलल्या प्रमाणे हॉटेल सेंट्रल पार्क मध्ये इंटरव्ह्यू अरेंज केले. स्वतः जातीनं उभा राहिलो, अन अक्षरश: पाच हिरे शोधून दिले. अन बोनीला सांगितलं "निवड लेका कोण पाहिजे तो"

पुढे रोलॉन ट्रेलिबोर्ग झाली अन दोन वर्षाखाली बोनीने सोडली, पण तो जाईपर्यंत माझे ट्रेलिबोर्ग मध्ये सौहार्दाचे संबंध होते. इतकंच नाही तर त्या काळातल्या कस्टमर शी आज चौदा वर्षानंतर पण मी कॉन्टॅक्ट मध्ये आहे. 

एकंच सांगायचं होतं की निरोप घेणं पण एक कला आहे. घरातून पाय निघताना, टेलिफोनवर बोलताना, पार्टीतून जाताना किंवा जॉब सोडताना निरोप घेण्यात एक ग्रेस असला पाहिजे. आपण स्वागत हसतमुखाने करतो, बरोबर काम परत्वे वेळ मजेत घालवतो. त्यानंतर निरोप छान घेतला की माणसाबद्दल आत्मीयता दाटून राहते. सोडून गेलेल्या माणसाचे विचार मनात आले की एक सुखाची भावना, पोजिटीव्हीटी, किंवा हुरहूर अशी वाटली पाहिजे.

या जगातून पण एक्झिट घेतल्यावर लोकांनी आठवण काढल्यावर चांगल्या भावनांची उधळण व्हायला पाहिजे.  मग सार्थक होईल जगल्याचं.

No comments:

Post a Comment