Saturday, 11 April 2020

करोना विरुद्धची लढाई

करोनानंतर बिझिनेसचं स्वरूप काय असेल याबाबत बरेच तर्क वितर्क चालू आहेत. मी स्वतः याबाबतीत खूप आशावादी आहे. अन त्याचं कारण माझा या विषयावर खूप अभ्यास आहे अशातला भाग नाही आहे. मी फक्त इतिहासाचा संदर्भ घेतोय.

माझ्या माहितीत तीन चार अशा घटना आहे की ज्याने एखादा देश किंवा सारं जग ढवळून काढलं. त्या तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहेत. त्यामुळे येणारे काही आरिष्ट आर्थिक स्वरूपाचे होते तर काही अगदीच विध्वंसक नेचरचे होते.

१९१८ साली एक फ्लू आजाराने साऱ्या जगाला वेठीला धरलं होतं. १९३० साली अमेरिकेत ग्रेट डिप्रेशन आलं होतं. १९३८ ते १९४५ साली दुसरं महायुद्ध झालं. २००० साली ११/०९ झालं. आणि २००८ साली सब प्राईम मुळे जगाच्या अर्थ व्यवस्थेला हादरे बसले. जपान मध्ये काही वर्षांपूर्वी त्सुनामी आली.

तुम्ही जर इतिहासातील या घटनांचा धांडोळा घेतला तर प्रत्येक घटनेनंतर जग किंवा देश अधिक जोमाने कामाला लागलं आणि असंख्य चांगल्या गोष्टी घडल्या.

उदाहरणासाठी आपण दुसरं महायुद्ध घेऊ यात. कारण या महायुद्धात आतासारखं सारं जग ओढलं गेलं होतं. अर्थात करोनाविरुद्ध लढाई बऱ्याच देशांनी लढायची आहे. पण १९४५ ला दुसरं महायुद्ध संपलं आणि जगातले बरेच देश हे संपन्नतेच्या मार्गावर लागले. अमेरिका ने ग्रेट डिप्रेशन नंतर कात टाकली आणि दुसऱ्या महायुध्दानंतर साराच युरोप आणि त्यातल्या त्यात जर्मनी आणि एशियातील जपान हे देश प्रगतीच्या घोड्यावर सवार झाले. या दुसऱ्या महायुद्धानंतर जगानेच एकंदरीत युद्ध या प्रकारचा धसका घेतला आणि आज ७५ वर्षे झालीत पण तितकं व्यापक आणि विध्वंसक युद्ध झालं नाही. करोना प्रकार तितका विध्वंसक होईल का तर कदाचित आर्थिक बाबीवर होईल पण मनुष्य हानी तितकी होणार नाही असं वाटतं. नव्वदीत आखाती देशात युद्ध झालं पण त्याचं कारण आणि आवाका हा वर्ल्ड वॉर २ पेक्षा छोटा होता.

२००० साली अमेरिकेत ११/०९ झालं. त्यानंतर गेली २० वर्षे दहशतवादाच्या मायनर घटना सोडता अमेरिकेत दहशतवादामुळे मनुष्य हानी झाली नाही.

यावरून लक्षात येईल माणूस हा तसा खूप हुशार प्राणी आहे. तो जर काही संकट फेस केले तर त्याच्या अस्तित्वाची लढाई जोमाने करतो. अर्थात पृथ्वीची ताकद ही माणसापेक्षा खूप जास्त आहे. तिच्या मनात येईल तेव्हा माणसाचं असणं हे काही क्षणात ते नसणं करू शकते. पण माणूस नावाच्या प्रजातीला आपलं अस्तित्व राखण्याचा हक्क आहेच.

मला असं वाटतं  की करोना विरुद्धची लढाई मनुष्य प्रजाती निकराने लढेल आणि जिंकेल ही. आणि त्यानंतरही काही अशा गोष्टी उदयाला येतील की ज्याने परत असं संकट किमान पुढचे दोन दशकं येणार नाही आणि आलंच तर त्याच्याशी दोन हात करायची तयारी असेल.

(जगाच्या संदर्भाशिवाय आपल्या भारत देशात पण काही संदर्भ आहेत. पण मी ते मुद्दाम दिले नाहीत कारण त्याला लागलीच आपल्या धार्मिक आणि राजकीय अस्मितेशी सांगड घालून आजकाल धुळवड साजरी होते. म्हणून मी त्याचा उल्लेख टाळला) 

No comments:

Post a Comment