Thursday 23 April 2020

चीन

ज्या देशांनी चीन मध्ये खूप गुंतवणूक केली आहे, ते देश चीन मधून पाय काढता घेण्याच्या विचारात आहे, आणि उत्पादन करण्यासाठी ते नवीन देश शोधत आहेत अशा खूप बातम्या धडकत आहेत. भारताला या बाबतीत नक्कीच संधी आहे. आणि का नसावी? जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे, शिक्षित तरुणाई उपलब्ध आहे, आपली अकौंटिंग पद्धत जगमान्य आहे आणि बँकिंग पद्धत ही तगडी आहे, आपलं कम्युनिकेशन इन्फ्रास्ट्रक्चर हे वर्ल्ड क्लास आहे, लेबर कॉस्ट ही चीनच्या १/३ आहे.

तरीही आपण सध्याच्या परिस्थितीत जगाचा उत्पादक म्हणून चीनला सशक्त पर्याय होऊ शकतो का यावर प्रश्नचिन्ह उभं रहावं अशी परिस्थिती आहे. 

साम्यवादी देश आणि अन एथिकल वर्क प्रॅक्टिसेस ची काळी किनार असली तरी चीनने गेल्या तीन दशकात एक उत्पादक म्हणून प्रचंड मुसंडी मारली आहे. आणि त्याला पर्याय म्हणून भारतच नव्हे तर इतर कुठल्याही देशाला उभं राहणं ही अशक्य नसली तरी प्रचंड अवघड बाब आहे. अगदी भारताचा विचार केला तर तब्बल ८७ बिलियन डॉलर्स चा द्विपक्ष व्यापार आहे, त्यापैकी ७० बिलियन डॉलर्सच्या गोष्टी आपण चीन कडून विकत घेतो जे आपल्या एकूण आयातीच्या १३.७% आहे. भारतात इतर देशातून आयात केलेल्या गोष्टीत काही चायनीज प्रॉडक्टस असतात. एकूण गोळाबेरीज करता वार्षिक १५० बिलियन डॉलर्सच्या आसपास आपण चायनीज प्रॉडक्टस आयात करत असू. आणि यात मोबाईल फोन्स, व्हाईट गुड्स, सॉफ्ट टॉईज, ऑटो पार्ट्स, पॉवर जनरेशन इक्विपमेंट, फार्मा मटेरियल अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. त्याला पर्याय उभा करायचा असेल तर ही एखाद दोन वर्षाची बाब नसून पुढचं पूर्ण दशक भारताने अनेक पातळीवर बाब केलं तर ते होण्याची शक्यता असेल. 

जेव्हा कधी म्हणून चीन ने भारताच्या विरुद्ध कुरापत केली की देशभक्तीचा पूर ओसंडून वाहतो. यावेळेस तर भारतच नव्हे तर पूर्ण जगात चीनच्या विरुद्ध वातावरण तयार झालं आहे. पण असं असलं तरी चीनने आपले पाय अनेक देशात भक्कम पणे नसले तरी पसरले आहेत. नुकतं पीपल बँक ऑफ चायना ने एच डी एफ सी मध्ये १. ७५ कोटी शेअर्स घेतल्यावर आरडाओरड झाली. पण जी एम जी हेक्टर गाडी आपण कौतुकाने मिरवतो ती चायनीज कंपनी आहे आणि तिने भारतात रु ५००० कोटी ची इन्व्हेस्टमेंट केली आहे. चीनमधल्या ऑटो कंपनीने, तळेगाव स्थित जी एम प्लांट विकत घेतला आहे. ज्या झूम ची सध्या हवा आहे तिचा फाउंडर जरी अमेरिकन नागरिक असला तरी तो चायनीज आहे.

"जगासाठी उत्पादक देश" ही बिरुदावली मिरवणं हे अभिमान वाटण्याजोगं आहेच पण त्याची व्याप्ती खूप मोठी आहे. देशाच्या तिन्ही घटकांनी स्वतःमध्ये बदल करण्याची नितांत गरज आहे. आणि ते तीन घटक म्हणजे वैयक्तिक पातळीवर, सामाजिक पातळीवर आणि देश/शासनाच्या पातळीवर हे बदल आवश्यक आहेत.

वैयक्तिक पातळीवर म्हणाल तर देशातील प्रत्येक माणसाने विचार करण्याच्या पद्धतीत बदल आणणं गरजेचं आहे. "मी" "माझा" या  पलीकडे विचार, गुणवत्तेची पातळी आणि वैयक्तिक उत्पादकता अनेक पटीने वाढवणे ही येणाऱ्या काळाची गरज असणार आहे. आणि या गोष्टींबरोबर मूल्याधिष्ठित जीवनप्रणाली अंगीकारली तर ह्या येणाऱ्या संधीचं सोनं करत देशाचा सर्वांगीण विकास होण्यात हातभार लावण्याची संधी प्रत्येक भारतीयाला मिळेल यात काही शंका नाही.

एकेकाळी उद्योजकतेचं माहेर असणाऱ्या या देशाच्या समाजाची आजची संरचना मात्र आज उद्योगपूरक आणि नावीन्यतेचा ध्यास धरणारी नाही आहे. इतिहासाच्या बाष्कळ प्रेमात बुडलेला आणि धार्मिक व जातीयवादात अडकलेला हा समाज नाविन्यपूर्ण कल्पनेचा उदोउदो करत नाही. आणि एखादी कल्पना अपयशी ठरली तर तिच्या निर्मात्याला आपण गुन्हेगार समजतो. धोका पत्करणे, त्याला काउंटर करण्यासाठी प्लॅनिंग करणे आणि सरतेशेवटी धोका घेऊन मारलेल्या उडीतून सही सलामत बाहेर पडणे या प्रोसेस ला समाज शहाणपण म्हणून स्वीकारत नाही. तर दुसऱ्या बाजूला माझ्यासारखे एस एम इ उद्योजक सुद्धा जगाच्या दृष्टीने आपल्या देशाचा ब्रँड हा स्वीकारार्ह नाही हे लक्षात घेत नाही आणि तो करण्याच्या दृष्टीने काही पावलं उचलत नाही.

आणि सरतेशेवटी एक देश म्हणून उद्योजकतेला प्रमोट करण्यासाठी अजून जोमाने प्रयत्न करावे लागणार आहेत. व्यवसाय पूरक देश म्हणून गेल्या काही वर्षात आपण जबरदस्त प्रगती केली आहे. इंडेक्स च्या लिस्ट वर १३० च्या आसपास असणारा आपला देश ६३ वर येऊन पोहोचला आहे. पण चीन सारखी अद्भुत उत्पादकता आणायची असेल तर व्यवसाय पूरकता अजून वाढवायला हवी. छोटे इंडस्ट्रियल पार्क्स, फायनान्स ची उपलब्धता, कस्टम्स आणि इतर टॅक्स स्ट्रक्चर, डिजिटल डिव्हाइड कमी करणे या क्षेत्रात प्रचंड सुधारणा अपेक्षित आहे. या करून व्हायरस प्रकरणात ज्या पद्धतीने व्यावसायिकांना इंस्ट्रक्शन्स देण्यात आल्या त्या अनाकलनीय होत्या. शासनाने उद्योगाला सहकारी म्हणून बरोबर घ्यावं लागणार आहे. मनुष्यबळ विकास आणि शिक्षण या दोन्ही मंत्रालयाला गृह किंवा संरक्षण मिनिस्ट्री इतकं महत्व असणं ही भविष्याची गरज आहे.

थोडक्यात उद्योजकतेच्या त्रिकोणाच्या तिन्ही कोनांनी, म्हणजे वैयक्तिक/सामाजिक/राष्ट्रीय, आपल्या स्किलसेट्स ला धार लावण्याची गरज आहे. मागे सुद्धा मोबाईल फोन उत्पादन करण्याचा मोठा ड्राइव्ह आला होता. पण कार्बन किंवा मायक्रोमॅक्स चं निशाण फार जोमाने फडकताना दिसत नाही. किंवा तो १००० रु चा मोबाईल वाला पण गायब झाला आहे.

संधी दाराशी आली आहे. आणि त्याबद्दल आशावादी असावं अशी जागतिक परिस्थिती पण आहे. तिचं सोनं करण्यासाठी सनातनी काम करण्याच्या पद्धती, रुढात्मक विश्वास आणि तथाकथित शहाणपणा याला तिलांजली देऊन एक नवीन भारताची चळवळ उभारावी लागेल. अन्यथा ही चीन विरोधी लाट एक बुडबुडा म्हणून विरून जाईल आणि दोन वर्षानंतर परत आपले लोक काही पैसे वाचतात म्हणून घरं सजवण्यासाठी चीन वरून फर्निचर कंटेनर भरून आयात करतील.












No comments:

Post a Comment