डिप्लोमा होताना वडील सारखे म्हणायचे की हे संपलं की मएसईबी मध्ये जनरेशन ला लावून टाकतो. कसाबसा मला डिप्लोमा ला फर्स्ट क्लास मिळाला आणि आईबाबांच्या मनात मला बीई करण्याचं आलं आणि सांपत्तिक स्थिती फार चांगली नसताना त्याकाळी नवखं असणाऱ्या प्रायव्हेट कॉलेज मधून बीई झालो. तेव्हाही बाबांच्या मनात होतं की मी एमएसईबी मध्ये जनरेशन ला जॉईन व्हावं. पण माझ्या डोक्यात "करेन तर प्रायव्हेट नोकरी" हे खूळ कुठून डोक्यात आलं हे मला आजपर्यंत उमगलं नाही आहे. आणि तो पगडा इतका की माझा मित्र मंगेश पाठक केंद्र सरकारच्या सी आय आर टी या डिपार्टमेंट ला लागला तेव्हा मी त्याला ही सरकारी नोकरी सोडून खाजगी नोकरी कर असा न मागता बिनकामाचा सल्ला द्यायचो.
पुढे ज्या पद्धतीने मंगेशची सी आय आर टी मध्ये कारकीर्द फुलत गेली, त्याने मला त्याचा अभिमान तर वाटतोच पण आज पन्नाशीत जेव्हा मी माझ्या वागणुकीचा विचार करतो तेव्हा मला हसायला येतं. शासकीय नोकरीला कमी लेखण्याची माझी विचारधारा किती तकलादू होती हे आज प्रकर्षाने जाणवतं.
प्रायव्हेट जॉब आणि सरकारी जॉब याची तुलना करताना काय गमावलं आणि काय कमावलं याची जर गोळाबेरीज केली तर उत्तरात फार तफावत येत नाही. किंबहुना मूर्त आणि अमूर्त गोष्टींचा विचार केला तर चिमूटभर श्रीमंतीच्या बदल्यात मूठभर मेंदूची शांतता आणि दोन हाताच्या कवेत मावतील इतके आयुष्याचे सुनहरे क्षण मी मिस केले असं बऱ्याचदा वाटतं. प्रायव्हेट जॉब आणि पर्यायाने मी व्यावसायिक झालो पण या प्रवासात मी जे टक्के टोणपे खाल्ले, धोके पत्करले ते सरकारी नोकरीत करावे लागले असतेच असं वाटत नाही.
याबाबत माझं आणि माझा मित्र संतोष देशपांडे यांची नेहमी चर्चा होते. बी एस एन एल मध्ये चौतीस वर्षे नोकरी करून त्याने नुकतीच व्ही आर एस घेतली. त्याला माझ्या धंद्याबद्दल फार अप्रूप आणि कौतुकही. खुल्या मनाने तो बोलून पण दाखवतो. पण जेव्हा माझे टेन्शन्स आणि आडवेतिडवे ट्रॅव्हल प्लॅन बघून काळजी पण व्यक्त करतो. आणि असंही म्हणतो की आम्ही एकमेकांचे रोल चेंज केले तरी तितक्याच सहजतेने स्वीकारले पण असते. सरते शेवटी आम्ही दोघेही एकच निष्कर्ष काढतो, जे आयुष्य आपण निवडलं आहे त्याचं उत्तरदायित्व आपल्यावर आहे. ते इमानेइतबारे जगावं, एन्जॉय करावं. एकमेकांना चिअर्स करत पेग संपवतो आणि तो त्याच्या मार्गाला जातो अन मी माझ्या.
No comments:
Post a Comment